हरीश सदानी

लिंगभाव, त्याआधारे केला जाणारा भेदभाव आणि त्यामुळे अनेक व्यक्तींना सोसाव्या लागणाऱ्या हालअपेष्टा, याविषयी बोलणारा ‘समभाव’ हा दरवर्षी जवळपास ६ महिने चालणारा फिरता चित्रपट महोत्सव आहे. ‘समभाव’ यंदा चार महोत्सवांतून ९ हजार तरुणांपर्यंत पोहोचला आणि तो भारताबाहेरही आयोजित करण्यात आला होता. तरुणांना अधिक संख्येनं सामावून घेऊन त्यांच्यात जागृती निर्माण करू पाहाणाऱ्या या महोत्सवाबद्दल..

Bombay high court, verdict, Compensation, acid attack victims
अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!

‘‘सुमारे ७ वर्षांपूर्वी वाराणसी शहरात मी नुकतीच एका स्थानिक महाविद्यालयात प्राध्यापक पदावर रुजू झाले होते. राहाण्यासाठी भाडय़ाचं घर शोधत असताना मला, तुम्ही विवाहित आहात की अविवाहित? तुमची जात काय? यांसारख्या प्रश्नांना सामोरं जावं लागत होतं. आज ‘बॅचलर गर्ल्स’ हा माहितीपट बघताना त्या सर्व कटू आठवणी जाग्या झाल्या..’’

‘‘मी चंदीगढच्या मध्यमवर्गीय परिवारात वाढले. वडिलांनी मला पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी अनुक्रमे बंगळूरू आणि डेहराडून इथे पाठवलं त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. पण उच्च शिक्षणाच्या संधी देण्याबरोबरच हे शिक्षण घेताना महाविद्यालयात आणि इतरत्र वावरताना तू तुझ्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं अमुक गोष्टी करू नकोस, हेसुद्धा बाबांनी सांगितलं होतं. पण या ‘न करण्याच्या गोष्टी’ माझ्या भावाला कधी सांगितल्याचं मला आठवत नाही. इथले काही चित्रपट पाहून मी त्या स्त्री पात्रांशी ‘रीलेट’ करू शकले. माझ्या हिंडण्याफिरण्यावर पितृसत्तात्मक शक्ती कशा कार्यरत होत्या ते मी नीट समजू शकले..’’

‘‘पूर्वी ट्रेन वा ट्रॅफिक सिग्नलजवळ भीक मागताना पारिलगी स्त्रीला (ट्रान्सवूमन) पाहून मी घाबरायचो. भीक मागण्यासाठी पुढे आलेल्या त्या हाताचा स्पर्श मला किळसवाणा वाटायचा. पण माझ्या महाविद्यालयात एका ‘ट्रान्सवूमन’ विषयीचा चित्रपट बघितल्यानंतर आणि एका ट्रान्सवूमन कलाकाराशी प्रत्यक्ष झालेल्या संवादानंतर मला हे समजू लागलं, की त्यांचं आयुष्य किती खडतर असतं.. विकासाच्या अनेक संधी नाकारल्यानंतर दिवसा भीक मागणं किंवा रात्री शरीरविक्रय करण्याशिवाय त्यांच्यासारख्या असंख्य जणींना समाजानं पर्यायच ठेवलेला नाही, ते उमजू लागलं.’’

‘समभाव’ या मी संकल्पिलेल्या आणि कार्यान्वित केलेल्या वेगळय़ा चित्रपट महोत्सवात सहभागी झालेल्यांचे हे अनुभव. ‘मेन अगेन्स्ट व्हायोलन्स अँड अब्युज’ (मावा) या मी सहसंस्थापक असलेल्या, २९ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या संस्थेतर्फे ‘समभाव’ या फिरत्या चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात दोन दिवस सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत एखाद्या महाविद्यालयात, विद्यापीठात किंवा एखाद्या सामाजिक/ सांस्कृतिक संस्थेच्या सभागृहात लिंगभाव, लैंगिकता, नातेसंबंध आणि संबंधित बाबींवर देशविदेशांतले १३ ते १४ चित्रपट दाखवले जातात. साधारणत: २०० विद्यार्थी, प्राध्यापक, सामाजिक संस्थांतले वा इतर सामाजिक कार्यकर्ते त्यात सहभागी होतात. प्रत्येक चित्रपटाच्या सादरीकरणानंतर उपस्थित श्रोत्यांशी संवाद साधायला लिंगभावाच्या प्रश्नांवर कार्यरत मानवी हक्क कार्यकर्ते, प्राध्यापक, सिनेदिग्दर्शक यांना बोलवलं जातं. एका शहरात किंवा ग्रामीण भागात दोन दिवसांसाठी आयोजित केला जाणारा हा महोत्सव मग देशातल्या इतर शहरांत आणि जिल्ह्यांत भरवला जातो. हा फिरता महोत्सव ५ ते ६ महिने चालतो. ‘समभाव’चं प्रथम आयोजन २०१७ मध्ये झालं आणि नुकतंच चौथ्या वर्षीच्या समभाव महोत्सवाचं समापन करण्यात आलं. या ४ महोत्सवांद्वारे देशभरातली ३१ शहरं आणि १४ ग्रामीण जिल्ह्यांमध्ये पोहोचता आलं आणि देशातल्या ९ हजार तरुणांचा प्रत्यक्ष सहभाग मिळवण्यात आम्ही यशस्वी झालो.

