आयुष्याचा अर्थ : नुसतं लढायचं नाही.. जिंकायचंही!

आयुष्याच्या प्रवासात कुठल्या वळणावर आपल्याला काय गवसेल आणि आपल्या हातून काय निसटेल हे सांगणं अगदीच अशक्य आहे.

आयुष्याचा अर्थ : नुसतं लढायचं नाही.. जिंकायचंही!

माधुरी बेंद्रे-लोणकर
आयुष्याच्या प्रवासात कुठल्या वळणावर आपल्याला काय गवसेल आणि आपल्या हातून काय निसटेल हे सांगणं अगदीच अशक्य आहे. पण जे निसटलं त्याचं दु:ख न करता, जे गवसलं त्याचा आनंद उराशी बाळगला तर पुढचं आयुष्य सकारात्मकतेनं जगण्यासाठी नक्कीच मदत होईल.आयुष्याचं प्रत्येक वळण, प्रत्येक टप्पा आपल्याला काही ना काही शिकवून जातो. त्या वळणावर आलेले अनुभव, भेटलेली माणसं, सगळय़ातूनच एक नवीन धडा मिळत जातो, जेणेकरून आयुष्याचा पुढचा प्रवास अधिकाधिक सुखकर होतो. खरं तर जीवनात येणाऱ्या संकटांना, दु:खांना सामोरं जाण्यास आपण तेवढे सक्षम झालेलो असतो.

मी कॉलेजमध्ये होते आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अचानक खालावली. त्या वेळी मी कॉलेज सोडून एक छोटी नोकरी करू लागले. पण शिक्षण अर्धवट राहिल्याची खंत सतत मनात बोचत होती. तेव्हा नोकरी करून शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला काही मैत्रिणींकडून मिळाला. सुरूवातीला खूप अवघड वाटलं, पण जिद्दीनं नोकरी करत शिक्षणही पूर्ण केलं. पदवीनंतर ‘ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट’मध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली आणि पुढे चांगली नोकरी मिळाली. हा प्रवास अतिशय संघर्षमय होता. माझ्याबरोबर माझी भावंडं आणि आई-वडील सगळय़ांनीच खूप कष्ट करून परिस्थिती बदलली होती. त्या काळात आईचा आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन माझ्यामध्येही आला. ती सतत आम्हाला सांगायची- ‘रडायचं नाही, लढायचं’. तिच्या या वाक्यानं नेहमीच बळ मिळत गेलं.

पुढे काही वर्षांनंतर लग्न झालं. आयुष्याचं हे नवीन वळण खूपच वेगळं होतं. लग्नानंतरही पुढे काही महिने नोकरी सुरू होती, परंतु मुलाच्या जन्मानंतर नोकरी सोडून द्यावी लागली. त्यानंतर अकस्मात अनेक जबाबदाऱ्या अंगावर पडल्या. पतीला नोकरीनिमित्त सतत बाहेर जावं लागत होतं. त्यामुळे मुलाची आणि घराची जबाबदारी माझ्या एकटीवरच पडली. परंतु मी ती अतिशय समर्थपणे पेलत होते. त्या काळातही अनेक चांगल्या-वाईट गोष्टींचे अनुभव घेतले. सांसारिक जबाबदाऱ्या सांभाळत असताना तेरा-चौदा वर्ष कशी निघून गेली ते समजलंच नाही. घरातल्या सगळय़ांचं करताना, त्यांच्या आवडीनिवडी जपताना मी मात्र स्वत: कुठेतरी हरवून गेले होते. स्वत:चं अस्तित्वच विसरले होते. आता हा संघर्ष वेगळा होता.. माझा माझ्याशी असलेला संघर्ष.

