उर्मिला पवार
आंबेडकरी चळवळीचा प्रभाव, संस्कृत वाङ्मयाचा अभ्यास आणि १९७५ पासून समोर आलेला स्त्रीमुक्तीचा विचार यातून प्रा. कुमुद यांचे तत्त्वचिंतक व्यक्तिमत्त्व घडले होते. ‘ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह विमेन ऑर्गनायझेशन’च्या अध्यक्षा होऊन त्यांनी स्त्री चळवळ पुढे नेली. भारतीय भगिनीभावात दलित स्त्रीला स्थान नाही, त्यामुळे आम्हाला आमच्या उपेक्षित, वंचित, शोषित जीवनाचा वेगळा स्त्रीवाद सांगावा लागेल, अशी ठाम भूमिका घेणाऱ्या प्रा. कुमुद पावडे यांच्याविषयी…

दलित म्हणजेच आज आंबेडकरी म्हटल्या जाणाऱ्या समाजातील पहिल्या एम.ए.(संस्कृत) झालेल्या उच्चशिक्षित आणि दलित स्त्रीवादाची मांडणी करणारे अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणजे नागपूरच्या प्रा. कुमुद पावडे. नागपूर भूमीतच डॉ. आंबेडकरांच्या झालेल्या बौद्ध धम्म प्रवेशामुळे हे ठिकाण आंबेडकरी चळवळीचा केंद्रबिंदू ठरलेले होते. त्या काळातल्या सत्यशोधक चळवळीत आणि डॉ. आंबेडकरांसोबत काम करणाऱ्या नागपुरातल्या किसन फागुजी बनसोड, विठोबा मूनपंडे तसंच जाईबाई चौधरी, राधाबाई कांबळे अशा कितीतरी दिग्गज कार्यकर्त्यांच्या कार्याविषयी ऐकत कुमुदताई मोठ्या झाल्या. १९३८ हे त्यांचं जन्म वर्ष आणि ३१ मे २०२३ भनंभनरोजी कुमुदताईंचं निधन झालं.

कुमुदताईंचे वडील देवाजी सोमकुंवर आणि आई विमलबाई यांच्यावरही डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा आणि चळवळीचा प्रभाव होता. वडील न्यायालयात ‘नोटरी’ होते. त्यांचे तुटपुंजे उत्पन्न असूनही त्यांनी आपल्या सातही मुलांना व्यवस्थित शिक्षण आणि आंबेडकरी संस्कार दिले. ताईंच्या बहिणी नलिनी आणि चारुलता याही महाविद्यालयात अध्यापक होत्या. कुमुदताईंनी शिक्षणासाठी जाणीवपूर्वक ‘विज्ञान’ऐवजी ‘कला’शाखेची निवड केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बी.ए.साठी संस्कृत विषय नाकारला गेल्याने त्यांना पर्शियन भाषा घेऊन उत्तीर्ण व्हावं लागलं.

या घटनेच्या परिणामातून कुमुदताई यांनी एम. ए.साठी संस्कृत विषय घेतला. त्यात विशेष गुण मिळवून त्या तेथील शासकीय महाविद्यालयात प्राध्यापिका झाल्या. तेव्हाही, ‘आता यांनीही संस्कृत शिकवावं हं.’ किंवा ‘तुमची विद्वत्ता मोठी आहे तुम्ही इथे शिकवण्याऐवजी पुण्या-मुंबईतील मोठ्या महाविद्यालयात शिकवायला का जात नाही?’ असे म्हणत संस्कृत विषय शिकवण्यावरून ताईंना टोमणे मारून अनेकदा अवमानित केलं गेलं. त्या मानसिक खच्चीकरणाला धैर्यानं तोंड देतच त्या मुलांना शिकवत. वादविवादात त्या संस्कृतमधूनही बोलत. संस्कृतमधील अडलेले शब्द समजून घेण्यासाठी त्यांच्याकडे अनेक जण येत. या विषयावरील त्यांचं प्रभुत्व आणि आंबेडकरी चळवळीतील त्यांच्या कार्याचा प्रभाव विशेषत: तत्कालीन मुलींवर पडत गेला.

