हिजाब आंदोलन
कर्नाटकमधील हिजाब प्रकरणाचे पडसाद बरेच काही सांगणारे आहेत, पण सध्या प्रश्न आहे तो मुलींच्या शिक्षणाचा. त्यांनी हे शिक्षण हिजाब वा स्कार्फ घालून घ्यावे की न घालता घ्यावे, हा समजुतीने सोडवण्याचा प्रश्न असायला हवा. महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाचा पाया रचलेल्या सावित्रीबाई फुले यांच्याबरोबरीने फातिमा शेख यांनीही १८४८ मध्ये सर्व स्तरांतील मुलींच्या शिक्षणासाठी जाणीवपूर्वक कष्ट घेतले. इतकी वर्षे होऊनही सर्व समाजातील, सर्व स्तरांतील मुलींचे शिक्षण आणि त्यातून मुलींना येणारी जाणीवजागृती निर्माण करण्यात समाज म्हणून आपण कमी पडतो का, हा खरे तर विचाराचा मुद्दा आहे. सध्या कर्नाटकमधील हिजाब प्रकरण न्यायालयात आहे.
आज समाजात हिजाब घालणाऱ्या मुस्लीम स्त्रिया आहेत, तशा न घालणाऱ्याही आहेतच, तो त्यांचा निर्णय आहे. आजच्या अंकात या निमित्ताने काही मान्यवरांच्या तसेच समाजासाठी काही करण्यासाठी धडपडणाऱ्या स्त्रियांच्या प्रतिक्रिया.
रझिया पटेल
कर्नाटकात सुरू झालेल्या हिजाब वादाचे पडसाद आजही देशभर उमटत आहेत. महाराष्ट्रातही काही संघटना आणि राजकीय पक्षांनी मुस्लीम मुलींच्या हिजाबच्या हक्कासाठी आंदोलने केली. मूळ मुद्दा सर्व सरकारी महाविद्यालयांतील गणवेशाशी जोडला गेला. मग ‘माय हिजाब माय राईट’ असे आंदोलन मुस्लीम मुलींनी सुरू केले. त्याला काही मुस्लीम युवक संघटनांनी आणि काही कट्टर मुस्लीम धार्मिक संघटनांनी पाठिंबा दिला. मग हिजाबच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी उडी घेतली. महाविद्यालयाचे विद्यार्थी भगव्या शाली घेऊन यात उतरले. कट्टर इस्लामवादी आणि कट्टर हिंदुत्ववादी यात उतरले, कारण अंतिमत: यात त्यांचा फायदा आहे. मुस्लीम मुलींचे मात्र यातून अंतिमत: नुकसान होऊ शकते, कारण या सर्व वादाचा मुस्लीम मुलींच्या शिक्षणावर परिणाम होऊ शकतो, याचे भान लवकर आले तर बरे.
मुस्लीम स्त्रियांमधील जागृती आता वाढते आहे. त्या शिकून पुढे येत आहेत. इंजिनीअर, डॉक्टर, पायलट अशा विविध क्षेत्रांत काम करत आहेत. ‘शाहीन बाग आंदोलना’ने दाखवून दिले, की मुस्लीम स्त्रिया समाजाचेही नेतृत्व करू शकतात. या आंदोलनात कुठल्याही कट्टर धार्मिक संघटना किंवा राजकीय पक्ष यांना आंदोलनकर्त्यां स्त्रियांनी शिरकाव करू दिला नव्हता. त्याची खंत असलेले आता हिजाब आंदोलनावर स्वार झाले आहेत. बीडमध्ये ‘पहले हिजाब, फिर किताब’, ‘हर किमती सामान परदे में रखा जाता हैं’ असे मोठे मोठे फलक लावले गेले. हिजाबसाठी आंदोलन करणाऱ्या आणि आम्ही आमच्या शिक्षणाच्या हक्कासाठीही लढतो आहोत, असे सांगणाऱ्या मुस्लीम मुलींनी वरील घोषणांचा विचार करावा.
