निकीता गुप्ते – nikita.tamhane08@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदाची दिवाळी अनेकांसाठी ‘बोनसविरहित’ ठरली आहे. कित्येकांच्या पगारांमध्ये ‘करोना’च्या सुरुवातीच्या काळात सुरू झालेली कपात अद्याप चालूच आहे. काहींनी तर रोजगारच गमावले आहेत. अशा स्थितीत मोठी गरज आहे, ती उमेदीची. टाळेबंदीपासून सुरू झालेल्या कठीण आर्थिक काळात स्नेहल लोंढे, सुवर्णा गोखले आणि अमृता माने या तिघींनी विचारपूर्वक आखणी करून आपल्याबरोबर इतर स्त्रियांनाही आर्थिक मिळकतीचे नवीन मार्ग शोधून दिले. त्यातून प्रेरणा घेऊन अनेकींनी नवीन व्यवसाय सुरू के ले. काय आहेत त्यांचे अनुभव हे जाणून घेण्यासाठी ‘लोकसत्ता चतुरंग चर्चे’च्या व्यासपीठावर ‘मंदी एक संधी’ हा वेबसंवाद आयोजित केला होता. त्या वेळी या तिघींनी सांगितलेले त्यांचे प्रेरणादायी अनुभव..

टाळेबंदीत जेव्हा आर्थिक मंदीचं सावट दिसू लागलं तेव्हा लहान नोकरी-व्यवसायांवर अवलंबून असणाऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालं. आता हळूहळू स्थिती पूर्वपदावर येऊ पाहत असली, तरीही अनेक व्यावसायिक जम बसवण्यासाठी धडपडत आहेत. कवठे महांकाळ येथील ‘पयोद इंडस्ट्रीज’च्या व्यवस्थापकीय संचालक स्नेहल लोंढे, ‘ज्ञानप्रबोधिनी’च्या कार्यकर्त्यां सुवर्णा गोखले आणि स्त्रियांना दुचाकी चालविण्यास शिकवणाऱ्या ‘वूमन ऑन व्हील्स’ संस्थेच्या युवा उद्योजक अमृता माने यांची गोष्ट मात्र जरा वेगळी आहे. ‘करोना’ आणि टाळेबंदीनं अर्थव्यवस्थेचं गणित बिघडवलं असलं तरी या तिघींनी मात्र या मंदीलाच संधी बनवलं आणि त्यातून स्वत:साठीच नव्हे, तर इतरांसाठीही उत्पन्नाचा मार्ग खुला करून दिला. ‘लोकसत्ता चतुरंग चर्चा’ या विशेष कार्यक्रमात ‘लोकसत्ता’च्या डेप्युटी कॉपी एडिटर स्वाती केतकर पंडित यांनी या चर्चेचं प्रास्ताविक करत या तिघींची ओळख करून दिली तर लोकसत्ताच्या ‘फीचर एडिटर’ (चतुरंग) आरती कदम यांनी या तिघींना बोलतं केलं.

प्रश्न – स्नेहल, तुम्ही तुमच्या ‘पयोद’ या कंपनीच्या माध्यमातून दहा वर्षांपूर्वी ग्रामीण स्त्रियांकडून घरबसल्या उत्तम प्रतीचे हातमोजे (ग्लोव्हज्) तयार करून घेण्यास सुरुवात केली आणि ते जपानमध्ये निर्यातही होऊ लागले. ही निर्यात करोनामुळे थांबून आलेल्या संकटावर मात करत तुम्ही ही मंदी एक संधी समजून तिचं सोनं केलं. त्या अनुभवाविषयी सांगा.

स्नेहल – हातमोजे आम्ही बनवत होतोच; परंतु टाळेबंदीमुळे निर्यातीवर बंधनं आल्यानं व्यवसायही थांबला. परंतु माझ्याकडे इतकी र्वष काम करणाऱ्या स्त्रियांच्या आर्थिक गरजेचा प्रश्न होता. साहजिकच मी आताच्या काळात अत्यंत गरजेच्या अशा मुखपट्टय़ा अर्थात मास्क बनवायला सुरुवात केली. या सर्व स्त्रियांकडे शिलाई मशीन होत्याच. नंतर गरजेनुसार त्याच्या डिझाईनमध्ये बदल करत गेलो. आता आम्ही दिवसाला २०,००० मास्क बनवतो आणि विकतो.

प्रश्न – एवढे मास्क बनवण्यासाठी किती बायका मदत करतात? काम कसं चालतं?

