हेमा होनवाड
‘मी माझं’च्या पलीकडे जाऊन विचार आणि आचरण करणारी माणसं मनानं खऱ्या अर्थानं व्यापक असतात. अनेक शतकांपासून भारताच्या मातीत हा विचार रुजवण्याचे प्रयत्न अनेक द्रष्ट्या विचारवंतांनी आणि संतांनी केले आहेत. पण ते प्रत्यक्ष आचरणात आणणारी माणसं मोजकीच असतात. शाळेत भेटलेला केशवसुतांचा ‘नवा शिपाई’ आजही ‘जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत…,’ म्हणत अनेकदा वेगवगेळ्या रूपांत भेटत राहतो. भारताच्या पूर्वेकडे, पश्चिम बंगालमध्ये ब्रजबल्लवपूर या छोट्याशा गावातील मुलांसाठी अद्यायावत शाळा सुरू करणारे शुभ्रो दास त्यातलेच एक.

सत्यजीत राय यांच्या बंगाली चित्रपटात असावं असं छोटंसं गाव. वळणावळणाची नागमोडी वाट, दोन्ही बाजूंना छोटी छोटी बैठी घरं, प्रत्येक दहा-वीस पावलांवर पुकुर(तळं) आणि त्यात मासेपालनाचा उद्याोग. हिरवागार मोहवणारा परिसर; पण नको-नकोसा, मुंबईलाही मागे टाकणारा कमालीचा उकाडा! कोलकाताला उतरून पुढे पाच तासांचा निसर्गरम्य प्रवास संपत आला की टुमदार आणि प्रसन्न पिवळ्या रंगाची शाळेची इमारत लांबूनच दिसते. प्रवेश केल्यावर संस्कृती आणि कलेची जपणूक करण्याचा प्रयत्न ठळकपणे दिसतो. मुला-मुलींच्या चेहऱ्यावर आनंद आहे. कसलंही दडपण नाही. शिक्षिका आणि मुलांच्या अतिशय सुरेल रवींद्र संगीताचा सराव कानांना सुखवतो. या सगळ्या धडपडीमागे गावातील मुलांसाठी पूल बांधण्याचा अट्टहास करणारा एक शुभ्रो नावाचा अवलिया आहे. (खोल खाई पार करून गेलेला वृद्ध त्या रस्त्यानं मागून येणाऱ्या तरुणांच्या सोयीसाठी त्या जागेवर पूल बांधतो या अर्थाची, ‘Bridge Builder’ ही कविता Will Allen Dromgoole या कवीनं लिहिली आहे.) तसेच हे शुभ्रो. आपल्या जगण्याला वेगळा अर्थ देऊन सेतू बांधणारे शुभ्रो दास ‘द फाउंडेशन अकॅडमी’ या शाळेमध्ये शिक्षकांच्या शिबिरासाठी आम्हाला स्वत: घेऊन जात होते. ही शाळा म्हणजे सत्यात उतरवलेलं त्यांचं स्वप्न!

चारचौघांसारखा ‘आपण बरे आपली बायको-मुलं बरी, काम करून पैसे कमवावे आणि त्यांना सुखात ठेवावं’ हा धोपट मार्ग सोडून आपल्या मूळ गावी जाऊन अनंत अडथळे पार करत त्यांनी ही शाळा २०१८ मध्ये जिद्दीनं सुरू केली. ‘एनआयटी’ जमशेदपूर येथे मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर ते काही काळ जमशेदपूरच्या ‘परमाणु ऊर्जा केंद्रा’मध्ये ( BARC), नंतर ‘जनरल इलेक्ट्रिक्स’मध्ये ( GE) आणि सध्या ‘बेकर ह्यूजेस’मध्ये डिझाइन आणि संशोधन क्षेत्रात गेली २८ वर्षं योगदान देत आहेत. त्यांच्या संघर्षमय जीवनात त्यांची मुलांसाठी पूल बांधण्याची प्रेरणा सदैव टिकून राहिली. लहानपणी परिस्थितीमुळे जे चटके स्वत: सोसले ते नंतरच्या पिढीतल्या कोवळ्या जीवांना बसू नयेत ही इच्छा मनात घर करून बसली होती.

शुभ्रो यांचा जन्म पश्चिम बंगाल बराउदयपूर या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील लहानशा गावात झाला. वयाला चार वर्षं झाली तेव्हा त्यांचं कुटुंब या गावी राहायला आलं. शाळेमधील अत्यंत ‘वाह्यात वल्ली’ अशी शुभ्रोची ख्याती होती. शिक्षकांनी त्याच्या पुढे हात टेकले. आईला आणि भावंडांना घरीही त्याचा खूप त्रास व्हायचा. अभ्यास करण्याची त्याची अजिबात इच्छा नसायची. त्यातच अभ्यासू मुलांना जास्तच त्रास द्यायचा शुभ्रो! आठवीपर्यंत हे चिरंजीव निदान एक /दोन विषयांत हमखास गटांगळी खायचे. ५० टक्क्यांच्या वर त्याची गाडी कधी गेलीच नाही. आठवीत नापास झाला तरी कसंबसं नववीत ढकललं शाळेनं. कायमच मागच्या बाकावर बसून टिवल्याबावल्या करणाऱ्या मुलांचा मात्र हा अगदी लाडका म्होरक्या!

