दक्षिण आफ्रिकेला हरवून भारताच्या स्त्री संघाने यंदाचा विश्वचषक क्रिकेट सामना जिंकला आणि भारतीय स्त्रियांच्या क्रिकेटला जणू संजीवनी मिळाली. यापूर्वी फक्त पुरुषांच्याच क्रिकेटला महत्त्व मिळत होते, मात्र हा सामना ३२ कोटींपेक्षा जास्त लोकांनी क्रीडांगणावर न जाता टीव्ही वा ऑनलाइनच्या माध्यमांतून पाहिला. यावरून या सामन्याची लोकप्रियता लक्षात यावी. पुरुषांच्या क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर जसे पुरुषांचे क्रिकेटविश्व बदलले तशीच आशा आता स्त्री क्रिकेटविश्वाकडूनही असेल. मात्र त्यासाठी आवश्यकता आहे ती मानधनासह अनेक गोष्टींत समानता येण्याची.

१९८३ मध्ये कपिलदेव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुषांच्या क्रिकेट संघाने ‘लॉर्ड्स्’च्या ऐतिहासिक मैदानावरील अंतिम सामन्यात बलाढ्य वेस्ट इंडिजचा पराभव करून विश्वचषक जिंकला आणि भारतीय पुरुषांचे क्रिकेट कायमचे बदलले. त्यानंतर आता २ नोव्हेंबर २०२५ रोजी भारतीय स्त्रियांच्या क्रिकेट संघाने नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील क्रीडांगणावर दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवत विश्वचषक जिंकला आणि देशभरात उत्साह व आशेचं वातावरण निर्माण केले आहे.

१९८३च्या विजयानंतर पुरुषांच्या क्रिकेटला देशभरात उत्तेजन मिळाले आणि मुंबई, दिल्ली, हैदराबादसारख्या शहरांमधले तरुण क्रिकेटपटू पुढे येऊ लागले. विश्वचषक विजेत्या स्त्रियांच्या संघाचा विचार केल्यास आपल्या लक्षात येईल की, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव या मुंबईच्या आहेत, तर प्रतिका रावल दिल्लीची. याशिवाय, बहुतेक सर्व खेळाडू ग्रामीण भागातल्या किंवा छोट्या शहरातल्या आहेत. आताच्या बहुतेक स्त्री क्रिकेटपटू अशा आहेत की ज्यांनी क्रिकेटचे धडे पुरुषांबरोबरच घेतलेले आहेत. कारण फारच कमी मुली क्रिकेटचे प्रशिक्षण घ्यायला येतात. या विजयामुळे प्रोत्साहन मिळून मोठ्या प्रमाणावर स्त्री क्रिकेटपटू तयार होतील,अशी आशा आहे.

एके काळी पुरुषांच्या क्रिकेटमध्ये मुंबईचे वर्चस्व होते. भारताच्या संघामध्ये सहा-सात खेळाडू मुंबईचे असायचे. इतर खेळाडू अन्य महानगरांतले असायचे. आता मुंबईपेक्षा अधिक खेळाडू अन्य शहरातले किंवा ग्रामीण भागातले आहेत. ‘महिला विश्वचषक क्रिकेट’चा विचार केल्यास आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या संघांनी जेतेपद मिळवलेलं आहे. एके काळी वेस्ट इंडिजच्या पुरुष संघाला पराभूत करणे अवघड असायचे. हेच ‘ऑस्ट्रेलियाच्या स्त्री संघा’बद्दलही बोलता येईल. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने सात वेळा, इंग्लंडने चार वेळा तर न्यूझीलंडने एकदा विश्वचषक जिंकला आहे. यापूर्वी ‘भारतीय महिला संघ’ तिसऱ्यांदा अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता. तर यंदा दक्षिण आफ्रिका पहिल्यांदा अंतिम सामना खेळला. त्यांचा भारताने ५२ धावांनी पराभव केला आणि विश्वविजेता होण्याचा मान मिळवला. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडची आता स्त्रियांच्या क्रिकेटमध्ये मक्तेदारी राहिली नाही, असे यावेळच्या विश्वचषकांनी सिद्ध केले आहे.

