राधिका टिपरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘अनेकदा प्रवास हा काही मिळवण्याच्याच उद्देशानं केला जातो. मी पुण्यातून चंडीगड, तिथून शिमलामार्गे किब्बपर्यंतचा प्रवास केला, तोच मुळी ‘इल्युसिव्ह घोस्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजिबडय़ा हिमबिबटय़ाचं दर्शन घेणं, त्याचे फोटो काढणं यासाठी. पण हिमाचल प्रदेशात किब्बपर्यंत पोहोचणं, तेही बर्फाच्छादित प्रदेशातून, जरी तो नयनरम्य निसर्ग असला तरीही.. माझ्यासारख्या सत्तरीतल्या व्यक्तीला काहीसं कठीणच होतं. हिमबिबटय़ाच्या ओढीनं मी तो बर्फाळ प्रदेश, प्रचंड थंडी, खडी चढण आणि दुखरे गुडघे या सगळय़ांवर मात करायची ठरवली आणि.. जे मिळालं ते अनमोल होतं!’

माझ्या त्या पर्यटनाचा उद्देशच होता हिमबिबटय़ाचं मनसोक्त दर्शन घ्यायचं नि त्याचे विविध अँगलने फोटो काढायचे. त्यासाठी मला लडाख, लाहौल, स्पिती, सिक्किम नाही तर तिबेटमध्येच जायला हवं होतं. ट्रान्स हिमालयात वास्तव्य करणारा हा अतिशय देखणा प्राणी ‘इल्युसिव्ह घोस्ट’ म्हणूनच जगभर प्रसिद्ध आहे.

गतवर्षी लडाखमधल्या उले गावात जाऊनही हिमबिबटा दिसला नव्हता. या वर्षी मात्र माझ्या नजरेसमोर स्पिती व्हॅलीमधलं टोकाचं किब्बर हे गाव होतं. तीन वर्षांपूर्वी या गावाला भेट दिली होती. उंच डोंगरांच्या बेचक्यात वसलेलं अक्षरश: पंधरा-वीस घरांचं हे दुर्गम गाव किब्बर राष्ट्रीय अभयारण्याच्या परिसरात येतं. हे हिमबिबटय़ाचं हक्काचं घर. हिवाळय़ात ‘स्नो लेपर्ड’ शिकारीच्या शोधात बऱ्यापैकी खालच्या उतारावर येतात, त्यामुळे माणसांच्या दृष्टीस पडतात. म्हणूनच किब्बरला जावं असं मनापासून वाटत होतं.

पुण्यातला इंद्रजीत भोसले हा तरुण किब्बरमध्ये येणाऱ्या देशीविदेशी फोटोग्राफर्ससाठी ‘स्नो लेपर्ड एक्सपिडिशन्स’ आखून देतो हे मला माहीत होतं. त्याचा आमच्यासाठीचा प्रतिसाद मात्र फारसा उत्साहवर्धक नव्हता- ‘‘काकू, तुम्हाला जमेल का? अवघड आहे. हिवाळय़ात किब्बरमधलं तापमान उणे वीस ते पंचवीसपेक्षाही खाली जातं. हवेमधलं ऑक्सिजनचं प्रमाण खूप कमी असतं. भरपूर बर्फ पडलेलं असतं. या वयात या गोष्टींमुळे तुम्हाला त्रास होण्याची भीती आहे. शिवाय स्नो लेपर्ड पाहण्यासाठी चालावं लागेल, चढ चढावा लागेल..’’ मी म्हटलं, ‘‘आम्ही हिमालयात खूप वेळा ट्रेकिंग केलं आहे. आम्हाला दोघांनाही (मी आणि पती सुधीर) ‘अल्टिटय़ुड सिकनेस’चा त्रास होत नाही. झालाच, तर लगेच खालच्या गावात जाऊ आम्ही.’’ कसाबसा त्याचा होकार मिळाला आणि मी विमानाच्या तिकिटांचं आरक्षण करून टाकलं.

