भूषण कोरगांवकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘लावणीतला ठसका आणि नजाकत दोन्ही सहजतेनं कसं सादर करावं, तेही निष्कारण कवायत न करता, हे वयाच्या नव्वदाव्या वर्षांपर्यंत उत्साहानं सांगणाऱ्या, करून दाखवणाऱ्या लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांचं नुकतंच निधन झालं. लावणीतलं एक जुन्या शैलीचं घराणं संपलं. नवीन मुलींना त्या शिकवताना त्यांना पाहणं, त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलणं हे आपल्या आकलनात मोलाची भर घालणारं होतंच, पण निखळ आनंद देणारंही होतं. गुलाबबाईंच्या जाण्यानं लावणीच्या क्षेत्रात निर्माण झालेली रिकामी जागा भरण्याचा प्रयत्न करणाऱ्या जुन्या शैलीच्या कलाकारांना प्रोत्साहन देणं ही आता रसिक म्हणून आपली जबाबदारी आहे..’

लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकरांच्या निधनाची बातमी आली. लावणीचं एक मोठं घराणं संपलंय याची खिन्न करणारी जाणीव झाली आणि मला त्यांची पहिली भेट आठवली. ही भेट घडून यायला दोन व्यक्ती कारणीभूत होत्या- वर्षां संगमनेरकर आणि मोहनाबाई महाळंग्रेकर.वर्ष २००५. ‘सोळा हजारात देखणी’च्या प्रयोगाला गेलो होतो. निवेदकानं घोषणा केली, ‘‘..आपली पुढची लावणी घेऊन येतायत लावणी क्वीन वर्षां संगमनेरकर’’. जोरदार शिट्टय़ा, टाळय़ांना सुरुवात झाली. ढोलकी कडाडू लागली. डोक्यावरून पदर घेतलेली बाई विंगेत प्रकटली. स्टेजवर येताच तिनं डोक्यावरून पदर काढला. सगळय़ांकडे पाहात, रमतगमत, मर्दानी ढंगात चालत येऊन माइकसमोर उभी राहिली. एकवार ‘कोणाकोणाची विकेट उडणारे आज, बघूया तरी,’ अशा ढंगात रोखून पाहिलं आणि ‘इचार काय हाय तुमचा?’ असं म्हणत अख्खं ‘शिवाजी मंदिर’ वेडं करून सोडलं.

मी वर्षांताईंची लावणी पाहिली हे समजताच मोहनाबाई म्हणाल्या, ‘‘तुम्ही एकदा तिच्या आईला, गुलाबबाईंना भेटा, मग मला तर सोडाच, पण वर्षां, शकू, पुष्पा, गीता, सगळय़ांना विसरून जाल. लावणीचा बाप आहेत गुलाबबाई!’’ हा योग यायला २०११ वर्ष उजाडलं.एका लावणी महोत्सवासाठी ‘आर्यभूषण थिएटर’च्या ग्रुप पार्टीची तयारी सुरू होती. मुजरा आणि लावण्या बसवून द्यायला रवी संगमनेरकरला नेमलं होतं. रवी म्हणजे गुलाबबाईंचा मुलगा. वर्षांताईंचा भाऊ. नवीन मुलींना लावणी शिकवणं, त्यांचा मेकअप करून देणं अशी कामं करायचा. पुढे त्यानं स्वत:चा कार्यक्रमही सुरू केला होता.
त्या दिवशी रवी आलेला असताना मोहनाबाईंनी त्याला विनंती केली, ‘‘उद्या आईला घेऊन ये, त्यांचंबी थोडं मार्गदर्शन लाभलं तर खूप चांगलं होईल’’. दुसऱ्या दिवशी मी अधिक उत्साहानं ‘आर्यभूषण थिएटर’ला पोहोचलो. गुलाबबाई नुकत्याच आलेल्या होत्या. कॉटनची पांढरी साडी, कानात हिऱ्याच्या कुडय़ा, नाकात चमकी आणि कपाळावर लाल रंगाच्या एका वेगळय़ाच छटेचं ठसठशीत कुंकू.

