|| डॉ. ऊर्जिता कुलकर्णी

लग्न संस्था, ही केवळ समाजव्यवस्था टिकण्याची सोय, असे त्याच्याकडे न पाहता, त्याच्याकडे अत्यंत परखडपणे पाहण्याची वेळ नक्कीच आली आहे. अन्यथा काही काळानंतर आपण ज्या संस्कृती, परंपरा आणि त्यातून जगणाऱ्या समाजाचा वारसा मोठय़ा छातीठोकपणे जगापुढे मांडतो ते खरेच शिल्लक असेल का? लग्न संस्थेत आमूलाग्र बदल नाही घडले, तर अगदी नजीकच्या काळात, नवीन लग्ने होतील का? आणि असलेल्या लग्नांपैकी किती लग्ने टिकतील?.. ‘सुखाशी भांडतो आम्ही?’ या लेखाचा उर्वरित भाग…

लग्न करून देताना मुलगा आणि मुलगी सुजाण आहेत हा महत्त्वाचा निकष असतो. त्यानंतर त्यांना त्यांचे स्वत:चे निर्णय स्वत: घेऊ दिलेच पाहिजेत. त्यात ते चुकतील, धडपडतील म्हणून आधीच सावधगिरीचे सल्ले सतत देत राहणे म्हणजेच ढवळाढवळ! किंवा त्यांनी प्रत्येक गोष्ट आपल्याला विचारून करावी, ही अपेक्षा बाळगणे म्हणजे त्यांच्या क्षमतेवर शंका घेण्यासारखे आहे.

त्यांच्या आयुष्यात असणाऱ्या सर्व बाबी उघडपणे, मोकळेपणाने त्यांनी बोलाव्यात, अशी अपेक्षा ठेवणे म्हणजे एक प्रकारे त्यांच्या सर्व नाडय़ा आपल्या हातात ठेवण्यासाठी केलेली धडपडच. आता इथे, आम्हाला काळजी असते. आम्ही चार पावसाळे जास्त पाहिलेले असतात किंवा त्यातले जास्त कळते, हे लगेच म्हटले जाईल. ते खरेच. परंतु त्या सगळ्याचा परिणाम जर त्या नात्यावर नकारात्मक पद्धतीने होणार असेल तर त्याचा काहीच उपयोग नाही. शिवाय सततचे प्रश्न किंवा शंका नसतील, तर नात्यात जास्त मोकळेपणा येतो, हे मूलभूत तत्त्व. तिथे गरज असल्यास, सल्ला घेण्यासाठी किंवा वडीलकीच्या नात्याने काय वाटते हे विचारण्यासाठी मोकळेपणाने ही नवीन जोडी नक्कीच कुटुंबाकडेच येईल आणि आली नाहीच, तरीही त्यातही वाईट वाटण्यासारखे काहीच नाही. ‘‘तुमच्या आनंदातच आमचा आनंद’’ असं वर वर म्हणत, आतून धुसफुसत राहत यांना कसे कोंडीत पकडता येईल असा विचार करणारे कुटुंबातले कित्येक सदस्य असतात.

लग्न झालेल्या जोडप्याने अर्थार्जन कसे करावे, पुढचे शिक्षण घ्यावे की नाही, मूल कधी होऊ द्यावे, त्यांना ते हवे आहे की नको, कोणती गाडी घ्यावी, कसे आणि कुठे घर घ्यावे, हे सर्वस्वी त्यांना ठरवू द्यावे. यामध्ये वेळोवेळी त्यांना काही मदतीची गरज लागल्यास, तसे त्यांनी विचारल्यास, ती सहज करणं शक्य असेल आणि त्याची तयारी मोठय़ांनी दाखवली, तर कुटुंबात समतोल राहील. ती करणे जमणार नसेल तरीही त्याविषयी स्पष्ट आणि मोकळेपणाने सांगण्यास काय हरकत?

