‘‘चित्रं, शिल्पं, मांडणशिल्पं, कलाप्रसंग, ‘परफॉर्मन्स आर्ट’, अशा विविध दृश्यकलांमधून प्रेक्षकांपर्यंत पोहोचणाऱ्या प्रत्यक्ष अनुभवाला सामोरं जाण्याच्या ओढीनं देशा-परदेशात भरणाऱ्या कला महोत्सवांना गेली अनेक वर्ष जात राहिलो. कलांमधल्या अतूट नात्याचा थेट प्रत्यय देणाऱ्या, मानवी जीवनातल्या अपूर्णतेबद्दलची तगमग व्यक्त करणाऱ्या, कधी समाजातल्या शोषणाच्या रूपांची, तर कधी प्रेक्षकाच्याही ऱ्हासाची जाणीव करून देणाऱ्या कलाकृतींनी फार आगळेवेगळे अनुभव दिले. राजकीय कारणांनी आलेल्या अस्वस्थतेचं रूपांतर अत्यंत संयमीपणे ‘कलाकृती’त करण्यासाठी दृश्य-कलावंतांना केवढी कळ सोसावी लागली असेल, हे सतत दिसलं. ‘आपण एकटे आहोत, तरीही एकटे नाही,’ची भावना जागृत करणाऱ्या अशा कलानुभवाकडे प्रत्येकानं जायला हवं!’’ सांगताहेत, कला समीक्षक अभिजीत ताम्हणे.
व्हेनिसला सहा वेळा (२००७, २०११, २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९), इटलीतल्याच मिलानला आणि फ्रान्समधल्या पॅरिसला, जर्मनीतल्या कासेल या छोटेखानी शहरात तीनदा, म्यून्स्टर या त्याहून छोटय़ाच जर्मन शहरात दोनदा आणि इस्तंबूल, अथेन्स, फ्रान्समधलं लिआँ इथं एकेकदा- यापैकी प्रत्येक शहरात, प्रत्येक खेपेला सरासरी किमान तीन दिवस; तर येता-जाता एक तर फ्रँकफर्टला किंवा रोम/ फ्लोरेन्सला वगैरे एक-दोन दिवस जाऊन आलो, तरी ‘पर्यटन केलं’ असं वाटतच नाही.. हे जे फिरणं होतं ते काही ‘नोकरीनिमित्त’ नव्हतं, त्यात पैसा सगळाच्या सगळा स्वत:चा होता आणि मुख्य म्हणजे नियोजनसुद्धा अख्खं स्वत:चंच होतं, ठिकाणांची निवड तर स्वत:ची होतीच.. त्यामुळे रूढार्थानं हे ‘पर्यटन’ नसलं तरी ती आनंदाची शोधयात्रा मात्र होती. दृश्यकलेची मोठमोठी प्रदर्शनं पाहण्यातून मिळणारा आत्मिक आनंद म्हणजे काय, याचा हा शोध. त्यासाठी फिरणं. मग? मिळाला का तो आत्मिकबित्मिक आनंदबिनंद?