अशा जवळजवळ ५० मुलांशी त्याची जानी दोस्ती होती. त्यांच्यातली २५ मुलं आठवीसुद्धा पास होऊ शकली नाहीत. ही पाच भावंडं राहात असलेल्या दोन बेडरूमच्या घरात शिक्षणासाठी गावाहून वडिलांची तीन भावंडं राहायला आली होती. ती सगळी आवडीनं अभ्यास करून यशस्वी व्हायची. शेवटी कंटाळून कानफाट्या शुभ्रोनं स्वत:च ठरवलं की दूर मामाच्या गावी जाऊन शिकायचं. त्याच्या मामानं वडिलांच्या जागी सही करून शुभ्रोची जबाबदारी घेतली. प्रगती पुस्तकावर अत्यंत कमी गुण दिसत असूनही मुख्याध्यापकांनी दया दाखवून प्रवेश दिला. आजोबांच्या काळात त्यांचं कुटुंब श्रीमंत होतं, परंतु वडील दारूच्या आहारी गेले आणि शुभ्रो चौथीत गेला तोपर्यंत त्यांचं दिवाळं वाजलं. घरातलं वातावरण बदलत गेलं, भांडाभांडी नेहमीची झाली. जगण्याच्या धडपडीत घरातील अशांती वाढत गेली. शुभ्रोची चित्रकला आणि तबल्याची आवड मारली गेली. वडील व्यसनाधीन आणि आई कायम मुलांच्या पानात काय वाढायचं या विवंचनेत असायची.

शुभ्रोचे दोन मोठे भाऊ वर्गात पहिले येत असत. एक इलेक्ट्रिकल इंजिनीअर झाला आणि त्यांनं १९९३ पासून धाकट्या भावंडांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. त्यांचे दुसरे मामाही स्वत: उच्च शिक्षण घेऊन परदेशी राहून मदत करायचे. शास्त्र आणि गणित शुभ्रोला आवडायचं. त्यामध्ये तो बरे गुण मिळवायचा. पण बाकीच्या विषयांशी रात्रंदिन युद्धाचा प्रसंग होताच. पण अचानक नववीच्या वर्षात एका शिक्षकाला काय वाटलं कोणास ठाऊक! त्यांनी शुभ्रोला त्यांच्या घरी शिकवणीला बोलावलं. तिथेही याचा दंगा चालूच राहिला. काही मुलांनी याच्या त्रासाला कंटाळून शिकवणी बंद केली. तरीही ते मुलांना सांगायचे, ‘‘एक दिवस शुभ्रो तुमचा मित्र आहे याचा तुम्हाला अभिमान वाटेल.’’ या वाक्याचा किशोरवयात शुभ्रोवर खोलवर परिणाम झाला आणि त्यानं पहाटे चारला उठून अभ्यास करायला सुरुवात केली. वर्गात त्यानं ६९व्या क्रमांकावरून ९व्या क्रमांकावर उडी मारली.

दहावीला शास्त्र-गणित विषयात ९० टक्के आणि बाकीच्या विषयात ५० टक्के मिळवून चिरंजीव उत्तीर्ण झाले. कनिष्ठ महाविद्यालयात असतानाही चार वेळा महाविद्यालयामधून काढून टाकण्याची धमकी मिळवली होतीच. पण कसं तरी करून शिक्षण चालू राहिलं. इथेही एका शिक्षकाच्या लक्षात आलं की ही वल्ली काही वेगळीच आहे. त्यांनी विचारपूर्वक त्याच्यावर मुलांच्या निवासस्थानाची जबाबदारी सोपवली आणि तीच त्याच्या परिवर्तनाची किल्ली ठरली. शुभ्रोनं रात्रीचा दिवस करून मनापासून अभ्यास करायला सुरुवात केली.

परिणामी, प्रवेश परीक्षेत सहज उत्तीर्ण होऊऩ इंजिनीअरिंगला प्रवेश मिळाला. त्यामुळे अर्थात ‘ग’ची बाधा झाली. पण ती उतरायला वेळ लागला नाही. जमशेदपूरच्या महाविद्यालयामध्ये जायला लागल्यावर लक्षात आलं की, आपल्यापेक्षा उत्तम गुण मिळवणारे अनेक जण आपल्या वर्गात आहेत. बंगाली माध्यमाच्या शाळेतून आल्यामुळे शुभ्रोला इंग्लिश पुस्तकातील सिद्धांत समजणं नुसतं अवघडच नाही, तर अशक्य होऊन बसलं. पण शुभ्रो भाग्यवान खरा! महाविद्यालयाच्या दुसऱ्या वर्षी ऐन मोक्याच्या वेळी शुभ्रा ही विद्यार्थिनी शुभ्रोला भेटली आणि तिच्या मदतीनं भाषेच्या अडथळ्यावर मात करून पुन्हा एकदा अभ्यास करायला शुभ्रोला प्रेरणा मिळाली. त्यानंतरचा आलेख चढता आहे.