बी.ए. नंतर कुमुदताई नागपुरात बर्डी येथे मोतीराम पावडे यांनी सुरू केलेल्या रात्रशाळेतील गरीब मुलांना, कामगारांना विनावेतन शिकवत असत. इथेच मोतीराम पावडे यांच्याशी झालेल्या परिचयातून त्या दोघांचा १९६२ मध्ये विवाह झाला. पावडे उच्चशिक्षित, गांधीवादी आणि कुणबी मराठा समाजाचे होते आणि कुमुदताई दलित (बौद्ध). त्या आंतरजातीय लग्नामुळे ताईंना सासरी खूप अपमान सोसावा लागला. एका प्रसंगाने तर त्यांच्या हृदयाला खोल जखम झाली. त्यांचा मुलगा उंच ओट्यावरून रांगत रांगत आला.तो तिथून खाली पडू शकतो हे दिसत असूनही जवळच बसलेले त्यांचे सासरे त्याला उचलायला पुढे झाले नाहीत. ताईंनी मात्र समजुतीने, आपुलकीने आणि विद्वत्तेने पुढे सासरच्यांची मनं जिंकली.

हेही वाचा

कुमुदताईंनी जातीवादामुळे सासरी ज्या झळा सोसल्या त्यातून आणि डॉ. आंबेडकर यांनी ‘आंतरजातीय विवाह’ हा जाती निर्मूलनासाठीचा एक महत्त्वाचा उपाय सांगितला आहे, तो लक्षात घेऊन ताईंनी वर्षभरातच धंतोली भागात ‘आंतरजातीय विवाह संस्था’ उभी केली. त्यातून त्या असेपर्यंत त्यांनी ४००च्या वर विवाह पार पाडले. त्यात काही आंतरधर्मीय विवाहही होते. त्यांच्या घरातल्या काही मुली इतर जातीत आणि धर्मात गेल्या तर तिकडच्या काही जणी त्यांच्या घरी आल्या. हे काम त्या काळात सहज सोपं नव्हतं. मुला- मुलींच्या नातेवाईकांकडून त्यांच्यावर हल्ले झाले. पोलिसांत तक्रारी दाखल झाल्या. पण ताई डगमगल्या नाहीत.

आंबेडकरी चळवळीचा प्रभाव, संस्कृत वाङ्मयाचा अभ्यास, आणि १९७५ पासून समोर आलेला स्त्रीमुक्तीचा विचार यातून त्यांचे तत्त्वचिंतक व्यक्तिमत्त्व घडले होते.

आपल्या दिसण्यातही त्यांनी काही बदल जाणिवपूर्वक केले होते. त्या मंगळसूत्र, बांगड्या घालत नव्हत्या. त्यांनी केसांचा बॉबकट केला होता. असा बाह्य बदल करण्याचे धाडस ८०-९०च्या दशकातही आम्हा नवबौद्ध स्त्रियांना होत नव्हतं. खरं तर बौद्ध धम्मात या गोष्टींना स्थान नव्हतंच तरीही कुंकू विस्कटलं, टिकली पडली, बांगडी पिचली, रात्री काढलेलं मंगळसूत्र गळ्यात घालायचं राहिलं की आमचा जीव कासावीस होत असे. यावर ताई म्हणत, ‘‘अगं, यात आपण कुणाचं नुकसान करत नाही ना मग भीती हवी कशाला? ही भीती आपली आपणच घालवायची असते.’’अशा तऱ्हेने परखडपणे बोलून त्या आम्हाला काल्पनिक गोष्टीतून वास्तवतेकडे नेत असत.

कुमुदताई सासरी गेल्या तेव्हा त्यांच्या पतीची मावशी वेणूताई त्यांच्या घरी आश्रयाला राहात होती. तिच्या नवऱ्याने दुसरं लग्न करून वेणूताईला अमानुष मारझोड करून हकलून दिलं होतं. वेणू मावशी वटसावित्रीचा उपवास अगदी निर्जळी आणि मनोभावे करत. एकदा तिचा हा उपवास चालू असताना कुमुदताई तिला म्हणाल्या, ‘‘मावशी, तुम्ही तोच नवरा सात जन्म हवा म्हणून उपवास करत आहात तशीच त्याची दुसरी बायकोसुद्धा यासाठीच उपवास करत असेल ना? म्हणजे पुन्हा तुम्ही त्याच्या दोन बायका, हे चालेल तुम्हाला?’’ कुमुदताईचा प्रश्न ऐकून मावशीने वटसावित्रीचे व्रत सोडले ते कायमचे.