या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘इन मुस्लीम बेटियों को कोई बरगला रहा हैं’. पण कर्नाटकच्या भाजप सरकारने या मुस्लीम मुलींना बेटीसारखे वागवले का? त्या मुलींची समजूत घालून काही मधला मार्ग काढता आला असता. त्याऐवजी त्या मुलींच्या तोंडावर महाविद्यालयाचे फाटक बंद केले गेले आणि मुली आत घेण्याची विनवणी करत फाटकाबाहेर उन्हात बसून राहिल्या, ते दृश्य फार विदारक होते. दुसरे विदारक दृश्य म्हणजे एकटय़ा मुलीच्या मागे आक्रमकपणे धावून येणारे ४०-५० गुंड तरुण. थरकाप उडवणारे हे दृश्य. ‘हमारी बेटियाँ’ असे म्हणणारे पंतप्रधान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कधी ‘सुली डील’, ‘बुली बाई’ अॅपबद्दल बोललेले आठवत नाही. तेव्हा हिजाब आंदोलनाचा फायदा कोणाकोणाला कसा मिळणार आहे हे स्पष्ट आहे. त्यामुळे लोक बोलू लागले आहेत. चित्रफितींच्या माध्यमातून अशा अनेक घटना सर्व जगासमोर आल्या आहेत. सर्व जगाने हे पाहिले आहे. धर्मनिरपेक्ष आणि विविधतेत एकता असल्याची प्रतिमा असलेल्या देशाबाबत हे काय घडते आहे?
विविध पुरोगामी संघटना, स्त्री संघटना आणि विरोधी राजकीय पक्ष ‘हिजाब हा त्यांचा चॉईस आहे’ अशी भूमिका मांडत हिजाब आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. मी काय परिधान करावे, हा माझा व्यक्तिगत निर्णय असू शकतो, पण तो आंदोलनाचा मुद्दा करणे हे पूर्णपणे मुस्लीम स्त्रिया आणि मुस्लीम समाजाला भावनिक मुद्दय़ांमध्ये गुंतवून खऱ्या मुद्दय़ांपासून बाजूला नेणे आहे. शिक्षण, सुरक्षितता, रोजगार आणि न्याय हे त्यांचे खरे मुद्दे आहेत. सच्चर अहवालातील शिफारशी हे त्यांचे खरे मुद्दे आहेत. पण त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलने केली जात नाहीत.
आज भारतात मुस्लीम समाजामध्ये साक्षरतेचे प्रमाण राष्ट्रीय साक्षरता दरापेक्षा खूप कमी आहे, पण भावनिक मुद्दय़ांवरच आंदोलने केली जात आहेत. मुस्लीम समाज आज अस्तित्वासाठी झगडतो आहे. हिजाबसारख्या भावनिक प्रश्नांवर आंदोलने करण्यापेक्षा खऱ्याखुऱ्या प्रश्नांवर संघटन आणि आंदोलन मुस्लीम समाजाने केले पाहिजे.
आता वेळ आहे शहाणपणा दाखवत लढा उभारायची. गरज आहे ती भारताची धर्मनिरपेक्ष लोकशाही वाचवण्याची आणि प्रश्न सामंजस्याने सोडवण्याची.
(लेखिका संशोधक आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां आहेत.)
chaturang@expressindia.com
माझी ओळख माझ्या विचारांमुळे!
|| मोहसीना मुकादम
मी कधी हिजाब घातला नाही कारण माझे पुरोगामी आणि प्रगतिशील विचारांचे कुटुंब आणि ज्या काळात मी वाढले त्या वेळचे सामाजिक वातावरण.
माझ्या आधीच्या दोन पिढय़ांनी- म्हणजे आज्या, मावश्या, आत्या यांनीही कधी हिजाब किंवा बुरखा घातल्याचे मला आठवत नाही. भेंडीबाजारसारख्या मुस्लीमबहुल वस्तीत राहणारे माझे नातेवाईक- जे धार्मिक बाबतीत कर्मठ होते (कट्टर नाही) त्यांच्या घरीही हिजाबचे प्रस्थ नव्हते. लेकीसुनांना ते न घालण्याचे स्वातंत्र्य होते. मनाचा कणखरपणा आणि समाजात वावरण्याचा आत्मविश्वास कुटुंबाने दिल्यामुळे ‘हिजाब म्हणजे संरक्षण’ हे समीकरण मनात आलेच नाही.
