तृप्ती जोशी-कुलश्रेष्ठ यांचा ‘पुरुषी एकटेपण’ हा लेख (१६ मार्च) वाचला. त्यांनी अगदी सुंदर पद्धतीने मांडणी केली आहे. मुळात एकटेपणा आणि पुरुषांना? कसं काय? असा प्रश्न अनेकांना पडतो. कारण पुरुषांचा गोतावळा तुलनेनं अधिक असतो आणि शाळा-कॉलेजमधील मित्र, त्यांच्या कार्यक्षेत्रातले सहकारी यांना वरचेवर बाहेर भेटणे-बोलणे होत असते. घरी फक्त जाहीर करायचे, की ‘मी आज जेवायला नाहीये’! स्त्रिया मात्र या तुलनेत त्यांच्या मैत्रिणींना खूप ‘मिस’ करतात. कधी भेटायचे ठरवले तरी घरच्या सर्वांची सोय करूनच स्त्रियांना बाहेर पडावे लागते. मूल लहान असेल तर त्यालाही सोबत न्यावे लागते. एखादीच्या घरी जुळवून घेणारे लोक नसतील तर तिला तर जाताच येत नाही. त्यामुळे पुरुष मित्रांच्या बाबतीत नशीबवानच. तरीही पुरुषांना संवाद साधण्यासाठी कुणी नसणे, त्यांचे एकटेपण हे आश्चर्यकारक वाटणारच. याची नेमक्या शब्दांत या लेखात कारणमीमांसा केली आहे. शिवाय या विषयावर एका स्त्रीतज्ज्ञाने लिहिलेले प्रथमच वाचनात आले. इथेही पुरुषतज्ज्ञ पुढे आलेले नाहीत असे दिसतेय. आपण सर्वजण ठोकताळे मनात न ठेवता मनुष्य म्हणून एकमेकांस बघू लागलो, तरच एकमेकांना मदत करता येईल, मागताही येईल.- स्वाती अमरीश

सहजानंदी जगण्यासाठी!

संकेत पै यांचा ‘त्रिसूत्री’ (९ मार्च) हा लेख आवडला. वेळेच्या काट्यावर धावताना येणारा कोरडेपणा टाळून अर्थपूर्ण प्रवास करावा, असे ते म्हणतात, ते पटले. सारे काही झटपट मिळण्याच्या ‘इन्स्टंट’ जमान्यात संयमाचीही कसोटी लागते. जिंकण्यासाठी सतत शिकणे, लवचीक मानसिकता, संयमित जगणे जसे कामी येते, तसे स्वत:चा आनंद, आवडीनिवडी जोपासणे हे जगणे निखळ-निरोगी करते.- विजय भोसले

‘उत्तराधिकारी’ लक्षवेधी

ऋता बावडेकर यांचा ‘उत्तराधिकारी’ (९ मार्च) हा आशयप्रधान लेख उल्लेखनीय वाटला. वडिलोपार्जित व्यवसाय स्वबळावर अधिक वृद्धिंगत करणाऱ्या अदिती कारे पाणंदीकर, मानसी किर्लोस्कर टाटा, विनती सराफ मुत्रेजा, नादिया चौहान, प्रीती राठी गुप्ता, झहाबिया खोराकीवाला या सर्व स्त्रिया उच्चशिक्षित आणि उच्च पदांवर कार्यरत आहेत. वडिलांकडून व्यवसायाचे धडे घेतलेल्या या सर्व स्त्रियांचे कर्तृत्व, नेतृत्व, याचा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने घेतलेला आढावा कौतुकास्पद. उद्याोग आणि व्यवसायाची ऊर्मी असणाऱ्या होतकरू स्त्रियांना तो दिशादर्शक ठरावा. ‘स्त्रियांना व्यवहार आणि आर्थिक बाबींमधील काही कळत नाही,’ या रूढीग्रस्त संकल्पनेस छेद मिळणे आवश्यकच.- अरविंद बेलवलकर