‘‘नमस्कार. काय करता आपण?’’ गुलाबबाईंनी डोक्यावरचा पदर सारखा करत मला विचारलं. कसलाही हेल नसलेली ब्राह्मणी वळणाची भाषा. मला आश्चर्य वाटलं. रिहर्सलमध्ये त्यांचं प्रत्येकीकडे बारीक लक्ष होतं. एकेकीला त्या आपल्या खास शहरी ढंगात सूचना करत होत्या.
‘‘खाली माना घालून कसल्या नाचताय? येणारे रसिक तुमचे पाय पाहायला येत नाहीत, तुम्हाला पाहायला येतात, तुमची कला पाहायला येतात. त्यांच्या नजरेत नजर घालून नाचा. थोडा तोरा दिसू द्या की!’’रवीच्या कोरिओग्राफीमध्येही त्या स्वत: उभं राहून अनेक सुधारणा सुचवत होत्या. ‘‘हे हात एवढे काखेपासून उचलायला नको सांगूस. नुसता हा असा हलका झटका द्यायचा. आपण मुरका कसा मारतो..’’ आणि मग वळून मला म्हणाल्या, ‘‘नेहमी जास्तच अवघड काहीतरी केलं पाहिजे असं नसतं. कमी करूनही जास्त परिणाम साधता येतो काही वेळेस. कुठं जास्त करायचं, कुठं कमी हे समजलं पाहिजे हो. प्रॅक्टिसनं येतं ते.’’ मुली, मोहनाबाई, रवी सगळेच लक्षपूर्वक ऐकत होते.

‘‘कसं आहे, लोक आपल्याला मान देऊन बोलावतात. मग आपला अनुभव त्यांना नीट समजावून सांगितला, त्यांना तो पटला, त्याचा फायदा झाला तरच ते परत बोलावतील. त्यामुळे कलाही पुढं जाईल,’’ त्या सांगत होत्या, ‘‘माझ्यासारख्या निवृत्त बाईला तेवढंच समाधान.’’
‘‘समाधान आणि पैसा!’’ रवी म्हणाला, ‘‘तो नसंल तर ही कशाला येईल इकडं?’’
‘‘नाहीच येणार, शेवटी मानधन असतं ते. कलाकारानं मान आणि धन कधीच सोडू नये!’’
लावणीतलं हे ‘स्मार्ट तत्त्वज्ञान’ त्यांना अर्थातच अवगत होतं.

रिहर्सल संपली. जेवणाची ताटं आली. तोच त्या पार्टीची मालकीण ओरडत आली, ‘‘काजल, चल गं, बैठक लागली आहे. ये लवकर.’’
काजलनं नुकतेच घुंगरू सोडले होते. तिच्या कपाळावर आठय़ा पडल्या. चेहरा रागानं अन् घामानं फुलला होता. ‘‘ इकडं भुकेनं जीव चाललाय. आता गेला ना अजून एक तास..’’ असं म्हणत तिनं खस्सकन घुंगरू ओढले आणि रागारागानं बांधायला सुरुवात केली.‘‘मालकिणीचा राग घुंगरांवर काढू नकोस पोरी.’’ गुलाबबाईंनी समजावलं, ‘‘घुंगरू म्हणजे आपली सरस्वती. तिला मान दिलाच पाहिजे. त्यांची आदळआपट बरी नव्हे.’’ काजलने निमूट घुंगरांना नमस्कार केला, बाईंच्या पाया पडली आणि बैठकीत पळाली.