१८ ते २५ वयोगटातले तरुण यात प्रामुख्यानं सहभागी होतात. लिंगभाव आणि त्यातून स्त्रियांबद्दल तसंच समिलगी-पारिलगी समाजाबद्दल (‘तृतीयपंथी’ हा शब्द समाजात जरी रूढ असला, तरी त्या शब्दात ‘वेगळी लैंगिकता असणारे तिसरे’ या मथितार्थामध्ये पुरुष प्रथमिलगी म्हणून वर्चस्व असणारे आणि इतर सर्व दुय्यम हे अनुस्यूत आहे. त्यामुळे ‘पारिलगी’ हा शब्द वापरणं योग्य ठरेल.) निर्माण होणाऱ्या दुजाभावाचं दर्शन घडवणारे सिनेउत्सव देशात नवीन नाहीत. पण तरीही ‘समभाव’ चित्रपट महोत्सव वेगळा आहे. तो अशासाठी, की लिंगभावाच्या विषयांवरचे चित्रपट महोत्सव हे साधारणपणे मुख्यत: स्त्रिया, लैंगिक अल्पसंख्याकांना घेऊन (मग ते श्रोते म्हणून असतील किंवा अशा विषयांवरच्या चित्रपटांचे निर्माते असतील.) आयोजित केलेले दिसतात. पण स्त्रिया आणि लैंगिक अल्पसंख्याकां- बरोबरच भिन्निलगी आकर्षण असणारे- ‘हेट्रोसेक्श्युअल’ बहुसंख्याक असलेल्या पुरुषांनाही लक्षणीयरीत्या सहभागी करून घेणारे महोत्सव दुर्मीळच आहेत. ‘समभाव’चं आयोजन लखनऊ, शिलाँग, कोईम्बतूर, त्रिसुर, इंदोर, भुवनेश्वर, डेहराडून, रांची अशा दुसऱ्या वा तिसऱ्या श्रेणीच्या शहरांमध्ये आणि भंडारा, पिंपरी, संगमनेर व गडचिरोली इथल्या ग्रामीण विभागांतही करण्यात आलं. सहसा कुठल्याही चित्रपट महोत्सवाला शुल्क असतं. ‘समभाव’ हा नि:शुल्क असलेला महोत्सव आहे. आपल्या देशात हिंदी वा आपल्या मातृभाषेशिवाय प्रादेशिक किंवा विदेशी चित्रपट (सबटायटल्ससह) व तेही सामाजिक प्रश्नांवर विचार करायला लावणारे, शुल्क देऊन पाहाणाऱ्या तरुणांची संख्या फार नाही. त्यामुळे ते पाहाण्यासाठी अधिकाधिक तरुणांनी यावं आणि ‘जेंडर’च्या चष्म्यातून पाहण्याची संस्कृती निर्माण व्हावी, असाही ‘समभाव’चा उद्देश आहे.

लिंगभावातून निर्माण होणारे भेदाभेद, स्त्रियांबाबत व लैंगिक अल्पसंख्याकांबाबत घडणारी हिंसा, यावरील देशविदेशांतले उत्कृष्ट लघुपट ते फीचर फिल्म्स या महोत्सवात सादर होतात. पुरुष, पुरुषत्व, विषारी ‘मर्दानगी’ यांविषयीचे ‘दि मास्क यू लिव्ह इन’ (अमेरिका), ‘बॉइज हू लाइक गर्ल्स’ (फिनलंड, नॉर्वे), ‘एली एली लमा सबाचतानी’, ‘ब्रोकन इमेज’, ‘मज्मा’ आणि विद्या बालन सहनिर्मित व अभिनित ‘नटखट’ हे चित्रपट या महोत्सवात चर्चिले गेले.

