भारत पाटणकर krantivir@gmail.com
‘‘चळवळींना आयुष्य वाहिलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यां- संशोधक गेल ऑम्व्हेट यांचे नुकतेच निधन झाले. ‘दलित पँथर’, ‘युक्रांद’, ‘मागोवा’,‘श्रमिक मुक्ती दल’ अशा परिवर्तनवादी चळवळींचा उदय होण्यात सहभागी-साक्षीदार झालेले भारत पाटणकर आणि गेल ऑम्व्हेट यांचं गेल्या ४५ वर्षांचं सहजीवन. भारत पाटणकर यांनी २२ मार्च २०१४ रोजी ‘चतुरंग’ पुरवणीमध्ये त्यांच्या आणि गेल यांच्या झपाटलेल्या सहजीवनाविषयी लेख लिहिला होता. तोच लेख (संपादित) आम्ही पुनर्मुद्रित करीत आहोत. सात वर्षांपूर्वीचा हा लेख दोन निष्ठावंत कार्यकर्ते आणि जोडीदार म्हणून फुललेलं त्या दोघांमधलं अतूट, सर्जनशील नातं उलगडतो..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्या संध्याकाळी, अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आम्ही प्रत्यक्ष भेटलो. शेकडो तरुणांनी बेभान होऊन परिवर्तनाच्या चळवळीत पूर्णपणे झोकून देण्याचा तो झपाटलेला काळ. हे झपाटलेपण जगभरच्याच तरुणांमध्ये होतं. तीही तशाच तरुणाईचा भाग होती, अमेरिकेत. ती होती गेल ऑम्व्हेट.. सातासमुद्रापल्याडहून आलेली. लोकशाही हक्कांच्या चळवळीत भाग घेतलेली. आफ्रिकी- अमेरिकी तरुणाईबरोबर लढय़ात सहभाग असणारी. जोतिबा फुल्यांच्या चळवळीवर अभ्यास करून डॉक्टरेट मिळवणारी. आणि तिच्यासमोर मी होतो.. मुंबईला एम.डी. करायला आलेला. बेचाळीसच्या प्रतिसरकारच्या सशस्त्र भूमिगत चळवळीत पुढाकाराने कार्य केलेल्या आई-वडिलांचा स्वप्नाळू मुलगा. एम. डी. गायनॅकॉलॉजीची फक्त अंतिम परीक्षाच देणे बाकी असताना सर्व सोडून पूर्ण वेळ चळवळीत झोकून दिलेला. मला अशीच जीवनसाथी पाहिजे होती.

समोर निळा अथांग समुद्र आणि त्याच्याशी साधम्र्य पावणारे गेलचे निळेशार डोळे. डोळ्यांना डोळे भिडत होते आणि शब्दांच्या भाषेबरोबरच डोळयांची भाषासुद्धा बोलत होती. आणि इथे सुरू होत होती आमच्या सहजीवनाची कहाणी. आम्हा दोघांनाही ही कहाणी अशी प्रत्यक्षात घडेलच याची खात्री त्या वेळी तरी नव्हती. मैत्री, प्रेम, जिव्हाळा यांच्या बीजपेरणीची ही सुरुवात तर होती. पावलं बरोबर पडण्याची ही सुरुवात होती. तो काळ होता १९७४-७५ चा. एकत्र आलेले दोन निष्ठावंत कार्यकर्ते आणि जोडीदार म्हणून फु ललेलं आमचं  हे नातं.