ठरल्याप्रमाणे आम्ही फेब्रुवारीमहिन्याच्या १३ तारखेला चंडीगडला पोहोचलो. चंडीगडहून शिमलामार्गे किब्बपर्यंत जायचं होतं. ‘अ‍ॅक्लमटायझेशन’साठी (बदललेल्या हवामानाशी जुळवून घेण्याचा सराव) वाटेत तीन ठिकाणी मुक्काम करायचं ठरलं. हिमाचल प्रदेशमधलं स्पिती नदीचं खोरं म्हणजे निसर्गाचं वरदान लाभलेला अतिसुंदर प्रदेश! हिमालयाच्या मध्यवर्ती रांगेच्या पलीकडे असणाऱ्या हिमालयाच्या पर्वतरांगांनी नटलेला हा भूभाग तिबेटच्या भूमीला खेटून आहे. अगदी ऐन हिवाळय़ात या भागात जायचं म्हणजे प्रचंड बर्फ अनुभवायला मिळणार याची खात्री होती. मी हे सर्व पाहण्यासाठी आतुर झाले होते. हिमालयातलं ‘कोल्ड डेझर्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्पितीची भौगोलिक परिस्थिती साधारणपणे लडाखच्या भूमीशी मिळतीजुळती. ‘स्पिती’चा शब्दश: अर्थ मधली भूमी. तिबेट आणि भारत यांच्या मधली भूमी म्हणजे स्पिती. हिमाचल प्रदेशच्या उत्तर-पूर्वेचा भाग स्पितीचं खोरं म्हणून ओळखला जातो. बहुतांशी लोक बौद्धधर्मीय; त्यामुळे वातावरण बौद्ध संस्कृतीशी जवळीक सांगणारं. याचाच परिपाक म्हणून स्पितीच्या प्रवासात अनेक गोम्पांना (ध्यानधारणा स्थळं.) भेट देण्याची संधी मिळते. शिमल्यामध्ये अजिबात बर्फ दिसला नव्हता. नंतर मात्र रस्त्याच्या कडेला बर्फाचे ढीग दिसायला लागले. उंच पाइन वृक्षांच्या घनदाट झाडीमधून वळणावळणांनी जाणारा रस्ता आणि हिमालयाच्या उत्तुंग डोंगररांगांचं मनोरम्य दृश्य. आधीच्या भेटीत पाहिलेला पाइन, देवदार वृक्ष, सफरचंदाच्या बागा यांनी नटलेला हिरवा निसर्ग आणि आताचा पांढऱ्या चादरीनं आच्छादलेला निसर्ग यातला फरक डोळय़ांना सुखावत होता. 

 नारकंडा गावात रात्र काढून आम्ही खोल दरीतून वाहणाऱ्या सतुलज (जिला सतलजही म्हटलं जातं) नदीच्या काठानं पुढील प्रवास सुरू केला. तिबेटमधल्या मानस सरोवरातून उगम पावणारी सतुलज कैलास रेंजमधील पर्वतरांगांमधून वाट काढत हिमाचल प्रदेशमधून वाहत पुढे पंजाबात प्रवेश करते. सतुलजच्या काठानं होणारा हा प्रवास खऱ्या अर्थानं रोमांचकारी. आमचा पुढील मुक्काम होता कल्पा या सुंदर गावी. हे गाव साधारणत: आठ हजार फूट उंचीवरचं आणि बर्फाच्छादित पर्वतशिखरांनी वेढलेलं. इथून किनौर कैलास शिखर पाहायला मिळतं. शिखराच्या शेंडय़ावरती असलेल्या टोकदार काळय़ा कातळाला, ज्याची उंची अठ्ठावीस फूट आहे ‘शिविलग’ म्हणून मान्यता आहे. हिमाचली लोक याची मनोभावे पूजा करतात. हाडं गोठवणारी थंडी. खिडकीतून दिसणारी बर्फाच्छादित शिखरांची रांग आणि किनौर कैलास शिखराचं निमुळतं टोक पाहून आमची दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली.