समाजात घडणाऱ्या बदलांचा खेळावर आणि खेळाडूंवर परिणाम होणे स्वाभाविक असते. स्त्री-पुरुषात कुठल्याही स्वरूपात भेदभाव करता कामा नये, हा स्तुत्य विचार. त्याप्रमाणे ‘समान कामासाठी समान वेतन’हा सिद्धांत अनेक क्षेत्रात स्वीकारला गेला. ‘बीसीसीआय’नेही २०२२च्या ऑक्टोबर महिन्यात पुरुष क्रिकेटपटूंना देण्यात येणाऱ्या सामन्याच्या मानधनाइतकीच रक्कम स्त्री क्रिकेटपटूंना देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. याचा अर्थ स्त्री-पुरुषांना कसोटी सामन्याचे सारखेच म्हणजे १५-१५ लाख रुपये, एकदिवसीय सामन्याचे सहा लाख रुपये आणि ‘ट्वेन्टी-ट्वेन्टी’चे तीन लाख रुपये देण्यास सुरुवात झाली. न्यूझीलंडने २०२२च्या जुलै महिन्यात त्यांच्या स्त्री-पुरुष खेळाडूंना सामन्याचं एकसारखेच मानधन देण्याची घोषणा केली. इंग्लंडनेदेखील त्यांचे अनुकरण केले. पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेशात सामन्यांसाठी मात्र अद्याप स्त्री क्रिकेटपटूंना पुरुष क्रिकेटपटूंएवढे मानधन दिले जात नाही. स्त्री क्रिकेटपटूंना देण्यात येणाऱ्या मानधनामध्ये त्या देशांनी वाढ केली आहे, पण ती वाढ पुरुषांना मिळणाऱ्या मानधनाएवढी नाही.

‘बीसीसीआय’च्या वार्षिक करारात स्त्री व पुरुषांना मिळणाऱ्या मानधनात मात्र प्रचंड फरक आहे. ‘ग्रेड ए’मधील पुरुष क्रिकेटपटूंना वर्षाचे पाच कोटी रुपये, तर स्त्री क्रिकेटपटूंना ५० लाख रुपये, ‘ग्रेड बी’मधील पुरुष क्रिकेटपटूंना वर्षाला तीन कोटी रुपये, तर स्त्री क्रिकेटपटूंना ३० लाख रुपये दिले जात आहेत. ‘ग्रेड सी’मधल्या पुरुषांना एक कोटी रुपये, तर स्त्रियांना १० लाख रुपये दिले जातात. याशिवाय पुरुष क्रिकेटपटूंसाठी ‘ए प्लस’ ग्रेड आहे, पण स्त्री क्रिकेटपटूंसाठी ‘ए प्लस’ ग्रेड नाही. ‘ए प्लस’मधल्या पुरुष क्रिकेटपटूंना सात कोटी रुपये वर्षाचे दिले जातात. ही तफावत त्वरित दूर केली पाहिजे आणि समान वेतनाचा सिद्धांत स्वीकारला पाहिजे. ‘स्त्री-पुरुष समानता’ हा सिद्धांत नसून ते एक जीवनमूल्य आहे, ते लक्षात घेतलं पाहिजे. ‘बीसीसीआय’ हे जगातलं सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ आहे. त्यांच्यासाठी स्त्रियांना ‘रिटेनरशिप’साठी समान मानधन देणे अशक्य नाही. आताच्या विश्वचषक विजेत्या स्त्री संघाला ५१ कोटी रुपयांचा बोनस देण्याची ‘बीसीसीआय’ने घोषणा केली, मात्र गेल्या वर्षी भारतीय पुरुष संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून ‘ट्वेन्टी-ट्वेन्टी’चा विश्वचषक मिळवला तेव्हा त्यांना १२५ कोटी रुपये देण्यात आले होते, हे विसरता कामा नये.

क्रिकेटच्या दुनियेने स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीने काही महत्त्वाची पावले बऱ्याच वर्षांपासून टाकायला सुरुवात केली आहे. क्रिकेट हा पूर्णपणे पुरुषांचा खेळ होता. ते चित्र आता इतर क्षेत्रांप्रमाणे बदलत आहे. आता स्त्रिया क्रिकेटच्या मैदानावरही नवनवीन विक्रम करायला लागल्या आहेत. क्रिकेट खेळणाऱ्या देशात स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर क्रिकेट खेळायला सुरुवात झाली आहे. भारतीय क्रिकेटने अनेक महान स्त्री क्रिकेटपटू दिले. मिताली राज, झुलन गोस्वामी, शांता रंगास्वामीसारख्या दर्जेदार क्रिकेटपटूंचे खेळ आपण पाहिले आहेत. आता तर हरमनप्रीत कौर, जेमिमा रॉड्रिग्ज, स्मृती मनधाना, दीप्ती शर्मा, शफाली वर्मासारख्या उत्तम खेळाडू आपल्या संघात आहेत. त्यांना मैदानात पाहण्यासाठी लोक गर्दी करायला लागले आहेत, हे बदलते चित्रआशादायी आहे.

