15 August 2020

News Flash

दरवळ मोगऱ्याचा !

‘‘आमच्या सहजीवनानं मला अधिक कणखर केलं तर अनिलला अधिक सौम्य केलं ही देवाण-घेवाण मला अर्थपूर्ण वाटते. उगाचच अपेक्षा करत बसायच्या नाहीत. त्यानं मला कधीच गजरा

| August 16, 2014 01:01 am

‘‘आमच्या सहजीवनानं मला अधिक कणखर केलं तर अनिलला अधिक सौम्य केलं ही देवाण-घेवाण मला अर्थपूर्ण वाटते. उगाचच अपेक्षा करत बसायच्या नाहीत. त्यानं मला कधीच गजरा आणला नाही. पण त्याला मोगरा आवडतो. मी दर उन्हाळय़ात एकदा तरी त्याच्यासाठी भरपूर मोगऱ्याची फुलं घेऊन येते. फुलं त्याने मला आणली काय न् मी त्याला आणली काय, सुगंधाचा दरवळ तर दोघांसाठीही असतो ना!’’ सांगताहेत लेखिका, ‘बालभवन’च्या संचालिका शोभा भागवत आपले पती, उद्योजक आणि ‘जीवनसाथ विवाह अभ्यास मंडळा’चे संचालक अनिल भागवत यांच्याबरोबरच्या ४४ वर्षांच्या सहजीवनाविषयी.
१९७० मध्ये आमचं लग्न झालं. या ४४ वर्षांच्या सहजीवनाकडे मागे वळून पाहताना मला बहरलेला वृक्ष, खजिना, खळाळता धबधबा, मोगऱ्याचा सुगंध, रिमझिम पाऊस असं काय काय आठवतं, डोळय़ासमोर येतं, दरवळत राहतं..
आमचं लग्न आम्ही ठरवलं ते फार मजेशीर पद्धतीनं. मी मुंबईत एम.ए. करत होते. अनिल आíकटेक्ट होऊन इंग्लंडला गेलेला होता. तो आणि माझा मोठा भाऊ एकत्र राहात होते. मी भावाला पत्र लिहायची ती अनिलही वाचायचा. त्याला ती आवडायची. भाऊ त्याला म्हणाला, ‘तूपण लिही तिला, तुला तिची पत्र आवडतात तर!’ आणि अनिलनी मला पहिलं पत्र लिहिलं. सुंदर अक्षर, भरपूर थट्टा-मस्करी, विनोदीच पत्र होतं. पत्र वाचूनच मी त्याच्या प्रेमात पडले. कित्येकदा मी ते सगळं पत्र मनाशी बोलून पहायचे. मग आमचा पत्रव्यवहार चालूच राहिला. तेव्हा फोन सहज करता येत नसत आणि कॉम्प्युटर्स नव्हतेच! एक पत्र यायला १५ दिवस! नंतर अनिल अमेरिकेत गेला तरी आमचा पत्रव्यवहार चालूच राहिला आणि पत्रातूनच आम्ही लग्न करायचं ठरवलं. त्यापूर्वी एकमेकांची अनेक प्रकारे ओळख करून घेतली.