पुढे वर्षभरानं गुलाबबाईंच्या घरी जायचा योग आला. पुण्याच्या ‘दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल’जवळच्या एका प्रतिष्ठित सोसायटीतला सुटसुटीत फ्लॅट. मुलगी कल्पना, तिच्या मुली, रवी आणि गुलाबबाई असं त्यांचं एकत्र मातृसत्ताक कुटुंब. आम्ही गेल्या गेल्या रवीनं शिरा करायला घेतला. कल्पनाबाई गरमागरम चहा घेऊन आल्या आणि आमच्या गप्पांना सुरुवात झाली.‘‘गुलाबबाई, तुमच्या बोलण्यातल्या ब्राह्मणी लहेजाचं, राहणीचं रहस्य काय?’’ हा प्रश्न खरंतर याआधी अनेकांना विचारून झाला होता. ‘त्या पहिल्यापासनंच बामनावानी बोलतात! कुठं शिकल्या काय म्हाईत,’ असंच सगळे म्हणाले होते. अगदी त्यांच्या मुलांनाही ते नीटसं सांगता आलं नव्हतं.

‘‘मला आवडतं असं बोलायला.’’ गुलाबबाईंना फार खोलात शिरायचं नाहीये हे जाणून मी त्यांच्या आवडीच्या विषयाला हात घातला. ‘‘लावणी तुमच्या आयुष्यात कधी आणि कशी आली?’’‘‘जन्माच्याही आधीपासून. कारण नाचगाणं हीच आमची परंपरा, तीच आमची जात आणि तोच आमचा धर्म.’’ बाई भूतकाळात शिरल्या.१९३२ मध्ये शिवडाबाई संगमनेरकरांच्या पोटी गुलाबचा जन्म झाला. तिसरीपर्यंत शिक्षण झाल्यावर आईनं तिला शाळेतून काढलं आणि एका नामांकित संगीत पार्टीत शिकायला पाठवलं. त्या बाई कलाकार म्हणून फार मोठय़ा होत्या, पण अतिशय तापट. सुरुवातीची तीन चार वर्ष नवख्या मुलींकडे बघतही नसत. कपडे धू, भांडी घास, पडेल ती कामं करत, पार्टीबरोबर नाशिक, पुणे, सोलापूर अशी शहरं फिरत लहानगी गुलाब त्या बाईंची अदाकारी, नखरा आदी भावकाम, इतर बायांचा नाच जमेल तेव्हा पाहात बसे.

शिवडाबाईंना हा कारभार पसंत पडला नाही. मग त्यांनी राधाबाई बुधगावकर, सुगंधाबाई सिन्नरकर, छबूबाई नगरकर (शकूबाईंची आई), बनूबाई शिर्डीकर, भामाबाई पंढरपूरकर अशा मोठय़ामोठय़ा पाटर्य़ामध्ये गुलाबला एकेक, दोन-दोन वर्ष ठेवलं. या प्रत्येक ठिकाणी त्यांना खूप शिकायला मिळालं. वेगवेगळय़ा प्रकारच्या लावण्या, गाणी, त्यांच्या गायकीतले फरक, अदाकारीच्या, नाचाच्या पद्धती याच्या बरोबरीनंच समोर कोण बसलंय हे पाहून आपल्या खेळात कसे बदल करायचे, कुणाशी कशा पद्धतीनं बोलायचं, कसं वागायचं अशा व्यावसायिक क्लृप्त्याही त्यांनी आत्मसात केल्या.
आपली मुलगी आता या क्षेत्रासाठी तयार झालीय याची खात्री पटताच शिवडाबाईंनी गुलाबना स्वत:ची पार्टी सुरू करून दिली. कोल्हापूरचं थिएटर, पुण्याचं आर्यभूषण, मुंबईचं हनुमान थिएटर असं करत करत गुलाबबाई खान्देशात पोचल्या आणि बराच काळ रमल्या. तिथे पाहायला येणारी माणसं, त्यांची भाषा, तिथल्या गाण्यांची पद्धत त्यांच्या अंगवळणी पडली. एव्हाना नृत्यनिपुण बहीण मीरा जोडीला आली होती. ‘गुलाब-मीरा संगमनेरकर पार्टी’नंकित्येक वर्ष रसिकांच्या मनावर राज्य केलं. हळूहळू अलका, कल्पना या मुलीही तयार झाल्या.

