डॉ. मीरा चढ्ढा बोरवणकर‘‘चेंबूरमध्ये दंगल झाली. खूप तणावाची परिस्थिती होती. मी पोहोचले. दंगल आटोक्यातही आली. पण दुसऱ्या दिवशी ‘तू एक स्त्री असून तुला दंगलीच्या तिकडे कुणी पाठवलं,’ असा प्रश्न मला विचारला गेला. अनेक प्रसंगानंतर एक गोष्ट नक्की जाणवली, ‘जेंडर इज नॉन मटेरिअल, लीडरशिप मॅटर्स’. असे आणीबाणीचे प्रसंग स्त्रीही सक्षमपणे हाताळू शकते. पुरुषाइतकी ताकद नसेल, तरीही तिच्याकडे एक तात्त्विक बैठक असते, संयम असतो, माणसं हाताळण्याची खुबी असते. हे सगळं तिला निसर्गानेच दिलेलं आहे. या अनुभवानंतर माझ्या मनातली शंकेची पाल कायमची शांत झाली.’’
मीपोलिसांत आले.. हे माझ्या आयुष्यातलं एक वळणच होतं. मी काही अपघाताने, अचानक वगैरे पोलिसांत आले नाही, तरीही.. पण आजपर्यंतच्या आयुष्यातल्या वळणवाटा कोणत्या याचा विचार करताना रस्ता वळणावळणाचा होता, हे मात्र नक्कीच.. समोर आलेली प्रत्येक जबाबदारी, प्रत्येक केस, भेटलेली माणसं, अमेरिकी पोलिसांबरोबर काम करण्याची मिळालेली संधी आणि वाचलेली पुस्तकंही.. या प्रत्येकाने मला काही तरी दिलं, नवं काही शिकवलं, काही प्रसंगांनी माझा दृष्टिकोनच बदलला. आणि त्यातूनच पुढचा रस्ता सापडत गेला.
पुरुषी आधिपत्य असलेल्या पोलीस खात्यात काम करताना स्त्री म्हणून अनेक संघर्ष होते, कष्ट होते, घर आणि करिअर सांभाळताना तडजोडी होत्या.. पण हे सगळं जाणीवपूर्वक स्वीकारलेलं होतं. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर संघर्ष हेच वळण होतं; पण हवंहवंसं, माहिती असलेलं. आयुष्यातल्या प्रत्येक वळणाने नवा दृष्टिकोन दिला. जळगाव वासनाकांडासारखी काही प्रकरणे प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यातूनही अर्थातच मी काही शिकले होते. मात्र, वरकरणी छोटय़ाशा वाटणाऱ्या काही प्रसंगांनी माझा विचार, दृष्टिकोन बदलला.. ते प्रसंग किंवा ती वळणं माणूस म्हणून आणि पोलीस अधिकारी म्हणूनही माझ्यासाठी महत्त्वाची ठरली.
मी पहिल्यापासून धाडसी होतेच. माझ्या धाडसाला घरातूनही प्रोत्साहन होतं. त्यावेळी पोलीस खात्यात स्त्रिया होत्या. हे नवं धाडसाचं क्षेत्र मला खुणावत होतंच. शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांकडूनही या सगळ्याला प्रोत्साहन मिळत होतं. वडील पोलीस दलात होते तरीही मी पोलिसांत जाण्याला त्यांचा विरोध होता. माझं पदव्युत्तर शिक्षण ‘इंग्रजी साहित्य’ या विषयातलं, कारण मला लेखिकाही व्हायचं होतं! मात्र, सिव्हिल सव्र्हिसेसमध्ये जायचं हेही निश्चित होतं. माझ्या मोठय़ा बहिणीची निवड तेव्हा केंद्रीय सेवेत झाली होती. या सगळ्यात माझ्याकडून एक चूक झाली. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत निवड झाल्यानंतर मी सुरुवातीला ‘इंडियन ऑडिट्स अँड अकाऊंट्स सव्र्हिसेस’ ची निवड केली. मात्र, या विभागातलं काम ही ‘माझी आवड’ नाही, हे लवकरच लक्षात आलं आणि पुन्हा परीक्षा द्यायची ठरवलं. पुढच्या वेळी मात्र पोलीस दलाची निवड सुनिश्चित केली आणि अखेर १९८१ च्या बॅचमध्ये मी भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) दाखल झाले. दुसऱ्या वेळी माझी निवड झाली नसती, तर माझं आयुष्य हे न आवडणाऱ्या क्षेत्रात गेलं असतं. पण या चुकलेल्या निर्णयाने मला, माझा आतला आवाज ऐकायला शिकवलं. त्यानंतर जे आतून वाटतं तेच करावं ही शिकवण मला मिळाली, प्रत्येक निर्णय घेताना, केसेस हाताळताना ती नेहमीच उपयोगी ठरत आली, आजही ठरते आहे. कालांतराने माझं करिअर पुढे सरकायला लागल्यावर वडिलांचा विरोधही मावळत गेला.