धर्माचे मूलभूत तत्त्वज्ञान समजून उमजून त्याप्रमाणे आचरण असावे, हे संस्कार महत्त्वाचे. धार्मिक असणे म्हणजे धर्माचे बाह्य अवडंबर मिरवणे हे नाही. धार्मिक कर्मकांड, रीतिरिवाज इतिहासाच्या समाजशास्त्रीय चौकटीत अभ्यासून जे कालबाह्य झाले आहेत ते सोडून देणेच योग्य आहे हे लक्षात घेतले पाहिजे. पण दुर्दैवाने गेल्या दोन दशकांपासून धार्मिक ओळख (आयडेंटिटी) हीच महत्त्वाची ओळख आहे, हा विचार अतिशय प्रखर झाला आहे. सांस्कृतिक एकतेपेक्षा धार्मिक वेगळेपण मिरवण्यातच धन्यता वाटू लागली आहे. याबाबतीत एकमेकांवर कुरघोडी करण्याचे धर्मकारण, राजकारण आणि समाजकारण सुरू आहे. पण माझी
ओळख ही हिजाबमुळे नव्हती आणि नाही. ती आहे माझ्या विचारांमुळे, व्यक्तिमत्त्वामुळे. त्यामुळे मी हिजाब घालण्याचा प्रश्नच येत नाही.
(लेखिका निवृत्त प्राध्यापिका आहेत.)
‘तिच्या पंखांना बळ हवं’
समीना दलवाई :- ‘मी बुरखा का घालत नाही’ या प्रश्नाला संलग्न मग मी मंगळसूत्र का घालत नाही? टिकली-कुंकू का लावत नाही? सिंदूर का भरत नाही? मासिक पाळीत बाजूला का बसत नाही? करवा चौथ किंवा वटसावित्री का पूजत नाही? असे अनेक प्रश्न उद्भवतात. सर्वाना उत्तर एकच- मी माणूस म्हणून जगते, व्यक्ती म्हणून, नागरिक म्हणून वावरते. स्त्री म्हणून पुरुषप्रधान समाजाचे नियम, रूढी पाळत
बसत नाही.
हे स्वातंत्र्य मला आहे, कारण मी उच्चशिक्षण घेऊन नोकरी-व्यवसाय करणारी स्वयंभू बाई आहे. आज ज्या तरुण मुली हिजाब घालून म्हणा, पूजा, उपासतापास करून म्हणा, शिकू पाहतात, त्यांना समाजाने ही संधी द्यावी, की त्याही उद्या सक्षम बनतील, स्वत:चे निर्णय स्वत: घेतील, पुरुषसत्ता आणि धर्मसत्ता झुगारतील. त्यांना शिकू द्या. त्यांचे पंख कापू नका, असेच मला सांगावेसे वाटते.
पुरुषांना बायकांच्या पेहरावावर, वागण्यावर, जगण्यावर इतका आक्षेप का आहे, हा खरा प्रश्नआहे. एकीकडे म्हणता, ‘मुली जीन्स, तोकडे टॉप घालतात, मग बलात्कार होणारच’, दुसरीकडे हिजाब म्हणजे अंगभर कपडय़ातील मुलींना शिक्षण नाकारता. हा दुजाभाव कशासाठी ?
जातीनिहाय पुरुषप्रधान संस्कृती स्त्रिया आणि शूद्रातिशूद्रांना शिक्षणापासून वंचित ठेवत आली. १८४८ मध्ये महात्मा जोतिबा फुले यांनी मुलींची शाळा काढली, सर्व जातींना शिकवू पाहिले त्याला तपे लोटली; पण आजही पायल तडवी, रोहित वेमुला शिक्षण घेताना जीव गमावतात. अजून किती बळी घेणार तुम्ही?
बायकांचा छळ करणे हा समाज कधी थांबवणार आहे? मला वाटते, जगा आणि जगू द्या, हेच महत्वाचे आणि तसेच जगायला हवे.
(लेखिका विधि महाविद्यालयात प्राध्यापक आहेत.)
हिजाबचा ‘हिसाब’ :- मुमताज शेख
‘आप दुनिया के तमाम औरतो को बुरखा पहना दो.. फिर भी हिसाब अपनी नजरोंका देना होगा’
– सआदत हसन मंटो
गेले काही दिवस ‘हिजाब’ प्रकरणाच्या निमित्ताने ‘हिसाब’ मांडला जातोय. कोण हिजाबच्या बाजूने आणि कोण त्याच्याविरोधात यावर सगळीकडे चर्चा सुरू आहे. यात हिजाबच्या बाजूने जायचे की त्याच्या विरोधात जायचे हा मुद्दा नसून प्रत्यक्ष त्या बाईला किंवा त्या मुलीला काय वाटते हे बाजूलाच राहते आहे. धर्माला मुलींच्या शिक्षणाच्या आड आणले जात असेल तर त्याचा निषेधच व्हायला हवा. कर्नाटकमधला प्रश्न सुरुवातीपासून अधिक सामंजस्याने हाताळता आला नसता का? धर्म आणि शिक्षण या दोन वेगळय़ा गोष्टी आहेत आणि त्याला मध्ये आणून राजकारण का केले जाते? तेही आताच का? मुळात हिजाब किंवा बुरखा घालण्याबाबत अथवा न घालण्याबाबत मुस्लीम स्त्रियांची काय भूमिका आहे, हे फार कमी वेळा समाजासमोर येते. हा निर्णय बहुतेक मुस्लीम स्त्रियांसाठी संघर्ष असल्यासारखा असतो. हा निर्णय त्यांच्यासाठी कसा आहे, या बाबतीतले माझे आणि माझ्या काही मैत्रिणींचे हे अनुभव.
