‘थेंब थेंब पाण्यासाठी’ हा प्रत्यक्ष जगताना या सदरातला छाया दातार यांचा लेख (२० एप्रिल ) वाचला. या प्रकल्पात दातार यांच्यासह मी काम केले आहे. हा पथदर्शी प्रकल्प होता. या प्रकल्पाच्या निमित्ताने सरकारी यंत्रणा जवळून बघता आली. ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे विविध श्रेणीतले अभियंते या सर्वाच्या प्रशासकीय आणि वैयक्तिक कार्यप्रणालीचे निकटचे दर्शन घडले. शिवाय गावकरी, गावातले पुढारी, राजकीय-सामाजिक कार्यकर्ते, गावातले प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक या सर्व घटकांशी संबंध यायचे. गावाची जातीय संरचना आणि लोकांचे परस्परांशी असलेले संबंध याचेही आकलन नवी जाणीव देणारे होते. या अनुभवातून खूप शिकायला मिळाले. ग्रामीण जनजीवनाविषयी असलेले समज-गरसमज नव्याने तपासता आले. या प्रकल्पात महिला आणि अनुसूचित जाती-जमाती या प्रवर्गाच्या गरजांवर विशेष भर देण्यात आला होता. गावातली पाणीपुरवठा योजना सुरळीत होण्यासाठी पाणी समितीच्या स्थापनेची तरतूद होती. या समितीत महिला आणि अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांचे प्रतिनिधित्व अनिवार्य होते. पाणी समितीने काय काम करावे याची निश्चिती करण्यात आली होती. यामध्ये वित्तीय नियोजन, देखभाल दुरुस्ती, प्रशासन, आरोग्य व स्वच्छता इ. जबाबदाऱ्या सदस्यांना दिल्या जायच्या. जबाबदाऱ्यांचे वाटपही अनेकदा पारंपरिक पद्धतीनेच व्हायचे. म्हणजे स्वच्छतेची जबाबदारी हमखास अनुसूचित जाती-जमातीच्या प्रतिनिधींकडेच दिली यायची. या प्रकल्पाच्या निमित्ताने आम्हालाही िलगभाव समानता म्हणजे नेमके काय, याची जाणीव झाली.
 दातार मॅडमच्या लेखामुळे जुने दिवस आठवले. प्रकल्प सोडल्यानंतर या गावांना भेट देण्याची खूप इच्छा होती. पण ते राहूनच गेले. नंतर दातार मॅडम काही वर्षांनी तेथे गेल्यावर त्यांना जे दिसले त्याबद्दल वाईट वाटले. कारण त्या काळात आम्ही खूप मेहनतीने काम पूर्ण केले होते. असो, असे व्हायचेच. अर्थसाहाय्य करणारी यंत्रणा बदलली की धोरणेही बदलतात हा अनुभवही नेहमीचाच!
– प्रा. प्रवीण घोडेस्वार, नाशिक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपण सुधारणार नाही
६ एप्रिलच्या  पुरवणीमधील (अस्वस्थ कहाण्या..‘मुलगाच हवा’च्या ) लेख वाचनात आला. कशाला उगाच शाई, वेळ वाया घालविता, असे वाटते. ९५ टक्के लोक असे आहेत की, असे सुधारणावादी लेख केवळ करमणूक म्हणून वाचून सोडून देतात.
समाजाची मानसिकता बदलण्यासाठी अनेक तपे जावी लागतील. मुलगा नसला तरी चालेल, असे नुसते वर वर सांगणे वेगळे, पण प्रत्येक जोडप्याची किंवा घरातील ज्येष्ठ मंडळींची तशी सुप्त इच्छा असतेच की नाही! पहिली बेटी धनाची पेटी इथपर्यंत ठीक आहे, पण दुसरा मुलगाच, धनाचा ‘खोका’ हवा असतोच. खरेतर यामागे जीवनाबद्दलची असुरक्षितता डोकावत असते, असे मला  वाटते. कसेही असले तरी मुलगा व सून आपल्या म्हातारपणीचा आधार आहे. काही दुखलं-खुपलं तर लक्ष द्यायला आहेत, ही एक भावना मनात असते. ती चुकीचीही नसावी. तसेच मुलगा घरी कमावून आणतो, त्यामुळे म्हातारपणी आर्थिक विवंचना नको म्हणूनही कसा का असेना पण मुलगा हवाच, अशी इच्छा असते. अजून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे ज्यांना मुली आहेत त्या दुसऱ्या घरी सून म्हणून जाणार, त्यामुळे तसा त्यांचा आर्थिक, शारीरिक, मानसिक आधार असूच शकत नाही, अशी धारणाच झाली आहे. पण जेवढे आई-वडिलांबाबत मुलाचे कर्तव्य असते त्याच बरोबरीने मुलीचेही असायलाच हवे. काही ठिकाणी हे दिसतेही, पण ते नगण्य आहे.
म्हणतात ना! शिवाजी जन्माला यावा, पण दुसऱ्यांच्या घरी. अगदी हाच नियम मुलींच्या बाबतीतही लागू पडतो. सर्व समाजाची हीच मानसिकता आहे. मुलगी जन्माला यावी, पण दुसऱ्याच्या घरी. त्यामुळे आपण नुसतं म्हणतो, मुलापेक्षा मुलगीच हवी, पण ते फक्त वरकरणी आहे. आपला समाज कधीच बदलणार नाही. त्यामुळे याबाबत लिखाण करणाऱ्यांना माझी नम्र विनंती आहे की, कृपया आपली शाई, वेळ व पैसा वाया घालवू नये.
– विद्या वावीकर, जुन्नरे, नाशिक