मी गेलला पहिल्यांदा पाहिलं ते सुधीर बेडेकरच्या घरी. एक अमेरिकन तरुणी, संशोधन करणारी, ‘मागोवा’ ग्रुपच्या एका प्रमुख कार्यकर्त्यांला भेटायला आलेली. पण माझ्या आईची (इंदुताई पाटणकर)आणि तिची ओळख माझ्याही आधीची. स्त्री-मुक्ती चळवळीच्या निमित्तानं झालेली. आईला वाटायचं, या मुलीनं आपल्या एखाद्या कार्यकर्त्यांबरोबर लग्न करावं. गंमत म्हणजे ज्या वेळी तिला कळलं, की आम्ही सहजीवन सुरू करणार आहोत त्या वेळी मात्र तिला असुरक्षित वाटायला लागलं. माझ्या एकुलत्या एका पोराचं काय होणार, याची काळजी वाटली तिला. पण नंतर अनेक भेटी, अनेक गप्पा, अनेक चर्चा, अनेक हळुवार प्रसंग येत गेले आणि आम्ही सहजीवन सुरू करायचं नक्की ठरवलं. ‘लग्न’ ही पारंपरिक संकल्पना पितृसत्ताकच. ती अमान्य. पण प्रत्यक्षात जगायचं तर कायदेशीर काही करणं सक्तीचं. एक तडजोड. ती केली. आजपर्यंतचं सहजीवनच.. रोमँटिकपणा काही अजून संपत नाही आणि संपणारही नाही.  निळे डोळे करडय़ा-काळसर डोळयांशी प्रेमाची अजब भाषा बोलत राहतात..

आमचं ‘लग्न’ झालं आणीबाणीत. मी आणीबाणीत भूमिगत. मुंबईच्या कामगार चळवळीत ग्रामीण भागातले शेतमजूर, शेतकरी चळवळीत. न पकडले जाता चळवळ तर करायचीच असा खाक्या. आमचं भेटणं कसं होत होतं याचंच आज मला आश्चर्य वाटतं. लग्नाला दहा-बारा माणसं. त्याच दिवशी सकाळी गेलनं लीलाताई भोसलेंसह जाऊन माझ्यासाठी एक शर्ट विकत घेतला. लग्नाच्या दिवशी शर्ट तरी नवा असावा म्हणून. मीही लटक्या रागानंच तो घेतला. नोकऱ्या करणाऱ्या मित्रांचे जुने कपडेच सर्रास अंगावर असायचे. ‘मग तेच असले म्हणून बिघडलं कुठं?’ हा माझा सात्त्विक (!) प्रश्न. एकंदरीत दहा-बारा मित्रांच्या साक्षीनं कॉ. ए. डी. भोसले आणि लीलाताई यांच्या घरी पुण्यात लग्न झालं. आई, मामा. चळवळीतले डॉ. बनेमामा होतेच.

सहजीवन होतंच, ते पुढे सुरू झालं. त्या काळात सहजीवन म्हणजे अळवाचं पान आणि त्यावरच्या दवबिंदूंसारखं. नाजूक, गोंडस, हळुवार, नात्याचं. मी सारखा रस्त्यावरच्या जनचळवळीत आणि गेल संशोधन आणि लिखाणात. गेल पुण्याला आणि मी मुंबईत, शहाद्याला, धुळे, सांगली जिल्ह्य़ात.

माझं आणि गेलमधील नात्यातली सघनता आणि खोली सातत्यानं वाढतच गेली. ते अतूट बनत गेलं. लग्नानंतर गेल अमेरिकेला गेली. कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या सॅनदिएगो शाखेमध्ये प्राध्यापकी चालू ठेवण्यासाठी. एक वर्षांच्या या काळाच्या शेवटच्या तीन महिन्यांत मी पहिल्यांदा अमेरिकेला गेलो. खेडय़ामध्ये शेतात राबत राबत शिकलेला मी या परदेश दौऱ्यावर जाताना खरंच प्रचंड बुजलो, गांगरलो. पैशांचा प्रश्न अर्थातच गेलनं सोडवला. मुंबईच्या विमानतळावर गेल्यावरचं दडपण मधल्या थांब्यावर, न्यूयॉर्कला विमान बदलताना आणि सॅनदिएगो विमानतळावर उतरून गेल दिसेपर्यंत चालूच राहिलं. गेल दिसल्यावर मात्र जीव भांडय़ात पडला. भेटण्या-भेटण्यात गेलला जाणवला, स्पर्शाला कळला तो अत्यंत कृश झालेला भारत. गेलच्या डोळ्यांत टचकन अश्रू तरारले. ‘आता तुला चांगलंचुंगलं खायला घालून गुबगुबीत केलं पाहिजे,’ ती म्हणाली आणि बैलगाडी चालवलेला, एस.टी., बस, लोकलमधून प्रवास करून चेंगरलं जाण्याची सवय असलेल्या मी तिच्या कारमधून तिच्या राहण्याच्या ठिकाणी गेलो. अमेरिकन साम्राज्यवादी व्यवस्थेतील लोकांचा अनुभव त्याला यायचा होता. अमेरिका नावाचं अजब रसायन समजायला सुरुवात होणार होती.

