माधुरी ताम्हणे – madhuri.m.tamhane@gmail.com

‘करोना’चा काळ सगळ्यांसाठीच कठीण. त्यातही ज्यांना नोकरी-व्यवसाय गमवावा लागला आहे, ज्यांच्यासमोर भविष्याची चिंता आहे, त्यांच्या मनाची स्थिती अधिकच नाजूक झाली आहे. अशा किंवा इतरही कारणांमुळे मानसिक अस्वस्थता आलेल्या अनेकांना के वळ एखाद्या विश्वासू व्यक्तीशी बोलल्यामुळेही धीर येऊ शकतो. अशा वेळी त्यांच्याशी समंजस संवाद साधणं खूप गरजेचं असतं. तसा संवाद साधून त्यांच्यात उमेद पेरणाऱ्या  विविध हेल्पलाइन्स कार्यरत आहेत. त्यांच्या कामाविषयी..

भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास (एचआरडी) या विभागाद्वारे २१ जुलै २०२० रोजी ‘मनोदर्पण’ नावाची एक ‘टोल फ्री’ आणि चोवीस तास चालवली जाणारी हेल्पलाइन सुरू करण्यात आली. ‘करोना’ काळातील अस्थिर आणि अनिश्चित परिस्थितीचा विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांवर विपरीत परिणाम होत आहे. त्यांना मानसिक आधार देण्यासाठी के ंद्र सरकारनं राष्ट्रीय स्तरावर मानसोपचारतज्ज्ञ आणि समुपदेशकांची ८० जणांची एक टीम तयार केली असून महाराष्ट्रातील लीना चौधरी (जळगाव) आणि अनिल पेटकर (चंद्रपूर) या शिक्षकांची या टीममध्ये निवड करण्यात आली.

या हेल्पलाइनविषयी आपला अनुभव अनिल पेटकर सांगतात, ‘‘‘राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद’ (एनसीईआरटी) आणि ‘महाराष्ट्र शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषदे’द्वारे (एमसीईआरटी) या हेल्पलाइनची एक दिवस चाचणी घेतली गेली आणि त्यानंतर आम्हाला भारतभरातून त्यावर फोन येण्यास सुरुवात झाली. एकदा मला अलाहाबाद विद्यापीठातील एका प्राध्यापकांचा फोन आला. त्यांना चार महिने पगार मिळाला नव्हता. घरातील परिस्थिती बिकट होत चालली होती. त्यांचं मन:स्वास्थ्य हरवलं होतं आणि त्यांना निराश, उदास वाटत होतं. मी त्यांना समजावलं, की समाजासमोर अशी आव्हानं यापूर्वीही आली होती. उलट त्या काळात आजच्यासारख्या आधुनिक सोयीसुविधा नव्हत्या. लोक तंत्रस्नेही नव्हते. तरीही समाजानं त्यातून बाहेर पडून आपली प्रगती साधली. आपण सुदृढ मनोवृत्तीनं हे आव्हान स्वीकारायला हवं. लवकरच परिस्थिती पालटेल. तोवर संयम बाळगायला हवा. माझ्या समजावण्याचा त्यांच्यावर सकारात्मक परिणाम झाला. त्यांनी मला फोन करून कळवलं, की तुमच्याशी बोलल्यामुळे मला खूप धीर आला आहे. माझ्या मनावरील ताण कमी झाला आहे.’’