माझा जन्म १९८१ मध्ये झाला. माझ्या घरी कोणीही बुरखा किंवा हिजाब वापरत नव्हते. माझे आजोळ अहमदनगरमधील कर्जत तालुक्यातील एका खेडेगावात होते. गावात जेमतेम दोन-तीन मुस्लीम कुटुंबे. सगळे दुसऱ्यांच्या शेतात काम करणारे किंवा मजुरी करणारे. बुरखा हे त्यांच्या गावीही नव्हते. त्यामुळे मी लग्नापूर्वी कधीही बुरखा घातला नव्हता. माझे लग्न ठरले आणि लग्नाच्या खरेदीमध्ये एक चॉकलेटी रंगाचा बुरखाही आला. लग्न झाल्यावर मला बुरखा दिला तेव्हा मला खूप अभिमान वाटला आणि आनंदही झाला. कारण मुस्लीम समाजातील फक्त सन्मानित कुटुंबातील स्त्रियाच बुरखा घालतात, असे मला वाटत होते. त्यानंतर मी काळा बुरखा, नोजपीस आणि हँड ग्लोव्हज असणारा बुरखा विकत घेतला आणि बाहेर तो घालून वावरू लागले. परपुरुषाला माझे नखही दिसू नये अशी मी राहत होते. परंतु मला लवकरच समजले की लग्नानंतरचे माझे चांगल्या आयुष्याचे स्वप्न पूर्ण होणार नाहीये. यादरम्यान ‘कोरो इंडिया’ संघटना माझ्या आयुष्यात आली. मी साक्षरता वर्ग घेऊ लागले. माझ्या साक्षरता वर्गातील स्त्रियांशी झालेल्या चर्चेमुळे हळूहळू स्त्रियांवरील हिंसाचाराचा मुद्दा समजण्यास मदत झाली. या समजुतीने मी स्वत: अनुभवत असलेल्या हिंसाचारावर विचार करू लागले. वैवाहिक जीवनात माझ्यावर लादलेल्या हिंसाचार आणि निर्बंधांमुळे मी अधिकाधिक हताश झाले, पतीबरोबरचे संबंध अधिक ताणले गेले. अत्याचारांची तीव्रता वाढली. याच दरम्यान माझी समज वाढत होती. लिंगभेद, हिंसा, संविधान हे समजत गेले. संविधानाने सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे हे समजले. सन्मान हा शब्द तर माझ्या किंवा माझ्या कुटुंबातील कोणत्याच स्त्रियांनी ऐकला किंवा जगला नव्हता. याच दरम्यान मी सामाजिक प्रशिक्षण कोर्समध्ये भाग घेतला.
हळूहळू मी बुरखा घालणेही सोडले. मी पहिल्यांदा बुरखा न घालता माझ्या मुलीला बालवाडीत दाखल करण्यासाठी गेले होते. परतल्यावर मला दारात उभे करून घरातल्यांनी खूप शिवीगाळ केली होती. परंतु मी माझ्या मुद्दय़ावर ठाम राहिले, कारण तो माझ्या निवडीचा मुद्दा होता. त्या दिवसापासून मी कधीच बुरखा घातला नाही. नंतर कोणी फारसा विरोधही केला नाही. एकदा ‘ट्रिपल तलाक’विषयीच्या ‘टीव्ही’वरील चर्चेनंतर घरी आल्यावर मला आठवते, की बरीच मौलानाजी मंडळी घराखाली थांबली होती आणि मला पाहून आपापसात बोललीही, पण मला कोणी काही बोलले नाही. त्यानंतर किंवा आता लोकवस्तीत काम करत असताना बऱ्याच मौलानाजींबरोबर आम्ही काम करतो, मदरशांमध्ये बैठका घेतो. तिथेही मी कधी डोक्यावर ओढणी घेऊन बसत नाही, किंवा मला कोणी डोक्यावर ओढणी घ्या, असे कोणी म्हटलेले नाही. माझ्या घरात माझ्या मामेबहिणींनी कधी बुरखा किंवा हिजाब घातला नाही. परंतु माझी वहिनी स्वमर्जीने बुरखा घालते. शेवटी हा ज्या-त्या स्त्रीचा निर्णय आहे, असे मला वाटते.
