– अ‍ॅड. स्नेहल सावंत

लेखक व. पु. काळे यांचं एक वाक्य एका कथेत वाचलं- ‘संसारात समजूतदार साथीदार मिळाला की संसार छान खुलतो, फुलतो, बहरतो.’ मला माझ्या संसारात त्या वाक्याचा तंतोतंत अनुभव आला आहे.

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
There is no end to the songs of Dalits
गीतांचा भीमसागर… : दलितांच्या सुरांना अंत नाही!
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!
Manmohan Singh
अग्रलेख: बडबड बहरातील मौनी!

मी माहेरची सुनीता मधुकर साटम. मुलुंडला माहेर. माझे पती चंद्रशेखर बाळकृष्ण सावंत. आमचं लग्न १९९३ मध्ये झालं. घरात आम्ही तीनच माणसं. पती, मी आणि सासूबाई. आम्ही कन्नमवार नगर, विक्रोळी इथं ‘वन रूम किचन’मध्ये राहात होतो. तसे आमचे दोघांचे स्वभाव भिन्न. मी बडबडी, पती मितभाषी. त्यांना वाचनाची आवड, मला तेवढी नाही. फक्त दोघांचीही ‘कॉमन’ आवड म्हणजे मनसोक्त फिरणं. लग्नाच्या वेळी चंद्रशेखर एका सहकारी बँकेत नोकरीला होते आणि मी एका साध्या खासगी कंपनीमध्ये. दोघांचाही पगारही तुटपुंजा होता. माझं शिक्षण ‘बी.कॉम.- एलएलबी’ होतं. फक्त वकिली करण्यासाठी लागणारं तिसरं वर्ष पूर्ण होणं बाकी होतं. चंद्रशेखरांच्या म्हणण्यानुसार चांगला पगार की शिक्षण, यात त्यांनी शिक्षण या गोष्टीला महत्त्व दिलं आणि मला पसंत केलं.

वर्षभरानं आम्हाला बाळ झालं. सासूबाई जेव्हा प्रथम रुग्णालयात मला आणि बाळाला पाहायला आल्या, तेव्हा प्रथम त्यांनी माझ्या गालाचा मुका घेतला आणि नंतर बाळाचा. त्यातच मला त्यांच्या ममत्वाचा अनुभव आला आणि आनंदही झाला, की माझं नातं एका सुसंस्कृत घराण्याशी जुळलं आहे. माझ्या सासूबाई त्या काळच्या फायनल परीक्षा पास झालेल्या होत्या. तीसपर्यंतचे पाढे त्यांना तोंडपाठ होते. त्यांनी कधीच जाणते-अजाणतेपणानं मला अपशब्द वापरला नाही, अपमान केला नाही. नेहमीच आईच्या मायेनं प्रेम केलं. मुलाच्या,अमेयच्या जन्मानंतर आमच्या तिघांचाही मी नोकरी सोडावी, असा एकमतानं निर्णय झाला. कारण मुलाकडे पूर्ण लक्ष द्यायला मिळावं हाच उद्देश. त्यानंतरही कधीच मी नोकरी करावी असा आग्रह दोघांनीही केला नाही. काही दिवसांनी चंद्रशेखर यांना बँकेत बढती मिळाली. सासूबाईंचा एक मात्र आग्रह असायचा, की मी ‘एलएलबी’चं तिसरं वर्ष पूर्ण करावं आणि वकील म्हणून माझ्या नावाचा बोर्ड घराच्या दरवाजावर असावा. मी त्यांच्या इच्छेखातर मन लावून अभ्यास केला आणि ‘एलएलबी’चं तिसरं वर्ष पूर्ण केलं.  अपेक्षित निकाल लागलेला बघून मी कॉलेजमधूनच सासूबाईंना फोन केला, त्यांना खूप आनंद झाला. आम्ही घरी पोहोचायच्या आधीच त्यांनी सगळय़ा शेजाऱ्यांना सांगितलं होतं, की ‘माझी सून वकील झाली’.

   हळूहळू माझ्या एका वकील मामाच्या मार्गदर्शनाखाली मी विक्रोळी कोर्टात काम सुरू केलं. दरम्यान अमेय पाच वर्षांचा झाला. मला बाळाचा आणि बाळाला माझा छान सहवास लाभला. त्याच्या बाललीला मला  मोकळेपणानं पाहायला मिळाल्या. संसाराच्या सारीपाटावर सुखदु:खाचा खेळ सुरू असतोच. एकमेकांना साथ देत, एकमेकांच्या पाठीशी उभे राहून असे प्रसंग हाताळले. कटाक्षानं एक गोष्ट नेहमीच टाळली, ती म्हणजे काहीही झालं तरी एकमेकांना दोष द्यायचा नाही.

हळूहळू माझ्या कामाचं बस्तान नीट बसू लागलं. मी स्वत:ची स्वतंत्र प्रॅक्टिस करू लागले. आम्ही सारासार विचार करून मुलुंडला थोडय़ा मोठय़ा ‘वन रूम किचन’मध्ये राहू लागलो. रोज न चुकता जेवल्यानंतर मी, अमेय आणि चंद्रशेखर, आम्ही एकत्र बसून स्वत:चा दिवसभराचा अनुभव सांगायचा, असा जणू आमचा नियमच ठरला. आयुष्य पुस्तकात लिहिलेल्या नियमाप्रमाणे छान सुरू होतं. आम्ही आमच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस सगळय़ा थोरामोठय़ांच्या आशीर्वादानं साजरा केला. मधल्या काळात सासूबाईंना दोन वेळा अर्धागवायूचा त्रास झाला. आम्ही तिघांनीही आपापल्या परीनं जमेल तेवढी त्यांची सेवा केली. परंतु त्यातच त्यांना देवाज्ञा झाली. माझ्या वीस वर्षांच्या वकिलीच्या प्रॅक्टिसनंतर मी दोन वर्षांपूर्वी ‘नोटरी’ झाले. मला मदतीचा हात देण्यासाठी चंद्रशेखर यांनी बँकेतली नोकरी सोडली. दोन महिन्यांपूर्वीच आम्ही दोन बेडरूमच्या घरात ‘शिफ्ट’ झालो. मुलाचं लग्न करून मुलगा, सूनबाई आणि आम्ही दोघं पती-पत्नी असे चौघं खेळीमेळीनं, शांततेनं, एकमेकांचा मान ठेवून राहात आहोत. ईश्वराचे खूप खूप आभार मानावेसे वाटतात, की त्यानं न मागता आयुष्यात खूप काही दिलं..

snehal.sawant03071968@gmail.com