उत्तर – आता आमच्याकडे सहाशे स्त्रियांची टीम काम करते. जपानला निर्यात होणाऱ्या उत्पादनांप्रमाणेच उत्तम प्रतीचे मास्क आम्ही स्थानिक बाजारपेठेसाठी बनवतो. स्त्रियांकडून उत्तम दर्जाचं काम व्हावं यासाठी त्यांच्या घरात गॅस देणं, फरशी बसवणं अशा इतर सुविधाही दिल्यामुळे आज आम्हाला दर्जेदार उत्पादन मिळतं. टाटा कंपनी तसेच ताज हॉटेलच्या सर्व शाखांना ‘पयोद’चंच उत्पादन जातं.

प्रश्न – या उत्पादनाची माहिती घेण्यासाठी तुम्ही व्यवसायाच्या सुरुवातीला जपानमध्ये गेला होतात, तेही कामगार म्हणून, त्याविषयी सांगा.

उत्तर – आम्ही जपानमधल्या कंपन्यांना भेटी दिल्या तेव्हा उत्पादनाची पुरेशी माहिती मिळाली नाही. जोपर्यंत तुम्ही त्यांचे भाग होत नाहीत तोपर्यंत तो व्यवसाय नीट कळणार नाही हे लक्षात आल्यावर मी कामगार म्हणून त्या कंपनीत रुजू झाले आणि उत्पादनांची आणि मशिनरीची माहिती घेतली, जी मला माझा व्यवसाय सुरू करण्यासाठी उपयोगी पडली.

प्रश्न – सुरुवातीला ग्रामीण स्त्रियांना तुम्ही ‘पयोद’कडे कसं वळवलं?

उत्तर – ग्रामीण स्त्रियांनी प्रशिक्षण घेऊन घरबसल्या ग्लोव्हज् बनवण्याचं काम करावं, यासाठी त्यांना त्यांची बुडणारी रोजंदारी आणि जाण्यायेण्याचा खर्च पदरमोड करून आम्ही दिला. पण नंतर घरून काम करून व्यवस्थित पैसे मिळवता येतात हे लक्षात आल्यावर स्त्रियांची संख्या वाढू लागली.

प्रश्न – या संपूर्ण प्रवासात समाधानकारक घटना घडल्या असतीलच.

उत्तर – आता आम्ही टॉवेल, नॅपकीन्स यांचं उत्पादन वाढवत आहोत. सांगायला आनंद वाटतो की, महाराष्ट्र सरकारच्या ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’ योजनेअंतर्गत शंभर स्त्रियांच्या कंपन्या नोंदणीकृत झाल्या आहेत. यातील एका स्त्रीनं दहा जणींना काम दिलं, तरी हजार स्त्रिया स्वयंपूर्ण होतील. हे खूप मोलाचं काम ठरेल.

चर्चेच्या दुसऱ्या मान्यवर होत्या सुवर्णा गोखले. गेली तीस र्वष त्या ‘ज्ञानप्रबोधिनी’च्या कार्याशी जोडलेल्या आहेत. टाळेबंदीच्या काळात ग्रामीण भागातील उत्पादनं त्यांनी पुणे शहरातील नागरिकांना घरपोच दिली आणि ग्रामीण शेतकरी स्त्रियांना विक्री आणि विपणनासाठी एका चांगल्या पर्यायाची ओळख करून दिली.

प्रश्न – सुवर्णाताई, तुम्ही ग्रामीण भागातील स्त्रियांना बचत गटाच्या माध्यमातून कशी संधी दिली?

उत्तर – टाळेबंदीच्या काळातही ग्रामीण भागातील परिस्थिती रोजच्या संपर्कातून फोनवरून कळत होती. एकीकडे शेतात भाजी पडून होती, तर मार्केट यार्ड बंद असल्यानं पुणेकरांना भाजी मिळत नव्हती. या व्यथा ऐकल्या आणि एक दिवस ‘ज्ञानप्रबोधिनी’च्या युवक-युवतींनी गावांतील भाजीविक्रीचा ‘वेब पेज’ व भेटीगाठींतून पुण्यात प्रचार केला. त्याच वेळी गावाकडच्या बचत गटाच्या  स्त्रियांना सांगितलं, की तुम्ही भाव ठरवा, विक्रीची व्यवस्था आम्ही करू. आठवडय़ात आम्ही ‘व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप’ केले. पोर्टलवरून उपलब्ध भाज्या आणि त्यांचे भाव लोकांना कळवले. पंधरा दिवसांत साडेसहा टन भाजी विक्री करण्यात आली.