पोलीस दलाच्या सेवेत दाखल झाले, त्यावेळी प्रशिक्षणासाठी ६८ मुलं आणि मी एकटी मुलगी, अशी परिस्थिती होती. सुरुवातीला मुलांकडूनही विरोध होता. अनेक मुलांनी तर ‘मीरा परत जा..’ असा धोशाच लावला होता. मात्र, मागे वळायचं नाही, हे मी ठरवूनच टाकलं होतं. प्रशिक्षण आव्हानात्मक होतं. त्यावेळी कधीतरी एखाद्या क्षणी आपला पोलीस सेवेत येण्याचा निर्णय चुकीचा तर नाही ना, असं वाटूनही गेलं. मात्र, मी परत फिरले नाही. कालांतराने मुलांचा विरोध मावळला आणि मला लागेल ती मदत ते करू लागले. प्रशिक्षणाच्या काळातला एक प्रसंग मी कधीही विसरणार नाही. झालं असं की.. आमचा रॉक क्लाइंबिंगचा सराव होता. सगळ्यात उंच आणि चढाईसाठी कठीण ‘रॉक १०’ मला चढायचा होता. त्यावेळी पहिल्यांदाच मला खूप भीती वाटली. त्यावेळी माझ्याबरोबरच्या सगळ्या प्रशिक्षणार्थीनी माझी बाजू घेतली होती. सगळेजण प्रशिक्षकांशी भांडले होते. ‘मीरा बाकी सगळं करते. मग एवढी सवलत तिला द्या.’ असं त्यांचं म्हणणं होतं. मात्र, माझ्या प्रशिक्षकांनी ऐकलं नाही. त्यांनी मला ती चाचणी द्यावीच लागेल म्हणून सांगितलं. एवढंच नाही, तर त्या पाषाणावर मला मार्चिग करायला सांगितलं. मला ते खूप अपमानास्पद वाटलं होतं. पण तो प्रसंग माझ्यातली भीती काढून टाकणारा म्हणूनच महत्त्वाचा ठरला. त्यानंतर भीती मला कधी शिवलीच नाही.
माझी फोर्ट भागात पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती झाली. त्यावेळी या भागांत येणाऱ्या कन्साईन्टमेंटमध्ये गैरव्यवहार सुरू होता. कस्टम, पोलीस, शासन अशा सगळ्यांनी एकत्र काम केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही, हे लक्षात आलं. त्यामुळे मी संबंधित सगळ्या घटकांशी चर्चा केली. प्रयत्नानंतर चोरीची प्रकरणं खूप कमी झाली. त्यावेळी हे प्रत्यक्ष घडलं आहे, यावर माझाही विश्वास बसत नव्हता. आपण ‘करू शकतो.’ हा विश्वास त्या घटनेने दिला. अशा काही घटनांनंतर मला जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती मिळावी, अशी मी मागणी केली. त्यावेळी महिला पोलीस अधीक्षक ही संकल्पनाच आपल्याकडे रुजलेली नव्हती. त्यावेळीही काही अधिकाऱ्यांनी मला विरोध केला. ‘जिल्ह्य़ाच्या ठिकाणी आम्ही नसणार, मग काही अडचण आली, तर तू एकटी कसं सांभाळशील,’ असा प्रश्न मला अनेक अधिकाऱ्यांनी विचारला. त्यामध्ये थोडासा पुरुषी दृष्टिकोनही डोकावत होता. पण मी हे आव्हान पेलू शकेन, असा मला पूर्ण विश्वास होता. त्यामुळेच मला गरज नाहीये मदतची, हे उत्तर मी देऊ शकले. हा विश्वास निर्माण झाला तो आधीच्या दहा वर्षांतल्या प्रत्येक प्रसंगांनी दिला होता. जिल्ह्य़ाच्या ठिकाणी नियुक्ती मिळाल्यानंतर लोक मला मुद्दाम पाहायला यायचे. महिला पोलीस अधीक्षक हे चित्रच महाराष्ट्राला नवं होतं. पण माझ्या कर्मचाऱ्यांनी आणि लोकांनीही मला खूप सहकार्य केलं. हा प्रसंग आहे जळगावच्या वासनाकांडापूर्वीचा.