‘‘संगीत बारीत मोजक्या लोकांसमोर कार्यक्रम असतात, खासगी बैठकांवर भर असतो.’’ गुलाबबाई म्हणाल्या,‘‘सगळं छान होतं, पण रोज रोज करून कंटाळा आला होता. आता काहीतरी वेगळं करावं असं वाटून मी एका ढोलकी फडाच्या तमाशात काम सुरू केलं.’’
हजारो प्रेक्षक, अफाट लोकप्रियता यामुळे काही काळ मजा आली, तरी ती गणितं फार दिवस टिकली नाहीत. भागीदार फडमालकिणीशी वाद व्हायला लागले. तेव्हा बाई पुन्हा आपल्या हक्काच्या संगीत बारीकडे वळल्या. ‘‘माणसानं आयुष्यात नवीन नवीन गोष्टी शिकत राहिलं पाहिजे. मी माझ्या परीनं खूप काही करून पाहिलं. ‘गाढवाचं लग्न’ नाटकाचे काही प्रयोग केले. प्रकाश आणि जयमाला इनामदारांचं हे नाटक कित्येक वर्ष गाजत होतं. संगीतकार विठ्ठल शिंदेंच्याकडे एच.एम.व्ही.च्या रेकॉर्डसाठी गायलेय. रेडिओवर एकेकाळी माझं फार नाव झालं होतं. पार दिल्लीपर्यंत जाऊन मी लावण्यांचे कार्यक्रम केलेत. एकदा तर एका कार्यक्रमात प्रत्यक्ष लताबाई मंगेशकर ‘राजसा जवळी जरा बसा’ ही लावणी गायल्या आणि मी त्यावर अदा केली. लताबाईंनी खूप कौतुक केलं. ‘तुमच्यासारखे कसलेले कलाकार विरळा आहेत’ म्हणाल्या.’’

‘‘तुमची सगळी मुलंही कलाकार झाली,’’ मी म्हटलं.
‘‘नुसती मुलंच नाही. माझ्या नातीसुद्धा लावणी खेळतात.’’
प्रिया, रूही, स्वप्ना, पीयूषा या सगळय़ांनीच थोडा काळ मनापासून लावणी केलेली आहे. पीयूषानं तर टीव्ही वाहिनीच्या रिअॅलिटी शोजमधून भाग घेऊन त्यात यशही मिळवलं.
‘‘ते रिॲलिटी शोजचं काही सांगू नका. रिॲलिटी कमी आणि दिखावा जास्त!’’
‘‘आणि आजकालच्या मुलींच्या लावणीबद्दल तुम्हाला काय वाटतं?’’
‘‘घृणा वाटते.’’ बाईंनी एक क्षणही न दवडता उत्तर दिलं, ‘‘लावणीत शृंगार असला पाहिजे. कधी लाजरा, कधी धीट, कधी बघणाऱ्याला घाम फुटेल इतका स्फोटक, अशा त्याच्या वेगवेगळय़ा छटा दाखवता आल्या पाहिजेत. पण या मुलींना काय वाटतं, की ‘व्हल्गर’ हावभाव केले, धबाधबा उडय़ा मारल्या, एकसारखे हातवारे केले म्हणजे लावणी झाली. ही यांची अक्कल! अरे लावणी म्हणजे काय कवायत आहे का? सांगायला गेलं तर ते ऐकून घ्यायचीही त्यांची तयारी नसते. बाण मारल्याची ॲक्शन करतील आणि पन्नास वेळा विचारत बसतील, ‘आला का बाण? लागला का बाण?’ आम्हाला असं कधीच तोंड वेंगाडावं लागलं नाही. आमचा बाण सुटला की तो वर्मी बसणार याची खात्री असायची आम्हाला.’’‘‘एक झलक दाखवा ना!’’ मी विनंती केली. ‘आता सवय राहिली नाही, तब्येत साथ देत नाही, पेटी-तबल्याशिवाय मजा नाही,’ असे अनेक आढेवेढे घेतल्यानंतर बाई तयार झाल्या.