असंच प्रबोधन झालेल्या प्राध्यापक आणि सुप्रसिद्ध हिंदी साहित्य लेखिका सुशीला टाकभोरे सांगतात, ‘‘मै मॅट्रिक पास होनेके बाद शादी करके मध्य प्रदेशसे निकलकर नागपूर स्टेशन उतरी तब मेरे चेहरेपर दो गज (फूट) घुंघट था. लेकीन कुमुदताईसे मिली और मै अंदर-बाहरसे पुरी बदल कर जो बनी वह आज आपके सामने हूं।’’ अशा अनेक मुली प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कुमुदताईंपासून प्रेरणा घेऊन शिक्षण घेत असत. मोकळेपणाने बोलत असत.

दलित स्त्रियांना आपल्या प्रश्नांबाबत जागरूक करून त्यांना अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचं धैर्य देण्यासाठी कुमुदताई नागपूर येथील ‘ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह विमेन ऑर्गनायझेशन’ या सुगंधाताई शेंडे यांनी सुरू केलेल्या संस्थेच्या त्यांच्या पश्चात अध्यक्ष बनल्या. या संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांसाठी त्यांनी अनेक कार्यक्रम राबवले. ‘आम्हीही इतिहास घडवला’ या आमच्या पुस्तकातल्या स्त्रियांच्या मुलाखतीसाठी मला आणि मीनाक्षी मून यांना नागपुरातल्या अनेकींचे पत्ते देऊन कुमुदताईंनी मोलाचे सहकार्य केले.

औरंगाबाद येथून डॉ. गंगाधर पानतावणे यांनी १९७४ पासून सुरू केलेल्या ‘अस्मितादर्श साहित्य संमेलना’त कुमुदताई सुरुवातीपासूनच सामील राहून कथा, कविता, सादर करीत, लिहीत असत. आपल्या भाषणात वर्ण-जातीयतेबरोबरच त्या स्त्रियांच्या स्थिती-गतीविषयी बोलत. मनुवादी विचारसरणीतून त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराकडे, हिंसेकडे त्या सर्वांचे लक्ष वेधत. इतकंच नाही तर तिथे बोलण्यासाठी निवडलेल्या विषयांमध्ये स्त्रियांसंबंधित विषय आणि त्यावर बोलायला स्त्रियांबरोबर पुरुषांचाही सहभाग हवा आणि स्त्रियांना सर्वच विषयांत बोलायला संधी दिली पाहिजे असे त्या ठणकावून सांगत. यातून अनेक स्त्रिया लिहू बोलू लागल्या.

१९७५पासून सुरू झालेल्या ‘स्त्रीमुक्ती संघटने’ मधूनही त्या परखडपणे बोलत. दिल्ली येथे दलित स्त्रीवर होणाऱ्या अत्याचार आणि बलात्काराच्या प्रश्नांवरील एका चर्चासत्रात, दलितेतर स्त्रिया जास्त होत्या आणि अत्यंत असंवेदनतेने त्या बोलत, वागत होत्या. ‘सकाळपासून सारखं सारखं त्या बलात्काराच्या घाणेरड्या विषयावरच काय बोलता?’, ‘इथल्या गरमागरम, चविष्ट जेवणाबद्दलही बोला की…’ असे काहींचे उद्गार आणि जाणिवांवर ताईंनी नंतर उद्वेग व्यक्त केला. अनेकींसाठी तो कणखरपणाचा आदर्श ठरला.