लेख एकतर्फी
लता राजे यांचा मार्गारेट थॅचर यांच्यावर लिहिलेला लेख (चतुरंग २० एप्रिल) वाचला. हा लेख एकतर्फी आहे, असे वाटते. थॅचर या एका व्यापाऱ्याच्या कन्या होत्या. त्या पंतप्रधान होताच त्यांनी इंग्लंडमधील सर्व सरकारी उद्योगधंद्यांचे खासगीकरण करून टाकले. कामगार संघटना संपवल्या. याचा परिणाम असा झाला की सामान्य लोकांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू मोठय़ा प्रमाणात महाग झाल्या. कामाचे ठरावीक तास जाऊन १२-१२ तासांची पाळी सुरू झाली. मालकांनी मनमानी यांत्रिकीकरण करून बेकारी निर्माण केली. मालकांचा नफा प्रचंड प्रमाणात वाढला. त्यांना अमेरिकेचे त्या वेळचे अध्यक्ष रीगन यांचा पाठिंबा लाभला. या दोघांनी, पोप जॉन पॉल दुसरे यांना जोडीला घेऊन समाजवाद नामशेष करण्याकडे मोर्चा वळवला. त्याचा फायदा पुढे अमेरिकेने उचलला.
फोकलंडस् जिंकले म्हणून लताबाईंनी त्यांचे गुणगान केले आहे. जर पोर्तुगीजांनी असे गोवा राखले असते तर त्यांनी पोर्तुगीजांचेही असे कौतुक केले असते का?
– मार्कुस डाबरे , वसई

लेखाची मांडणी भावली
२३ मार्चच्या चतुरंगमधील ‘पालकत्वाचे चालकत्व’ हा प्रा. प्रकाश जकातदार यांचा अप्रतिम लेख वाचला. प्रा. जकातदारांनी वस्तुस्थिती सहज, साध्या सोप्या भाषेत मांडली आहे व अडचणीसाठी उपायही सुचविले आहेत. खरोखर अप्रतिम विचार मांडणारा लेख आहे. जकातदार यांनी सुंदर विचार मांडल्याबद्दल त्यांचे धन्यवाद.
खरोखर आजच्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या तथाकथित सुशिक्षित माता-पितांना अभ्यासापलीकडे जग असते याची कल्पनाच नसते असे वाटते. अभ्यास केला तरच तुला नोकरी मिळेल असे विचार ते मुलांच्या मनावर बिंबवताना दिसतात. माझ्या मते, शिक्षण हे जीवन सुखी करण्याचे एक साधन आहे, पण नोकरी मिळवण्याचा हक्क आहे असा समज आता पसरू लागला आहे. म्हणून ‘शिक्षण म्हणजे नोकरी’ हे गृहित धरणे चुकीचे आहे, असे प्रांजळपणे वाचते.  लेखातील मुद्दय़ांची मांडणी अत्यंत सोप्या मात्र प्रभावी भाषेत केल्याबद्दल जकातदार यांचे अभिनंदन.
– अशोक द. बुटाला, पवई, मुंबई</strong>