जळगावला एका महाविद्यालयांत काहीजणांनी चुकीच्या हेतूनेच प्रवेश घेतला होता आणि अनेक मुलींच्या असहायतेचा फायदा या मुलांनी घेतला. ते सगळंच प्रकरण खूप मोठं होतं आणि त्या जळगावच्या प्रसंगाने मला प्रसिद्धी दिली, ओळख दिली. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा उल्लेख मला आवर्जून करावासा वाटतो. मला जेव्हा मुंबईच्या गुन्हे अन्वेषण शाखेचं सहआयुक्त पद देण्यात आलं, तेव्हा पाटील यांना अनेकांनी सांगितलं होतं, की तुम्ही एका स्त्रीला हे पद देताय. त्या सांभाळू शकणार नाहीत. पण तरीही माझ्यावर विश्वास ठेवून पाटील यांनी मला ते पद दिलं. मी स्त्री आहे, म्हणून मी एखादी गोष्ट करू शकणार नाही, हे मला पटतंच नाही. हा दृष्टिकोन तयार झाला, तोही एका वळणावरच. मी मुंबई झोन ४ मध्ये काम करत असताना, चेंबूरमध्ये दंगल झाली. खूप तणावाची परिस्थिती होती. झोन ४ मधल्या सगळ्या विभागाच्या पोलीस ठाण्यात दंगलीबाबतचा संदेश गेला होता. मी दंगलीच्या ठिकाणी पोहोचले. दंगल आटोक्यात आली, वातावरण निवळलं. दुसऱ्या दिवशी ‘तू एक स्त्री असून तुला दंगलीच्या तिकडे कुणी पाठवलं,’ असा प्रश्न मला विचारला गेला. परिमंडळाच्या उपायुक्तांनी घटनास्थळी जाणं अपेक्षित होतं. सहा फूट उंच, धिप्पाड असे ते अधिकारी होते. मात्र, ते आले नाहीत. त्याबाबत उपायुक्तांना विचारल्यावर ‘मला ठिकाण सापडलं नाही.’ असं उत्तर त्यांनी दिलं होतं. या प्रसंगानंतर उपायुक्तांची अर्थात बदलीही झाली. मला मात्र तो प्रसंग खूप काही देऊन गेला. दंगल किंवा समूहाला काबूत ठेवण्याची वेळ येते, तेव्हा माणसाचं व्यक्तिमत्त्व, त्याचं दिसणं या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. त्याबाबतीत पुरुष उजवे ठरतात, असा माझा समज होता. तो खोटाही म्हणता येणार नाही. पण या प्रसंगानंतर एक गोष्ट जाणवली ‘जेंडर इज नॉन मटेरिअल, लीडरशिप मॅटर्स’. असे आणीबाणीचे प्रसंग स्त्रीही सक्षमपणे हाताळू शकते. तिच्याकडे पुरुषाइतकी शक्ती नसेल, तरीही तिच्याकडे एक तात्विक बैठक असते, संयम असतो, माणसं हाताळण्याची खुबी असते. हे सगळं तिला निसर्गानेच दिलेलं आहे. या अनुभवानंतर माझ्या मनातली शंकेची पाल कायमची शांत झाली.
लग्न आणि त्यानंतर मातृत्व हे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात एक वळणंच असतं. नाशिकमध्ये असताना मला असंही विचारण्यात आलं होतं की मॅडम तुमचं घर हे हॉटेल आहे की हॉस्टेल आहे. कारण मी आणि माझे पती दोघेही बाहेर असायचो. घर आणि करिअर सांभाळताना ज्या तडजोडी कराव्या लागल्या त्या मी केल्याही. लग्नाआधीच मला महाराष्ट्र केडर मिळालं.. आणि माझी ‘चढ्ढा’ ही ओळख बदललीच होती. मी महाराष्ट्रात आल्यानंतरचा टप्पा हा थोडासा गमतीदारच होता. पंजाबी लोकं ही खूप उत्सवप्रेमी असतात. त्यांचे कपडे, राहणीमानही थोडंसं गडद असतं. नाचणे, गाणे सतत सुरू असतं. मात्र, महाराष्ट्रात अगदी त्याच्या उलटं. राहणी साधी, कपडय़ांचे रंगही फिके. त्यावेळी मी चंदिगढला खूप ‘मिस’ करायचे. पण आता मी महाराष्ट्राचीच झाले आहे. इथली राहणीच मला आवडायला लागली आहे.
