ज्योती केळकर
मृणाल गोरे यांच्या राजकीय आणि सामाजिक कामात प्रथमपासूनच स्त्रिया अग्रस्थानी होत्या. त्या नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर या पाणीवाल्या बाईने स्थानिकांच्या पाणी प्रश्नाला प्राधान्य दिलं. गोरेगाव येथे ‘कुटुंब कल्याण केंद्र’ सुरू करून स्त्रियांना किती अपत्यं असावीत हे ठरवायचा जणू अधिकार दिला. स्त्रियांसाठी स्त्रियांनी चालवलेली ‘स्वाधार’ संस्था स्त्रीवरील अत्याचारावर उपाय ठरली, तर महागाईविरोधातील आंदोलनात या लाटणेवाल्या बाईने प्रत्येकीला स्वत:वरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला शिकवलं.

‘पाणीवाली बाई’, ‘लाटणेवाली बाई’, ‘रणरागिणी’ अशी लोकांनी आदराने बहाल केलेली बिरुदावली निभावणारं, लोकाभिमुख राजकारण करणारं, संघर्षाला भिडणारं, सत्याची आस धरणारं, निर्भीडता ठायी ठायी भरलेलं, ‘भारतीय संविधाना’च्या स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, लोकशाही, समाजवाद या मूल्यांवर दृढ निष्ठा ठेवणारं, ‘तुरुंग-मतपेटी आणि फावडे’ ही डॉ. राममनोहर लोहियांची त्रिसूत्री अंगीकारणारं, महात्मा गांधीजींच्या ‘सत्य-अहिंसा’ विचाराने प्रेरित होऊन नि:स्पृहतेने आपली राजकीय आणि सामाजिक कामाची कारकीर्द गाजवणारं विलक्षण विलोभनीय व्यक्तिमत्त्व म्हणजे मृणाल गोरे.

१९४२-४३च्या काळात ‘राष्ट्र सेवा दला’मध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घ्यायला सुरुवात केली. मैदानी खेळांसोबत बौद्धिके असायची. त्यातून ताईंची वैचारिक जडणघडण पक्की झाली आणि पुढची दिशाही ठरली. आपलं वैद्याकीय शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी पूर्णवेळ राजकीय व सामाजिक काम करायचं ठरवलं. १९४८ मध्ये ज्येष्ठ समाजवादी नेते केशव ऊर्फ बंडू गोरे यांच्यासोबत सहजीवनास सुरुवात केली. गोरेगाव त्यांचं कार्यक्षेत्र झालं. केशव गोरे यांची फार मोलाची साथ व मार्गदर्शन त्यांच्या राजकीय, सामाजिक कार्याच्या सुरुवातीला मिळालं. मृणालताईंच्या संपूर्ण कारकीर्दीत त्याचा ठसा पदोपदी दिसून येतो. मात्र केशव गोरे यांच्या अकाली मृत्यूने ही साथ अर्ध्यावरच सुटली. जो निर्धार सहजीवन सुरू करताना दोघांनी केला होता त्या निर्धाराची वाटचाल आयुष्याच्या अखेरपर्यंत त्या करत राहिल्या.

स्त्रियांना एकत्र आणण्याचं काम मृणालताईंनी सुरू करायचं ठरवलं. त्यांनी ‘गोरेगाव महिला मंडळा’सोबत कामास सुरुवात केली. मृणालताईंना वाटत असे स्त्रियांनी स्वत:च्या हितासाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडणं आवश्यक आहे. पण त्या येणार कशा? पदरात चार-पाच मुलं, घर-संसार, यात त्या बुडलेल्या. त्यावर त्यांचं स्वत:चं कुटुंब लहान असलं पाहिजे या विचाराने प्रेरित होऊन ‘महिला मंडळा’त त्यांनी स्त्रीरोगतज्ज्ञ असलेली मोठी बहीण डॉ. पद्मावती गुप्ते यांच्या सल्ल्याने गोरेगाव येथे ‘कुटुंब कल्याण केंद्र’ सुरू केलं.

हे केंद्र सुरू करण्यामागे स्त्री स्वास्थ्याचा आणि आपल्याला किती मुलं हवीत हे ठरवण्याचा अधिकार त्या स्त्रीला मिळायला हवा हा विचार होता. ‘महिला मंडळा’त त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या बरोबरीने बालसंगोपन, बालकांचा आहार, बालमृत्यूची कारणं, मातेचं आरोग्य अशा नानाविध विषयांवर प्रबोधनात्मक उपक्रम सुरू केलं. आरोग्य स्पर्धा, सुदृढ बालक स्पर्धा भरवल्या. घर-संसार सांभाळून स्त्रियांच्या हाती उपजीविकेचं साधन असावं या हेतूने माफक फी घेऊन शिवणवर्ग सुरू केले. ‘महिला मंडळा’च्या साप्ताहिक बैठकांमध्ये विविध विषयांवर चर्चा होत असत. पहिल्यांदा बुजणाऱ्या स्त्रिया हळूहळू बोलायला लागल्या.