 मी काही लग्न कसं करावं याबद्दल विचार केला नव्हता. पण अनिलची काही मतं, तत्त्वं ठाम होती. त्याचं म्हणणं लग्न अतिशय साधं करायचं, रजिस्टर करायचं, समारंभ नाही, देणं-घेणं नाही, दागदागिने नाहीत. काही नाही. मला ते मान्य होतं त्यामुळे तो भारतात येणार नाही, मीच परीक्षा झाल्यावर लगेच अमेरिकेत जायचं आणि तिथेच लग्न करायचं असं ठरलं होतं. यावर नातेवाईक, मित्रमंडळींच्यात बऱ्याच चर्चा झाल्या. काही लोक म्हणाले, ‘बघा बरं, तो फसवेल हिला.’ काही म्हणाले, ‘‘काही नको म्हणतो म्हणजे नक्कीच त्याच्यात काहीतरी दोष, व्यंग असेल.’’ काही म्हणाले, ‘‘असं मुलीला एकटीला पाठवू नका. तिकडे त्याचं लग्न झालेलं असलं तर ती काय करेल?’’ त्यात माझ्या भावाचं पत्र आलं. त्यानं लिहिलं होतं, ‘‘तुमचे दोघांचे स्वभाव जुळणारे नाहीत, तुम्ही लग्न करू नका.’’ मला मात्र अनिलशीच लग्न करायचं होतं. वडील म्हणाले, ‘‘तू ठरवशील तसं आपण करू. सगळय़ा गोष्टींचा विचार मात्र कर. पसे हा विचार नकोच. ते काय असतात उद्या नसतात. लग्न हा तात्पुरता करार नसतो, ती साता जन्मांची गाठ असते. तेव्हा तू ठरव.’’ वडील त्याच्या घरी जाऊन आले. त्यांना सर्वात कशाचा आनंद झाला तर अनिल नास्तिक असला तरी त्याची आई देवपूजा करत होती आणि आईला सात भावंडं आणि वडिलांना पाच भावंडं होती. अनिलच्या वडिलांचे विचार पुरोगामी होते आणि ते बोलायला, वागायला मोकळे होते. माझे वडील त्यांना म्हणाले, एखादा मुहूर्त पाहून आपण इथे साखरपुडा तरी करू. अनिल नसला तरी तुम्ही सगळे आमच्याकडे या. तसा साखरपुडा केला. त्याचे फोटो अनिलला पाठवले तर त्यानं लिहिलं, ‘‘मला हे काहीही मान्य नाही. आवडलेलं नाही. साखरपुडा तुझा झालाय, माझा नाही.’’
अनिलचा स्वभावच तीव्र आहे. तो त्याला न पटणाऱ्या, न आवडणाऱ्या गोष्टी निर्भीडपणे सांगत असतो. मी मात्र सौम्य आहे. मला आई-वडिलांचं कौतुकच होतं की, त्यांनी मला तिकडे पाठवायला नकार दिला नाही आणि अनिलच्या आई-वडिलांनी तर सगळी मदतच केली. हुंडा, देणं-घेणं, मानपान हे शब्दच कोणी उच्चारले नाहीत. उलट अनिलने विमानाचं तिकीट काढून पाठवूनही दिलं. या सगळय़ा पत्रापत्रीच्या, लग्न ठरल्यानंतरच्या काळात मी तर हवेतच तरंगत होते. मला मनासारखा जोडीदार मिळाला होता. सगळं अकल्पितच घडत होतं. लग्न ठरल्यामुळे झालेला असा आनंद आयुष्यभर साथ देतो असं मला वाटतं. माझी मुलगी आम्हाला म्हणते, ‘‘तुम्ही तर अजूनही एकमेकांच्या प्रेमातच आहात असं वाटतं.’’
आम्ही अमेरिकेत रजिस्टर्ड लग्न केलं. तिथली दोन वष्रे आनंदात आणि भरपूर कामात गेली. आम्ही आपापल्या नोकऱ्या सांभाळून संध्याकाळी एका मित्राबरोबर ‘इंडियन सुपर स्नॅक्स’ नावाचं छोटं रेस्टॉरंट चालवायचो. दोन वर्षांनी भारतात परत जायचं असं आम्ही ठरवलेलं होतं. भारतात परत जायची अनेक कारणं होती. अनिलला स्वतचा व्यवसाय करायचा होता, नोकरी करण्यात त्याला रस नव्हता. मला माझं क्षेत्र शोधायचं होतं. मुलं भारतातच वाढावीत असं वाटत होतं. शिवाय जवळच्या नातेवाईकांच्या सहवासाची ओढ होती. त्या काळात तरुण मुलं मोठय़ा प्रमाणावर इंग्लंड – अमेरिकेत स्थायिक होत होती. आमच्या माहितीत आम्ही दोघंच परत आलो आणि त्याबद्दल आम्हाला कधीही पश्चात्ताप झाला नाही.
