चतुरंग (११ मे) मधील ‘तिचा पिलामधी जीव’ हा संपदा वागळे यांचा मातृदिनानिमित्त लिहिलेला विशेष लेख वाचून डोळ्यांत पाणी आले नि हृदय हेलावले. अर्चना पाटील यांनी दोन्ही मुलांच्या शारीरिक समस्यांवर इलाज करण्यासाठी, त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी जो संघर्ष केला, जे परिश्रम घेतले ते वाचून ऊर अभिमानाने भरून आला. इतिहासातील हिरकणीने एका रात्रीत गड उतरून आपल्या बाळापर्यंत पोहोचण्याचे धाडस केले. ही हिरकणी आपल्या पिलांसाठी दिवसरात्र संकटांचे अनेक गड चढतेय आणि उतरतेय. या सगळ्या धडपडीत तिच्या स्वत:च्या अनेक व्याधींकडेही लक्ष द्यायला या माउलीला वेळ नाही.

अजूनही आपल्या मुलांचं यश, त्यांची पुढची प्रगती, त्यांचे सुखी संसार तिला डोळे भरून पाहायचे आहेत. तिनं सगळी आव्हानं पेलून इथवर केलेली धडपड पाहता तिला हे यश नक्कीच मिळेल. दोन्ही मुलांचा सुखी संसार तिला पाहायला मिळणं हा तिला आजवर मिळालेल्या अनेक सन्मान आणि पुरस्कारांपेक्षा किती तरी मोठा पुरस्कार असेल. काही कमतरता असणाऱ्या पाल्यांना वाढवणाऱ्या, त्यांना यशस्वी करण्यासाठी धडपडणाऱ्या अनेक मातांना संपदा वागळे यांचा हा लेख प्रेरणादायी ठरू शकतो. मातृदिनानिमित्त लिहिलेला हा लेख कुणाचं तरी भविष्य बदलू शकतो. -वैशाली कुलकर्णी

आणखी वाचा-पाळी सुरूच झाली नाही तर?

उपयुक्त लेख

‘जिंकावे नि जगावेही’ या सदरातला ‘आरोग्याला प्राधान्य हवंच!’ हा लेख (१८ मे) वाचला. फारच उत्तम व उपयोगी असा हा लेख आहे. उच्च व उत्तम भाषाशैलीचा वापर करत अगदी सहजतेने वाचकांच्या मन:पटलावर प्रभाव व्हावा, अशा सुंदर शब्दांचा सुरेख वापर केलेला प्रत्ययास येतो.

‘व्यग्रता हा माणसाच्या यातनांवरचा वेदनाशामक उपाय आहे,’ तसंच ‘स्वत:ला सतत काही ना काही कामात गुंतवून घेण्यात आपण जगण्यातल्या वेदनेच्या जाणिवा बधिर करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे रूढ अर्थानं अशा व्यक्तीची प्रगती होताना दिसते, पण खरे तर त्याचे मूळ प्रश्न त्यानं उत्तरांशिवाय गाडून टाकलेले असतात.’ त्यापुढे, ‘अस्वस्थ करणारं सत्य दूर सारण्यासाठी किंवा आपणच आपल्याला खोदून खोदून प्रश्न विचारणं टाळण्यासाठी व्यग्रता ढालीसारखी वापरली जाते.’ व्वा! किती सुंदर वाक्ये आहेत ही!

हा लेख वाचत असताना डोळ्यांसमोरून अगदी वीस वर्षांचा कालावधी झरकन मागे पडत होता आणि मी स्वत:च्या आयुष्याची त्याच्याशी तुलना करू लागलो. माझे मतही असेच असल्याची जाणीव होऊ लागली आणि मन अधिक दृढनिश्चयी होऊ लागले. मी या लेखांचा नियमित वाचक असून बऱ्याचशा नावीन्यपूर्ण गोष्टींचा त्यातून उलगडा होतो व खासगी आयुष्यात त्याचा हमखास उपयोग होतो. -प्रल्हाद शिंदे