पल्लवी पाटील सांगवीकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘सप्तपदीनंतर..’ किती सार्थक नाव आहे या सदराचं! लग्नापूर्वीचे गोडगुलाबी, हळुवार, हवेत तरंगणारे दिवस सप्तपदीनंतर जेव्हा सत्यात उतरू लागतात, तेव्हा खऱ्या अर्थानं नव्या आयुष्याची, सहजीवनाची सुरुवात होते. आम्हा दोघांचं ‘अ‍ॅरेंज मॅरेज’. पारंपरिक कांदेपोहे पद्धतीनं झालेलं!

आम्ही दोघं स्वभावाच्या बाबतीत अगदी दोन टोकं. मला जितकं जास्त बोलायला आवडतं, तितका तो कमी बोलणारा. मी जितकी उतावळी, तो तितका संयमी. मी जेवढी फटकळ, रागीट, तेवढाच तो शांत, समंजस.. अगदी दोन विरुद्ध स्वभावाची माणसं एका बंधनात बांधल्यामुळे एकत्र येतात आणि एवढी एकमेकांत गुंतून जातात, की आपल्याही नकळत आपण समोरच्यातले काही गुण उचलतो. एखाद्या प्रसंगी जेव्हा तो चिडतो आणि मी त्याचा राग त्याच्याच शैलीत शांतपणे हाताळते, त्यावेळी वाटतं, कुठून आला एवढा संयम माझ्यात? मी याच्यासारखी होत चालली आहे का? आणि तोही बऱ्याचदा जेव्हा एखादी गोष्ट माझ्यासारखी करून जातो तेव्हा मला म्हणतो, ‘तुझा वाण नाही, पण गुण लागला!’  मागच्या दहा वर्षांत सुखदु:खांच्या अनेक लाटा पचवताना एकमेकांचा हात हातात धरून या संसाररूपी वाळूत कधी ठामपणे उभे राहिलो हे आम्हालाच कळलं नाही! आणि या किनाऱ्यावर गवसलेल्या मोत्यांसारखी आमची दोन्ही लेकरं- मर्मबंधा आणि वितहार्य तर आमच्या सहजीवनाचा आनंद पदोपदी द्विगुणित करतात.

 आम्ही दोघंही ‘आयटी’ क्षेत्रातले असल्यामुळे नोकरीच्या निमित्तानं आम्हाला वेगवेगळय़ा देशांमध्ये फिरण्याची संधी मिळाली. फिनलँड, इंग्लंड, स्कॉटलँड, चीन असे वेगवेगळे देश फिरताना, तिथे राहाताना मजा तर केलीच, पण तिथे येणाऱ्या अडचणींवरही एकमेकांना साथ देऊन मात केली. बऱ्याचदा आपल्याला वाटतं, की अमुक एक जण परदेशामध्ये राहातात म्हणजे किती छान आयुष्य आहे यांचं! पण तिथलाही ‘स्ट्रगल’ पूर्णपणे वेगळा असतो. तिथे कोणत्याही कामासाठी मदतनीस मिळत नाही. मिळाले तरी ते फारच खर्चिक असतं. त्यामुळे केरवारे, लादी पुसणं, भांडी घासणं, ही कामं आपल्यालाच करावी लागतात. भाषेची समस्या असेल तर वेळेला ‘ट्रान्सलेटर’ वापरून समोरच्याला सांगावं लागतं. प्रसंगी भारतीय शाकाहार करण्यासाठी २-२ तासांचा प्रवास करावा लागतो. पासपोर्ट, व्हिसा, त्याची कागदपत्र नोंदणी बऱ्याचदा थकवून सोडते.