mumtajcorommf@gmail.com
‘बुरख्याचा फायदाच!’ :- शकीला
माझे वय ४५. शिक्षण सातवी. लग्न करून मुंबईत आले, तेव्हा हातातल्या बांगडय़ाही नवरा आणून द्यायचा. घरातून बाहेर पडले, की नकाबमध्येच जावे लागायचे. त्या वेळी मला असे वाटले होते की नकाब सोडायला हवा, हे माझ्यावर बंधन आहे. हळूहळू महिला मंडळांच्या बैठकांना लोकवस्तीत जाऊ लागले, तेव्हा वाटले, की कशाला सोडायचे, हे बंधन घेऊन मिरवायचे! मग मी बुरखा घालायचे, पण चेहरा उघडा ठेवायचे. एवढे ठीक आहे, असे मला वाटले. नंतर हे काम करत असताना जी समज तयार झाली, त्यातून लक्षात आले, की मी ज्या वस्तीत काम करते ती वस्ती मुस्लीमबहुल आहे आणि स्त्रियांना बाहेर काढणे, त्यांना संघटित करणे, त्यांचे नेतृत्व पुढे आणणे, हे अवघड काम आहे. यात जर मी बुरखा पूर्णपणे सोडला, तर लोक म्हणतील ‘पाहिलेत, महिला मंडळात गेली आणि बुरखा सोडला. बेपर्दा झाली. हे महिला मंडळवाले असेच! स्त्रियांना भडकवतात.’ मी बुरखा घालून वस्तीत जाते, स्त्रियांच्या दारात उभी राहते, मीटिंगला चला म्हणते, त्या स्त्रिया मला बुरख्यात पाहतात. इथे जाऊनही आपण बुरखा घालू शकतो, असा त्यांना विश्वास वाटतो, त्या वेळी त्या मोठय़ा प्रमाणात बाहेर पडतात. आता मी माझा बुरखा ही माझ्या कामाची रणनीती म्हणून वापरते. मला आणि माझ्या संघटनेला याचा फायदा झाला आहे. याचबरोबर पुरुषांचा सहभागही कामात वाढलेला दिसतो. त्यांचीही समज तयार होऊ लागली आहे. त्यामुळे त्यांच्या मुलींवर ते गोष्टी लादत नाहीत. मग तो बुरखा असो की मोबाइल फोन. जर बुरखा घातल्याने स्त्रियांना आपलेपणा वाटत असेल किंवा त्यांचा विश्वास वाढत असेल तर त्यांनी तो का घालू नये? कदाचित नंतर त्यांची समज वाढल्यावर, शिक्षण झाल्यावर त्या घेतील त्यांचा निर्णय. मला आता माझा बुरखा ‘पाबंदी’ वाटत नाही. मी स्त्रियांना बुरखा घाला किंवा नका घालू असे सांगत बसत नाही, कारण तो प्रत्येकीचा वैयक्तिक निर्णय आहे हे माझे ठाम मत आहे. ६
‘बंधन झुगारले’ :- नेहा
मी २८ वर्षांची आहे. ‘एमएससी- प्लँट बायोकेमिस्ट्री’मध्ये माझे शिक्षण झाले असून एका खासगी कंपनीत प्लँट फिजिओलॉजिस्ट म्हणून काम करते. माझा इथपर्यंतचा प्रवास ही मोठी कहाणी आहे. माझे कुटुंब मुंबईतील नागपाडामधले. आजूबाजूला मुस्लीम समाजातील बऱ्यापैकी सधन मंडळी. घरातले भाऊ, बहिणी सगळे शिकलेले, चांगल्या पदांवर असलेले. मी ९ वर्षांची असताना मला वाढदिवसाची भेट म्हणून नकाब दिला होता. त्यानंतरची २४ वर्ष मी बुरख्याशिवाय बाहेर पडले नाही. तशी परवानगीच नव्हती. माझ्या ‘पीएच.डी.’साठी घरच्यांचा विरोध होता म्हणून १७ एप्रिल २०१७ मध्ये मी घर सोडले. ‘कोरो’ संस्थेमुळे शेल्टर होमद्वारे माझी राहण्याची व्यवस्था झाली. तिथेही मी बुरखा घालायचे.