परत येताना आम्ही स्वतच्या गाडीने वेगवेगळय़ा तीस देशांमध्ये आठ महिने फिरलो. आधी अमेरिका, कॅनडा नंतर जवळजवळ सर्व युरोपीय देशांत िहडलो. अनेक लोकांना भेटलो. विलक्षण अनुभव घेतले. प्रवास करताना निम्मा वेळ अनिलने गाडी चालवली निम्मा वेळ मी, त्यामुळे एकावर ताण आला नाही. हा प्रवास मला आमच्या पुढच्या सहजीवनाचा पाया वाटतो. कारण एकमेकांशिवाय कोणीही जवळ नव्हतं. काम भरपूर, आनंद भरपूर, प्रश्नही यायचे पण त्या सगळय़ात खूप मजा आली!
ग्रीसमध्ये अथेन्सला गाडी विकली आणि आम्ही भारतात परतलो, तेव्हा पोटात मुलगा शोनील होता. भारतात आल्यावर जगण्यालाच एक वेग आला. अनिलनं त्याचा व्यवसाय सुरू केला. शोनीलचा जन्म झाला. आम्ही पुण्याला राहायला आलो. दोन वर्षांनी मुलगी आभा झाली. मुलं झाल्यावर पाच वष्रे काही करायचं नाही असं मी ठरवलं होतं. त्याचा मुलांना उपयोग झाला. अनिल सतत कामात असायचा, पण त्याचं ऑफिस घरातच होतं त्यामुळे तो मुलांना भेटायचा. मुलं त्याच्या ऑफिसमध्ये चक्कर मारायची, त्यामुळे मुलं वाढत असताना मी घरात नसले तर अनिल येऊन-जाऊन असल्यामुळे मला मुलांची काळजी वाटली नाही.
माझ्या क्षेत्रातल्या काही ज्येष्ठ कार्यकर्त्यां नेहमी बोलताना म्हणत, तुझी मुलं चांगली निघाली याचं आम्हाला कौतुक आहे. तू जे समाजाला शिकवलंस तेच घरातही केलंस. घरात आपण जे बोलतो, वागतो, बाहेर जे काम करतो त्याचा मुलांवर कळत – नकळत परिणाम होत असतो. शोनीलचे मित्र शाळेत असताना मुलींना चिडवायचे तर शोनील त्यांना सांगायचा, मी मुलींची चेष्टा नाही करणार, मी त्यांच्याशी चांगली मत्री करणार, आणि तसं तो वागलाही. त्यानं एका ग्रीक मुलीशी लग्न केलं. तिचं नाव अनास्तासिया. तो म्हणतो अनास्तासिया आणि मी यांचे दोन तट नाहीत मी तिच्याच बाजूचा आहे. आम्ही पण तिच्या बाजूचे आहोत अशी ती आहे. मुलांच्या घराबरोबरच्या नात्याबद्दल तो म्हणतो, ‘‘समज मी एक झाड आहे आणि बाहेर पडल्यामुळे माझी चांगली वाढ झाली तरी मला फुलं येण्यासाठी घराकडेच माझी मुळं वळतात.’’ फुलं येणं म्हणजे आनंद. तो बायोडायव्हर्सटिीमधे डॉक्टरेट झाला तेव्हा आम्ही ऑक्सफर्डला गेलो. त्याच्या घरी राहिलो. त्याचं कौतुक केलं तेव्हा तो म्हणाला, डॉक्टर होणं म्हणजे काही फार मोठी गोष्ट नाही. फक्तआपल्याला कळतं आपलं अज्ञान किती आहे ते. तशीच आभा आर्टस्टि आहे. ती कॅलिफोíनयात एम.एस. करून आली. ती सांगत होती, ‘‘मला समोर दिसत असतं चित्र पण ते कागदावर तसं उठत नाही. त्यामुळे मला अस्वस्थता येते.’’