‘शहर बडोदे सोडून दिधले
वर्ष जाहली बारा
बारा गं बाई,
माझा सखया कुणीकडं गेला गं,
बाई गं, बाई गं..’
एकेक शब्द गुलाबबाईंच्या खणखणीत आवाजात जिवंत होत होता आणि त्यावरची अदाकारी! उफ्फ! बाण पार आरपार घुसला होता. ऐंशीव्या वर्षी जर इतका जाळ, तर ऐन जवानीत काय होत असेल, याची आम्हाला पुरेपूर कल्पना आली. बाईंनी उभं राहून नाचाचीही झलक दाखवली. पाय कसे चालवायचे, हात आणि संपूर्ण शरीर तालात कसं हलवायचं याचं प्रात्यक्षिक दिलं आणि आम्ही अगदी तृप्त झालो.
२०१३ मध्ये बाईंची आणखी एक इच्छा पूर्ण झाली. ‘रज्जो’ या हिंदी चित्रपटात एक भूमिका करायची संधी त्यांना मिळाली. पुरस्कार तर ढिगांनी मिळाले. २०२० मध्ये त्यांना ‘विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर जीवनगौरव’ हा मोठा पुरस्कार जाहीर झाला. परंतु टाळेबंदीमुळे तो समारंभ होऊ शकला नाही, याची खंत त्यांना लागून राहिली होती.बाईंनी आयुष्यात दु:खंही फार पाहिली. रवीचा अचानक मृत्यू झाला. याच तीव्रतेच्या अजूनही काही दु:खद घटना घडल्या. पण त्यांची कला शेवटपर्यंत टवटवीतच राहिली.

कुठलीही मोठी व्यक्ती गेली, की त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात एक पोकळी तयार होते. लावणीच्या बाबतीतली ही पोकळी अजूनच मोठी आहे. कारण हा जुना बाज, ही जुनी शैली जोपासणारे शकुंतलाबाई नगरकर, सरलाबाई नांदोरेकर, सावित्रीबाई सातारकर, दिलजानबाई परितेकर, माया खुटेगावकर, शोभा-छाया, नंदा-उमा इस्लामपूरकर, पुष्पा सातारकर यांच्यासारखे अगदी मोजके कलाकार आज कार्यरत आहेत. त्यांच्या कलेचा आस्वाद घेणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं ही सर्व रसिकांची जबाबदारी आहे. त्यायोगे नवीन पिढीच्या कलाकारांनाही हे शिकून घ्यायचा हुरूप येईल. नाहीतर मग नेहमीच्या कवायती आणि चाळे आहेतच!
‘‘गुलाब सुकला तरी त्याचा सुगंध जात नाही!’’ एकदा गुलाबबाई मिश्कील सुरात म्हणाल्या होत्या.
‘‘हो आणि म्हातारपणात शुगर वाढते त्यामुळे आता तर तुमचा गुलकंदच झालाय!’’ माझं वाक्य ऐकताच बाई खूप हसल्या होत्या.
लावणीच्या मोठय़ा घराण्याचा हा गुलाब गेल्या ९० वर्षांत उमलून, बहरून, अनेकांना सुखावून आता पडद्याआड गेलाय. तरीही त्याचा सुगंध अनुभवलेल्या प्रत्येक रसिकाच्या मनात तो सदैव दरवळत राहील.

bhushank23 @gmail. com
(लेखकाने ‘संगीत बारी’ या पुस्तकाचे लेखन केले असून पारंपरिक कलाकारांना घेऊन ‘लव्ह अँड लावणी’ या कार्यक्रमासह लावणी नृत्य, गायन आणि लेखनाच्या कार्यशाळा, व्याख्याने असे त्यांचे उपक्रम आहेत.)

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Planting not looking gulabbai sangamnerkar planting empress artists amy
First published on: 24-09-2022 at 00:06 IST