एक निमित्त झालं आणि ज्या केंद्रात मी राहत होते तिथल्या काही स्त्रियांनी एके दिवशी रागाने माझा बुरखा कात्रीने कापून टाकला. मी तशीच फाटलेला बुरखा घालून संस्थेच्या ऑफिसमध्ये गेले. माझा फाटलेला बुरखा बघून ऑफिसमधील कार्यकर्त्यांनी सांगितले, की ‘फाटलेला बुरखा का घातला? नाही घातला तर काही फरक पडणार आहे का?’ मी विचार केला, बुरख्याला नेहमी माझ्यासमोर लाज, शरम याच्या तराजूत ठेवलं गेलं. मी एक मुलगी आहे आणि मी नेहमी आपली नजर झुकवून चालायला हवे, सर्वाची इज्जत करायला हवी, इत्यादी गोष्टी मला सांगितल्या गेल्या. बुरख्यात राहूनच मी माझे शिक्षण पूर्ण केले. पण मी जेव्हा उच्च शिक्षणाबद्दल घरात बोलायला लागले, तर मला काय मिळाले? मला घर सोडावे लागले. आईवडील, घर असूनही मी शेल्टर होममध्ये राहू लागले. कारण काय, तर मी निर्णय घेत होते, आवाज उठवत होते. मग मी ठरवले, की बास, आता बुरखा नाही घालायचा. सुरुवातीला अवघड वाटले. कारण वयाच्या नवव्या वषार्र्पासून बुरखा घातलेला होता. तो लगेच सोडणे अवघड जात होते. मी घर सोडल्यावर ६ महिन्यांनी आईवडील आणि बहीण आले होते. त्या वेळी मी नुकतीच ऑफिसमधून येत होते. रिक्षातून उतरले, तर समोर ही मंडळी उभी होती. मला पाहून आई जोरजोरात रडू लागली. ‘ये देखो कैसे बेशरमकी तरह बिना नकाब के घूम रही हैं’. मी घाबरून पळत शेल्टर होमच्या आत गेले. वाईट याचे वाटले, की ६ महिन्यांनी भेटल्यावर मी कशी आहे हे न विचारता मी न घातलेला बुरखा दिसला. पण आईची तरी कुठे चूक होती! शेवटी दोष तिलाच दिला गेला असता म्हणूनही तिची ही भूमिका असेल.
आज मला बुरखा सोडून आठ वर्षे झाली. मला मी स्वतंत्र आहे असे वाटते. त्यावर कुठल्याही प्रकारचे बंधन, बंदिश नाही असे मला वाटते. बुरखा सोडणे हा माझा निर्णय योग्य होता.
‘शिक्षणानेच समज येईल’ :- यास्मिन
माझे वय ४५. माझे ‘एम.ए.’पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे. मी लग्नानंतर बुरखा घालायला सुरुवात केली. ‘बी.ए.’पर्यंत बुरखा नाही घातला. माझे आजोबा, वडील भाऊ म्हणायचे, की बारावीनंतर तिला बुरखा घालू द्या. पण आई म्हणायची, की ‘तिला नाही घालायचा तर का जबरदस्ती करताय?’ लग्नानंतर मुस्लीम धर्मानुसार बुरखा घालायला पाहिजे असे म्हणतात, म्हणून मी बुरखा घातला आणि मला आता त्याची सवय झाली आहे. जेव्हा मी ‘कोरो महिला मंडळ फेडरेशन’मध्ये आले तेव्हा मला समजले, की बुरखा घातला म्हणजेच मला लोक चांगली बाई म्हणतील असे नसते. ते आपल्या स्वभावावर ठरत असते. मला वाटले तर बुरखा घालेन, नाही तर नाही घालणार. हे माझ्यावर अवलंबून आहे. ‘एम.ए.’चे शिक्षण पूर्ण करताना त्यात कुठेही मला माझ्या बुरख्याची अडचण वाटली नाही. आता माझ्या घरात माझ्या मुलीला जर कोणी म्हणाले, की बुरखा घाल, तर माझी मुलगी त्याचे योग्य उत्तर देते. अशी तिची समज मी तयार केली आहे. ती तिला आवडेल ते कपडे घालते. मला असे वाटते, की शिक्षण तुम्हाला सगळे शिकवते, निर्णय घेण्याचे सामर्थ्य देते, लढायला शिकवते आणि हीच प्रक्रिया व्हायला हवी.