त्यांनी आणखीही काही अनुभव सांगितले. ‘‘एक फोन मध्य प्रदेशातून आला. बी.एड. झालेला विद्यार्थी सांगत होता, की सध्या त्याला नोकरी मिळत नसल्यामुळे पैशांची तंगी असते. आई-बाबा टोचून बोलतात. मानसिक ताणामुळे त्याला रात्र रात्र झोप येत नव्हती. मी त्याला ‘माइंडफु लनेस’चं तत्त्व सांगितलं. आपण एक तर भूतकाळात रमतो किंवा भविष्याची चिंता करतो आणि निराश होऊन वर्तमानकाळ खराब करतो. मी त्याला सांगितलं, की तू तरुण आहेस, तू वर्तमानात जगायला शिक. संधीचा शोध घे. ‘ऑनलाइन’ क्लासेस घेणं सुरू कर. दोन-तीन वेळा त्याचं असं समुपदेशन केल्यावर त्याच्या विचारांना निश्चित दिशा मिळाली. एकदा एका पालकाचा फोन आला. त्यांना मुलीची चिंता वाटत होती, कारण ती सतत मोबाइलवरच असे. घरात कोणाशी बोलत नसे. मी स्वत: त्या मुलीशी बोललो. त्यातून कळलं, की वडिलांचा व्यवसाय बंद असल्यानं ते सतत घरात असत आणि तिच्यावर लक्ष ठेवत. त्यांना संशय असे, की ती सतत कोणाशी तरी ‘चॅटिंग’ करते. वस्तुत: ती ‘नीट’ परीक्षेची तयारी करत असल्याने त्यासाठी आवश्यक ते  व्हिडीओज् बघत असे, ऑनलाइन क्लासेसनाही उपस्थित राहात होती. केवळ गैरसमजातून एका अभ्यासू मुलीला अकारण मनस्ताप सहन करावा लागत होता. मी तिच्या पालकांशी बोललो आणि त्यांची समस्या सुटली.’’

‘‘पुण्यातला एक विद्यार्थी ‘बीएस्सी’ करून ‘एलएलबी’कडे वळला. नुकतीच पदवी मिळालेली, पण न्यायालयं बंद. त्यामुळे व्यवसाय ठप्प. कुठे जावं, काय करावं, त्याला कळत नव्हतं.  त्याला धीर दिला, त्याच्याशी बोललो, तेव्हा जाणवलं, की तणाव कुठे तरी व्यक्त करता यावा, ही प्रत्येकाची खरी गरज असते. सध्या लोकांची खूप घुसमट होत आहे. वेगवेगळ्या प्रश्नांना त्यांना सामोरं जावं लागत आहे. त्यासाठी ‘मनोदर्पण’ या हेल्पलाइनचा शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना खूपच फायदा होत आहे. अजूनही आम्हाला या हेल्पलाइनवर फोन येतातच. फक्त आता प्रश्नांचं स्वरूप थोडं बदललं आहे. प्रवेश परीक्षा, करिअर मार्गदर्शन अथवा व्यवसायाची निवड यासाठी आता फोन येतात. ‘मनोदर्पण’ ही हेल्पलाइन खरोखर काळाची गरज ठरली आहे,’’असं पेटकर सांगतात.

सध्या तरुण पिढी अशा अनेक प्रकारच्या ताणतणावांचा सामना करत आहे. जेव्हा ताणतणावांचा अतिरेक होतो, तेव्हा काही तरुण आत्महत्येचा टोकाचा निर्णयही घेतात. अलीकडच्या काळातील आत्महत्यांच्या घटनांमुळे तरुणाईला वैफल्यानं किती ग्रासलं आहे ते जाणवून समाजात अस्वस्थता पसरत आहे. जी व्यक्ती समस्यांसह स्वत:चं जीवन संपवते ती व्यक्ती अनेक पातळ्यांवर त्रास सोसत असते. अशा वेळी कौटुंबिक क्लेश, आर्थिक वा नातेसंबंधांतील तणाव अशा अनेक समस्यांच्या मुळाशी जाऊन ते समजून घेण्याची गरज भासते. नेमकी हीच गरज ओळखून २००५ मध्ये अर्नवाझ दमानिया यांनी ‘कनेक्टिंग’ या संस्थेची स्थापना केली आणि २००८ मध्ये सँडी डायस या विश्वस्तांनी पुढाकार घेऊन ‘कनेक्टिंग’ ही हेल्पलाइन सुरू केली.

‘कनेक्टिंग’चे वरिष्ठ समन्वयक विक्रमसिंह पवार सांगतात, ‘‘आमची ही हेल्पलाइन दररोज दुपारी १२ ते सायंकाळी ८ या वेळेत सुरू असते. ज्यांना ई-मेलद्वारे वा थेट भेटीतून संवाद साधायचा असतो, ते तसंही करू शकतात. आम्हाला देशभरातून दररोज बारा ते पंधरा तरी फोन येतातच. फोन करणाऱ्या व्यक्तीची अनामिकता आम्ही जपतो. त्यामुळे त्याचं नाव, गाव, पत्ता, काहीही विचारत नाही. आम्ही आपद्ग्रस्तांना श्रवणकौशल्यानं संवादातून आधार देतो, मात्र त्यांना कोणताही सल्ला देत नाही. फोन करणाऱ्या व्यक्तीच्या मानसिक तणावांच्या कारणांचा ऊहापोह किं वा न्यायनिवाडा आम्ही करत नाही. आम्ही त्यांनी व्यक्त केलेल्या भावनांची वाच्यता न करता त्यांच्या निवेदनातील खासगीपण जपतो.’’