अमेरिकेतली पहिली चळवळ पाहिली ती गेलच्या  विद्यापीठातील विद्यार्थ्यांची. विद्यापीठानं वंशद्वेशी दक्षिण आफ्रिकी सरकारच्या संगनमतानं तिथं केलेल्या भांडवली गुंतवणुकीविरुद्ध केलेल्या निदर्शनांच्या रूपानं. ती मुलं गाणं म्हणत होती, ‘काळे-गोरे एकजुटीनं, आम्ही डगमगणार नाही.’ ते  विद्यार्थी ‘फीवाढ रद्द करा,’ ‘सवलती द्या’ वगैरेंसारख्या कोणत्याच मागण्या करत नव्हते. फारच बरं वाटलं.

अमेरिकेत गेलच्या आई-वडिलांनी आमचं रिसेप्शन आयोजित केलं. आमचं लग्न झाल्यावर गेलनं फोनवरून त्यांची माझी भेट घातली होती. त्याआधी त्यांना काहीच सांगितलं नव्हतं.  तिने एका भणंग होऊन चळवळीत फिरणाऱ्या भारतीयाशी लग्न केलं होतं. एका काळयासावळया तरुणावर प्रेम केलं होतं. असं असूनही अत्यंत प्रेमानं आणि अगत्यानं तिच्या आईवडिलांनी माझं स्वागत केलं. त्यांचा आनंद व्यक्त करण्यासाठी मित्रमैत्रिणी, नातेवाईकांसह सर्वाना निमंत्रित केलं होतं. गेलच्या कुटुंबाचं अमेरिकेतलं, मिनिसोटा राज्यातलं मूळ गाव होतं ‘टू हार्बर्स’. मिनिआपोलिस या त्या वेळच्या गावापासून १०० पेक्षा जास्त मैलांवर. तिथूनही गेलचे चुलते-चुलत्या, चुलतभाऊ-चुलतबहिणी वगैरे या कार्यक्रमाला आले होते. मिनीआपोलिसमधल्या मावशा-काका आणि त्यांची मुलंसुद्धा आली होती. मित्रमैत्रिणी तर आलेच होते. हा एक सुखद धक्काच होता. तीन महिन्यांच्या काळात असे परस्परप्रेमाचे, मानुष नात्यांचे अनेक अनुभव येत गेले.  बुरसटलेल्या, जातीवादग्रस्त, घराण्याचा दुराभिमान बाळगणाऱ्या, गोरा रंग हे सौंदर्याचं प्रमुख लक्षण मानणाऱ्या ‘काळया रंगाच्या’ भारतीय , मराठी माणसांपेक्षा वेगळं विश्व या नात्यांमधून गवसलं.

‘दलित पँथर’, ‘युक्रांद’, ‘मागोवा’ अशा नव्या परिवर्तनवादी चळवळींचा उदय होण्यात सहभागी-साक्षीदार असणाऱ्या आमच्या जीवनामध्ये उतारही आला. ज्या प्रस्थापित पक्षांवर घणाघाती टीका करून या प्रवाहांचा उदय झाला त्याच प्रवाहांमधली माणसं वेगवेगळया प्रस्थापित पक्षांमध्ये सामील होत गेली. पर्याय उभा करण्याचं आव्हान उभं राहिलं. ‘श्रमिक मुक्ती दल’ हे याच आव्हानात्मक परिस्थितीतून उभं राहिलं. आम्ही जोडीनं यासाठी जिवापाड मेहनत घेतली. सहकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून नव्या पिढयांबरोबर तारुण्य टिकवून काम केलं. आव्हानं पेलली, स्वीकारली, त्यातले धोके पत्करले, धोक्यांवर मात केली. आज महाराष्ट्राच्या १०-११ जिल्ह्य़ांमध्ये एक नवी चळवळ, नवी उमेद घेऊन उभी आहे. तरुण पिढी ही चळवळ पुढे नेत आहे. साम्राज्यवादी जागतिकीकरणाची आव्हानं स्वीकारणारी, नवे पर्याय सर्व क्षेत्रांत मांडणारी, हजारो स्त्री-पुरुषांच्या सहभागाची चळवळ पुढे झेपावते आहे. दोघांनाही मागे वळून पाहताना आनंदच होतो आहे.  पोथ्या टाकून, जुन्या क्रांतिकारकांच्या विचारांच्या खांद्यावर उभं राहून नवे सिद्धांत उभे करण्यात आम्ही दोघांनी अनेक मंथनं, लिखाण संयुक्तपणे केलं. जनतेच्या चळवळीतून शिकून नवीन मांडणी पुढे आणली. संयुक्तपणे लिखाण, विचारमंथन करणं, संयुक्तपणे नवा विचार जन्माला घालणं, हेही शृंगारिक असू शकतं, याचा अनुभव जीवनभर घेतला.