याचं थेट उत्तर नंतर देतो. आधी ‘दृश्यकलेची मोठमोठी प्रदर्शनं’ म्हणजे काय, हे सांगणं आवश्यक आहे. व्हेनिस शहरातली ‘आर्ट बिएनाले’- म्हणजे चित्रं, शिल्पं, मांडणशिल्पं, कलाप्रसंग किंवा ‘परफॉर्मन्स आर्ट’ अशा विविध दृश्यकला प्रकारांचं ‘मध्यवर्ती प्रदर्शन’ आणि त्याला जोडून ४० हून अधिक देशांनी आपापले दृश्यकलावंत निवडून मांडलेली ‘पॅव्हिलिअन्स’ अशा स्वरूपाची दर दोन वर्षांनी भरणारी कलापर्वणी. ही पाहायला किमान तीन दिवस तरी लागतातच. तेवढेच दिवस, जर्मनीतल्या त्या कासेल नावाच्या शहरगावात ‘डॉक्युमेंटा’ नावाचं असंच मोठं प्रदर्शन दर पाच वर्षांनी भरतं. ‘व्हेनिस बिएनाले’ पहिल्यांदा भरलं १८९५ मध्ये- म्हणजे आधुनिक कलेत इम्प्रेशनिझम (दृक् -प्रत्ययवाद), पॉइंटिलिझम (बिंदूवाद) या शैलींचा जन्म नुकता झाला असताना (त्या शैलींना पाश्चात्त्य मानण्याचं कारण नाही. ‘भारतीय सौंदर्या’चा पुकारा करणारे ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांची भरपूर चित्रं पॉइंटिलिझमच्या तंत्रानंच केलेली आहेत)! मात्र नंतर ही बिएनाले बदलत गेली आणि आताच्या कलेचा तसंच या कलेमागल्या तत्त्वचिंतनचा उत्सव ठरू लागली. ‘डॉक्युमेंटा’ पहिल्यांदा भरला होता तो १९५५ मध्ये. हिटलरशाहीत ज्या प्रकारच्या- राजकीय आशय मांडणाऱ्या किंवा व्यक्तिस्वातंत्र्यच महत्त्वाचं मानणाऱ्या चित्रांना ‘अधोगतीकडे नेणारी कला’ (डीजनरेट आर्ट) ठरवलं गेलं होतं, अशा प्रकारच्या चित्रांचं १९५५ मध्ये मुद्दाम भरवलेलं प्रदर्शन म्हणजे डॉक्युमेंटा! पण त्यानंतर दर पाच वर्षांनी भरणारा ‘डॉक्युमेंटा’ हा जगभरातल्या राजकीय- सामाजिक आशयाच्या दृश्यकलेचा उत्सव असतो. थोडक्यात, जगाच्या कला-इतिहासात व्हेनिस बिएनाले आणि डॉक्युमेंटा या दोघांनी भर घातली आहे. म्हणून ही दोन्ही प्रदर्शनं वैशिष्टय़पूर्ण आहेत.
ती पाहायला जाणं हा माझ्या प्रवासांचा मुख्य उद्देश होता. त्याआधी ‘पत्रकारांना कुठे कुठे फिरायची संधी आयती मिळते,’ या न्यायानं १९९५ मध्ये जर्मनीतल्या चार शहरांना भेट देण्याचा ‘चान्स’ मिळाला, तेव्हा पुन्हा कध्धीच युरोपात जाण्याची संधी मिळणार नाही, असा विसाव्या शतकात शोभणारा विचार करून हावरटपणानं पॅरिसचं लूव्र, पिकासो म्युझियम, म्यूझे डि ऑर्सी आणि अॅमस्टरडॅमला अॅन फ्रँकच्या घरासह चित्रकार रेम्ब्रांचं घर-संग्रहालय, व्हॅन गॉचं म्युझियम, राय्जेविक म्युझियम असं काय काय पाहून घेतलं होतं! तो जर्मनीचा पुढला प्रवास एकटय़ानंच, स्वखर्चानं केलेला होता आणि तिकडल्या युथ हॉस्टेलमध्ये राहाण्यासाठी भारतातूनच ‘युथ होस्टेल्स इंटरनॅशनल’चं सदस्यत्व घेतलं होतं. चित्रकलेबद्दल नित्यनेमानं लिहू लागलो तो १९९७ मध्ये. तेव्हा मुंबईतली कला-प्रदर्शनं पाहायचो, त्यावर पेपरात आठवडी कॉलम लिहायचो. एकाच दैनिकात दृश्यकलेबद्दलच आठवडय़ातून तीन निरनिराळय़ा प्रकारे लिहायला देणारा तो काळ मजेचाच होता. त्यामुळे नोकरीतल्या बाकीच्या जबाबदाऱ्या सांभाळून हे अधिकचं काम करतोय असं कधीच वाटायचं नाही. अशा मन:स्थितीत मुंबईत येणारीच चित्रं पाहणं अपुरं वाटू लागलं. दिल्लीत तेव्हा ‘आंतरराष्ट्रीय