ही मुलं सतत वाढायला उत्सुक आहेत याचं मला विशेष वाटतं. ती दोघ लिहितातही चांगलं आणि बोलतात सहज. सून, जावई, नातवंडं हा आयुष्यातला खास आनंद असतो. तसा तो सध्या आम्ही अनुभवतो आहोत. मुलीकडे गेलं की तिचे दोन्ही मुलगे बिलगतात. छोटा तर आनंदानं नाचत असतो. आणि निघालं की मुलं हात धरून ठेवतात. दाराला आडवे हात धरून उभे राहतात आणि ‘नाही रे तुम्ही जायचं नाही. आता आम्ही तुम्हाला कध्धीच जाऊ देणार नाही. तुम्ही खूप दिवस राहायचं,’ असं म्हणतात तेव्हा धन्य वाटतं. एवढं प्रेम मुलंच करू शकतात. आमचा जावईही खूप जवळचा आहे.
 नवरा-बायकोचं लहानपण कसं गेलं त्याचा सहजीवनावर परिणाम होतो. मी तीन भावांनंतरची सर्वात धाकटी मुलगी. घरात मी सर्वाची लाडकी होते. वडिलांची तर विशेषच! शाळा – कॉलेजात हुशार. भावुक, साहित्याची आवड. कविता करणारी, लेखन करणारी, लहान मुलं आवडणारी, भरपूर मित्र-मत्रिणी असलेली आणि भिडस्त होते. आजही माझा मित्रपरिवार ही मला संपत्ती वाटते.
अनिल दोन बहिणींच्या मधला एकुलता एक मुलगा. तो खरा हुशार पण शाळेत अभ्यासात लक्ष नव्हतं, त्यामुळे आई-वडिलांचा खूप मार खाल्ला. एकदा फडके सर कुणाशी तरी बोलताना म्हणाले, अनिल खरा हुशार आहे, पण त्याला आपण अभ्यासाची गोडी नाही लावू शकलो. त्या एका वाक्यानं अनिल अभ्यासाला लागला आणि बदललाच. तो अतिशय व्यवस्थित आहे, आग्रही आहे. समाजकार्याची आतूनच आवड आहे. प्रवासाची, ट्रेकिंगची आवड आहे. कष्टाळू आहे. त्याला सतत कामात असायला आवडतं. त्याला व्यसन नाही, मित्र फार नव्हते, निवडकच होते. त्याचं वाचन खूप आहे. अर्ध जग िहडल्यामुळे तो नकाशे पण कादंबरीसारखे वाचत बसतो. एकंदरीत हा गुणी माणूस आहे. पण थोडा विक्षिप्तपण आहे. मी त्याला म्हणते, ‘तुझं नाव अनिल न ठेवता अधीर ठेवायला हवं होतं.’ एखादी गोष्ट ठरली की, ‘केव्हा एकदा’ ती होते असं त्याला होतं. वेळेच्या बाबतीत खूप काटेकोर.अशा माणसाबरोबर राहणं सोपं नसतं. आपल्याला तो निवांतपणा लाभू देत नाही. त्याला जगातले सगळे पदार्थ आवडतात, त्यामुळे रोज सकाळी आज नाश्त्याला काय आहे? असा त्याचा प्रश्न हमखास असतो. मात्र तो सगळं आवडीनं खातो, नावं ठेवत नाही. आम्हा दोघांना आमची कामं मनापासून आवडत होती आणि आहेत. त्याबद्दल आम्ही एकमेकांशी सगळंच बोलत असतो. त्यामुळे कामंही समृद्ध होतात. व्यवस्थापनाविषयी त्याचे सल्ले मला कायम मदत करायचे. तो त्याच्या धंद्यातल्या अनुभवांबद्दल मला सांगायचा. माझा सल्ला घ्यायचा. त्याच्या धंद्यात काही गंभीर प्रश्न निर्माण झाले होते तेव्हा मी त्याच्या सहकाऱ्यांशी मीटिंग्ज घेऊन प्रश्न सोडवायला मदत केली, कारण ते आम्हाला धाकटय़ा भावंडासारखेच होते. त्यांच्याविषयी माझ्या मनात प्रेमच होतं आणि त्यांनाही तेवढा विश्वास होता.