नुकत्याच संपलेल्या ‘समभाव’मध्ये भारतातील जेंडर किंवा लिंगभावाशी संबंधित मुद्दे आणि आपल्या शेजारच्या दक्षिण आशियाई राष्ट्रांतले मुद्दे यांत काही साम्य दिसून येतंय का, याचा विचार केला गेला. बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान, नेपाळ आणि इतर दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये स्त्रियांवर होणारे कौटुंबिक हिंसाचार व अ‍ॅसिड हल्ले यांसारखे इतर लिंगाधारित हिंसाचार, समिलगी-पारिलगी व्यक्तींच्या मानवी हक्कांची पायमल्ली, पुरुषप्रधानतेतून दिसणाऱ्या विखारी मर्दानगीचं स्वरूप, यांमध्ये काही समान धागे दिसतात. त्यामुळेच लिंगभावाशी संबंधित मुद्दय़ांवर असणारे भारतीय व विदेशी चित्रपट भारताबाहेर, दक्षिण आशियाई देशांतही दाखवले पाहिजेत असं मला वाटू लागलं. मागील वर्षी निधन झालेल्या ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्यां कमला भसीन यांनीही एकदा या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी असा मनोदय व्यक्त केला होता. कमलादीदींची ती मनीषा ‘समभाव’च्या चौथ्या आवृत्तीनं यंदा पूर्ण झाली. देशातली ८ शहरं व २ ग्रामीण जिल्ह्यांबरोबर काठमांडू, नेपाळ व ढाका, बांगलादेश इथे स्थानिक शिक्षण संस्था आणि कमला भसीन यांनी उभारलेल्या संगत- ‘साऊथ एशियन विमेन्स नेटवर्क’च्या धडाडीच्या कार्यकर्तीच्या सहभागात दिमाखदारपणे ‘समभाव’चं आयोजन झालं. लंडन इथे दक्षिण आशियाई हेरिटेज महिना- जुलै २०२२ मध्ये साजरा झाला, तिथेदेखील ‘समभाव’मधील चित्रपट दाखवले गेले.

 आतापर्यंत झालेल्या ‘समभाव’च्या उपक्रमांत अभिनेत्री कल्की कोचलिन, सोनाली कुलकर्णी, राजश्री देशपांडे, वीणा जामकर यांनी सहभाग घेऊन उपस्थित तरुणांशी संवाद साधला. इतिहासतज्ज्ञ उमा चक्रवर्ती, स्त्रीवादी कार्यकर्त्यां डॉ. मनीषा गुप्ते, शुभदा देशमुख, खुषी कबीर, ट्रान्स व्यक्तींच्या हक्कांसाठी लढणाऱ्या दिशा पिंकी शेख, गौरी सावंत, चित्रपट दिग्दर्शक हर्षवर्धन कुलकर्णी, उमेश कुलकर्णी, निशांत रॉय-बोम्बार्डे, रोहन कानवडे, पटकथालेखिका मनीषा कोरडे यांनी ‘समभाव’च्या माध्यमातून तरुणांशी सुसंवाद साधला आहे. लिंगसमभाव, लैंगिक विविधतेचा स्वीकार करण्याविषयीचा ठोस संदेश दिला आहे.

विदर्भात गडचिरोलीतील कुरखेडा या अतिदुर्गम, आदिवासीबहुल भागात ‘समभाव’चं आयोजन डिसेंबर २०२१ मध्ये झालं. ‘गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालया’चे प्राचार्य डॉ. राजू मुनघाटे यांनी विशेष प्रयत्न करून ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या सामाजिक संस्थेबरोबर आपल्या महाविद्यालयीन मुलामुलींकरिता ‘समभाव’ महोत्सवाचं आयोजन केलं. फक्त टीव्हीवर चित्रपट पाहाणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांनी क्वचितच थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघितला असेल. अशा विद्यार्थ्यांना लघुचित्रफिती बघताना प्रचंड उत्सुकता होती. महोत्सव सुरू झाल्यावर काही तासांतच महाविद्यालयाचं सभागृह पूर्ण भरून गेलं. सुरुवातीला थोडे लाजरेबुजरे दिसणारे हे विद्यार्थी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सहजसोप्या पद्धतीनं मुद्दय़ांवर बोलल्यानंतर मोकळेपणानं बोलू लागले. आदिवासी समुदायात, विशेषत: गडचिरोलीच्या गोंड समुदायात स्त्रियांना मासिक पाळी आली, की त्यांना कुर्माघरात ठेवलं जातं. एक झोपडीसारखी जागा- जी मुख्य घरापासून लांब आहे, ज्यात कुठल्याही मूलभूत सुविधा नाहीत, अशा ठिकाणी मासिक पाळीत त्यांना ५-६ दिवस राहावं लागतं. त्यांच्या आरोग्यासाठी आणि जीवनासाठी धोका वाढवणारी ही प्रथा आहे. त्याबद्दल, तसंच इतर संवेदनशील मुद्दय़ांवर मुलींनी लघुपट प्रदर्शनानंतर प्रश्न विचारायला सुरुवात केली. यातून आदिवासीबहुल मुलामुलींनाही एक वेगळी दिशा व सम्यक दृष्टी देण्याचं काम झालं, असं मला वाटतं.