प्रसंगांनी जसं आयुष्याला वळण दिलं. तसंच या सगळ्या टप्प्यावर भेटलेल्या काही लोकांनी. मी रिबेरोसाहेबांना आणि एस. एस. पुरी यांना खूप मानते. रिबेरोसाहेबांच्या हाताखाली काम करण्याची संधी कधी मिळाली नाही. पण त्यांना भेटण्याची संधी अनेकदा मिळाली आहे. पहिल्यांदा त्यांना भेटायला गेले तो दिवस मी विसरू शकणार नाही. सकाळी ११ वाजताची वेळ त्यांनी दिली होती. मी वेळेपूर्वी थोडी आधी जाऊन प्रतीक्षाकक्षात बसले होते. बरोबर ११ वाजता स्वत: रिबेरोसाहेब ‘ती मीरा कुठे आहे’, असं विचारत बाहेर आले. त्यांच्याकडे कोणी वरिष्ठ अधिकारी होते आणि त्यांची आधीची मिटिंग संपायला १० मिनिटे लागणार होती. पण तेवढय़ासाठी त्यांनी स्वत: उठून मला शोधत बाहेर येणं, या गोष्टीने मी भारावून गेले. रिबेरो सरांबरोबरच्या त्या भेटीनंतर मला प्रेरणा मिळाली आणि मी योग्य मार्गावर आहे, याचा विश्वासही. आपल्या कर्मचाऱ्यांशी, नव्या अधिकाऱ्यांशी कसं वागावं, याचा धडा मला त्यांच्याकडून मिळाला. पुरी सरांनीही मला प्रत्येक वेळी रस्ता दाखवला. सहकार्य करणारे अधिकारी भेटले, तेवढेच विरोध करणारेही. पण त्यांच्या प्रत्येक विरोधातून एक नवा पैलू समोर येत गेला आणि त्या प्रत्येक वळणातून नवा रस्ता सापडत गेला.
राज्याची कारागृह महासंचालक म्हणून काम करताना कळलं की अनुभवांतून दिसलेलं वेगवेगळ्या प्रकारचं माणूसपण कामी येत आहे. गुन्हेगारांसाठी चालवण्यात येणारे विविध प्रकल्प, उपक्रम याचं कौतुक होतं. पण माझा दृष्टिकोन बदलण्यासाठी कारणीभूत ठरला असाच एक प्रसंग. मी त्यावेळी नवी होते. कामाचा उत्साह होता. गुन्हेगारांबद्दल राग होता. सगळं वाईट बंद करून टाकण्याची ऊर्मी होती.. मी नाशिकमध्ये असताना एका ठिकाणी पेट्रोल पंपावर डिझेलमध्ये भेसळ होत असल्याचे कळले. त्याच ठिकाणी वेश्या व्यवसाय होत असल्याचे कळले होते. त्या ठिकाणी आयत्यावेळी छापा घातला. पेट्रोल पंपावर सुरू असलेली भेसळ पकडली. छापा टाकला तेव्हा वेश्या व्यवसाय करणारी एक महिलाही तेथे होती. तिलाही ताब्यात घेतलं. मी खूप खूश होते. मोहीम यशस्वी झाली होती. पण नंतर मी पाहिलं, तर त्या महिलेला एक पाय नव्हता. ती जे करत होती, तो तिचा काहीअंशी नाइलाज होता. ते बघून मी खूप अस्वस्थ झाले. त्यानंतर गुन्हेगारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. प्रत्येकाची एक गोष्ट आहे. गुन्ह्य़ाचा तिरस्कार करा, गुन्हेगाराचा नाही, हे पक्कं मनात ठसलं. आजही गुन्हेगाराला शिक्षा व्हायलाच हवी, पण त्याच्या गुन्ह्य़ासाठी. आता मला गुन्हेगाराचा राग येत नाही.
या सगळ्यांत मला खूप छान साथ दिली, ती माझ्या पुस्तकांनी. विचार पक्का होण्यासाठी त्यांनी मदत केली. ‘टू कील अ मॉकिंग बर्ड’ या पुस्तकाने माझ्या आयुष्यात मोठा बदल घडवला. मी लोकसेवेत येण्यापूर्वीच हे पुस्तक वाचलं होतं. मी कधी निराश झाले नाही, हरले नाही याचं श्रेय हे या पुस्तकालाही द्यावं लागेल. तुमचा हेतू चांगला असेल, उद्दिष्ट चांगलं असेल, तर तुम्ही जे करता ते योग्यच असतं. त्या दृष्टिकोनाने करिअर घडवलं असं म्हणायला हरकत नाही. महिला म्हणून मला आलेले चांगले आणि वाईट अनुभव, त्यातून मिळालेला दृष्टिकोन यांचा उपयोग करून आता मला महिलांसाठी काही करण्याची इच्छा आहे. खेडोपाडय़ांतील मुलींचं अवकाश अजूनही मोठं होण्याची गरज आहे. त्याचबरोबर मला माझं लेखिका होण्याचं स्वप्नही पूर्ण करायला आवडेल.
आतापर्यंतच्या प्रत्येक वळणाने मला एक नवं आयुष्य दिलं, नवी वाट दाखवली. यापुढच्या वळणांवरही असेच नवे काही मिळेल हीच आशा !
डॉ. मीरा चढ्ढा बोरवणकर
शब्दांकन- रसिका मुळ्ये – rasika.mulye@expressindia.com