नव्या युगाची नांदी
१६ फेब्रु.च्या पुरवणीमधील मंजिरी निक्का यांचा ‘घरचे बल्लवाचार्य’ हा लेख वाचला. ४०-४५ वर्षांपूर्वीच्या माझ्या लहानपणी जेव्हा मी आईला मदत म्हणून स्वयंपाकघरात काम करायचो, तेव्हा तो एक हसण्याचा व चेष्टेचा विषय असे. यात स्त्रियाही पुढे असत. पण आता समाजाची मानसिकता हळूहळू बदलते आहे, असे वाटते. ही नक्कीच स्वागतार्ह गोष्ट आहे. मी तर याला स्त्री-पुरुष समानतेच्या नव्या युगाची नांदी म्हणेन. याने स्त्रियांवरील कामाचा बोजा काहीसा कमी होण्याबरोबरच आनंदाचे एक नवे क्षेत्र पुरुषांसाठी खुले होत आहे. वैयक्तिकरीत्या मला या माझ्या पाक-कौशल्याचा वेळोवेळी खूपच उपयोग झाला आहे. आई घरात असताना- नसताना, स्वत: मी एकटा राहत असताना, बदलीवर गेल्यावर, आंतरजातीय लग्न केल्यावर माझे अडले नाही. खेरीज माझे पाककलेवरील एक पुस्तक यातूनच तयार झाले.
-शिरीष गडकरी, रोहा, रायगड

मला काय व्हावेसे वाटते?
९ फेब्रुवारीच्या ‘चतुरंग’मध्ये रेणू दांडेकरांच्या ‘जगणे आनंदाचे..’ लेखामधील खेडय़ातील मुलांचे मी कोण होणार? किंवा मला काय वाटते? यावरील अनुभव वाचले. आवडले. तस्साच अनुभव मला अलीकडेच मुंबईपासून जेमतेम १-२ दोन तासांवर असणाऱ्या एका मुलींच्या आश्रमशाळेत आला. सुरुवातीला मुली थोडय़ा अंतर राखून बोलत होत्या, पण नंतर त्यांना हळूहळू आमच्याबद्दल विश्वास वाटला असावा. गप्पांच्या ओघात मीही त्यांना वरील प्रकारचा प्रश्न विचारला. त्यावर एकीने मला पंख मिळावेत असे म्हटले. माझ्या शहरी विचारानुसार मला वाटले की, आकाशातून सैर करायला वगैरे मिळावे म्हणून ती असे म्हणतेय, पण पुढचे तिचे स्पष्टीकरण ऐकून मी थक्क झाले. तिच्या आदिवासी पाडय़ापासून शाळेत येण्यासाठी पक्कारस्ता नसल्याने कुठलेही वाहन जात-येत नव्हते. तेव्हा कित्येक मैल पायपीट करून तिला शाळेत जावे लागे. म्हणून पंख असते तर तिने हे अंतर आरामात पार केले असते, असे तिचे म्हणणे होते.
दुसऱ्या मुलीने सांगितले की, तिला बिजली व्हावेसे वाटते. बिजली म्हणजे वीज जी अजून त्यांच्या घरात पोहोचलेलीच नाही. पाडय़ावरच्या काही घरातून आता सौरदिवे लागले आहेत. ते पाहून तिला वाटले की ती बिजली झाली तर तिचेही घर ती प्रकाशाने उजळून टाकील.
विशेष म्हणजे, हे सांगताना आपण रस्ते-वीज यांसारख्या प्राथमिक सोयी-सुविधांपासून वंचित आहेत याबद्दल कुठेही कटुता वगैरे अजिबात नव्हती. फक्त या अडचणीतून मार्ग कसा काढता येईल इतकाच कल्पनाविलास होता. त्यांची विचार करण्याची पद्धत, दिशा आणि त्यांच्या अपेक्षासुद्धा आपल्यापेक्षा प्राप्त परिस्थितीमुळे खूप भिन्न असू शकतात. हे मला त्या वेळी जाणवले आणि रेणूताईंच्या विधानाने त्याची सत्यता पुन्हा एकदा अधोरेखित झाली.
अलकनंदा पाध्ये, चेंबूर

‘चतुरंग’ बाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया, तुमची मते, तुमचे विचार आम्हाला जरूर लिहून कळवा. निवडक प्रतिक्रियांना नक्कीच प्रसिद्धी दिली जाईल. ‘लोकसत्ता चतुरंग’, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई, ४००७१० किंवा ईमेल करा. chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Readers response
First published on: 25-05-2013 at 01:01 IST