प्रश्न – बचत गटातील संघटित स्त्रियांच्या नेटवर्कचा, परस्पर संपर्काचा कसा फायदा झाला?

उत्तर – गावांतील मजुरांना भाजी दिली, तेव्हा त्यांना गहू-तांदूळ हवे आहेत असं कळलं. मग या सर्व स्त्रियांनी पुढाकार घेऊन घराघरांतून तयार धान्य गोळा के लं आणि त्याच्या विक्रीनंतर रोख रक्कम त्या त्या बाईच्या कार्डावर जमा केली. तोवर सरकार शेतकऱ्यांना पाच हजार रुपये पीक कर्ज देणार असं कळलं. बचत गटाच्या स्त्रियांनी गावातील लोकांची यादी केली आणि बँक व्यवस्थापकांना विनंती केली की, सर्वासाठी वाहतुकीची साधनं उपलब्ध नसल्यामुळे एकाच व्यक्तीकडे कर्जाची रक्कम द्यावी. प्रक्रिया उद्योग, कागदी आणि कापडी पिशव्या बनवणं, अशा पूरक उत्पादनांमुळे स्त्रियांचं उत्पन्न वाढलं. त्याच वेळी गावात कर्तव्य बजावणारे पोलीस, डॉक्टर यांना बचत गटाच्या स्त्रियांनी डबे पुरवण्याचं काम सुरू केलं. त्यातूनही त्यांना आर्थिक लाभ झाला.

प्रश्न – पुणे शहर आणि ग्रामीण भाग यामधला तुम्ही दुवा ठरला आहात, ते काम कसं केलं?

उत्तर – ‘प्रबोधिनी’च्या कामाची अनेकांना आधीपासून माहिती असल्यामुळे सुरुवातीला लोकांनी स्वेच्छेनं देणग्या दिल्या. एका स्त्रीला गणपती उत्सवात गौरीचं वाण द्यायचं होतं. तिनं गावातल्या एका स्त्रीला व्यवसायासाठी भांडवल दिलं. त्यातून तिचा शेवया उत्पादनाचा उद्योग सुरू झाला.

प्रश्न – याखेरीज ग्रामीण स्त्रियांच्या जीवनात कोणतं परिवर्तन झालं?

उत्तर – या सगळ्या कालावधीत स्त्रियांनी घेतलेला पुढाकार आणि केलेली यशस्वी वाटचाल, यातून या स्त्रियांना आपोआपच ‘मालकीण’ असा एक मानाचा दर्जा प्राप्त होत गेल्याचं आम्ही पाहिलं. तिची घरातील पत बदलली. तिचे कुटुंबीय कामात मदत करू लागले. ‘झूम मीटिंग’वर बोलणं, उत्पादनाचं पॅकेजिंग करणं, फॉर्म भरणं, सरकारी कार्यालयात धिटाईनं जाणं, हे तिला जमू लागलं. तिचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान बळावला. शेतीचं नियोजन, विपणन कौशल्य ती या करोनाकाळात शिकली. मंदीतील संधी तिच्यासाठी हितकारक ठरली ती अशी.

या परिसंवादातील उद्योगिनी आणि सळसळत्या तरुण पिढीची प्रतिनिधी म्हणजे ‘वॉव’ अर्थात ‘वूमन ऑन व्हील्स’ची संचालक, मुली आणि स्त्रियांना दुचाकी चालवायला शिकवणारी अमृता माने.

प्रश्न – अमृता, करोनामुळे टाळेबंदी लावली गेली आणि एका अर्थी तुझ्या व्यवसायाचं चाक थांबलं. तुझ्याकडच्या दुचाकी चालवायला शिकवणाऱ्या ट्रेनर्सचं जीवन त्यावर अवलंबून होतं. मग ‘वॉव’द्वारे खाद्यपदार्थाची डिलिव्हरी पोहोचवण्याचं नवीन काम सुरू केलंस. तुझ्यासाठी ही मंदी संधी कशी ठरली?

उत्तर – टाळेबंदीत स्त्रियांना दुचाकी प्रशिक्षणाचं माझं काम थांबलं. पण माझ्याकडे असणाऱ्या प्रशिक्षकांचा आर्थिक प्रश्न होताच. त्यांना काही तरी काम देणं आवश्यक होतच. म्हणून वेगळं काम शोधू लागले. लोकांना वाणसामान आणि औषधांची गरज असते. ते घरपोच दिलं तर? असा विचार आला आणि मी त्यासंबंधी ‘फेसबुक’वर एक व्हिडीओ रेकॉर्ड करून टाकला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. हळूहळू केक, जेवणाचे डबे पोहोचवण्याचं काम मिळू लागलं. पुढे हॉटेल्स, रेस्टॉरंटस्मधून पार्सल सेवेसाठी फोन येऊ लागले.