काही तरी बिनसले म्हणून ही जोडपी जेव्हा वडीलधाऱ्यांकडे येतात, त्याही वेळेस आपल्याला काय वाटते यापेक्षा परिस्थितीजन्य आत्ता काय करता येईल, असा विचार होऊन चर्चा झाल्या, तर त्यात कोणी एक वाईट आणि कोणी एक उत्तम असे वर्गीकरण होणार नाही किंवा ‘‘मी तुला सांगत होतो/होते, तू ऐकलंच नाहीस. मला आधीच लक्षात आलं होतं..’’ वगैरे वल्गना या, असलेली परिस्थिती अधिकच बिघडवण्याचे काम करतात. त्यापेक्षा शांतपणे विचार करून, त्यातून मार्ग काढता येईल.

ज्या वेळेस नाती तुटायला येतात किंवा घटस्फोटासारखी परिस्थिती निर्माण होते, तेव्हा एकत्र म्हणून असणाऱ्या कुटुंबात चक्क दोन शत्रुपक्ष तयार होतात. एकमेकांवर इतके ताशेरे ओढले जातात, अपमानास्पद बोलले जाते. जसे की या क्षणासाठीच ते सारे साठवून ठेवले असावे की काय! इतकी कटुता घेऊन जर आपण एकमेकांसोबत रोज राहत असू, तर ती नाती पोकळच म्हणावी लागतील.

दुसरा सहज होणारा परिणाम असतो तो मित्रमंडळींचा. सहज म्हणून, मनातले बोलावे तसे त्यांच्या पुढय़ात एखादी बाब मांडली, तर ती काय पद्धतीने बघितली जाते हे फार महत्त्वाचे. त्याच्यावर सारासार विचार होतो की जोडीदारावर बोट ठेवून चर्चा होतात, की केवळ हसण्यावारी नेले जाते, यातून कोणाशी काय बोलावे किंवा बोलूच नये हे नक्कीच ठरवता येईल. बऱ्याचदा काही मित्रमंडळी, आपल्या आयुष्यात नसलेल्या समस्यांना नव्याने जन्माला घालून त्या आहेत अशी जाणीव करून देण्यात पटाईत असतात. एखादा प्रश्न विचारून, तुझा जोडीदार अमुकतमुक करतो का? किंवा तुमच्या कुटुंबात अशी स्थिती आहे का? वगैरे. आपल्याला नसलेली समस्या आहे असे भासवून, त्यातून बाहेर काढण्यासाठी, आपण केवळ त्यांचीच मदत घेऊ शकतो हे भासवणे. क्वचित प्रसंगी, अगदी आपल्याला नाजूक वेळेत गाठून, तिथे खांदा देणे! यातून त्यांचे महत्त्व आपल्या आयुष्यात वाढवणे, हाच काय तो उद्देश किंवा आपल्या जोडीदारापेक्षा कुटुंबातील इतर लोकांपेक्षा ते आपल्याला समजून घेतात हे भासवणे. अशांपासून चार हात लांब राहिलेले उत्तम. यातून सुरळीत चाललेल्या आयुष्यात किती तरी गरसमज निर्माण होतात.

आता जोडीदारांनीच काही बाबींची मनाशी खूणगाठ बांधली, तर मात्र ही न टिकणारी नाती नक्कीच जिवंत होतील.