स्त्रीला घरातून पाठिंबा मिळावा

९ मार्च रोजी प्रसिद्ध झालेला ऋता बावडेकर यांचा ‘उत्तराधिकारी’ हा लेख वाचून मन अगदी भरून आले. उद्याोग क्षेत्रांतील स्त्रियांची कामगिरी वाचून नवी प्रेरणा मिळाली. स्त्रियांना अशा विविध क्षेत्रांत मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस मानाचा मुजरा! प्रत्येक कुटुंबात स्त्रीचे कौशल्य ओळखून तिला योग्य पाठिंबा दिला जाईल अशी आशा आहे. मग स्त्रिया अशीच उंच-उंच भरारी घेतील.- अनुसया आलेवार

‘शब्द विचारपूर्वक वापरायला हवेत’

गेल्या (१६ मार्च) शनिवारच्या अंकातला ‘दु:खाचा हात सोडायला हवा’ लेख वाचला. खरोखरच अप्रतिम लेख.

आई म्हटलं, की तो मुलांचा हळवा कोपरा असतो, पण त्यामुळे कधी स्वत:च्या बायकोवर अन्याय होतो आहे, हे लक्षातच येत नाही. लेख सुंदर आहेच, परंतु मला त्यातलं सर्वांत काय आवडलं असेल ते हे की ‘आता निदान’ किंवा ‘आता तरी’ या वाक्यामुळे अर्थाचा अनर्थ होतो हे. अनेकदा बोलताना आपण बरेच शब्द विचारपूर्वक वापरत नाही, त्यामुळे त्यातून काय अर्थ निघतो हे बऱ्याचदा आपल्या लक्षात येत नाही. ते लक्षात घेऊन बोलायला हवे. या लेखातून लेखिकेच्या या विचारांच्या स्पष्टतेची कल्पना येते. ती आमच्या पर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद.- पराग नाबर

विचारांची क्षितिजं समृद्ध करणारे लेख

१६ मार्चच्या अंकातला ‘अस्पष्ट रेषा’ हा लेख वाचला, मानवाच्या खासगी भावना, त्यांची गुंफण, त्यातील गुंता, आणि भविष्यातले त्या गुंत्याचे परिणाम या विषयी भाष्य करणारा हा लेख खरंच अप्रतिम आहे. ‘लोकसत्ता’ अशा लेखांची पर्वणी शनिवारी आणि रविवारी उपलब्ध करून देते, हे खरोखर वाचक म्हणून आमचं भाग्य आहे. विचारांची क्षितिजं समृद्ध करणाऱ्या यासारख्या लिखाणासाठी सन्माननीय लेखकांचे आभार.- लक्ष्मण भास्कर फदाट, बुलढाणा</p>

एकटेपणाची शोकांतिका

‘मनातलं कागदावर’ या सदरातील ‘शेवटचे घरटे माझे’ हा प्रभाकर बोकील यांचा लेख (९ मार्च ) वाचला. अत्यंत संवेदनशील आणि सत्य परिस्थितीवरचा लेख. उतारवयातील एकटेपण, विसरत चाललेली नाती आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून न घेता आल्याने होणारी घालमेल अचूक शब्दात मांडली आहे. आजच्या पिढीतील साठीच्या पुढे गेलेल्या माझ्यासारख्या अनेकांची सत्य परिस्थिती किती अचूक मांडली आहे, जी सांगताही येत नाही आणि जुळवूनही घेता येत नाही अशी आहे.- अशोक देसाई

समस्यांना उत्तरे मिळावीत

‘शेवटचे घरटे माझे’ ही प्रभाकर बोकील यांनी लिहिलेली कथा (९ मार्च). ह्रदयस्पर्शी असून वाचून डोळ्यात पाणी आले. म्हातारपणी बँकेत खूप पैसे असावे लागत नाही. व्यायाम, वयानुसार आहार, फिरण्यासाठी मोकळ्या जागा, चांगले हवामान, गप्पा मारण्यासाठी लोकसंपर्क, या गोष्टी असतील तर पुरेसे असते. पण अनेकांना या गोष्टी आर्थिक परिस्थिती चांगली असूनही अनेक कारणांनी मिळत नाहीत याचे वाईट वाटते. या समस्यांना उत्तरे मिळावीत ही अपेक्षा.- उमा हाडके, कुलाबा मुंबई.

