19 August 2019

News Flash

वडिलांचा खंबीर आधार

वडिलांच्या मित्रांनी, नातेवाइकांनी त्यांना सल्ला दिला होता की आता याचे शिक्षण पुरे. तू त्याला तुझ्या मिलमध्ये चिकटवून घे, म्हणजे चार पैसे मिळवील व तुझ्या संसाराला,

| August 16, 2014 01:02 am

वडिलांच्या मित्रांनी, नातेवाइकांनी त्यांना सल्ला दिला होता की आता याचे शिक्षण पुरे. तू त्याला तुझ्या मिलमध्ये चिकटवून घे, म्हणजे चार पैसे मिळवील व तुझ्या संसाराला, कुटुंबाला हातभार लागेल. त्यांचा तो सल्ला त्या परिस्थितीत योग्यही होता, परंतु माझी घालमेल चालली होती. अशा वेळी शेवटी वडील माझ्यापाठी खंबीरपणे उभे राहिले आणि शेवटच्या दिवशी मी व्हीजेटीआयला प्रवेश घेतला. हाच माझ्या आयुष्यातला टर्निग पॉइंट ठरला.
मी आज जो कुणी आहे तो केवळ आणि केवळ वडिलांमुळे घडू शकलो, त्याची ही गोष्ट. माझे बालपण खार पूर्वेच्या एका झोपडपट्टीवजा चाळीत गेले. १९५२ मध्ये वडिलांनी या चाळीत एक छोटी खोली भाडय़ाने घेतली. एप्रिल १९७७ पर्यंत आम्ही येथेच राहात होतो. गंमत म्हणजे आम्ही मुंबईत राहात असून डिसेंबर ७६ पर्यंत आमच्याकडे वीज आली नव्हती. पाण्याचा नळ बाहेरच होता. त्या परिसरात शौचालय असलेली अशी आमची एकमेव चाळ होती. माझा जन्म १९५७चा. आमच्या खोलीत आम्ही तीन भाऊ, आई-वडील, आजी-आजोबा, ५ आत्या, एक काका, एक मावसभाऊ  व एक मावसबहीण राहात होतो. त्यामुळे आम्ही अधिक येणारा पै-पाहुणा आणि त्याचबरोबर गावाहून येणारी व दुसरी सोय होईपर्यंत सहा महिने ते दोन वर्षे अशी विविध कारणांनी वेगवेगळ्या वेळी राहून गेलेली सुमारे ३५-३६ माणसे या खोलीत राहात होतो. वडील मिल कामगार होते. अशा परिस्थितीमुळे घरखर्चाला हातभार लावण्यासाठी आम्ही तीन भाऊ  व मावसभाऊ  ‘पेपर-लाइन’ टाकत असू.
चाळीत अठरापगड जातीचे लोक राहात होते. त्यात फिल्म लाइनमधील लोकांपासून ताशे-वाजंत्री वाजविणारे ते गुंडांच्या दादापर्यंत सर्वच होते. चाळीत वीज नसली तरी हा दादा कुठूनही जोडणी घेऊन २४ तास कर्णे लावून संगीताचा रतीब घालत असे. वडील दिलदार असल्यामुळे आमच्याकडे सर्वानाच मुक्त प्रवेश होता. ते सर्वाना यथाशक्ती शैक्षणिक, शारीरिक व आर्थिक मदत करीत. तेच संस्कार आमच्यातही भिनले.
आम्ही चौघे भाऊ , एक आत्या व मावसबहीण शाळा-कॉलेजात जात होतो. परंतु, घरच्या दारिद्रय़ामुळे शैक्षणिक गरजा भागविणे खूपच कठीण जाई. त्यामुळे फी भरणे, पुस्तके विकत घेणे इ. कधीच जमले नाही. त्यासाठी आम्ही धर्मादाय संस्था, ग्रंथालये यांच्यावरच पूर्णपणे अवलंबून होतो. वडीलही वेळोवेळी कर्ज काढून आमच्या गरजा भागविण्याचा प्रयत्न करीत. आत्याचे व मावसबहिणीचे लग्न त्यांनीच कर्जे काढून करून दिली. घरात वीज नसल्यामुळे एका चिमणीभोवती आम्ही गोलाकार बसून अभ्यास करीत होतो. परंतु, पुढे इयत्ता वाढत गेल्यावर घरी अभ्यास करणे कठीण झाले. कारणे अर्थातच पुस्तकांचा, विजेचा अभाव आणि गुंड-दादाची कृपा.  