प्रश्न – सुरुवातीला अंडी, औषधं, खाद्यपदार्थ अशा डिलिव्हरी पोहोचवण्यापासून तुम्ही सुरुवात केली. आता तुम्ही सगळ्या कुठपर्यंत आणि दिवसाला किती डिलिव्हरी पोहोचवता?

उत्तर – आता आम्ही विक्रोळी, कांदिवली, दक्षिण मुंबई, दादर अशा सर्व ठिकाणी महिन्याला २,००० डिलिव्हरी पोहोचवतो. माझी अशी इच्छा आहे की, संपूर्ण मुंबईसह महाराष्ट्रभर पोहोचावं.

प्रश्न – ‘वॉव’ या तुझ्या संस्थेमागची नेमकी कल्पना काय?

उत्तर – मी असं पाहिलं आहे की, स्त्रिया केवळ मजेसाठी दुचाकी शिकत नाहीत. त्या प्रामुख्यानं मुलांना शाळेत सोडायला, बाजारात जायला गाडी शिकतात. म्हणजे गाडी शिकण्यानं त्याचं काम अधिक सुलभ होतं. सुरुवातीला मी माझ्या ओळखीच्या स्त्रियांना दुचाकी शिकवायचं ठरवलं. पहिल्या महिन्यात फक्त एक जण माझ्याकडे शिकायला आली.  हळूहळू संख्या इतकी वाढली की आता आम्ही वेगवेगळ्या बॅचमध्ये दुचाकी चालवायला शिकवतो.

प्रश्न – हा वेगळा व्यवसाय सुरू केल्यानंतरचा तुझा काय अनुभव आहे?

उत्तर – डिलिव्हरी पोहोचवण्याच्या आमच्या कामामुळे इतरांच्या उद्योगांचा विस्तार झाला. माझ्यासह इतरांनाही नवे उद्योग सुरू करण्याची प्रेरणा मिळाली याचं समाधान आहे. अनेक जणी घरी खाद्यपदार्थ बनवतात किंवा टिफीन तयार करतात, मात्र त्यांच्याकडे ते ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग नसतो. अशा वेळी माझी ‘वॉव डिलिव्हरी’ ते काम करते. साहजिकच माझा व्यवसाय होतोच, परंतु त्यांचाही व्यवसाय चालू राहतो, हे मला मोलाचं वाटतं.

या चर्चेचा समारोप करताना आरती कदम म्हणाल्या, ‘‘थांबला तो संपला. करोनामुळे व्यवसाय, जगण्याची गती थांबली तरी जगणं थांबत नाही. अशा वेळी आपत्ती ही इष्टापत्ती समजून पुढे जायचं हे ठरवून, जे स्वत:बरोबर इतरांनाही पुढे नेतात, त्यांचं यश लखलखीतपणे समाजासमोर येतं. इच्छा तिथे मार्ग असतोच. आपल्यावर अवलंबून असणाऱ्यांना आर्थिक संकटात टाकता येणार नाही, इतक्या साध्या विचाराच्या बळावर या तिघींनी अनेकींना रोजगार तर मिळवून दिलाच; परंतु नवे व्यवसायाचे मार्ग दिले. त्यांच्या या उदाहरणातून अनेकांना नवीन व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतीलच. हेच या कार्यक्रमाचं फलित ठरेल.’’

या तीन उद्योगिनींची कार्यक्षेत्रं वेगळी, त्यांना असलेला आधीच्या कामाचा अनुभवही वेगवेगळा, पण त्यांनी समोर दिसणाऱ्या संकटात शांत राहून वेगळा विचार के ला आणि तो अमलात आणला, हे त्यांचं वैशिष्टय़. आपल्यापैकी इतरही कित्येकांनी असे प्रयोग निश्चित के ले असतील. या तिघींच्या प्रातिनिधिक अनुभवांमधून नवे मार्ग शोधण्याची प्रेरणा मिळो, हीच सदिच्छा!

हा कार्यक्रम संपूर्ण पाहण्यासाठीची लिंक  – https://www.youtube.com/watch?v=mk6-FEy6h00&t=28s

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus pandemic lockdown recession an opportunity loksatta chaturang charcha dd70
First published on: 14-11-2020 at 01:41 IST