‘निर्णयावर ठाम राहिले’ :- अन्वरी
माझा जन्म १९६० मध्ये उत्तर प्रदेशात एका खेडेगावातील मध्यमवर्गीय मुस्लीम कुटुंबात झाला. वडिलांनी मुंबईत येऊन टॅक्सीचा व्यवसाय सुरू केला होता. मुंबईत त्यांच्या मालकीची टॅक्सी होती आणि त्यात ते चांगली कमाई करत. गावात आमच्या कुटुंबाला खूप मान होता. आमच्या घरातील स्त्रिया घराचा उंबरठा ओलांडत नाहीत ही आमच्या कुटुंबासाठी अभिमानाची बाब मानली जात होती.
मला चार बहिणी आणि पाच भाऊ. आई-वडील साक्षर नव्हते आणि आमच्या कुटुंबातील एकही स्त्री शाळेत गेली नव्हती. परंतु माझे भाऊ शाळेत जात होते. ते शाळेत जात असताना मला कुराण शिकण्यासाठी स्थानिक मदरशात पाठवण्यात आले, परंतु ते ठिकाण आमच्या घरापासून थोडे दूर असल्याने लवकरच तेही बंद झाले. बहिणींनाही मदरशात पाठवले गेले नाही, कारण त्या स्वत: शिकण्यास उत्सुक नसायच्या. मी खोडकर, खेळकर मुलगी होते. आठ वर्षांची होईपर्यंत मी माझ्या मैत्रिणींच्या गटात ‘लीडरगिरी’ करायचे. परंतु दोन वर्षांत- म्हणजे मी १० वर्षांची झाल्यावर मला बुरखा घालायला लावले होते. ते मला अजिबात आवडले नव्हते आणि मी त्यास विरोध केला होता. पण घालावा लागला. नंतर वडिलांच्या ओळखीने टॅक्सी चालवणाऱ्या एका युवकाबरोबर माझा निकाह लावण्यात आला. लग्न झाल्यानंतर मुलांचा सांभाळ करण्यात वेळ गेला. मुले मोठी झाल्यानंतर मात्र मी निर्णय घेतला, की आता बुरखा घालायचा नाही. यादरम्यान मी महिला मंडळाच्या संपर्कात आले होते आणि लोकवस्तीत स्त्री अत्याचारासंबंधी काम करू लागले. एके दिवशी मी बुरखा घालायचे बंद केले. यावर माझ्या घरी खूप विरोध झाला. सासर आणि माहेरचे लोक नावे ठेवायला लागले. माझ्या नवऱ्याला ते म्हणायचे, की ‘तेरी औरत खुला घुमती हैं’. यामुळे मी काही दिवस नातेवाईकांच्या घरी जायचेच सोडले. काही दिवसांनंतर मी गावी गेले होते, तिथे माझ्याशी कोणीही बोलले नाही किंवा भेटायला आले नाही. पण मी माझ्या मुद्दय़ावर ठाम होते. मी म्हणाले, की माझी मर्जी आहे बुरखा घालायचा की नाही. मुलांसाठी शाळेत, घरातील कामांसाठी, बाजारात जायला, डॉक्टरांकडे जायला अशा सगळय़ाच कामासाठी घराबाहेर पडावे लागते. मग कसला परदा आणि कोणासाठी करायचा, हा विचार करून मी बुरखा काढला. हळूहळू लोकांचे बोलणे बंद झाले आणि चर्चाही थांबल्या.