कला त्रवार्षिकी’ (बिएनालेसारखी ‘ट्रिएनाले’ म्हणजे हिंदी वळणाच्या उच्चारांत ‘त्रिनाले’) भरायची. तिथे गेलो, बडोदे इथल्या विद्यापीठाच्या कलाविभागाचं नाव मोठं आणि तिथल्या विद्यार्थ्यांना पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अखेरच्या वर्षी वर्गखोल्यांमध्येच आपापली छोटी प्रदर्शनं भरवायला जागा मिळते (हे आता मुंबईतही अशाच प्रकारे सुरू आहे), त्या बडोद्याच्या ‘डिस्प्ले’ची चर्चा तेव्हा असायची, म्हणून तिथेही नेहमी गेलो.. किंवा चित्रकलेबद्दल सांगलीच्या ‘कलापुष्प’ संस्थेतर्फे एवढा दोन दिवसांचा कार्यक्रम होतोय तो पाहू तरी, बेंगळूरुला फक्त राज्यव्यापी- कर्नाटकपुरता कलामेळा होतोय तो कसा असेल बरं, असली भोचक कुतूहलं तिथं-तिथं जाऊन शमवत राहिलो. प्रवासखर्चाबद्दल कुटुंबातून आणि सुट्टीबद्दल ऑफिसातून कधी अडवणूक झाल्याचं आठवत नाही. अशा प्रकारे प्रवासाला निर्ढावलो.
या निर्ढावलेपणात २००७ उजाडलं, तोवर अटलबिहारी वाजपेयींच्या सरकारनं ‘इंडिया शायिनग’चा दावा करून झाला होता आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात देशाचा आर्थिक विकास प्रत्यक्ष दिसत होता, सामान्य माणसापर्यंत पोहोचत होता. अशा काळात संपूर्ण स्वखर्चानं दोन आठवडे युरोपात जाण्याचं नियोजन सुरू केलं. त्यासाठीची आर्थिक झळ ११ पगारांना बसणार होती; पण आठ महिने आधीपासून प्रवासाची आखणी करणं इंटरनेटमुळे सोपं झालं होतं (जे १९९५ मध्ये नव्हतं!) व्हेनिसची बिएनाले आणि जर्मनीचा डॉक्युमेंटा २००७ मध्ये एकाच सुमारास भरले होते, शिवाय म्यून्स्टर शहरात दर दहा वर्षांनी भरणारं शहरव्यापी शिल्प-प्रदर्शनही अनायासे त्या वर्षी होतं. या तीनच ठिकाणी जायचं, भरपूर पाहायचं, असं ठरवून निघालो. या वेळी हॉस्टेलं खासगी आणि छोटीसुद्धा चालतील; पण तिथे मॅगी वगैरे करून खायचं, जेवणखाण्याचे पैसे वाचवायचे, असं नियोजन करूनच निघालो असल्यानं ठेपले, वडय़ा, मॅगीची पाकिटं यांच्यावरल्या खर्चासह एकंदर ८९ हजार जाऊन-येऊन खर्च झाला होता, असं आठवतंय! हा खर्च पुढल्या- पुढल्या वेळी वाढत गेला खरा; पण तोवर घरच्या मंडळींची सहनशक्तीसुद्धा वाढली होती. सहचारिणीनं, सुप्रियानं सांगितलं- ‘मीही येते तुझ्याबरोबर.’ मग २०१३ ला दोघं गेलो. व्हेनिसच्या मध्यवर्ती प्रदर्शनाची जागा म्हणजे ‘आर्सेनाले’ हा एके काळचा शस्त्र-कारखाना.. तिथे अगदी जवळ एक अपार्टमेंटच सात दिवसांसाठी घेऊन दोघं राहिलो. तर दोन खेपांना, सुधीर काटकर हे चित्रकार-मित्र सोबत होते. बाकीच्या सर्व वेळी एकटय़ानं फिरताना, एकटं कधीच वाटलं नाही. जिथे राहायचो त्या जागी बहुतेकदा आसपासच्या शहरांतले/ देशांतले कुणी त्या प्रदर्शनांसाठीच आलेले असायचे, मग तर गप्पा रंगायच्याच! असाच २०१५ ला व्हेनिसमध्ये जर्मनीतला एक अख्खा ग्रुप होता आणि माझ्याकडे ‘पेगी गुगेनहाइम म्युझियम’मध्ये भारतीय चित्रकार व्ही. एस. गायतोंडे यांच्या भरलेल्या प्रदर्शनाच्या ओपिनग पार्टीचे दोन पास होते.. ग्रुपमधल्या कुणाला गायतोंडे यांच्या अमूर्तचित्रांत रस आहे, हे त्या मित्रमैत्रिणींनी आपसांत ठरवलं आणि एक जण माझ्यासह आला.
