नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. कुठल्याही गोष्टीचा आरंभ हा काही घडण्यासाठी आवश्यक असतो. या नवीन वर्षांत तुमच्याही आयुष्यात खूप काही शुभ घडावं म्हणूनच ‘प्रारंभ’ या विषयावरील ही काही वचनं, तुम्हाला प्रेरणादायी ठरणारी..

अध्यात्माच्या वाटेवरचे नियम फक्त दोनच :  आरंभ आणि सातत्य
 – सुफी वचन

 हजारो मलांच्या प्रवासाचा आरंभ एक पाऊल उचलूनच होत असतो.
  – लाओ त्सू (ताओवादाचे प्रवर्तक)

 सत्याच्या मार्गावर चालत असताना  होणाऱ्या दोन चुका – पहिली म्हणजे प्रवास पूर्ण न करणे आणि दुसरी पण महत्त्वाची म्हणजे आरंभच न करणे.
– भगवान  बुद्ध

 जी व्यक्ती आपल्या वाटचालीचा प्रारंभ ज्या क्षणी निश्चित करते ती त्या क्षणी एका अर्थाने आपलं अंतिम ध्येयही निश्चित करत असते.
– एच. ई. फोस्डिक (अमेरिकन धर्मगुरू )

 कुठल्याही गोष्टीचा प्रारंभ नेहमीच सोपा असतो. त्यात सातत्य राखणे हे मात्र अवघड!
– जपानी वचन

 मृत्यूची चिंता, भीती बाळगत बसण्यापेक्षा जीवन जगायलाच सुरुवात न करणे ही भीती खऱ्या अर्थाने सर्वाधिक मोठी आहे.
– मार्क्स ऑरेलिअस (रोमन सम्राट )

 साधारणपणे कोणतीही नवी सुरुवात करताना एक प्रकारची भीती वाटू शकते. कोणत्याही नवीन गोष्टीचा किंवा उपक्रमाचा आरंभ भीतीदायक असू शकतो. अनेकदा त्यांचा अंतही उदासवाणा असू शकतो. पण तरीही आरंभ हा करायला हवाच. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरंभ आणि अंत या दोन्हींमधला काळ ! प्रत्येकाने कसलीही नवी सुरुवात करताना ही गोष्ट लक्षात ठेवायलाच हवी, असं मला वाटतं.
– साण्ड्रा बुलक (हॉलीवूड अभिनेत्री)

 कोणत्याही अत्यंत महत्त्वाच्या आणि अविस्मरणीय घटनेच्या संदर्भात एकच गोष्ट लक्षात राहते आणि ती गोष्ट म्हणजे तिची सुरुवात, तिचा आरंभ!
– थॉमस कार्लाईल  ( प्रख्यात विचारवंत )

 सतत नवनव्या गोष्टींचा आरंभ करीत राहा. भलेही त्यात अपयश आलं तरीही, नव्याने सुरुवात कराच. कितीही वेळा यशाने हुलकावणी दिली तरीही दरवेळी नव्या उमेदीने केलेली सुरुवात तुम्हाला कणखर, खंबीर बनवील. आणि ही कणखर वृत्तीच तुम्हाला तुमच्या ध्येयप्राप्तीपर्यंत घेऊन जाईल. कदाचित आरंभ करताना तुमच्या लक्षातही येणार नाही, पण नंतरच्या काळात याच स्मृती तुम्हाला आनंद देत राहतील.
– आन सुलिवान (हेलन केलर यांच्या शिक्षिका)

 मागे फिरून, भूतकाळात शिरून नव्याने आरंभ करणं ही गोष्ट शक्यच नसते. पण कोणतीही व्यक्ती अगदी आज.. या क्षणापासून नवी सुरुवात करू शकते आणि त्यातून नव्याने अंतिम ध्येयही निश्चित करू शकते.
–  मारिया रॉबिन्सन (प्रसिद्ध लेखिका )

 अवघड आरंभाचा अंत नेहमीच सर्वोत्तम असतो. त्यामुळे आरंभाला घाबरू नका.  
– जॉन हेवूड ( ख्यातनाम अमेरिकन न्यायतज्ज्ञ व इतिहासतज्ज्ञ)

या विश्वाच्या कोणत्या ना कोणत्या भागात नेहमीच नवा दिवस उजाडत असतो.. नवी पहाट होत असते. सूर्याचे प्रकाशमय किरण आसमंत उजळत असतात. तात्पर्य इतकंच की अंधारात बुडून गेलेला दिवसाचा अंत कधीच कायम राहत नसतो. जेव्हा जेव्हा एकीकडे अंत होतो, तेव्हा तेव्हा दुसरीकडे नवा आरंभ होत असतो.
– रिचर्ड हेन्री हॉर्न (ज्येष्ठ कवी व समीक्षक)