मार्च २०२० मध्ये करोनाने आपल्याकडे शिरकाव केला आणि सुरळीत, धावपळीत सुरू असलेलं सर्वसामान्यांचं जीवन टाळेबंदीमुळे एकदम शिथिल आणि शांत झालं. खूप जणांच्या आयुष्यात उलथापालथ झाली, तशीच माझ्याही आयुष्यात झाली. त्या वेळी आयुष्याच्या अशा वळणावर उभी होते, की पुढे जाणारे सगळे रस्ते अंधूक दिसत होते आणि मागे परत फिरावं तर पुन्हा तोच रस्ता, ज्यामुळे आयुष्य असह्य वाटत होतं. पुन्हा पुन्हा आपण निराशेच्या गर्तेत ओढले जातोय ही भावना मनात ठाण मांडून बसली होती. मूळची आशावादी स्वभावाची मी, या वेळी मात्र सगळं त्राण हरवून बसले होते. पण पहिल्यापासून आईनं दिलेला कानमंत्र ‘रडायचं नाही, लढायचं’ पुन्हा पुन्हा मनावर येऊन आदळत होता. कदाचित यामुळेच आणि माझ्या काही प्रियजनांच्या माझ्यावरच्या अतूट विश्वासानं, त्यांच्या सकारात्मकतेनं मला पुन्हा एकदा परिस्थितीशी लढण्याचं बळ दिलं. मनावरची सगळी मरगळ बाजूला टाकून मी पुन्हा उभी राहिले ती या विश्वासानं, की आता फक्त लढायचं.. स्वत:साठी.. आणि नुसतंच लढायचं नाही, तर जिंकायचंसुद्धा! मग मनानं ही नवीन उभारी घेतली आणि अचानक समोर लखलखीत वाटा दिसू लागल्या. जणू त्याच माझी खूप दिवसांपासून वाट बघत होत्या. करोनाचा
बंदिस्त काळ असूनही तोपर्यंत मनावरची सगळी काजळी पुसली गेली होती आणि चार भिंतींमध्येसुद्धा मला अनेक आशेची किरणं डोकावताना दिसली. त्यात पहिल्यांदा मला गवसलं माझ्या जोडीदाराबरोबरचं माझं नवीन नातं, जे अनेक वर्षांपासून कुठेतरी हरवलं होतं. आणि या नात्याबरोबरच मला सापडली अनेक नवीन नाती.. माझं रंगांबरोबरचं नातं, सुरांबरोबरचं नातं, लेखणीबरोबरचं नातं.. या लेखणीनं तर मला पुन्हा नवीन जन्म दिला
असंच वाटू लागलं.

या सगळय़ांनी माझीच माझ्याशी पुन्हा नव्यानं ओळख करून दिली आणि पुन्हा जगण्याचा नवीन मार्ग दाखवला. आज पुन्हा एकदा बाहेरच्या परिस्थितीशी आणि माझ्यातल्या ‘मी’बरोबर एक नवीन लढा देतीय.. पुन्हा एकदा जिंकण्यासाठी आणि जीवनाचं नवीन गाणं गाण्यासाठी आतुरलेली मी आज पुन्हा एकदा स्वत:ला गवसलीय. पुन्हा एकदा स्वच्छंदी, उन्मुक्त.. एक नवीन भरारी घेण्यासाठी नव्या आशेचे पंख पसरून!

वर्तमान क्षणातलं जगणं!

लता प. रेळे
वय वाढतं, तसं आयुष्यातल्या अनेक गोष्टी- ज्यावर आपण कधी विचारच केला नव्हता, ज्या आपण गृहित धरल्या होत्या त्या वेगळय़ा दिसून येतात आणि शाळेच्या परीक्षेत ‘गाळलेल्या जागा’ भरतात, तसा त्यातून आयुष्यातल्या आधी न जाणवलेल्या पोकळ जागांत अर्थ भरला जातो. हे आकलन मोलाचंच.
माझ्या बाबतीतही असंच झालं. सहसा माणसाला ‘आयुष्याचा अर्थ’ कळू लागतो तो म्हातारपणाकडे झुकल्यावर. पण माझ्या बाबतीत झालं असं, की ‘आपलं वय झालंय’ हे उमगायलाच मला फार वेळ लागला! वय झाल्याचं वास्तव समोर येताना मात्र आयुष्याचा सगळा पट डोळय़ांसमोर उलगडत गेला होता.. माझ्या या प्रवासाची गोष्ट सांगते.