  • आपण जोडीदार म्हणून एकमेकांना निवडले तेव्हाच आपल्या दोघांचे असे वेगळे जग तयार झाले.
  • इथे आपल्या दोघांचे कुटुंबीय, अगदी आई-वडीलसुद्धा या जगात येतच नाहीत. याचा अर्थ त्यांना वगळायचे असे अजिबातच नाही; परंतु आपल्या दोघांच्या आयुष्याबाबत मात्र निर्णय आपणच घ्यायचे.
  • इथे आपल्यावर एकमेकांची मोठी जबाबदारी आहे. आपले वाद-विवाद, आपल्यातले मतभेद हे असणारच. त्यासाठी प्रत्येक वेळेस आपल्या संपूर्ण कुटुंबाला त्यात गुंतवणे टाळायचे. ते आपल्या आपण सोडवायचे. सतत छोटय़ा-मोठय़ा बाबींसाठी,आई-वडिलांना ‘तुमचा मुलगा असा वागतो’ किंवा ‘तुमची मुलगी नीट वागत नाही’ असे प्रत्यक्ष किंवा फोन करून ऐकवत राहणे, यातून नकळत आपण आपल्या जोडीदाराचे त्यांच्या लेखी असलेले स्थान, आदर या सगळ्यांवरच आघात करतो हे नक्की. शिवाय काहीही घडले की पालकांचा आधार घ्यायचा, ते आपल्याला सांभाळता येत नाही, तितके धाडस नाही किंवा आपल्या चुका दाखवल्या जाऊ नयेत किंवा जोडीदाराने त्यांना घाबरून तरी नमते घ्यावे, अशी भूमिका असेल, तर ही केवळ पळवाट झाली. असे वारंवार घडले तर मात्र आपल्या प्रत्येक गोष्टीत घरातली सर्व मंडळी जातीने लक्ष घालणार हे नक्की. इथे स्वतंत्र विचार करण्याची मुभा आपण गमावून बसतो.
  • एकमेकांच्या चुका पारदर्शकपणे एकमेकांसमोर मांडायच्या. हे करताना, ते शांतपणे आणि शक्यतो घराबाहेर कुठेही जाऊन, बसून केल्यास, फापटपसारा टाळला जाऊन, नेमके मुद्दे मांडून बोलता येईल.
  • जोडीदार आणि आपल्यात काही अगदीच मूळ बाबतीत मतभेद आहेत हे लक्षात आले तर मात्र या फरकांसह आपल्याला या नात्यात सुसह्य़पणे राहता येणे खरेच शक्य आहे का, याचाही डोळसपणे विचार करावा. इथे जोडीदाराचा विचार करणेही गरजेचेच. त्याची आपल्या काही विशिष्ट स्वभाववैशिष्टय़ांमुळे गळचेपी होत नाही ना, हे प्रामाणिकपणे तपासून पाहावे.
  • कोणत्याही नात्यात राहताना, काही प्रकारची तडजोड, हा त्यातला अविभाज्य भाग. मग हे असलेले नाते मोडून, नव्याने संसार थाटायचा म्हटले, तरीही त्यात ती आलीच. त्यामुळे आपण तडजोड करतोय ती कितपत आहे? ती दोघांकडूनही असेल आणि त्याही स्थितीत आपण आनंदी असू, तर फुटकळ भांडणांना मोठ्ठे स्वरूप प्राप्त होण्याची इतर काही कारणे आहेत का, हेही बघावे.
  • जोडीदार म्हणून शारीरिक आणि मानसिक पातळीवर एकत्र येणे ही अत्यंत आवश्यक बाब. इथे आपल्यात काही दोष असतील तर ते झाकून न ठेवता, त्यावर योग्य उपचार, मार्गदर्शन वेळ न दवडता घेणेही गरजेचे. कारण, बोलू की नको? किंवा काय करावे? यात बराच मौल्यवान वेळ निघून जातो. दुसऱ्या जोडीदाराला संपूर्ण कुटुंबाकडूनच फसवले गेल्याची भावना येऊ शकते. कदाचित इथे सगळ्या बाबी, दुरुस्तीच्या पुढे जाऊन पोहोचतात.
  • घरात सर्वासाठी सारखे नियम! हा मुद्दा तर खूप महत्त्वाचा. इथे अर्थातच, व्यक्तिनिहाय असणारे काही मूलभूत फरक लक्षात घेतलेच पाहिजेत. जसे प्रत्येकाचे वय, आरोग्य, त्यांची जडणघडण काय पद्धतीने झाली आहे, वगैरे. हे एकमेकांत अगदी स्पष्ट बोलावे. त्यामुळे बऱ्याचदा वडीलधाऱ्या मंडळींना न दुखावतासुद्धा आपल्याला हवे ते निर्णय घेता येतात. यासाठी तुमची जोडीदाराशी वीण मात्र घट्ट हवी.
  • कोणत्याही नात्यात महत्त्वाची बाब म्हणजे विश्वास. तिथे आपला जोडीदार आपल्याविरुद्ध घरच्यांशी हातमिळवणी करून वागतोय, असे वाटले तर ते खरेच तसे आहे की आपल्याला वाटत आहे, हे जोडीदाराशी आणि कुटुंबाशी बोलल्याशिवाय कळणार नाही. तिथे अशा बाबी मनात न ठेवता त्यावर बोलावे.
  • मित्र-मत्रिणी, नातेवाईक, कुटुंब ही सगळी नात्यांना खतपाणी घालणारी असावीत. तशी नसल्यास त्यांच्यापासून एक विशिष्ट अंतर राखावे. तेही न दुखावता.