१९५६ मध्ये लोकसभेत मंजूर झालेल्या ‘हिंदू कोड बिला’चं महत्त्व, त्याची उपयुक्तता सर्वसामान्य स्त्रियांपर्यंत, समाजापर्यंत पोहोचावी या उद्देशाने ‘गोरेगाव महिला मंडळा’ने गोरेगावमध्ये ३०-३५ सभा आयोजित केल्या होत्या. चीन युद्धाच्या वेळी भारत-चीन सीमावाद, युद्धाची कारणमीमांसा करणारे प्रबोधनात्मक कार्यक्रम वस्ती पातळीवर आयोजित केले होते. आपले सणवार, त्यांची उपयुक्तता व त्यातील दोष यावरही ‘महिला मंडळा’त चर्चा होत असे. आबा करमरकर यांची बहीण ताई परांजपे वयाने ज्येष्ठ. त्या प्रस्थापित पारंपरिक विचारापेक्षा वेगळा विचार मांडत असत.

मृणालताईंकडे कल्पक दृष्टी होती. त्यांनी चातुर्मासात प्रत्येकीने एका बाईला लिहायला-वाचायला शिकवायचं हे व्रत घ्यावं हा एक अभिनव विचार ताई परांजपे यांच्यामार्फत ‘महिला मंडळा’त मांडला होता. चातुर्मासाकडे बघण्याचा हा मार्ग अनेक जणींना भावला आणि त्यांनी तो अमलात आणला. त्यामुळे अनेक स्त्रियांना आपण काही तरी काम करतो याचं समाधान मिळालं आणि स्त्रिया लिहायला-वाचायला शिकू लागल्या.

मृणालताई आपलं कार्यक्षेत्र विस्तारू इच्छित होत्या. गोरेगावमध्ये त्या वेळी ग्रामपंचायत होती. मृणालताई ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या. या निवडणुकीच्या काळात पाड्यापाड्यांत फिरताना त्यांना स्त्रिया विहिरीवर पाणी भरताना आढळल्या. वस्त्यावस्त्यांमध्ये जाऊन तेथील प्रश्नांची पाहणी त्यांनी केली. स्त्रियांना संघटित केलं. आपले प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलं. ग्रामपंचायत पातळीवर पाण्याचा प्रश्न सोडवण्यात त्यांना यश आलं. या लढ्यात त्यांच्यासोबत असणाऱ्या स्त्रियांना आपले प्रश्न सोडवण्यासाठी एकीचं बळ असावं लागतं हे कळलं. प्रश्नांचा सखोल अभ्यास, मुद्देसूद मांडणी, पाठपुराव्यात सातत्य असलं की प्रश्न सुटण्यास मदत होते, याचा धडा स्त्रियांना मिळाला.

पुढे गोरेगाव मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट झालं. मृणालताई मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीस उभ्या राहिल्या. रात्री १२ वाजता प्रचार करून परत येताना त्यांच्यासोबत डॉ. राममनोहर लोहिया होते. दोघांचं लक्ष सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासाठी रांगेने मांडलेल्या हंडे, कळशा आणि बाजूला उभ्या असलेल्या स्त्रियांकडे गेलं. रात्री बारा वाजताचं हे चित्र बघून डॉ. लोहिया चक्रावूनच गेले. त्यांनी मृणालताईंना सांगितलं, ‘‘तू नगरसेवक म्हणून निवडून आलीस की पाण्याचा प्रश्न प्रथम हाती घे.’’ मृणालताई नगरसेवक म्हणून निवडून आल्या.

ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी पाण्याच्या प्रश्नाला प्राधान्य दिलं होतं. ग्रामपंचायतीमधील या प्रश्नांवरील कामाचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता. नगरपालिकेत निवडून आल्यानंतर त्यांनी वस्त्यावस्त्यांमध्ये फिरून पाण्याची समस्या जाणून घेतली. ‘समाजवादी पक्षा’तर्फे पाणी परिषद घेतली होती. बोरिवली तालुका मुंबई शहराइतकाच पाणी कर मुंबई महानगरपालिकेला भरतो तेव्हा मुंबई शहराइतकंच पाणी बोरिवली तालुक्याला मिळायला हवं. मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या या नवीन क्षेत्रात नवी जलवाहिनी टाकली गेली पाहिजे. या परिषदेच्या मुख्य मागण्या होत्या.