 आम्ही दोघं चीनमध्ये नोकरी करत होतो तेव्हा घरकामं वाटलेली असायची. हे घरातलं, बायकांचं काम आहे आणि ‘हे तू कर, मी करणार नाही’ असं म्हणणारा नवरा- ओंकार मला कधीच आठवत नाही. तो घरातही बरोबरीनं मदत करू लागतो. मग ते घर आवरणं असो, मुलांना सांभाळणं असो, त्यांना खाऊ घालणं असो किंवा रात्री जागून त्यांना सांभाळणं. प्रत्येक गोष्टीत त्याचा सहभाग असतो. आणि त्याबरोबर मीही जेव्हा बाहेरची सगळी काम करते त्या वेळी त्यालासुद्धा माझं कौतुक असतं. आताही भारतात एक वर्षांचं बाळ आणि घर सांभाळून नोकरी करण्याची हिंमत मी फक्त त्याच्या जीवावर करू शकते. लेकीला जपणाऱ्या, मदत करणाऱ्या जावयाचं माझ्या आईला भारी कौतुक! तिच्या शब्दात तर तिचा जावई अगदी हिरा आहे आणि ‘या हिऱ्यापुढे तुझी मुलगी जणू गारगोटीच आहे असं तुला वाटतं’ असं मी नेहमी तिला गमतीत म्हणत असते.

आमच्यात भांडणंही भरपूर होतात. खासकरून मुलांच्या बाबतीत. ओंकारला मुलांवर आवाज चढवलेला, त्यांच्यावर हात उचललेला अजिबात आवडत नाही आणि मी प्रत्येक वेळेला परिस्थिती शांतपणे हाताळू शकत नाही. त्यामुळे बऱ्याचदा आमच्यात वादाची ठिणगी पडते. मात्र एक जण चिडला की दुसऱ्यानं शांत बसायचं, हा आमच्यातला अलिखित नियम आहे. त्यामुळे आमची भांडणं कधीही घराबाहेर जात नाहीत. नातेवाईकांच्या, मित्रमैत्रिणींच्या वागण्यालाही आम्ही आमच्या भांडणाचं कारण बनवणं कटाक्षानं टाळतो. समोरच्यानं कसं बोलावं, वागावं यावर आपला ताबा नाही, हे समजून घेतो. एकमेकांना त्रासदायक वाटणाऱ्या सवयींमुळे बऱ्याचदा आमच्यात वादाला तोंड फुटतं. ‘दोन मिनिटांत आलो’ असं सांगून दोन तास घेणारा, कोणालाही ‘नाही’ न म्हणणारा ओंकार आणि बऱ्याच वेळा वेळ पाळली नाही, कपाटात कपडे, कागदपत्रं नीट ठेवली नाहीत यावरून चिडचिड आणि (त्याच्या भाषेत) त्याचा अतिरेक करणारी मी, अशा कारणांमुळे आठवडय़ातून एखाद्या वेळी तरी आमच्या सांगवीकर राज्यात धुमश्चक्री होतेच! अशा वेळी आमचं कन्यारत्न मध्यस्थी करून वाद मिटवायला मदत करतं.

२०१७-१८ ही वर्ष आमच्यासाठी अतिशय दु:खद होती. माझे वडील आणि त्याचे वडील दोघंही नऊ महिन्यांच्या अंतरानं वारले आणि त्या दोन्ही वेळी चीनमधून भारतात येणं हे जणू आमच्यासाठी अक्षरश: शिवधनुष्य उचलणं होतं. माझे वडील वारले तेव्हा आम्ही तीन दिवस चीनमध्ये अडकलो होतो. आमचा पासपोर्ट ‘व्हिसा एक्स्टेन्शन’साठी गेल्यामुळे काहीच करता येत नव्हतं आणि इकडे वडील अतिदक्षता विभागात. त्या वेळी मला समजावणारा, सावरणारा, माझ्या पाठीशी उभा राहाणारा ओंकार, माझ्या दुसऱ्या बाळंतपणाच्या वेळेस टाळेबंदी असल्यामुळे आणि इतर कुणीही रुग्णालयात सोबत  नसल्यामुळे पूर्ण वेळ बाळाला सांभाळणारा ओंकार माझ्यासाठी ग्रेटच आहे!

 मी नेहमी ओरडत असते, की ‘‘तुझी पोरं आगाऊ झाली आहेत. नऊ महिने यांना पोटात वाढवा, ‘सीझर’चे टाके सहन करा, बेड रेस्ट, उलटय़ा, एवढं सगळं सहन करून मुलांचा पहिला शब्द काय, तर ‘बाबा’!’’ तो हसत म्हणतो, ‘‘माझी लेकरं त्यांच्या आईवरच गेली आहेत! आईआधी त्यांना बाबाच लागतो. त्यांच्या आईसारखा!’’

pallavis311@outlook.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saptapadi life arrange marriage traditional methodically ysh
First published on: 06-08-2022 at 00:11 IST