पुढचा मुक्काम काझा या गावी. आता डोंगरउतारावर तुरळक खुरटी झुडपं दिसू लागली होती. रुक्ष, उजाड, लालसर मातकट डोंगर आणि दऱ्या दिसायला लागल्या. अत्यंत खोल दरीतून वाहणाऱ्या सतुलजचं विशाल पात्र आणि त्यातून निळसर रंगाच्या रिबिनीगत वाहणारा आक्रसलेला प्रवाह. कल्पाहून निघाल्यानंतर ‘खाब’पर्यंत येईतो आपण सतुलज नदीच्या पातळीपर्यंत खाली उतरतो. याच ठिकाणी उत्तर-पूर्वेकडून येणारी स्पिती आणि मानस सरोवराकडून येणारी सतुलज यांचा सुरेख संगम पाहायला मिळतो. दोन्ही नद्यांची गळाभेट पाहताना मनस्वी आनंद मिळतो, कारण इतर वेळेस त्या इतक्या खोल दरीतून वाहत असतात, की पाहूनच उरात धडकी भरते. खाबनंतर मात्र सतुलज नदीचा निरोप घेऊन स्पिती नदीच्या काठानं आपला प्रवास सुरू होतो.

खाब इथे पुण्याहून आलेल्या छायाचित्रकारांचा ग्रुप भेटला. तेही किब्बरला निघाले होते. संगमाच्या जागी उजव्या बाजूनं येणाऱ्या सतुलजचे फोटो घेताना माझं मन व्याकूळ झालं. का कुणास ठाऊक, पण मला नद्यांबद्दल नेहमी एक अनामिक ओढ वाटते. कदाचित हिमालयात खूप पदभ्रमण केल्यामुळे असेल, पण मनात सदैव कुतूहल असतं.. त्यांच्या उगमापर्यंत जाण्याची अगम्य मनीषा असते. हिमालयातल्या नद्यांच्या उगमापर्यंत पोहोचायचं म्हणजे अत्यंत अवघड गोष्ट असते. हिमालयातल्या पदभ्रमणाच्या निमित्तानं आजवर काही नद्यांच्या उगमापर्यंत जाता आलं होतं. आज या गोष्टीचं प्रचंड समाधान वाटतं. अर्थातच यापुढच्या आयुष्यात ही गोष्ट जमणार नाही, हे सत्य स्वीकारताना मन उदास होऊन जातं..

आता हिमालयाचं लालसर तांबूस वर्णातलं रौद्र भयानक, तसंच भयावह आणि ठिसूळ वाटणारं वेगळंच रूप नजरेसमोर यायला लागलं होतं. खोल दरीतून वाहणारी स्पिती निळसर रिबिनीसारखी दिसत होती. अतिशय अवघड वळणांचा, डोंगर कोरून तयार केलेला अरुंद रस्ता पाहून मन थक्क होऊन जात होतं. अशा वेळी ड्रायव्हरच्या कौशल्याचा कस लागायचा. वाटेत ‘गिऊ’ ही लहानशी मॉनेस्ट्री लागते. मनालीकडून प्रवेश केल्यास रोहतांग पास ओलांडल्यानंतर केलाँगपासून एक रस्ता पुढे लडाखकडे जातो आणि दुसरा रस्ता चंद्रा नदीच्या खोऱ्यात उतरतो. शिमल्याच्या बाजूनं येणाऱ्यांना खाब ओलांडून स्पिती नदीच्या खोऱ्यातून वर चढल्यानंतर कुंजुम पास ओलांडून चंद्रा नदीच्या खोऱ्यात उतरता येतं. अति बर्फवृष्टीमुळे जवळजवळ आठ महिन्यांसाठी देशाच्या इतर भागांपासून स्पिती खोऱ्याचा संपर्क तुटलेला असतो. त्यामुळे स्पिती पाहायचं असल्यास जून ते सप्टेंबर हा चार महिन्यांचा काळ पर्यटकांसाठी सोयीचा.