प्राचीचा, आमच्या मुलीचा जन्म हा आमच्या जीवनातल्या सर्वात आनंदाच्या क्षणांपैकी, वैयक्तिक जीवनातला एक क्षण. आईनं आणि बापानं कोणत्याही रागाच्या क्षणी प्राचीच्या अंगाला बोटही लावलं नाही. मारणं तर दूरच. पण चळवळीतल्या आणि संबंधित संशोधन कामातल्या सहभागाने प्राचीला आम्हा दोघांचाही पूर्ण सहवास लाभू शकला नाही, ही खंत आहेच.  ही उणीव माझ्या आईनं भरून काढली. ती तिची दुसरी आईच झाली. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याच्या चळवळीचा भाग म्हणून शहादा, नंदुरबार, तळोदा या ठिकाणांवरून पायी ‘समता मार्च’ निघाला. नऊ महिन्यांच्या प्राचीला ‘बॅक कॅरिअर’मध्ये पाठुंगळीवर घेऊन गेल, माझी आई आणि पश्चिम महाराष्ट्रातले कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले. आदिवासींच्या त्या परिसरातून वाट तुडवत धुळयापर्यंत कित्येक किलोमीटर चालले. होईल तसा मुक्काम, मिळेल तसं जेवण, असं करीत धुळयाच्या मेळाव्यापूर्वी आमची गाठ पडली. तो प्रसंग आयुष्यभर न विसरता येणारा. कारण प्राचीचं पोट जाम बिघडून ती आजारी पडली होती. मी डॉक्टर असून तिच्याजवळ थांबू शकत नव्हतो. कारण मुंबईच्या गिरणी कामगारांच्या चळवळीच्या जबाबदाऱ्या होत्या. गेलच्या डोळयांत अश्रू होते. मी मात्र अश्रू गिळून ते बाहेर येऊ देत नव्हतो. अशा अनेक प्रसंगांतून ती पोर पुढे जाणार होती..

दुष्काळी भागात लांब पल्लय़ाची दुष्काळ निर्मूलनाची, समन्यायी पाणीवाटपाची चळवळ १९८३ ला सुरू झाली. गेल, प्राची, इंदुताई या चळवळीत सामील. परित्यक्तांची चळवळ उभारण्यात सामील. प्राचीचं दप्तर कायम बरोबरच. जिथे मुक्काम पडेल तिथं अभ्यास. अनेक कार्यकर्त्यां, कार्यकर्ते तिच्या मावशा, मामे झाले. प्राची मराठी माध्यमात शिकत गेली. घरीही सारखी कार्यकर्त्यांची रीघ. सारख्या चर्चा, सारखी वर्दळ. त्यातूनच अभ्यास.