१९९४ या वर्षी पुण्याला ‘आलोचना’ संघटना आणि प्रामुख्याने १९९६ मध्ये रुथ मनोरमा यांनी दिल्ली येथे घेतलेल्या दलित स्त्रियांच्या परिषदेत व त्याच वर्षी पुन्हा पुणे येथे आम्हा दलित स्त्रियांना एकत्र करून कुमुदताईंनी दलित स्त्रीवादाची वेगळी दिशा स्पष्ट केली. ‘मुख्य धारेतील स्त्रिया जात, वर्ग आणि लिंग याबाबत न बोलता फक्त स्त्री आणि पुरुष अशा लिंगभावावर बोलतात. त्यांच्या भगिनीभावातही दलित स्त्रीला स्थान नाही’. अशी प्रमुख स्त्रीवादाची मर्यादाही त्यांनी अधोरेखित केली.

यापुढे आम्हाला आमच्या उपेक्षित, वंचित, शोषित जीवनातून वेगळा स्त्रीवाद मांडावा लागेल, असेही त्या ठामपणे म्हणाल्या होत्या. इथे खऱ्या अर्थाने कुमुदताईंनी दलित स्त्रीवादाची बीजे रोवली. आपल्या जगण्याच्या प्रश्नांबरोबरच दलित स्त्रियांना हळूहळू स्वभान येत आहे. त्यांना त्यांच्या क्षमतांचेही आकलन होत आहे. साहित्यातील विविध प्रकारांतून त्या लिहीत आहेत. त्यातून त्यांना त्यांची भूमिका सशक्तपणे मांडायला ‘सिद्धांतना’ची भाषाही नक्कीच सापडेल, असा विश्वास व्यक्त केला. त्याच वेळी ‘दलितेतर स्त्रियांशी आपल्याला कधीही फारकत घ्यायची नाही’, हेही सांगायला त्या विसरल्या नाहीत.

पुण्याहून सौदामिनी राव यांच्या ‘बायजा’ त्रैमासिकात क्रमश: प्रकाशित झालेल्या लेखनातून १९८० मध्ये कुमुदताईंचे ‘अंत:स्फोट’ हे स्वकथन प्रकाशित झाले आणि खूप गाजलेही होते. त्यांच्या मराठी भाषेला संस्कृतचा पाया असल्याने त्यांचे लेखन अत्यंत लालित्यपूर्ण झाले आहे. मात्र कोणतीही चळवळ कार्यकर्त्यामधला अनेकदा लेखक संपवते. हे अनेक दिग्गज कार्यकर्त्यांच्या बाबतीत घडले आहे. कुमुदताई त्यापैकीच एक होत्या. आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात त्या फक्त वैचारिक लेखन आणि व्याख्यानातूनच व्यक्त होत राहिल्या. अनेक संस्था, संघटनांच्या त्या संस्थापक आणि सदस्य म्हणून कार्यरत होत्या. साहित्य संमेलनांच्या उदघाटक, अध्यक्ष असे अनेक बहुमान-पुरस्कारही त्यांना मिळाले. त्यात ‘संस्कृत पंडिता’ हा राज्य शासनाने दिलेला पुरस्कारही होता.

कुमुदताईंनाही त्यांच्या पुस्तकाने आणि कार्याने महाराष्ट्र आणि देशविदेशांतही अनेक ठिकाणी नेलं. १९९२ ते २००६ पर्यंत दक्षिण आशिया, डर्बन, चीन, जोहान्सबर्ग, केपटाऊन, बीजिंग, वेस्ट इंडिज, हरारे, नैरोबी, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, नेदर्लंड, जिनिव्हा (स्वित्झर्लंड) अशा विविध देशांत मराठी साहित्य, भाषा, दलित साहित्य, दलित चळवळ, स्त्री चळवळ, कृष्णवर्णीय आणि दलित स्त्रीच्या जाणिवा अशा अनेक विषयांवर बोलायला कुमुदताईंना निमंत्रित करण्यात आलं. तिथे त्या आपले विचार अतिशय स्पष्ट आणि कणखर शब्दांत मांडत. त्यातूनच त्या जागतिक पातळीवरही आंबेडकरी स्त्रीजाणिवांचा बुलंद आवाज बनल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

pawarurmila.writer@gmail.com