‘कनेक्टिंग’ची हेल्पलाइन ३५ प्रशिक्षित स्वयंसेवकांद्वारे चालवली जाते. सर्व स्वयंसेवक सेवाभावी असून त्यांना आठवडय़ातून एकच दिवस, एकाच शिफ्टमध्ये काम दिलं जातं. त्यांचा एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहे. फोन करणाऱ्या व्यक्तींपैकी एखाद्या अतिशय तीव्र भावनावेगातील व्यक्तीला शांत करणं एखाद्या स्वयंसेवकाला कठीण जात असेल, तर अनुभवी स्वयंसेवक तातडीनं त्याची जागा घेतो. या हेल्पलाइनवर बहुतेक वेळा आत्महत्येच्या टोकाच्या निर्णयापर्यंत आलेल्या अथवा अत्यंत उदास आणि खचलेल्या मन:स्थितीतील व्यक्ती फोन करतात. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम स्वयंसेवकांवर होतो. यासाठी महिन्यातून एकदा त्यांची कार्यशाळा घेतली जाते. त्यात संवादकौशल्य, योग तसंच त्यांच्या कलागुणांचा विकास यावर भर दिला जातो. स्वयंसेवकांचा वार्षिक मेळावाही होतो, ज्यायोगे स्वयंसेवक प्रफुल्ल आणि स्थिर मन:स्थितीत आपद्ग्रस्तांना सेवा देऊ शकतात.

‘‘मानसिकदृष्टय़ा खचलेल्या माणसाला सल्लाच हवा असतो असं नव्हे, तर सहानुभूतीनं त्यांची वेदना समजून घेणारं कोणीतरी त्यांना हवं असतं. वस्तुत: प्रत्येक व्यक्तीत क्षमता आणि ऊर्जा असतेच. अत्यंत निराश मन:स्थितीत जर त्यांना योग्य मानसिक आधार मिळाला, तर ते स्वत:च आपल्या समस्येतून अलगद बाहेर येतात. यासाठी त्यांना मानसिक आधार देणं ही प्राथमिक गरज असते, तर काही वेळा हेल्पलाइनवर फोन करणाऱ्यांच्या निवेदनातून त्यांना व्यावसायिक मध्यस्थाची असलेली गरजही जाणवते. अशा वेळी समुपदेशक कायदेशीर सल्लागार, कौटुंबिक सल्ला केंद्र, वृद्धाश्रम, अनाथाश्रम असे ज्याला जशी गरज असेल त्याप्रमाणे संपर्क क्रमांक देतात.  ई-मेलच्या सुविधेमुळे हल्ली परदेशांतील कॉलर्सची संख्याही वाढीस लागली आहे. विशेषत: ‘करोना’च्या काळात छोटे व्यावसायिक, किरकोळ विक्रे ते, घरगुती विक्री केंद्र असलेले लोक, या सर्वाचं प्रचंड आर्थिक नुकसान झालं. त्यातून त्यांच्या नात्यात तणावही निर्माण झाले. याविषयी बोलणारेही अनेक फोन आम्हाला येत होते.  प्रदीर्घ काळ अशा प्रकारच्या मानसिक तणावातून व्यक्ती गेल्यास नैराश्याचं प्रमाण वाढतं आणि त्यातूनच आत्महत्येचे विचार मनात मूळ धरू लागतात,’’असंही पवार सांगतात.