आमचा पुढचा मुक्काम काझा या १२ हजार फूट उंचीवरच्या गावात होता. काझा हे लाहौल आणि स्पिती या जिल्ह्यातलं मुख्य शहर. काझाला पोहोचण्याआधी वाटेत ढंकर गाव लागतं. इथे प्रसिद्ध गोम्पा आहे. अत्रुग या ठिकाणी पिन आणि स्पिती या नद्यांचा संगम पाहायला मिळतो. मनाच्या कॅमेऱ्यातही हे सारं काही साठवून ठेवताना प्रचंड आनंद मिळत होता. वाटेत लाल-मातकट रंगांचे उघडेबोडके डोंगर, वळणं घेत वाहणारी स्पिती, भणभण वाऱ्यामुळे आणि बर्फामुळे ठिसूळ डोंगरमाथ्यांचे तयार झालेले चित्रविचित्र आकार, हे सारं काही इतकं विलोभनीय होतं, की मनाचं पाखरूं स्वैरपणे त्या दऱ्याखोऱ्यांत भटकत राहिलं. आम्ही काझाच्या वाटेवर असतानाच इंद्रजीतचा फोन आला, ‘‘तुम्ही काझाला न थांबता सरळ किब्बरला या. स्नो लेपर्डचं सायटिंग चालू आहे.’’ मग काय, सरळ किब्बर गाठलं!

किब्बरच्या डाव्या बाजूला चिचम हे काही घरांचं गाव आहे. त्याच्या खालच्या बाजूला किब्बर आणि चिचम या दोन्ही गावांना तोडणारी खोल दरी आहे. या दरीतून एक लहानसा ओढा वाहतो. दरीच्या समोर भिंतीच्या कपारीत, गोठलेल्या धबधब्याशेजारी हिमबिबटय़ाची दोन पिल्लं झोपलेली होती. खरं तर दिवस मावळलेला होता. दरीत अतिशय कमी उजेड होता. डोंगराच्या कपारीत बर्फाच्या ढिगाऱ्यात असणारी दोन्ही पिल्लं साध्या डोळय़ांनी दिसत नव्हती. मी माझा कॅमेरा घेऊन तिथवर पोहोचले, पण उतारावरून खाली कडय़ाच्या काठापर्यंत बर्फातून पोहोचणं माझ्यासाठी केवळ अशक्य होतं. मग एका तरुणानं, केसननं मला हाताला धरून कडय़ाच्या अगदी काठापर्यंत नेलं. बरेच फोटोग्राफर्स जय्यत तयारीनिशी बसलेले होते. मी ट्रायपॉड घेतला नव्हता. तेवढय़ात ती पिल्लं उठून खेळायला लागली. कॅमेऱ्याची पाचशे एमएमची लेन्स यासाठी अपुरीच आहे याची तीव्रतेनं जाणीव झाली. थंडीमुळे पायातून कळा यायला लागल्या. उजेडही अपुरा होता. त्यात स्टँड नसल्यानं इतक्या दुरून पिल्लांचे फोटो घेणं अवघड जात होतं. शेवटी मी उठले. बर्फातून चालत आम्ही गाडीपर्यंत पोहोचलो आणि किब्बर गावाच्या दिशेनं निघालो. 