संगमनेरमधील भाऊसाहेब सं. थोरात महाविद्यालयातले प्राध्यापक तुळशीराम जाधव यांनीही ‘समभाव’चं आयोजन ‘लोकपंचायत’ या स्थानिक सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमानं केलं. दोन दिवसांत विविध चित्रपटांवर टिप्पणी करण्याबरोबरच दिशा पिंकी शेख यांच्या ‘कुरूप’ या कवितासंग्रहावर आधारित नाटय़ाविष्काराचं सादरीकरणही या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. लेखक-नाटककार जमीर कांबळे यांच्या दिग्दर्शनाखाली झालेल्या या वैशिष्टय़पूर्ण नाटय़ाविष्काराला विद्यार्थ्यांबरोबरच स्थानिक लोकवस्तीतल्या स्त्रिया मोठय़ा संख्येनं उपस्थित होत्या. नलिनी उनवणे या लोकपंचायत संस्थेच्या कार्यकर्तीनं आपलं हृद्य मनोगत मांडलं, ‘‘छक्का म्हटलं की नाव घेणंसुद्धा अशुभ, असा समज होता. पण ‘समभाव’ महोत्सवातले चित्रपट आणि ‘कुरूप’ या नाटय़ाविष्कारानं माझ्या कुरूप असलेल्या विचारांना लाजवलं. खरंच माणूस म्हणून आपण वागतो का माणसासारखं? असा प्रश्न मनात आला.’’

 समभाव महोत्सवानं देशभरातल्या विशीतल्या असंख्य युवकांना लिंगभाव व संबंधित प्रश्नांवर संकोच न करता व्यक्त व्हायला सुरक्षित जागा दिली. या महोत्सवात मुली आत्मविश्वासानं अभिव्यक्त होत असताना मुलं पाहात होती. वेगळे, सकारात्मक, समानशील समाजाच्या दिशेकडे नेणारे विचार मुलगे मांडत असताना मुली ऐकत होत्या. वेगळी लैंगिक ओळख असलेले तरुणही आपले अनुभव, आपली असुरक्षितता व्यक्त करत होते. या महोत्सवाच्या आयोजनात विद्यार्थी संघटनांचा सहभागही उल्लेखनीय होता. महोत्सवाचं भित्तीचित्र नावीन्यपूर्ण पद्धतीनं तयार करून ते वेगवेगळय़ा मंचांवर प्रसिद्ध करणं, किमान १५० ते २०० सहाध्यायींना सहभागी करून घेणं, हे जसं त्यांनी केलं, तसंच आयोजनातला खर्च आणि आवश्यक ती सर्व सोयीसाधनं उपलब्ध करून देण्यात महाविद्यालयं, विद्यापीठं, सामाजिक संस्था यांनी खारीचा वाटा उचलला. पेण इथल्या ‘भाऊसाहेब नेने महाविद्यालया’नं, तसंच संगमनेरच्या ‘भाऊसाहेब थोरात महाविद्यालया’नं ‘समभाव’चं समापन झाल्यानंतर आपापल्या महाविद्यालयात नियमितपणे चित्रपट दाखवणारा क्लब सुरू करून नवा पायंडा पाडला, ही एक अनपेक्षित फलश्रुतीच.

एकंदर चित्रपटांसारख्या सशक्त माध्यमाद्वारे एक वैचारिक मंथन तरुणांमध्ये घडवून आणण्यास ‘समभाव’नं सुरुवात केली. आसामच्या तेजपूर विद्यापीठात शिकणारी निकिता बुरागोहाइ ही तरुणी म्हणते, ‘‘या महोत्सवानं ओळख, मानवी अस्तित्व व एकंदर मानवी जगणं याविषयी असणाऱ्या माझ्या समजेस विकसित करण्यात मोठा हातभार लावला. ‘मैदा’ हा लुबना युसूफ यांनी बनवलेला लघुपट मला आजही अस्वस्थ करतो. रंगानं गोरी असल्यामुळे ‘मैदा’ या नावानं हिणवलं गेलेल्या उजाला या ग्रामीण बिहारमधल्या १३ वर्षांच्या मुलीला मासिक पाळी आल्यानंतर शालेय शिक्षण अर्धवट सोडावं लागतं. सोळाव्या वर्षी तिचं मनाविरुद्ध लग्न केलं जातं. भोजपुरी गीत गाऊन स्वत:चं दु:ख अलगदपणे मांडणाऱ्या त्या मुलीचा उदासवाणा चेहरा मला सतत खुणावत राहतो.. मी पदवीपर्यंत शिक्षण घेऊ शकले असताना उजालासारख्या असंख्य मुलींच्या आकांक्षांचं काय होत असेल असा प्रश्न तो विचारत राहतो..’’

saharsh267@gmail.com