मुलांचा विचार व्हायलाच हवा

डॉ. स्मिता प्रकाश जोशी यांचा ‘मुलांना हवेत आई आणि बाबा!’ (२४ फेब्रुवारी) हा लेख म्हणजे आपल्या स्वार्थासाठी (स्वहितासाठी) वेगळे होणाऱ्या दांपत्याच्या डोळ्यात अंजन घालणारा असा आहे. आजकालच्या तरुण पिढीला घटस्फोट हा ड्रेस बदलावा तसा सहज, सोपा वाटतो. तोडण्यापेक्षा जोडणे खूप अवघड आहे. एकमेकांशी मतभेद असणे हे चुकीचे नाही, पण मतभेदासाठी विभक्त होणे चुकीचे आहे. आपल्या पाल्यांच्या निकोप वाढीसाठी त्यांना आपल्या दोघांचीही तेवढीच गरज आहे हे समजून घेणे खूप आवश्यक आहे. लहान वयात आपले आई-वडील विभक्त होताना बघून त्यांच्या बालमनावर घाव पडतात व ते घाव कधीही भरून न येणारे असेच असतात.

दोन भिन्न व्यक्तींच्या विचारांमध्ये भिन्नता असते. त्या भिन्नतेला समजून घेऊन एकत्र येणे हे ज्याला समजले तो कधीही घटस्फोट घेणार नाही. घटस्फोटामुळे दोन्ही कुटुंबे उद्ध्वस्त होत असतात. मुलांचं संपूर्ण भविष्य अंधारमय होते, त्यांचे जीवन प्रकाशमय करण्यासाठी नवरा-बायकोंनी एकत्र असणे खूप गरजेचे आहे.- भाग्यश्री रोडे-रानवळकर, पुणे</strong>

मनुष्यस्वभावाचे कोडे उत्कंठावर्धक!

‘पैस वाढवू आनंदाचा’ हा डॉ. आनंद नाडकर्णी यांचा लेख (१६ मार्च) मनाला सुखावणारा आहे. कोणाला कशात आनंद वाटेल काही सांगता येत नाही. आपण त्याचे वर्णन ‘स्वभाव’ असे करतो. त्याची जडणघडण कशी होत असावी, असा प्रश्न पडतो. असे म्हणतात, की आई आणि वडीलसहित तीन पिढ्यांवरून व्यक्तीची शारीरिक ठेवण निश्चित होते, तसे स्वभावघडणीत होत नसेल का? पण त्याशिवाय जीवाचे त्याचे असे संचितही स्वभावघडणीत निश्चित समाविष्ट असावे. जगातील आजूबाजूचे वातावरण आणि माणसे यांच्याशी जसेजसे जीवाचे संबंध येतात, तसे त्याचा मूळ स्वभाव वारंवार प्रकट होतो. वस्तुसंग्रहात सुख नसून ते आपल्या मनाच्या समाधानात आहे, हे प्रत्येकाच्या प्रत्ययास विविध वयांत येत असावे. ‘माझा आनंद एकटे राहण्यात आहे,’ असे उतारवयात वाटणे हाही एक सामान्य अनुभव आहे. जगात आपण स्वखुशीने आलो नाही. मला मिळालेली माणसे हीदेखील माझ्या नियतीचा भाग आहे. तेव्हा अनेक बाबतींत कोणत्याही प्रकारचे ‘निवडस्वातंत्र्य’ नसताना १०० वर्षांच्या आयुष्यात आनंदी राहण्याचे कौशल्य आणि कला मला स्वत:ला आत्मसात करणे भाग आहे, हे माणसाला विविध वेळी आणि स्तरांवर कळत असावे. संत तुकारामांसारखा ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ अनुभव एखाद्याचेच भागधेय असावे. ‘स्वभाव’ हे प्रकरण संशोधन करण्याजोगे आहे हे नक्की!- श्रीकृष्ण फडणीस