प्रसाद शिरगावकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘मी जॉब करायला सुरुवात करू का पुन्हा?’’ अल्पनानं मला विचारलं. आमचा मुलगा शौनक तेव्हा जेमतेम सहा महिन्यांचा होता. मूल तीन-चार वर्षांचं होईपर्यंत आईनं पूर्ण वेळ मुलालाच द्यावा, त्यासाठी स्वत:चं करियर बाजूला ठेवून घरी थांबावं, अशी एक सर्वसाधारण समजूत आणि प्रचंड दबाव टाकणारी अपेक्षा आपल्या समाजात तेव्हा होती. त्यात जर नवऱ्याची नोकरी व्यवस्थित सुरू असेल, घर चालवण्यासाठी पैसे कमावण्याची फार गरज नसेल, तर आईनं पूर्णवेळ बालसंगोपन करावं आणि वडिलांनी बाहेर जाऊन पैसे कमावून आणावेत, या आपल्याकडच्या पारंपरिक, समाजमान्य भूमिका आहेत! या कल्पनांना छेद देऊन शौनक सहा महिन्यांचा असतानाच अल्पनाला पुन्हा आपलं करियर सुरू करावंसं वाटत होतं.

  ती भारतातली ‘सी.ए.’ आणि अमेरिकेतली ‘सी.पी.ए.’ अशी दुहेरी उच्चशिक्षित आहे. शिवाय आम्ही लंडनला असताना तिथे तिच्या क्षेत्रात चांगली नोकरीही करत होती. तिच्या गर्भारपणात आम्ही भारतात परत यायचं ठरवलं, म्हणून तिनं लंडनमधली नोकरी सोडून करियरमध्ये ‘ब्रेक’ घेतला होता. शौनकच्या जन्मानंतर आम्ही भारतातच राहायचं ठरवलं आणि तिला भारतात पुन्हा करियर सुरू करावंसं वाटायला लागलं. ‘तू कर सुरू जॉब, आपण करू मॅनेज,’ असं मी तिला सांगितलं आणि तिनं नोकरी शोधलीही. तिच्या तेव्हाच्या पहिल्या नोकरीत तिला कंपनीची बस सकाळी लवकर पकडायला लागायची. माझ्या तेव्हाच्या कामाच्या वेळा बऱ्यापैकी लवचीक होत्या. मला उशिरा ऑफिसला गेलेलं चालायचं. तिच्या वेळेनुसार आवरून शौनकला बेबी-टोपलीत ठेवून आम्ही दोघं तिला बसपर्यंत सोडायला जायचो. त्याला सांभाळायला एक मावशी ठेवल्या आम्ही. शिवाय माझे आणि तिचे आई-वडील एकेक दिवस आमच्याकडे येऊन थांबायचे दिवसभर. सांभाळणाऱ्या मावशी किंवा आमचे आई-वडील असं कोणी घरी आलं, की मी ऑफिसला जायचो. असं साधारणपणे वर्षभर केल्यावर आम्ही आमच्या नव्या घरी राहायला आलो. दोघांच्याही आईवडिलांना तिथे येणं लांब पडायला लागलं. मग आम्ही शौनकला पाळणाघरात ठेवायचं ठरवलं. आमच्या सुदैवानं अत्यंत चांगलं, दक्षिण भारतीय कुटुंब चालवत असलेलं पाळणाघर आमच्या घराजवळ मिळालं. तरीही तिथे तो रुळेपर्यंतचे पहिले एक-दोन महिने आम्हा बापलेकांसाठी रोजचा ‘युद्धाचा प्रसंग’ असायचा. त्याला अजिबात जायचं नसायचं आणि त्याला तिथे सोडल्याशिवाय मला ऑफिसला जाता यायचं नाही. रोज तो पाळणाघरात न जाण्याच्या नव्या नव्या ट्रिक्स शोधून काढायचा! रोज त्याची मनधरणी करायला लागायची. बाप म्हणून (आणि आई म्हणूनही) माझं अफाट शिक्षण या काळात घडलं.