हेल्पलाइनने हाताळलेल्या विविध प्रकरणांविषयी पवार माहिती देतात. ‘‘हल्ली ज्येष्ठ नागरिकांमध्ये एकटेपणाची भावना तीव्र होत चालली आहे. दिल्लीला राहाणारे एक ज्येष्ठ नागरिक आम्हाला अनेकदा तिथून फोन करतात. त्यांना मधुमेह आहे, मेंदूची शस्त्रक्रियाही झाली आहे, पत्नी वारली आहे आणि मुलं परदेशी असतात. त्यांना बोलायला कोणी नाही. त्यामुळे फार एकाकी वाटतं. आम्ही त्यांच्याशी खूप वेळ बोलतो, त्यांना धीर देतो. एक बत्तीस वर्षांचा तरुण अनेक र्वष नैराश्यात आहे. त्याला नोकरी नाही, मित्र नाहीत, आई-वडील वृद्ध. तो अनेकदा नैराश्याचा झटका आला की आम्हाला फोन करतो. आम्ही त्याच्याशी सकारात्मक बोलून त्याला जगण्याची उमेद देतो. मात्र आमच्या हेल्पलाइनवर कोणीही फार अवलंबून राहू नये याचीही आम्ही दक्षता घेतो. एका स्त्रीचा नवरा तिला खूप मारहाण करतो. मुलांमुळे ती घटस्फोट घेऊ शकत नाही. असं झालं, की ती आमच्या हेल्पलाइनवर फोन करते आणि खूप रडते. ती म्हणते, तुम्ही ऐकून घेता म्हणूनच केवळ मी आत्महत्येच्या विचारापासून दूर राहिले आहे. एक ‘एचआयव्ही’ग्रस्त तरुण औषध घेतो, पण तो नेहमी अत्यंत काळजीत असतो. त्याला सतत भीती वाटत राहाते. आपलं आयुष्य लवकर संपेल असं त्याला सतत वाटतं. आम्ही त्याला दर वेळी समजावतो, की वेळेवर औषधं घेतलीस, निरोगी जीवनशैली राखलीस, तर छान आयुष्य जगशील. काही वेळा असाध्य आजार झालेले रुग्ण असतात. कर्क रोगाची रुग्ण असलेली एक स्त्री सतत रोगाशी झगडून नैराश्यात जातेय. तिला आम्ही धीर देतोय, सावरतोय. काही वेळा तर मानसिक अस्वस्थतेमुळे वैद्यकीय आणीबाणीची स्थिती निर्माण झालेल्या व्यक्ती फोन करतात. एखादा सांगतो, की मी आत्ताच कीटकनाशक प्यायलो आहे किंवा मनगटाची शीर कापून घेतली आहे. अशा वेळी त्यांना शांत करून, त्यांचा पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक घेऊन आम्ही तिथे रुग्णवाहिका रवाना करतो आणि जमेल तितकी तातडीची मदत देतो.’’

अडचणीतील व्यक्तींनी या हेल्पलाइन्सवर फोन केल्यावर त्यांचं बोलणं शांतपणे, समंजसपणे ऐकून घेतलं जातं. त्यामुळे त्यांच्या भावनावेगाची तीव्रता कमी होते. क्षणिक भावनिक कल्लोळातून ती व्यक्ती बाहेर येते आणि पुढे स्वत:च आपल्या समस्येवर शांतचित्तानं विचार करू लागते. या हेल्पलाइन्सच्या माध्यमातून नेमकं हेच साध्य करायचं असतं, असंच या संस्थांशी बोलल्यावर जाणवतं.

या सगळ्याच हेल्पलाइन्स महत्त्वाचं काम करत आहेत. मात्र त्याच वेळी हेही सांगावंसं वाटतं, की मानसिक ताणतणाव यांचा वेळीच निचरा होणं गरजेचं असतं. अशा वेळी कु टुंबीयांची, मित्रमैत्रिणींची साथ लाभल्यास त्या व्यक्ती अधिक लवकर बाहेर पडतील आणि अशा हेल्पलाइनची गरजच मग कदाचित अशा व्यक्तींना लागणार नाही.

कनेक्टिंग हेल्पलाइन नंबर- ९९२२००११२२, ९९२२००४३०५ (दुपारी १२ ते सायंकाळी ८)

मनोदर्पण हेल्पलाइन नंबर- ८४४८४४०६३२ (टोल फ्री)

मनोदर्पण संके तस्थळ – http//manodarpan.mhrd.gov.in