स्त्री क्रिकेटपटूंना आर्थिक मदत करायला आता अनेक ‘स्पॉन्सर’ पुढे यायला लागले आहेत. त्यात यापुढेही अधिक वाढ होईलच. क्रिकेटमध्ये कारकीर्द करण्याचादेखील अनेक मुली विचार करायला लागल्या आहेत. यात आणखी वाढ होईल. २०१७ मध्ये हरमनप्रीत हिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध काढलेल्या १७१ धावांनंतर काही ‘कॉर्पोरेट’ कंपन्यांचे स्त्रियांच्या क्रिकेटकडे लक्ष गेले. भारतात ‘आयपीएल’प्रमाणे २०२३ मध्ये ‘महिला प्रीमियर लीग’ (डब्ल्यूपीएल) सुरू झाली. त्यातून पुढे आलेल्या मुली आज जगभर क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवत आहेत.

स्त्री क्रिकेटपटूंना मिळत असलेल्या यशाचे साहजिकच समाजमाध्यमांवर प्रतिबिंब पडायला लागले आहे. त्यांना चाहते ‘एक्स’, ‘इन्स्टाग्राम’वर मोठ्या संख्येने ‘फॉलो’ करायला लागले आहेत. अर्थात पुरुष क्रिकेटपटूंच्या तुलनेत अजूनही कमी लोक त्यांना ‘फॉलो’ करत असले तरी ते करत आहेत हे महत्त्वाचे. भारतीय पुरुषांचा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना असो किंवा ‘ट्वेन्टी-ट्वेन्टी’; किमान २० ते २५ कोटी लोक टीव्हीवर, आणि ऑनलाइन, अॅप आदी माध्यमांवर सामना पाहतात. भारत-पाकिस्तान यांच्यात सामना असेल, तर ती संख्या अनेकदा ६० कोटींच्या पुढे जाते. एवढ्या मोठ्या संख्येत लोक सामने पाहत असल्यामुळे दूरचित्रवाणीवरील वाहिन्यांना मोठ्या प्रमाणात जाहिराती मिळायला लागल्या आहेत. विश्वचषकासाठी नुकताच झालेला भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यामधला स्त्रियांचा अंतिम सामना टीव्ही आणि ऑनलाइनच्या माध्यमांवरून ३२ कोटींपेक्षा अधिक लोकांनी पाहिला. यातून स्त्रियांच्या क्रिकेटबद्दलही लोकांमधील अभिरुची वाढत असल्याचे दिसते. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य सामना इतक्या लोकांनी पाहिला नव्हता. अर्थात अंतिम सामना महत्त्वाचाच असतो. विश्वचषक जिंकून ‘भारतीय महिला क्रिकेट संघा’ने क्रांती घडवली आहे, असे म्हणायला हरकत नाही.

सध्या रोहित शर्मा, विराट कोहली हे क्रिकेटपटू लाखो लोकांचे प्रेरणास्थान झाले आहेत. त्याप्रमाणे हरमनप्रीत, स्मृती, जेमिमा, दीप्ती, शफालीसारख्या जिगरबाज क्रिकेटपटूंकडे लाखो लोक आदराने पाहत आहेत. रोहित, विराटला मिळणारे लोकांचे प्रेम स्त्री क्रिकेटपटूंना मिळायला लागले आहे.