या साऱ्या लौकिक गोष्टींपेक्षा तिथे जाऊन पाहिलेल्या- आस्वादलेल्या कलाकृतींचे अनुभव ‘अलौकिक’ म्हणावेत असे. यात म्युझियममध्ये पाहिलेली चित्रं आहेतच (अॅमस्टरडॅमच्या व्हॅन गॉचं ‘पोटॅटो इटर्स’ किंवा रेम्ब्रांचं ‘नाइट वॉच’, व्हॅटिकनमधला आणि फ्लोरेन्समधला मायकेलँजेलो, पॅरिसचा पिकासो आणि मातिस आणि तिथल्याच सेंटर पॉम्पिदूतला जाँ डय़ूबफे.. मिलानच्या ‘हँगर बिकोका’तला आन्सेल्म कीफर.. आणखी किती तरी). पण त्या- त्या महाप्रदर्शनापुरत्याच मांडलेल्या कलाकृतीही आहेत. यात २००७ मध्ये घानाच्या इब्राहिम महामा या चित्रकारानं व्हेनिसच्या आर्सनालेमध्ये सुमारे ३१० मीटर लांब आणि १० ते १२ मीटर (फूट नाही) उंच अशा पॅसेजला गोणपाटांनी झाकून टाकल्याचं दृश्य ही पहिली आठवण.. ही गोणपाटं घानातल्या शेंगदाण्यासाठी वापरलेली, काळपटलेपणात मजुरांच्या घामाचाही अंश असलेली आणि त्यावर पांढऱ्या खुणा- त्या मजुरांनीच केलेल्या.. किती खेपा झाल्या, याच्या खुणा. ‘आर्ट अॅज स्पेक्टॅकल’ वगैरे बोलबाला युरोप-अमेरिकेत २००८ च्या मंदीपर्यंत असताना, एका आफ्रिकी चित्रकाराची स्पेक्टॅक्युलर कृती, शोषणालाही सर्वासमोर टांगणारी होती. अर्स फिशर या शिल्पकारानं ‘रेप ऑफ द सबीन विमेन’ या विषयावरल्या (एका) इटालियन संगमरवरी शिल्पाची मेणाची प्रतिकृती केली, तिच्यासमोर आजच्या प्रेक्षकाचाही मेणाचा पुतळा उभा केला आणि या दोन्ही मेणकृतींची ज्योत पेटवून त्या कणाकणानं वितळवल्या.. प्रेक्षकांमध्येही त्यानं ऱ्हासाच्या जाणिवेची ज्योत पेटवली. प्रतिभावान प्रकाश-शिल्पकार (लाइट आर्टिस्ट) जेम्स टरेल यानं त्याच वर्षी अनंततेचा अनुभव दिला. डॉक्युमेंटाची एक शाखा २०१९ मध्ये मुद्दाम अथेन्समध्ये होती, तिथे लाला रुख या पाकिस्तानी चित्रकर्तीची ‘रूपक ताल’ ही कलाकृती ताल आणि रेषा यांच्या अतूट नात्याचा थेट- प्रत्यक्ष प्रत्यय देणारी ठरली.