परिषद झाल्यानंतर ताईंनी आपल्यासोबत काम करणाऱ्या बाबूराव सामंत, मधू आडेलकर, कमलताई देसाई आदी कार्यकर्त्यांसह वस्तीवस्तीमध्ये जाऊन स्त्रियांना संघटित केलं. त्यांच्यामध्ये जागृती केली. त्यांना सोबत घेऊन पाणी प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केला. निवेदनं देणं, मोर्चा काढणं, वेळप्रसंगी घेराव घालणं इत्यादी माध्यमांद्वारे त्यांनी जनतेला पाणी मिळवून दिलं. अगदी स्वत:च्या पक्षातील कार्यकर्ते जे ‘प्लम्बिंग’मधील उत्तम जाणकार आहेत त्यांना सोबत घेऊन त्यांनी वस्तीवस्तीमध्ये पाण्याच्या पाइपलाइन्स टाकून घेतल्या. नि:स्पृहपणे केलेल्या या कामाची रास्त दखल जनतेने त्यांना ‘पाणीवाली बाई’ ही पदवी बहाल करून घेतली आणि पुढे तीच त्यांची ओळख झाली. बोरिवली तालुक्यातील अनेक ठिकाणी मृणालताईंनी पाण्याचा प्रश्न तडीस नेला.

झोपडपट्टीवासीयांचे प्रश्न पाणी प्रश्नाच्या वेळी फिरत असताना लक्षात आले होते. हा राजकीय आणि सामाजिक प्रश्न आहे याची जाणीव त्यांच्या मनात होती. मुंबई उपनगरात झोपडपट्टीत राहणाऱ्या या नागरिकांना नागरी सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी त्या आग्रही राहिल्या. मुंबईत नोकरीसाठी परप्रांतातून येणाऱ्या, या नगरीत आपल्याला भुके मरावं लागणार नाही याची खात्री असणाऱ्या, आपली उपजीविका शोधणाऱ्या लोकांचे लोंढे येत असत, अगदी आजही येतात. त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न फारच कठीण.

झोपडपट्टीत आसरा मिळवणं किंवा रस्त्यावर पथारी टाकायची हाच पर्याय. अशा अनेक झोपडपट्ट्या निर्माण झाल्या. या नागरिकांना स्वच्छतागृह, सार्वजनिक शौचालय या सुविधा मिळायला हव्यात आणि पाणीही मिळायला हवं यासाठी मृणालताई आग्रही राहिल्या. मालाडमध्ये झोपडपट्टी परिषद घेतली. हजारो स्त्री-पुरुष या परिषदेत सहभागी झाले होते. झोपडपट्टी परिषद घेऊन निवाऱ्याचा प्रश्न हाती घेतला. गोरगरिबांना मुंबईत स्वत:चं छोटं का होईना पण हक्काचं घर असावं या संकल्पनेतून लोकांच्या आर्थिक सहभागातून उभी राहिली ‘नागरी निवारा परिषदे’ची चळवळ.

लोकांना कमी खर्चात घरे बांधून मिळावीत म्हणून ‘सीलिंग अॅक्ट’खालील जमीन मिळवण्यासाठी केलेले संघर्ष, अविरत अथक प्रयत्न, यात अनेक स्त्रिया मृणालताईंच्या खांद्याला खांदा देऊन उभ्या राहिल्या होत्या. त्यातूनच दिंडोशी येथे उभी राहिली ६२०० संकुले असलेली नागरी निवारा वसाहत. ‘नागरी निवारा परिषदे’चं नेतृत्व करणाऱ्या मृणालताई, बाबूराव सामंत, कमल देसाई, कृष्णनाथ नेवरेकर, वसंत शिराळी, श्रीधर नाखरेकर, मधू आडेलकर यांचं कुणाचंही एकही घर या वसाहतीमध्ये नाही, असं हे नि:स्पृहपणे काम करणारे नेतागण.

१९७२ च्या काळात भारत, पाकिस्तान, बांगलादेश युद्धाची पार्श्वभूमी, पडलेला भीषण दुष्काळ, जीवनावश्यक वस्तूंची टंचाई, गगनाला भिडलेली महागाई यामुळे मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय, कष्टकरी, गरीब कुटुंबांतील स्त्रिया त्रस्त झाल्या होत्या. सर्वात प्रथम प्रमिलाताई दंडवते यांनी महागाईचा प्रश्न हा राजकीय आणि सामाजिक आहे यावर आंदोलन उभं राहिलं पाहिजे असा विचार एका सभेत मांडला.

समाजवादी पक्षाच्या मृणालताई, कमल देसाई, मंगल पारीख, कम्युनिस्ट पक्षाच्या अहिल्याताई रांगणेकर, मंजू गांधी, ‘भारतीय महिला फेडरेशन’च्या तारा रेड्डी इत्यादी सर्व डाव्या पक्षांच्या स्त्री कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन महागाईच्या प्रश्नावर आंदोलन करण्यासाठी ‘महागाई प्रतिकार संयुक्त महिला समिती’ स्थापन केली. मृणालताई या समितीच्या अध्यक्ष झाल्या. या समितीने सर्वसामान्य स्त्रियांना संघटित केलं. छोटे छोटे मेळावे, परिषदा घेऊन महागाईचा प्रश्न समजावून सांगितला. त्यांना लढण्याचं बळ दिलं. त्यांच्या सहकार्याने नवनवीन प्रतीकं वापरत हे महागाईविरोधातील आंदोलन गाजवलं.