 भल्या मोठय़ा वाटचालीची सुरुवात होते ती, एका छोटय़ाशा पावलाने! म्हणूनच आपण कोणतीही सुरुवात करताना वाटचाल किती मोठी, किती अवघड आहे, याची चिंता कधीच करू नये. आपल्या आवाक्यातलं काम.. मग ते कितीही छोटं;  प्रसंगी क्षुल्लक जरी वाटलं तरीही, ते करत राहावं. त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. कारण ते लहानसं वाटणारं काम प्रत्यक्षात एखाद्या भव्य गोष्टीचा महत्त्वपूर्ण प्रारंभ असू शकतं.
– ए. ई. स्टीव्हन्सन

 तुम्ही कोणत्याही गोष्टीला कधी सुरुवातच केली नाहीत तर कधी जिंकणारच नाहीत.  
–  हेलन रोलॅण्ड (अमेरिकन पत्रकार)

 माझ्या मते प्रत्येक आरंभ हा एका अर्थाने अंत असतो. आपण ज्याला आरंभ म्हणतो, ती एक प्रकारे अखेर असते, असं मला वाटतं. आणि कोणत्याही गोष्टीच्या अखेरीपर्यंत, अंतापर्यंत पोचण्यासाठी सुरुवात तर करायलाच हवी ना! म्हणूनच मला नेहमी वाटतं की एखाद्या गोष्टीचा अंत म्हणजेच आपण जिथून नवा आरंभ करतो ती पायरी होय.
– टी. एस. इलियट  (प्रसिद्ध कवी)

 एखाद्या कामाचा आरंभ उत्तम झाला म्हणजे ते काम निम्मं फत्ते झालं म्हणून समजा.
– अ‍ॅरिस्टॉटल (ग्रीक तत्त्वज्ञ)

 अत्यंत यशस्वी माणूस म्हणून माझ्या मनावर आलेलं प्रचंड दडपण, एक अनामिक ओझं पुन्हा जेव्हा एका गोष्टीला नव्याने प्रारंभ केला तेव्हा क्षणात नाहीसं झालं. नव्याने सुरुवात करणाऱ्या एखाद्या नवख्या व्यक्तीप्रमाणे मला एकदम हलकं वाटू लागलं. नवख्या व्यक्तीला जशी पुढील कोणत्याही गोष्टीची शाश्वती नसते. तरीही तिच्या मनावर फारसा ताण नसतो, तसं मला जाणवत होतं.. आणि त्या नव्या आरंभामुळेच मी माझ्या आयुष्यातील एका सर्वोत्तम अशा सृजनशील टप्प्यात प्रवेश केला.
– स्टीव्ह  जॉब्ज (‘अ‍ॅपल’चा संस्थापक)
 
 कोणतीही नवी सुरुवात करण्यासाठी परिस्थिती अनुकूल होण्याची वाट बघत बसू नका, थेट सुरुवात करा. प्रारंभ झाला की परिस्थिती आपोआप योग्य बनत जाते.
– अलन कोहेल (‘बेस्टसेलर’ प्रेरणादायी पुस्तकांचे लेखक)

 दररोज नव्या दिवसाबरोबर येणारी आश्वासकता मला थक्ककरते आणि आनंदितसुद्धा! एक, ताजीतवानी सुरुवात, एक आणखी नवा प्रयत्न.. खरंच, या गोष्टी किती सुखावणाऱ्या आहेत! आणि दररोज उगवणाऱ्या नव्या दिवसाची प्रतीक्षासुद्धा!
– जे. बी. प्रिस्टले ( प्रख्यात कांदबरीकार  व नाटककार)

 जे गरजेचं आहे त्या गोष्टींपासून आरंभ करा, मग ज्या शक्य आहेत त्या गोष्टी करा. अचानक एका क्षणी तुमच्या लक्षात येईल, की जे अशक्य वाटत होतं, तेच तुम्ही करत आहात.
– सेंट फ्रान्सिस ऑफ अस्सिसी ( इटालियन धर्मगुरू )

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 तब्बल ५०० पानं लिहून पूर्ण करणं, जेव्हा मला अशक्य वाटू लागतं, ते एक मोठं आव्हान आहे असं वाटू लागतं, तेव्हा माझ्या मनावर एकाएकी अपयशाचे ढग जमू लागतात. मग मी हळूच फक्त एक पान लिहून काढतो..मग दुसरं ..मग तिसरं .. अशी हलकेच सुरुवात माझी कामाची गुंतागुंत संपवून टाकते.
– जॉन स्टेनबेक (पुलित्झर पुरस्कार विजेते लेखक)