‘गेट’(GATE) परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन पदव्युत्तर शिक्षण आणि ‘बीएआरसी’सारख्या संस्थेमध्ये कामाची संधी मिळाली आणि शुभ्रोनं त्याचं सोनं केलं. जीवनात प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत यशाच्या दिशेनं केलेली एका सर्वसामान्य माणसाची ही वाटचाल आहे आणि हजारो स्त्री-पुरुष याहीपेक्षा अवघड परिस्थितीला तोंड देत यशस्वी झालेले आपल्या आजूबाजूला दिसतात; मग या गोष्टीत विशेष काय? यश मिळवल्यानंतर शुभ्रोनं पुन्हा जाणीवपूर्वक जे वळण जीवनात घेतलं त्यामुळे या गोष्टीला वेगळा अर्थ मिळतो.

मुलांमधील सुप्त गुण फुलण्यासाठी योग्य वातावरण निर्माण करण्याऐवजी बहुसंख्य शाळा एका चौकटीत मुलांना बसवण्याचा आटापिटा करतात आणि त्या मुलातील स्वतंत्र विचाराचं स्फुल्लिंग विझवून टाकतात. ऑगस्ट १९९७ मध्ये ज्या दिवशी शुभ्रोच्या हातात त्याचा पहिला पगार पडला तेव्हापासून शुभ्रोनं एका वंचित विद्यार्थ्याच्या शिक्षणाची जबाबदारी उचलायला सुरुवात केली. सिंहावलोकन करताना या शुभ्रो नावाच्या शिल्पकाराला काही गोष्टींचं महत्त्व प्रकर्षानं जाणवलं होतं. त्याच्या ‘वेगळे’पणामुळे त्याला कशा प्रकारे पाठिंबा द्यायला हवा हे आईला समजणं अवघड होतं. पण वेळोवेळी पाठीवर हात ठेवून लढ म्हणून सांगणाऱ्या शिक्षकांनी पालकत्वातील ही कमतरता भरून काढली.

शुभ्रोसारख्या मुलामधील स्वयंप्रेरणा ओळखणारी माणसं त्याला भेटली. इतकंच काय ज्या मैत्रिणीनं महाविद्यालयामध्ये मदत केली तीच आता शुभ्रोची सहधर्मचारिणी आहे. स्वत:ला अनेक रूपांनी मिळालेल्या मदतीबद्दल मनोमन ऋणी असलेल्या शुभ्रोनं शहरापासून दूर असलेल्या त्यांच्या छोट्याशा गावातील शेकडो मुलांना संधी देण्याच्या तळमळीतून ‘द फाउंडेशन अकॅडमीची’ स्थापना त्यांनी केली. या कामात शुभ्राची खंबीर साथ आहे. विद्यार्थ्यांना जीवनाभिमुख शिक्षण मिळावं यासाठी त्यांची सगळी धडपड आहे.

अत्यंत वास्तववादी आणि त्याच वेळी हृदयाची व्यापकता वाढवणारे उपक्रम त्यांच्या शाळेत आयोजले जातात. मुलामधील आनुवंशिक गुण, संगोपन आणि सुयोग्य भवताल (नेचर, नर्चर आणि नेबरहूड) मुलामुलींना मिळावा यासाठी प्रेम-जिव्हाळ्यानं परिपूर्ण परिसराची निर्मिती ही जबाबदारी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं शुभ्रो निभावतात. मूल कितीही वाह्यात वागत असलं तरी योग्य संगोपनामुळे ते कुठं पोहोचू शकतं याचं चालतं-बोलतं उदाहरण म्हणजे त्यांची स्वत:ची जीवनगाथा!

सुप्तावस्थेतील जे उत्कृष्ट ते फुलवायला त्यांचे स्वत:चे पालक असमर्थ ठरले, तरीही वेळोवेळी असे अनेक हात पुढे आले ज्यांनी पालकत्वाची उणीव भरून काढली. झाडाचं मूळ जसं खडक फोडत अंधारात पाण्याच्या शोधात खोल खोल प्रवास करतं, तसा माणूसही कायम ‘जिव्हाळा’ आणि ‘आपली दखल घेणाऱ्या’ माणसांच्या शोधात असतो. शुभ्रो म्हणतात, ‘‘थोड्या आर्थिक मदतीनं आणि प्रेमानं जीवन बदलू शकतं हे मी जीवनात स्वत: अनुभवलं. आपल्या देशात अजूनही वंचितांची संख्या मोठी आहे. त्यामुळे ऑगस्ट १९९७ मध्ये मिळालेल्या पहिल्या पगारापासून मी शक्य तितक्या वंचित मुलांना शिक्षण मिळवून देण्यासाठी हातभार लावला. मी उपेक्षित मुलांना लहान वयापासून साहाय्य करून सुशिक्षित होण्यासाठी प्रेरित करतो आणि याचा लाभ असंख्य मुलांना झाला आहे.’’ आणि ते आपल्याला त्यांच्या उभ्या असलेल्या शाळेच्या मूर्तरूपात दिसत असतं.

hemahonwad@gmail.com