डॉक्युमेंटातल्या अनेक कलाकृती पाहताना, राजकीय कारणांनी आलेल्या अस्वस्थतेचं रूपांतर अत्यंत संयमीपणे ‘कलाकृती’त करण्यासाठी किती तरी देशांमधल्या दृश्य-कलावंतांना केवढी कळ सोसावी लागली असेल, हे सतत दिसलं. व्हेनिसला जॉर्ज बेसेलिट्झ या चित्रकाराची मानवी जीवनातल्या अपूर्णतेबद्दलची तगमग त्याच्या रंगांमधून, रेषांमधून भिडली (त्यासाठी त्याच शहरात भरलेलं त्याचं एकल प्रदर्शनही कामी आलं.), डॅमिएन हस्र्टसारख्या ‘चमको’ ब्रिटिश चित्रकाराची लगन केवढी आहे हे पाहाता आलं, चीनचा बहिष्कृत, पण प्रतिभावंत आणि बंडखोर दृश्यकलावंत आय वे वे याचं दर्शन डॉक्युमेंटात घडलं.. एकदा खरोखर शहारलो, तो आवडता लेखक-चिंतक उम्बर्तो इको याच्या निधनानंतरच्या वर्षांत, व्हेनिसच्या बिएनालेत त्याचे उतारे भिंतीवर लावलेले पाहून! अर्थात कला आणि तत्त्वचिंतनाचा संबंध आहेच, हे अन्यत्रही दिसत राहिलं होतं.. स्लोव्हेनिया हा देश स्लावोय झिझेकचा आणि त्या देशाचं ‘पॅव्हिलियन’ व्हेनिसला दर बिएनालेत असतं.. एकदा (२०११) प्रचंड मोठय़ा कॅनव्हासवर इवलुशा ब्रशनं रंगकाम करत राहाण्याची कृती हीच या स्लोव्हाक पॅव्हेलियनमध्ये ‘कलाप्रसंग’ म्हणून होती. झिझेक म्हणतो की कलाकृतीचं ‘प्रदर्शन’ करणं हे कलावंतानं आपल्या आतल्या कलेला ‘बाहेर काढण्या’सारखं- चारचौघांत ‘जा’ म्हणण्यासारखं आहे. तो धागा पकडूनच हा कलाप्रसंग जासा या कलावंताला सुचला होता. टिनो सेहगल हा अधिक नावाजलेला कलाप्रसंगकार, त्यानं एका वेळी २० जणांना एका अंधाऱ्या हॉलमध्ये सोडलं- त्या हॉलमध्ये आमची ‘बॅच’ शिरल्यावर आधीच तिथं असलेले काही जण अगम्य भाषेत ओरडू लागले आणि क्षणार्धात, काळोखीतला समाज तयार होत गेला.. इतरही तस्संच ओरडू लागले.. आता ‘याला कला म्हणावं का?’ असा प्रश्न येणारच! पण ही प्रश्नांकितता, त्यामागची अनिश्चितता, हे सारं मान्य केलं तरी ‘प्रत्ययकारी कला-कृती’ म्हणून टिनो सेहगलच्या या कलाप्रसंगाला स्थान द्यावं लागेल.
असे अनेक अनुभव, आत्मिक आनंद देणारे होते. एकटय़ाला भिडलेला, पण एकटय़ाचा नसल्याची जाणीवही त्याच क्षणी देणारा अनुभव. आपण एकटे आहोत, तरीही एकटे नाही, आपण या क्षणी जाणते होतो, आहोत, तरीही नेणतेपण शाबूत आहे, याचा अनुभव. अशा अनुभवाच्या लाटांना आनंदलहरीच म्हणावं लागेल. आणि या सगळय़ाला भंपकपणा म्हणणारेही असतीलच, हे गृहीत धरूनसुद्धा एक सत्य उरतं: कला असतेच कुठे तरी.. तिच्याकडे तुम्ही जावं लागतं. हे जाणं गेल्या तीन-चार वर्षांत माझ्यापुरतं कमी झालं, कोची वा दिल्लीपुरतं उरलं, पण एक तर ते कायमचं थांबलेलं नाही आणि एकाचं थांबलं तरी बाकीचे असतीलच ना कलेकडे जाणारे!