आमच्या वेळी ११वी एसएससी व इंटर सायन्सला अ व इ असे दोन ग्रुप्स असायचे. अ ग्रुपचे विद्यार्थी फक्त इंजिनीअरिंग व इ ग्रुपचे फक्त मेडिकलला जाऊ  शकायचे. मी ५वीत असतानाच इंजिनीअर व्हायचे ठरवले होते. त्यामुळे ११वी नंतरचा अभ्यास शब्दश: म्युनिसिपालीटीच्या दिव्याखाली म्हणजे मधुपार्क नावाच्या बागेतील दिव्यांखाली बसून किंवा महाविद्यालयाच्या ग्रंथालयात बसून केला. १९७५ ला इंटर सायन्सच्या परीक्षेच्या वेळी महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचा संप झाला. ऐन परीक्षेच्या वेळी हा संप झाल्याने चांगलेच धाबे दणाणले होते. मी पूर्ण शैक्षणिक आयुष्यात कधीच पुस्तके विकत घेऊ  शकलो नाही. त्यासाठी माझी पूर्ण मदार ग्रंथालयावरच होती. सुमारे १५ दिवस हा संप होता. त्या काळात मी आणि भाऊ  आम्ही महाविद्यालयाच्या पायरीवर बसून अभ्यास केला. मी वर्षभर अभ्यास करीत असल्याने या संकटावरही मात करून इंटर सायन्स अ ग्रुपला ६५ टक्के मार्क्स मिळवले.
 त्याकाळी इंजिनीअरिंगची दोनच महाविद्यालये मुंबईत होती, एसपी आणि व्हीजेटीआय. एसपीला ५५ टक्के व व्हीजेटीआय ५९ टक्के मार्काचे कट-ऑफ होते. इंजिनीअरिंगला प्रवेश घ्यायचा शेवटचा दिवस जवळ येत होता. मला व्हीजेटीआयला प्रवेश घेण्याची प्रबळ इच्छा होती, पण वडिलांच्या मित्रांनी, नातेवाइकांनी त्यांना सल्ला दिला होता की आता याचे शिक्षण पुरे. तू त्याला तुझ्या मिलमध्ये चिकटवून घे, म्हणजे चार पैसे मिळवील व तुझ्या संसाराला, कुटुंबाला हातभार लागेल. त्यांचा तो सल्ला त्या परिस्थितीत योग्यही होता. परंतु, माझी घालमेल चालली होती. अशा वेळी शेवटी वडील माझ्यापाठी खंबीरपणे उभे राहिले आणि शेवटच्या दिवशी मी व्हीजेटीआयला प्रवेश घेतला. हाच माझ्या आयुष्यातला टर्निग पॉइंट ठरला अन्यथा मी फक्त मिल कामगारच झालो असतो.
आम्हाला मार्गदर्शन करणारे कुणीच नसल्यामुळे मी एकदा आयएएसच्या मुलाखतीच्या टप्प्यापर्यंत जाऊन आलो, तेही नोकरी सांभाळूनच. पण इंजिनीअर झाल्यावर मी त्या वेळी नवीन असलेल्या संगणक क्षेत्रात प्रवेश केला. नारायण मूर्ती, नंदन निलेकणी सारख्या दिग्गजांच्या हाताखाली काम केले. अमेरिकेत कामानिमित्त जाऊन आलो आणि आज बेस्ट उपक्रमात ईडीपी मॅनेजर(संगणक व्यवस्थापक) म्हणून निवृत्तीच्या मार्गावर आहे.
एक झोपडपट्टीतील मुलगा वडिलांच्या पाठिंब्यामुळे इथवर येऊन पोचला आहे. माझ्या आई-वडिलांना माझे शतश: प्रणाम!

First Published on August 16, 2014 1:02 am

Web Title: support from father a turning point of my life