किब्बर गाव अतिशय लहान. कच्चे रस्ते, त्यावर बर्फाचा थर, उंचसखल रस्त्यावरून गाडी चालवणं मोठय़ा जिकिरीचं काम. तिथल्या होम-स्टेमध्ये तिबेटी पद्धतीचं मातीचं बांधकाम होतं. खोलीच्या मध्यभागी पत्र्याची बंद शेगडी धगधगत होती. मातीच्या बांधकामामुळे ही तिबेटी पद्धतीची घरं बऱ्यापैकी उबदार राहतात याचा अनुभव घेतला. हिवाळय़ात नळात वाहतं पाणी उपलब्ध नसतं, कारण तापमान उणे वीसच्या खाली जात असल्यामुळे पाइपमध्ये पाणी गोठतं. अर्थातच स्वच्छतागृहाची समस्या खूप मोठी असते. पाणी जमिनीत मुरत नसल्यानं ड्रेनेजचा वापर करता येत नाही, म्हणून इथले लोक परंपरागत पद्धतीची शौचालयं वापरतात. फ्लश होणारं टॉयलेट वापरता येत नाही. त्यामुळे केमिकल टॉयलेटचा वापर करावा लागत होता. आंघोळीचा विचार करणंही शक्य नव्हतं. केलीच तर आजारी पडण्याचा धोका!

सकाळी उठल्यानंतर खिडकीतून दिसणाऱ्या शुभ्र भवतालाची पूर्ण कल्पना आली. किब्बर गावाला वेढून असणाऱ्या सर्व पर्वतांवर बर्फाचे प्रचंड जाडीचे थर होते. उन्हाची किरणं परावर्तित होऊन डोळय़ांना इजा होण्याचा धोका. त्यामुळे डोळय़ांवर सतत गॉगल ठेवणं गरजेचं. अंगावर कपडय़ांचे चार थर घालून उभयता बाहेर पडलो. आज बरंच चालावं लागणार होतं. बर्फातून चालताना मदत करायला केसन आणि तेंझिन हे दोन तरुण आमच्याबरोबर होते. पठाराच्या खाली खोल दरी आणि दरीच्या पलीकडे असणाऱ्या बर्फाच्छादित शिखराच्या उतारावर हिमालयीन आयबेक्सचा (हिमालयीन बकऱ्या) कळप निवांत बसलेला होता. त्या दिवशी हिमबिबटय़ाचं स्पॉटिंग काही झालं नाही, पण निवांतपणे त्या बकऱ्या पाहता आल्या.