या काही मुद्दय़ांवर केवळ नवीन जोडप्यांनी विचार करावा असे नाही, तर बराच काळ केवळ टिकवायचे म्हणून किती तरी लग्ने आपल्या आसपास असतात. (तर अनेक वर्षे एकत्र राहणाऱ्या जोडप्यांनीही करण्यास हरकत नाही.) त्यांनाही याच बाबी उपयुक्त. हे केवळ ठरवून केलेल्या विवाहात लागू होते असे नव्हे, तर उलटपक्षी प्रेमविवाहात हे जास्त लागू पडते. कारण तिथे एकमेकांशी व्यवस्थित ओळख असली तरीही अपेक्षाही वाढलेल्या असतात. येणाऱ्या प्रतिक्रियाही बऱ्याचदा तीव्र स्वरूपाच्या असतात.

लग्नाशिवाय एकत्र राहणारी जोडपी, म्हणजे ‘लिव्ह-इन’मध्ये असणारी मंडळी किंवा घरच्यांच्या इच्छा डावलून लग्नात बांधल्या जाणाऱ्या व्यक्ती, यांच्यासाठी आयुष्य सोपे असते का? तर अजिबातच नाही. एक तर हा निर्णय कुटुंबीयांना मान्य नसतानाही आपण घेतला याचे सततचे दडपण आणि हे सगळेच फसल्यास पुढे काय? आधारासाठी कोणीच नाही अशीही परिस्थिती असते. त्यामुळे यांच्यापुढील आव्हाने तर जास्तच.

लग्न संस्था, ही केवळ समाजव्यवस्था टिकण्याची सोय, असे त्याच्याकडे न पाहता, त्याच्याकडे अत्यंत परखडपणे पाहण्याची वेळ नक्कीच आली आहे. अन्यथा काही काळानंतर आपण ज्या संस्कृती, परंपरा आणि त्यातून जगणाऱ्या समाजाचा वारसा मोठय़ा छातीठोकपणे जगापुढे मांडतो ते खरेच शिल्लक असेल का?

लग्न संस्थेत आमूलाग्र बदल नाही घडले, तर अगदी नजीकच्या काळात, नवीन लग्ने होतील का? आणि असलेल्या लग्नांपकी किती लग्ने टिकतील?

हे प्रश्न त्यांच्याकडे पाठ फिरवून, सध्या तरी माझ्या कुटुंबात सगळे आलबेल चाललेय असे खोटेच समाधान मानून सुटणारे नाहीत. ते कधी आपल्या उंबऱ्यापर्यंत येऊन पोहोचतील हे सांगणे अवघड!

urjita.kulkarni@gmail.com

chaturang@expressindia.com