या क्रिकेटपटू आणि त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या संघर्षामुळे हजारो मुली क्रिकेटकडे आकर्षित होतील यात शंकाच नाही. क्रिकेट आणि लिंगभावनिरपेक्ष शब्द स्त्रियांच्या क्रिकेटचं वाढतं महत्त्व लक्षात घेऊन जागतिक स्तरावरच्या ‘मेरीलीबोन क्रिकेट क्लब’ने (एमसीसी) क्रिकेटच्या संदर्भातील काही नियमांत २२ सप्टेंबर २०२१ला सुधारणा केल्या आहेत. ‘बॅट्समन’ऐवजी ‘बॅटर’(Batter) हा लिंगभावनिरपेक्ष शब्द त्यात आणला गेला. ७ ऑक्टोबर २०२१ला ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे’ने (आयसीसी) सर्व व्यवहारांत आणि धावफलकात ‘बॅटर’ शब्दाचा उपयोग करणं बंधनकारक केलं आहे. ‘बीबीसी’, ‘स्काय स्पोर्ट्स’ इत्यादींनी त्याची लगेच अंमलबजावणीही केली आहे. सामन्यातील सर्वश्रेष्ठ खेळाडूंना देण्यात येणाऱ्या पुरस्काराला ‘मॅन ऑफ द मॅच’ म्हटलं जायचं पण त्यातला ‘मॅन’ शब्द बदलून ‘प्लेयर ऑफ द मॅच’ हा शब्द आणला गेला. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, हा बदल एखाद्या शब्दापुरता मर्यादित नसतो. शब्दांच्या मागे विचार असतो. ‘मॅन’, ‘बॅट्समन’ हे मुळात पुरुषसत्ताक व्यवस्थेचे शब्द आहेत. त्यातून पुरुषी वर्चस्व व्यक्त होते. गेली अनेक वर्षं लोक लिंगभावनिरपेक्ष शब्द शोधून त्याचा उपयोग करताना आढळतात. हा विचार समानतेचा आहे. चित्रपट दुनियेत ‘अॅक्टर’ हा शब्द आता पुरुषांपुरता मर्यादित राहिला नाही. पूर्वी स्त्री कलाकारांना ‘अॅक्ट्रेस’ म्हटले जायचे. आता सर्वांकरिता ‘अॅक्टर’ शब्द वापरला जातो. ‘नारीवादी आंदोलना’चा परिणाम म्हणून अनेक स्त्री कलाकारांनी स्वत:चा उल्लेख ‘अॅक्टर’ म्हणून करायला सुरुवात केली आहे. मेरील स्ट्रीप, कॅट ब्लेंचेटसारख्या हॉलीवूडच्या कलाकारांचा त्यात समावेश आहे. समाजाचा विकास आणि समानतेच्या विचारासोबत लिंगभावनिरपेक्ष शब्दांचा अधिक उपयोग व्हायला हवा.

आंतरराष्ट्रीय टेनिसचा विचार केल्यास ‘विम्बल्डन’, ‘अमेरिकन ओपन’, ‘फ्रेंच ओपन’ आणि ‘ऑस्ट्रेलिया ओपन’ हे सामने महत्त्वाचे मानले जातात. संपूर्ण जगाचे लक्ष या स्पर्धांकडे असते. कोट्यवधी लोक हे सामने टीव्हीवर किंवा ऑनलाइनच्या माध्यमातून पाहत असतात. जगभरातील टेनिस खेळाडू, फुटबॉल खेळाडू, क्रिकेटपटू इत्यादी विम्बल्डन पाहायला मुद्दामहून जात असतात. युरोप आणि अमेरिकेचं टेनिसमध्ये वर्चस्व आहे. मात्र येथेही स्त्रियांवर अन्याय होतो. या सर्व ठिकाणी स्त्रियांचे अंतिम सामने शनिवारी आणि पुरुषांचे रविवारी होतात. अलीकडे लोकांना शनिवार, रविवारी सुट्टी असली तरी रविवारचा आनंद वेगळा असतो. त्या दिवसाचं वातावरणही वेगळे असते. एका वर्षी स्त्रियांचा अंतिम सामना रविवारी आणि दुसऱ्या वर्षी पुरुषांचा रविवारी अशा स्वरूपात स्पर्धेचे सामने आयोजित करणे शक्य आहे. याला प्रतीकात्मक महत्त्व नाही, परंतु ते एक महत्त्वाचे पाऊल ठरू शकेल.

आताचा स्त्रियांचा विश्वचषक अंतिम सामना रविवारी खेळला गेला. त्यामुळे या सामन्याला प्रचंड प्रेक्षकवर्ग मिळाला. अशाच प्रकारचे प्रोत्साहन या स्त्री क्रिकेटपटूंना मिळत राहिले आणिमानधनाच्या बाबतीतही समानता आली तर भारताला मिळालेले हे वर्चस्व कायम राहण्यास नक्की मदत मिळेल.