निवृत्तीनंतर अनिल आता आमच्या ‘जीवनसाथ विवाह अभ्यास मंडळा’त चांगलाच गुंतला आहे. खरं तर ते १७ वर्षांपूर्वीच त्याने सुरू केलं. आमची मुलं लग्नाची होती तेव्हा त्यांनी विचारपूर्वक लग्न करावीत अशा इच्छेने ते मंडळ सुरू केलं ते आता बरंच वाढलं आहे. अनिलने ‘विवाह व्यवस्थापन’ या विषयात डॉक्टरेटचा अभ्यास करून थीसिस लिहिला आहे. त्यानं विवाह समुपदेशनाचाही बराच अभ्यास केला आणि करत असतो.
‘जीवनसाथ’ मधल्या तरुण मुला-मुलींना त्याचा खूप आधार वाटतो. विवाह समुपदेशक म्हणूनही तरुण मुलं-मुली, त्यांचे कुटुंबीय त्याला भेटत असतात. गेले चार महिने तो ‘जीवनसाथ’च्या सतरा वर्षांच्या अनुभवांवर आधारित पुस्तक लिहितो आहे. तो पहाटे चारला उठून लिहायला सुरुवात करतो ते निदान बारा तास तरी लिहितो.
मी मुलं लहान असताना त्यांना प्राधान्य दिलं. पालक शिक्षणाचा अभ्यास आम्ही दोघांनीही केला आणि गेली तीस वष्रे अनेक ठिकाणी कार्यशाळा घेतल्या, व्याख्यानं दिली. ‘बालभवन’चं काम सुरू करण्यापूर्वी पाच वष्रे शैक्षणिक संशोधनात आणि दोन वष्रे स्त्री-प्रश्नांमध्ये मी काम केलं. कुठलंही काम मी जीव ओतूनच करते, त्यामुळे ‘बालभवन’चं काम हे माझ्या नुसतं आवडीचं नाही तर मला अत्यंत प्रिय आहे. माझ्या कामाच्या निमित्तानं अनेक संस्थांच्या संपर्कात मी आहे. त्यांची कामं मी हौसेनं करते. प्रत्येक कामाबरोबर आपला अनुभव वाढतो आणि काम अधिक समृद्ध होतं असा माझा अनुभव आहे. माझ्या कामाला अनिलने आणि मुलांनीही कधी आडकाठी घेतली नाही. उलट त्या तिघांनाही मी काय करते त्यात खूप रस असतो. मुलांची पण एकमेकांशी छान मत्री आहे. आभा तर मला आता चांगले सल्लेही द्यायला लागली आहे, तर मुलगा माझ्या दर वाढदिवसाला ‘रिटायरमेंट डय़ू’, ‘रिटायरमेंट ओव्हर डय़ू’ असे मेसेजेस पाठवतो.