मी आम्हा तीन बहिणींत सगळय़ात धाकटी. सर्वात लहान असण्याचे फायदेतोटे मी नेहमी उपभोगले. फायदे म्हणजे घरच्या कामवाल्या बायका सुटीवर गेल्या की माझ्यावर कुठलीच जबाबदारी पडत नसे, तोटा एवढाच, की लहान असल्यामुळे आमच्या छोटय़ा फियाट गाडीत मला नेहमी कुणाच्या तरी मांडीवर बसायला, नाही तर उभं राहायला लागत असे! हे झालं ७-८ वर्षांची होईपर्यंत. आईवडिलांनीसुद्धा ‘तुम्ही लहान आहात आणि आमचं ऐकलंच पाहिजे’ अशी भूमिका कधी घेतली नाही. उलट घरात कुठलाही निर्णय घेताना आमचं मत विचारात घेतलं जायचं. शाळा-कॉलेजमध्ये असताना आपण कधी वयानं मोठे होऊ ही कल्पनासुद्धा मनाला शिवली नाही. पाहिजे तेवढं शिकायचं, मित्रमैत्रिणींबरोबर मजा करायची हेच विश्व. लग्न केलं तेसुद्धा माझ्याच वयाच्या, आधीपासून ओळखत असलेल्या मुलाशी. त्यामुळे तेही नातं जास्त करून मित्रत्वाचं; ‘टिपिकल’ नवराबायकोचं नव्हतं आणि अजूनही नाही. मी ३०-३५ वर्ष नोकऱ्या केल्या, त्या नशिबानं आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये! तिथे वरपासून खालपर्यंत एकमेकांना एकेरी नावानं संबोधित केलं जायचं. कामाची पद्धत अशी, की वयापेक्षा तुमच्या अनुभवाला आणि कामातल्या क्षमतेला जास्त महत्त्व. मुलं झाली तेव्हासुद्धा वयानं मोठं झाल्यापेक्षा आपण स्वत:ला विसरून दुसऱ्या कोणाचा तरी विचार करायला पाहिजे, याची जाणीव जास्त झाली.

अर्थात, स्वत:ला वय वाढत आहे असं वाटलं नाही तरी आजूबाजूचे लोक त्याची जाणीव करून द्यायला तत्पर असतातच. ताई, वहिनी, आई, आँटी, आजी म्हणून बाजारात, दुकानात हाक मारलेली ऐकली, की आपल्या वाढत्या वयाची जाणीव होतेच होते! माहेरी आईवडील आणि सासरी सासूबाई होत्या. कोणतेही प्रश्न सोडवायला मदत करायला ही मंडळी होती, त्यामुळे एकाकी वाटलं नाही, की जबाबदारीचं दडपण आलं नाही. माझ्या नशिबानं माझे आई-वडील त्यांच्या८५ व्या व सासूबाई त्यांच्या ९४ व्या वर्षांपर्यंत लाभले. आई-वडील, सासूबाई गेल्यानंतर मात्र कळून चुकलं, आता कुटुंबातले मोठे आपणच आहोत. एकदम मोठी जबाबदारी अंगावर यावी असं काहीसं वाटलं. त्याच वेळी असंही वाटलं, की आपल्या वयाचा आकडा वाढलाय, याची इतकी वर्ष कधी जाणीव का झाली नसावी?.. विचार करू लागले आणि लक्षात आलं, की सतत आताच्या क्षणात जगायची सवय लहानपणीच अंगात भिनली असावी. थोर व्यक्ती जे सांगत असतात, की ‘वर्तमानात जगा’ तसे बऱ्याच अंशी आपण जगत होतो आणि त्यामुळे आपल्याही नकळत अनेक क्षणांचा पुरेपूर आनंद घेतला हा आयुष्याचा अर्थ मला लागला आणि तो सुखावूनही गेला.