किब्बरपासून दहा कि.मी. अंतरावर शीला हा नाला स्पिती नदीला मिळतो. त्या जागी ‘सी बकथॉर्न’ या खुरटय़ा झुडपांचा भरपूर झाडोरा आहे. याची फळं पक्ष्यांच्या आवडीची. त्यामुळे आम्ही पक्षी बघायला तिथे जावं असं असं इंद्रजीतनं सुचवलं. आम्ही गेलो, तर त्या जागी खरोखरच भरपूर पक्षी होते. मी अजून कॅमेरा काढलाही नव्हता, तोच निरोप आला, की शिच्लिंगजवळ हिमबिबटा दिसला आहे. त्वरित निघालो, पण मनात शंका, की तिथवर जाईतो तो तिथेच थांबेल याची काय खात्री? शिच्लिंग गावात एका घराच्या आवारात येऊन हिमबिबटय़ानं बकरी मारली होती. नंतर तो पहाडावरती निघून गेला होता. ही घटना सकाळी घडली होती. त्यामुळे हिमबिबटय़ा शिकार खायला नक्की परत येणार होता. आमच्या बरोबरच्या त्सेरिंग या वयस्क आणि जाणकार ‘स्पॉटर’नं एका पहाडावर चढून दुर्बिणीतून दुसऱ्या पहाडावर झोपलेल्या बिबटय़ाचा तपास लावला. तो मला म्हणाला, की तुमची तयारी असेल, तर थोडय़ा सोप्या रस्त्यानं तुम्हाला हिमबिबटय़ा बघायला वर घेऊन जाता येईल. ‘‘बकरीका खून पीके सो गया हैं। नशा चढता हैं जानवरको। शाम तक उठेगा नही।’’ असा त्याचा ठाम दावा. दुखऱ्या गुडघ्यांकडे दुर्लक्ष करून आम्ही वर जायचं ठरवलं. दीड तास चालल्यानंतर आम्ही शेंडय़ावर पोहोचलो. दुसऱ्या पहाडाच्या कडेवर हिमबिबटय़ा आरामात झोपलेला. माझा कॅमेरा स्टँडला लावून त्सेरिंगनं लेन्समधून त्याला ‘लोकेट’ केलं. आजूबाजूच्या दगडांमध्ये तो बेमालूमपणे मिसळून गेला होता. हिमबिबटय़ावर नजर ठेवून बसून राहिले. तासाभरानं तो जागा झाला आणि आळोखेपिळोखे देत, मान ताठ करून ऐटीत बसून राहिला. एव्हाना सूर्य डोंगराच्या पाठीमागे पोहोचला होता. बर्फात बसून माझ्या पायांची लाकडं झाली होती. अचानक बिबटय़ा उठला आणि दुसऱ्या जागी जाऊन बसला. काही वेळानं अंग झटकून चालू लागला. दोन-चार झेपेत तो पहाडाच्या दुसऱ्या बाजूला गेला आणि एका घळीत दिसेनासा झाला. त्यानं बहुधा डोंगर उतरून खाली त्याच्या शिकारीकडे जाण्याची तयारी सुरू केली होती. आम्ही कॅमेरा पॅक केला. खाली उतरणं अवघड होतं. अजूनही खाली इतर सर्व फोटोग्राफर बिबटय़ाची वाट पाहात होते. आता मला तिथे थांबावंसं वाटत नव्हतं. आम्ही किब्बरला परत निघालो. एकंदरीतच हे सर्व प्रकरण आमच्या आवाक्याबाहेरचं होतं याबद्दल आता मनात शंका उरली नव्हती. दुसऱ्या दिवशी पुन्हा हिमबिबटय़ा दिसल्याची खबर आली. किब्बर गावाच्या वरच्या पहाडावर जायला दोन-अडीच तास आम्ही चढ चढत होतो. आधीसारखेच  शे-दीडशे फोटोग्राफर्स सरसावून बसलेले. माझ्यासाठी कडय़ाच्या काठावरची जागा धरून राखूनठेवलेली होती. समोरच्या सरळसोट भिंतीच्या कपारीत तीन हिमबिबटे साखरझोपेत मुटकुळं करून पहुडलेले. कॅमेरा आणि बिबटे यांच्यामध्ये अंतर बरंच होतं; पण लेन्समधून  हिमबिबटय़ाची मादी आणि तिची दोन पिल्लं पाहायला मिळाली. साधारण साडेचारच्या सुमारास बिबटीणबाई उठल्या आणि सटासट उडय़ा मारत खडी चढण चढायला लागल्या. आईच्या पाठोपाठ पिल्लंही निघाली. ते दृश्य रोमांचकारी होतं. लांब पल्ल्याच्या लेन्स बाळगणाऱ्यांना अतिशय दुर्मीळ अशा त्या दृश्याचे फोटो घेते आले. काही मिनिटांत तो थरार संपला; पण दुखऱ्या पायांनी मी शेवटपर्यंत चढून गेले आणि त्या प्रसंगाचा अनुभव मला घेता आला याचा खूप आनंद वाटत होता.

‘इल्युसिव्ह घोस्ट’ म्हणवणारा स्नो लेपर्ड मला असा तीन वेळा पाहायला मिळाला. ते समाधान मनाशी घेऊन आम्ही परतीसाठी तयार झालो. परतताना रामपूर गावी मुक्काम केला. पाच दिवसांनंतर स्नान केलं आणि शिमला गाठलं. नंतर चंडीगड आणि तिथून पुणे! हिमबिबटय़ा पाहण्याची कहाणी सुफळ संपूर्ण झाली! 

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Artist tourism in the mountains travel chandigarh shimla snow nature ysh
First published on: 22-04-2023 at 00:02 IST