पावसाने आपले आगमन जरा लांबवलेलेच दिसतेय. त्यामुळे अजूनही उन्हाचा ताप काही कमी झालेला नाही. त्यामुळे आपणही पावसाळ्याकडे वळलो नाहीये. आता थोडय़ा ‘लांबलेल्या उन्हाळ्यात’ थंडावा देणाऱ्या धणे आणि कोथिंबिरीविषयी जाणून घेऊ या. रोजच्या आहारात धणे आणि कोथिंबिरीचा मुबलक वापर करायला हवा.
उन्हाळ्यात उष्णतेपासून शरीराचे रक्षण करण्याचे आणि थंडावा देण्याचे काम धणे, पर्यायाने कोथिंबीर करीत असते. धणे रात्रभर पाण्यात भिजवून त्याचे पाणी प्यायल्याने मूत्रमार्गाच्या आणि मलबद्धतेच्या तक्रारी कमी होतात. लहान मुलांना हेच पाणी खडीसाखर घालून दिल्यास तेही आनंदाने प्यायला तयार होतात. कच्ची कोथिंबीर कोशिंबीर, भाज्या, सरबतांमधून घेतल्यास कॅल्शिअम, व्हिटामीन सी, ब जीनवसत्त्व मोठय़ा प्रमाणात शरीरात जाते. यामुळे हाडे मजबूत होतात. शिवाय उष्णतेमुळे तोंड येणे, पित्ताचे अल्सर यावर उपयोगी ठरते. मात्र उन्हाळ्यात सडण्याची, आंबण्याची प्रक्रिया जलद होत असते. त्यामुळे कोथिंबीर अथवा सर्व भाज्या धुऊनच वापराव्यात अन्यथा जिवाणूंची वाढ होऊन त्याचा त्रासच होऊ शकतो. त्यामुळे सगळेच पदार्थ ताजेच खावेत. धण्यांचाही वापर करताना त्यांचे वाळलेले देठ (काडय़ा) काढून वापरावे.
धण्यामुळे जेवल्यानंतर जास्त वेळ पोट जड राहण्याच्या तक्रारी दूर होतात. अपचन/ मंद पचनाच्या तक्रारी कमी होतात तसेच मंद पचनातून तयार होणारे गॅस लवकर बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे त्यातून होणारी पोटदुखीही कमी होते. यासाठी धणेपूडचा वापर भाजी, सुप, डाळींमध्ये नियमित करावा.
जंतुसंसर्गामुळे त्यातही कांजिण्यांमुळे त्वचा लाल होणे, पुरळ येणे यामध्ये कोथिंबिरीचा रस लावल्याने लालसरपणा कमी होतो. तसेच पुरळ बरे झाल्यानंतरचे काळसर डाग पण कमी होतात. मात्र येथेही ताजी आणि धुतलेल्या कोथिंबिरीचा वापर करावा.
डॉ. सारिका सातव,आहारतज्ञ
dr.sarikasatav@rediffmail.com