माझ्या लेखनालाही अनिलनं खूप मदत केली आहे. माझं काही तातडीचं लिहायचं असलं तर मी त्याला सांगते, ‘उद्या सकाळचा चहा, नाश्ता तू कर, मी चारला उठून लगेच लिहायला बसणार आहे.’ तो ते आनंदानं करतो आणि माझा पहिला वाचकही तो असतो. सध्या तर बहुतेक वेळा सकाळचा चहा तोच करतो. मी नाश्ता तयार करत असले तर कांदा कापून देण्याचं काम त्याचं असतं. बाहेरची खरेदी  करतो. मला घरी यायला उशीर झाला तर तो अस्वस्थ होतो. तसं तर शंभर टक्के जुळणारं जोडपं नसतंच. माझ्या भावानं म्हटलं होतं तसे आमचे स्वभाव जुळणारे नाहीतच. तो तीव्र, मी सौम्य, तो निर्भीड, मी भिडस्त, मी संसारात, माणसात रमणारी, तो थोडा अलिप्त, मी तोंडातून शब्द बाहेर निघण्यापूर्वी दहा वेळा मनात विचार करणार, यानं समोरचं माणूस दुखावणार तर नाही! तो मनात येईल ते बोलून मोकळा होणार. तरी आमचं जुळतं!
भांडणं तर सर्वाचीच होतात. माझे आई-वडील त्याला अपवाद होते. त्यांची कधीही भांडणं झाली नाहीत. त्यामुळे लग्नानंतर आमच्यात मतभेद झाले की मला फार त्रास व्हायचा. घरी, शाळेत माझं फार कौतुक झालेलं, त्यामुळे आपण आहोत तसं आपल्याला दुसऱ्यांनी मान्य केलंच पाहिजे, करणारच असा माझा विश्वास होता. अनिलच्या परफेक्शनिस्ट स्वभावामुळे तर त्याला गोष्टी खटकायच्याच. मी त्याला म्हणायची, ‘तू घरात बॉस नाहीस, आणि मी तुझी असिस्टंट नाही.’ ते त्याला हळूहळू पटलं. त्याचे आग्रह हळूहळू कमी झाले आणि मला हे लक्षात आलं की तो अतिशय विश्वासार्ह आहे. डोळे मिटून त्याच्यावर विश्वास ठेवावा इतका तो सरळ आहे. पुरुष पशांवरून बायकोची कोंडी करतो, बाई सेक्सवरून. कधी उलटही, ते आम्ही कधीही केलं नाही, त्यामुळे त्या दोन्ही बाबतीत आम्ही समाधानी आहोत. फरक आहे तो संवेदनक्षमतेच्या पातळय़ांचा. आम्ही आपापल्या ठरवलेल्या क्षेत्रात अतिशय संवेदनक्षम आहोत, पण ती सगळी क्षेत्र कशी जुळणार? अजूनही खटके असतात, पण ते सौम्य झालेत आणि काही मतभेद हे आयुष्यभर संपतच नाहीत, त्यांची गाठोडी बांधून फळीवर टाकून द्यायची हेच खरं!
नवरा-बायकोच्या मनात एकमेकांबद्दल प्रेम तर हवंच, पण शिवाय एकमेकांविषयी आदरही वाटायला हवा. मनापासून कौतुक हवं, मग मतभेदात कटुता येत नाही. तसं आमचं आहे असं वाटतं आहे. अर्थात, दुसऱ्याला आदर वाटेल असं वागावंही लागतं.
आमच्या सहजीवनानं मला अधिक कणखर केलं, तर अनिलला अधिक सौम्य केलं ही देवाण-घेवाण मला अर्थपूर्ण वाटते. उगाचच अपेक्षा करत बसायच्या नाहीत. त्यानं मला कधीच गजरा आणला नाही. पण त्याला मोगरा आवडतो. मी दर उन्हाळय़ात एकदा तरी त्याच्यासाठी भरपूर मोगऱ्याची फुलं घेऊन येते. फुलं त्याने मला आणली काय न् मी त्याला आणली काय, सुगंधाचा दरवळ तर दोघांसाठीही असतो ना! हीच सहजीवनाची गंमत असते आणि तो सहजीवनाचा मंत्रही आहे!    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2014 1:01 am

Web Title: profile of shobha and anil bhagwat
Next Stories
1 गतिमंद मुलांची झोप
2 अहो आश्चर्यम्!
3 तिचं ‘कमबॅक’
Just Now!
X