मुलांची शिक्षणं संपवून ती परदेशी स्थायिक झाली, लग्नं झाली. मीसुद्धा तोपर्यंत ‘रिटायर’ झाले. पहिल्या नातवात व माझ्या वयात ६० वर्षांचा फरक! तो जन्माला आला तेव्हा पहिला विचार मनात आला, की तो तरुण होईपर्यंत मी असेन का? आणि डोळय़ांत पाणी तरळलं. मुलानं विचारलं, ‘‘ममी, का रडतेस?’’ मी त्याच्यापासून खरं कारण लपवू शकले नाही. तोसुद्धा जरा गडबडला. माझी समजूत घालायला म्हणाला, ‘‘अगं, आजी-आजोबा ८०-८५ पर्यंत होते, तर तुला तो वारसा मिळणारच!’’ नंतर अमेरिकेच्या या ना त्या कारणानं दरवर्षी फेऱ्या सुरू झाल्या त्या गेली १५ वर्ष. हे करण्यात अर्थात दोन स्वार्थी हेतू होते, एक आपलं नातवंडांशी जवळचं नातं निर्माण करणं आणि दुसरा म्हणजे, असं लक्षात आलं, की जर आपल्या मुलांना त्यांना जरूर असताना मदत केली, तर ती त्यांना जास्त महत्त्वाची वाटेल, आपण त्यांच्यासाठी काही तरी केलं याची जाणीव होईल आणि आठवणीतही राहील. आपलं नातं घट्ट व्हायला मदत होईल.

हळूहळू वर्ष जात होती, तसं लक्षात यायला लागलं की कौटुंबिक समारंभांत जरी आपल्याला कितीही वाटलं की आपण मनानं तरुण आहोत, तरी थोडय़ा वेळानं खरी तरुण मंडळी आपापले ग्रुप करून हळूहळू वेगळी होतात. वयस्करांच्या ग्रुपमध्येसुद्धा बोलण्याचे विषय बदलल्याचं ध्यानात यायला लागलं. प्रत्येक जण आपापल्या शारीरिक व्यथा सांगायला लागले. हॉस्पिटल आणि डॉक्टरांच्या अनुभवाचे किस्से सांगितले जायला लागले. मुलाबाळांच्या तक्रारी आणि कौतुक. नाटकं, सिनेमे आणि टीव्हीवरच्या मालिका हे जास्त चर्चेचे विषय बनत चालले.

आता मुलांची शिक्षणं पुरी होऊन, लग्न होऊन आपापल्या संसारात, कामात गर्क आहेत, नातवंडंसुद्धा शाळेच्या मार्गाला लागून आपल्या जगात रंगली आहेत. या टप्प्यावर जसं कॉलेज संपत येताना जे विचार आपल्या मनाला येतात, ते परत यायला लागले. स्वत:ला नक्की काय केल्यानं आनंद मिळतो? आतापर्यंत त्यातलं काय काय केलं? काय राहिलं?..

मग प्रथम ठरवलं, की स्वत:ची तब्येत सर्वात महत्त्वाची. नियमित व्यायाम आणि बरोबर खाणंपिणं यावर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. वाचन, गाण्याचे कार्यक्रम ऐकणं, मित्रमंडळींना भेटणं वाढवलं, की ज्यामुळे मानसिक संतुलनसुद्धा चांगलं राहील, आनंदी आणि उत्साही वाटेल. ‘हाऊ टू एज ग्रेसफुली’ या विषयावरच्या पुस्तकांतून हाच सल्ला दिलेला असतो ना?

आपल्या वयोगटातलं कुणी आजारी असलेलं किंवा मरण पावल्याचं ऐकलं की पोटात गोळा येतो. मनातल्या मनात ‘मेरा नंबर कब आयेगा?’ हा प्रश्न डोकावायला लागतो. करोनामुळे गेल्या दोन वर्षांत जास्तच! अलीकडेच मी नीना कुळकर्णीचा ‘फोटोप्रेम’ हा सिनेमा पाहिला. मृत्यूनंतर आपला एकतरी चांगला फोटो फ्रेममध्ये लावण्यासाठी हवा, यासाठी एका साध्या गृहिणीची धडपड त्यात टिपली आहे. आपले काही चांगले फोटो आहेत का, हे बघण्यासाठी माझा हात लगेच मोबाईलकडे गेला! विनोदाचा भाग बाजूला ठेवला, तरी वय वाढल्याची जाणीव होताना ‘आजवर या क्षणात किती जगलो?’ याचं उत्तरं आपल्याला मिळालं, तर आयुष्याचा काहीसा तरी अर्थ आपल्याला समजला, असं मनोमन वाटतं.
madhuri.bendre02@gmail.com
lata.rele@gmail com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Meaning of life sorrow to winon the journey college financial situation of the family amy

Next Story
संशोधिका : परस्परपूरक विज्ञान
फोटो गॅलरी