आज प्राची अमेरिकेत नोकरी करते. तिचं लग्न झालं आहे. दोघंही दक्षिण आशियाई जनतेच्या एकजुटीकरिता चळवळ करताहेत. ‘ऑक्युपाय द वॉल स्ट्रीट’ चळवळीत त्यांचा पुढाकार. सर्व दडपलेल्या जनतेच्या चळवळीत त्यांचा पुढाकार आहे. पोरगी मातीला जागली, पोरीनं शोषितांबरोबरची नाळ तुटू दिली नाही. आपले पणजी-पणजोबा शेतमजूर आणि अंगठेबहाद्दर होते, शोषित होते, हे विसरली नाही. समाजपरिवर्तनाची मशाल तिनं सातासमुद्रापलीकडे पेटती ठेवली. यापरतं सुख दुसरं कोणतंच असू शकत नाही. ती दरवर्षी इकडे येते. कासेगावी-सातारी मराठी बोलते. कासेगावच्या चिंचोळया गल्ल्यांमधून जुन्या मित्रमैत्रिणींना भेटते. जुन्या प्रकारच्या जुन्यापान्या घरात आनंदानं राहते. रानात जाते आणि मित्रमैत्रिणींना भारतीय, मराठी शेती दाखवते.  हा एक अमृतानुभवच असतो.

तडजोडी केल्या तर सत्ता सांभाळून नेते. जिवावरचे प्रसंग येत नाहीत. तुरुंगात जावं लागत नाही. मी मात्र तुरुंगात लॉकअपमध्ये ढेकणा-पिसवांच्या अनुभवातून अनेक वेळा गेलो आहे. कधी सहकाऱ्यांसह, तर कधी एकटा. गेली ३-४  वर्षसोडली, तर ३४-३५ वर्ष ही चळवळीच्या केसेस अंगावर घेतलेली, कोर्टात खेटे घालणं भाग पाडणारीच होती. आणीबाणीत एकदा तर सत्ताधाऱ्यांच्या गुंडांनी जिवे मारण्याचा घाट घातला होता, पण मी कसाबसा वाचलो. बडया-बडया नेत्यांनी सभा-बैठकींमध्ये जाहीरपणे धमक्या देण्याचे तर अनेक प्रसंग आणि घटना. जगलो आहे हे अजून तरी हे एक आश्चर्य. जनतेनंच जिवंत ठेवलं आहे. पाठीचा कणा ताठ आहे. कुणाची भीती वाटण्याचा प्रश्नच नाही. जनतेच्या मुक्तीसाठी या धोक्यांचं मला काय किंवा गेलला काहीच वाटत नाही. चळवळीच्या नवनव्या यशाच्या आनंदापुढे, नव्या चळवळी उभारण्याच्या आनंदापुढे, नवे विचार जन्माला घालण्याच्या जल्लोषापुढे हे धोके कस्पटासमानच वाटतात.

गेल मला म्हणते, ‘तू एक वेडा कार्यकर्ता आहेस. इतकी वर्ष झपाटलेला, बेभान झालेला आहेस. चळवळ म्हणजे जणू तुझं व्यसनच आहे. तुझं मन चळवळीनं पछाडलेलं आहे.’  तिला माझं हेच ‘भारतपण’ आवडतं. म्हणून शरीरं वयस्कर झाली तरी प्रेम तरुण आहे.  मला नेहमी असं वाटत आलंय, गेल नसती तर आजचा भारत, मी असा घडलोच नसतो. तीही या झपाटलेपणाचा भाग आहे.  नाहीतर पावसात भिजत, चिखल तुडवत, अंधारात आदिवासी भागात फिरण्याचा बेभानपणा तिनं केलाच नसता. फक्त देहबोली वेगळी आहे. व्यक्त होणं वेगळं आहे. माझ्या व्यक्तिगत पुरुषप्रधान वृत्तींना लगाम घालून त्याला बदलण्याचं मोठं कार्य गेल आणि प्राचीनं केलं. भारत त्यामुळे जास्त मानुष झाला आहे.

चळवळीनं, श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून ऐतिहासिक कार्य केलं आहे. नव्या वाटा पाडल्या आहेत. मानव मुक्तीच्या स्वप्नाशी जोडणारे पर्याय पुढे आणून संघर्ष यशस्वी केला आहे. या संघर्षांतली गेल आणि भारतची ही प्रेमकहाणी आहे.

ती साठा उत्तराची इथे पाचा उत्तरात सांगितली आहे. कारवाँ वाढतो आहे. पण अजूनही लहानच आहे, देशाच्या मानानं. या कारवाँमध्ये आमचं सहजीवन वाटचाल करीत आहे ..

 

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharat patankar article about researcher author activist gail omvedt life zws
First published on: 04-09-2021 at 01:08 IST