थाळीनाद करून निदर्शनं केली, मोर्चात आलेल्या प्रत्येकीच्या हातात एक लाटणं घेऊन निघालेला अभूतपूर्व मोर्चा सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होता. निवेदनं देणं, मोर्चा काढणं, मंत्र्यांना घेराव घालणं, व्यापाऱ्यांवर धाडी घालणं, ठिय्या आंदोलन, अशी नानाविध माध्यमं वापरून स्त्रियांमध्ये एक वेगळाच जोश निर्माण केला गेला, जो आजही हयात असलेल्या स्त्रियांमध्ये, या इतिहासाची दखल घेतलेल्या आंदोलनकर्त्यांमध्ये आहे.

आपल्या कौटुंबिक तक्रारी व्यक्त करणारी स्त्रियांची शेकडो पत्रं मृणालताईंकडे येत. त्या सर्व पत्रांना उत्तरं देणं हे काम मृणालताई आवर्जून आपल्या स्त्री सहकाऱ्यांच्या मदतीने करत असत. या बाईचं व्यक्तिमत्त्व इतकं साधं होतं की या स्त्रिया पत्रातून आपलं मन सहजगत्या त्यांच्याजवळ मोकळं करायच्या. एका उच्चशिक्षित स्त्रीनंही मृणालताईंकडे तक्रार केली होती. ताईंनी ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्थे’च्या प्राध्यापिका मीनाक्षीताई आपटे यांच्या सहकार्याने स्त्रियांसाठी स्त्रियांनी चालवलेली ‘स्वाधार’ ही स्वतंत्र संस्था १९८३ मध्ये स्थापना केली. समुपदेशन केंद्र, वस्तीतील स्त्रियांमध्ये जाणीव-जागृती, प्रबोधन करणं हे प्रमुख काम. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या स्त्रियांवरील ‘अत्याचारविरोधी कृती समिती’मघ्ये ‘स्वाधार’चा मोलाचा सहभाग राहिला आहे. ‘महिला अत्याचारविरोधी कृती समिती’च्या नेतृत्वाची धुरा अनेक वर्षं मृणालताईंकडे होती.

निवडणुकीच्या राजकारणातून मृणालताईंनी साठीनंतर निवृत्ती घेतली होती, तरी त्या पक्षीय राजकारणात अध्यक्ष या नात्याने अनेक वर्षं कार्यरत राहिल्या होत्या. आमदार आणि विरोधी पक्षनेता असताना त्यांनी ‘विधानसभे’त महाराष्ट्रात स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांना वाचा फोडली होती. ‘महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी सभा’ या कामगार संघटनेचे अध्यक्षपद मृणालताईंनी १९९५ मध्ये स्वीकारलं आणि या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, त्यांच्या मानधनात वाढ मिळवून देण्यासाठी अविरत प्रयत्न केले. या मानधनकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतन मिळावं म्हणून संघर्ष केला. हजारो स्त्रियांना एकत्र येण्याचं बळ त्यांनी दिलं.

मृणालताईंच्या राजकीय आणि सामाजिक कामात प्रथमपासूनच स्त्रिया अग्रस्थानी होत्या. सामाजिक क्षेत्रात अनेक स्त्रिया झोकून देऊन अतिशय चांगलं काम करत आहेत, पण स्त्रियांनी पक्षीय राजकारणात प्रवेश केला तर चित्र थोड्याफार प्रमाणात बदलेल, अशी खात्री ग्रामपंचायत सदस्य ते संसद असा राजकीय प्रवास असणाऱ्या मृणालताईंना होती. या स्त्रिया पक्षीय राजकारणात येत नाहीत याचा सल त्यांच्या मानत कायम होता.

आपल्यासमोर उभ्या असलेल्या प्रश्नांचा अभ्यास करणं, प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणं, प्रश्नांच्या मुळाशी जाणं, प्रश्न सोडवण्यासाठी काय करता येऊ शकेल याचा कार्यकर्त्यांसोबत आणि स्त्रियांसोबत विचारविनिमय करणं, नियोजन करणं, तज्ज्ञांची मदत घेणं, वेळप्रसंगी कायदेशीर लढत देणं, कामात सातत्य ठेवणं ही मृणालताईंच्या कामाची खासियत होती. आणि त्यातूनच मृणाल गोरे यांच्यासारखं खमकं व्यक्तिमत्त्व तयार झालं. Kelkarjyoti@gmail.com