‘संघर्ष केला नि शक्कलही लढवली!’ :- अंजुम शेख
मी दहावीपर्यंत शिकले आहे. घरात चार भाऊ आणि चार बहिणी. घरात नेहमीच मुले आमच्यापेक्षा पुढे होती. मात्र शिक्षण म्हणून पाहिले, तर आमच्या घरात मुले शिकलेली नाहीत, परंतु मुलींनी दहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. मी दहावीत असताना माझ्या दोन मैत्रिणी बुरखा घालायच्या. त्यांना पाहून मी अम्मीला म्हणाले, की मला बुरखा घालायचा आहे. घरातले सगळे म्हणाले, ‘आता घालू नकोस, तू लहान आहेस.’ मी म्हणाले, ‘मला बुरखा आवडतो, म्हणून घालायचा आहे.’ अम्मी म्हणाली, ‘बुरखा आवडतो म्हणून घालायचा नसतो, तर पर्दा करण्यासाठी असतो.’ मी १६ वर्षांची झाले आणि मला पाळी आली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी माझ्यासाठी बुरखाही आला. त्या वेळी मी सांगितले, की ‘मला नाही घालायचा बुरखा.’ तेव्हा मला सांगण्यात आले, की मी आता मोठी झाले आहे, त्यामुळे मला बुरखा घालावाच लागेल, मग तो आवडो किंवा न आवडो. माझ्या बहिणी मला समजावू लागल्या, की ‘बुरखा आपल्या धर्मात खूप गरजेचा आहे. जर तू बुरख्यामध्ये असलीस तर कोणी परपुरुष तुझ्याबरोबर छेडछाड करणार नाही, तुझ्याकडे वाईट नजरेने बघणार नाही. एक चांगली मुलगी पडद्यातच चांगली वाटते.’ त्यांचे हे भावनिक म्हणणे मला पटले आणि मी ते अनुसरू लागले.
जेव्हा मी ‘कोरो इंडिया’च्या सामाजिक कामाशी जोडली गेले, तेव्हा तिथे मला माझे अधिकार कळले. भारतीय संविधानाने प्रत्येकाला आपल्या पद्धतीने जगण्याचा अधिकार दिला आहे, हे सगळे मी शिकले आणि स्वत:ला बदलण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत मी सामाजिक बंधनात जगत होते, ते समजले. स्वत:चे जीवन जगण्याची संधी मिळाली. पण ही संधी घेणे सोपे नव्हते. मला बुरखा तर सोडायचा होता, पण हा निर्णय घेणे माझ्यासाठी सोपे नव्हते. मग मी एक कल्पना लढवली. मी बुरखा तर घालायचे, पण तोंड झाकण्यासाठी जे ‘नोजपीस’ लावले जायचे ते लावायचे नाही. काही दिवस असेच गेले. काही लोकांनी त्याबद्दल विचारले, काहींनी नाही विचारले. त्यानंतर मी ‘रीदा’ (रीदा म्हणजे मोठी ओढणी. ज्यात पूर्ण शरीर झाकले जाते.) बुरख्याला पर्याय म्हणून वापरायला सुरुवात केली. नंतर जेव्हा ऑफिसमध्ये जायचे तेव्हा बुरखा घालून जायचे आणि तिकडे गेल्यावर तो काढायचे. त्यानंतर कामासाठी कुठे जायचे असल्यास बिना बुरख्याची जाऊ लागले. मी घरी येत असताना माझ्या घराजवळचे लोक म्हणायचे ‘क्या री, घर से तो बुरखा पहनकर ऑफिस जाती हैं.. मगर बाहर तो बिना बुरखेकी घुमती हैं’. काही लोक खूप वाईटसाईट बोलायचे, की ‘यांचे तर कामच असे दिखाव्याचे आहे. लोकांना दाखवायला पर्दा करायचा’. खूप वाईट आरोपही केले गेले. मला याचा खूप त्रास व्हायचा. मी घरात एकटी रडत बसायचे आणि सकाळी उठून पुन्हा कामाला जायचे आणि सगळे विसरायचे. हे सोपे नव्हते. मला कुठेतरी हे सगळे थांबवायचे होते. एकदा मी एका लग्नात बिनाबुरख्याची गेले होते. ते माझ्या भावाला माहीत नव्हते. तिथे माझ्या मावशीचे पती आले होते. त्यांनी मला बिनाबुरख्याची पाहिल्यानंतर माझ्या भावाला फोन करून ते सांगितले. भावाला खूप वाईट वाटले आणि त्याने मी घरी गेल्यावर त्याबद्दल मला विचारले. भाऊ मला म्हणाला, की ‘तू असे करू नको. लोक आम्हाला बोलतात.’ मी त्याला सांगितले, ‘मी ऑफिसमध्ये जाताना बुरखा घालून जाते, पण तिकडे गेल्यावर बुरखा काढून लोकांमध्ये मिसळते,कारण ते महत्त्वाचे असते, शिवाय मला बुरखा आवडत नाही.’ मी खूप शांतपणे त्याला हे समजावून सांगितले. त्यानंतर कधी भाऊ काही बोलला नाही. आजही कुणी काही बोलले तर मी शांतपणे ऐकून घेते आणि आपले काम करत राहते.
chaturang@expressindia.com