याच काळातली दुसरी गंमत म्हणजे मला स्वयंपाकघर सांभाळण्याचं कामही जमायला लागलं! अल्पनाला अत्यंत उत्कृष्ट स्वयंपाक करता येत असूनही कामाच्या वेळांमुळे तिला सकाळचा स्वयंपाक करायला जमायचं नाही. संध्याकाळी प्रचंड थकून घरी आल्यानंतर तिनं पुन्हा स्वयंपाक करावा असं मला वाटायचं नाही. मग आम्ही स्वयंपाकासाठी एक मावशी ठेवल्या. त्यांना सूचना देण्यापासून ते काय हवं नको ते सगळं आणून देण्यापर्यंतची जबाबदारी मी घेतली. अजूनही ती जबाबदारी माझ्यावरच असते. कामानिमित्त अल्पनाला परदेशात जावं लागायचं. शौनक अगदी दीड-दोन वर्षांचा असल्यापासून तिचे दौरे सुरू झाले. दर दोन-चार महिन्यांतून एकदा आठवडा-दोन आठवडय़ांसाठी ती इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया अशी कुठे तरी जाऊन यायची. तेव्हाही तिचा पाय निघायचा नाही घरातून; पण तेव्हाही, ‘तू जा गं, मी करतो मॅनेज,’ असं मी म्हणायचो आणि करायचो मॅनेज; करत आलोय आजवर. हे सगळं सांगण्यामागे माझा  मोठेपणा मला सांगायचा नाहीये. किंबहुना काहीही मोठं आणि जगावेगळं मी केलंय असं मला खरोखरच वाटत नाही. आपलं घर, आपला संसार, आपलं मूल आपल्याला सांभाळता आलंच पाहिजे, पुरुषांनाही ते जमलं पाहिजे, असं मला वाटत आलं आहे आणि ते मी करत गेलो. खरं तर प्रत्येक पुरुषानं ते करायला हवं असं मला प्रामाणिकपणे वाटतं.

या सर्व काळात माझ्या करियरमध्ये असंख्य वळणं येत होती आणि चढउतारही सुरू होते. भारतात आम्ही परत आलो तेव्हा एका ब्रिटिश कंपनीची भारतीय शाखा मी सांभाळत होतो. ते करत असताना मला स्वत:चा व्यवसाय सुरू करायची अत्यंत तीव्र इच्छा झाली. अल्पनाशी चर्चा करून मी माझी नोकरी सोडली आणि स्वत:ची छोटी कंपनी सुरू केली. पाचेक वर्ष स्वत:ची कंपनी चालवत होतो. घराच्या एका खोलीत एका लॅपटॉपवरून सुरू केलेली कंपनी पुढे वीसेक जणांची टीम होईपर्यंत मोठी झाली. अनेक परदेशी क्लायंट्स आणि मोठे प्रोजेक्ट्स मिळायला लागले. अर्थात यामध्ये बहुसंख्य छोटय़ा व्यवसायांसमोर असतं तसं

‘कॅश फ्लो’ मॅनेज करण्याचं मोठं आव्हान माझ्या व्यवसायासमोर येत गेलं. व्यवसाय वाढतो आहे, पैसे येत आहेत; पण आलेले पैसे पुन्हा व्यवसायातच टाकावे लागत आहेत, असं घडत गेलं. यामुळे मी घरात पैसे देऊ शकणं जवळपास बंद झालं. घराचे हप्ते भरणं पुढेमागे होऊ लागलं. पुढे माझ्या व्यवसायात काही दुर्दैवी आर्थिक फटके बसले आणि व्यवसायाचीही देणी देणं अवघड बनलं. या वेळी अल्पना भक्कमपणे पाय रोवून उभी राहिली. काही काळासाठी घराची संपूर्ण आर्थिक जबाबदारी तर तिनं उचललीच, शिवाय तिची अंगभूत आर्थिक शिस्त आणि व्यावसायिक ज्ञान वापरून माझी व्यावसायिक देणीही मी व्यवस्थितपणे देऊ शकेन अशी व्यवस्था मला करून दिली. खूप अवघड काळ होता तो; पण तिची नोकरी आणि तिनं लावलेली आर्थिक शिस्त यामुळे आम्ही तरून गेलो.

स्वत:च्या व्यवसायातून बाहेर पडून मी एका अमेरिकी कंपनीसाठी ‘कॉर्पोरेट ट्रेनिंग’ क्षेत्रात काम करायला लागलो. या कामासाठी माझा आधी देशभर आणि पुढे जगभर प्रवास सुरू झाला. दर दोन-चार महिन्यांनी मी घराबाहेर प्रवासासाठी जायला लागलो. ‘तू जा बिनधास्त, मी करते घर मॅनेज,’ असं म्हणायची आता अल्पनाची वेळ होती! एव्हाना ती तिच्या करियरमध्ये टॉप मॅनेजमेंटमध्ये पोहोचली होती. मी प्रवासाला गेलो की तिचं प्रचंड ताणाचं आणि प्रचंड वेळ घेणारं काम सांभाळत घर आणि शौनकची शाळा, अभ्यास सांभाळणं ती करायला लागली. आज मी अमेरिकी कंपनीचा ग्लोबल प्रोग्रॅम मॅनेज करतो आणि ती तिच्या कंपनीच्या ‘सीनियर लीडरशिप’मध्ये तीन देशांतल्या पाच-सहाशे लोकांची टीम सांभाळते आहे!

‘एकमेकांच्या हातात हात असला पाहिजे, पण पायात पाय येऊ द्यायचा नाही,’ हे एक साधंसोपं सूत्र आम्ही दोघं पाळत आलो आहोत. घर दोघांचं आहे, दोघांनी मिळून सांभाळायचं आहे. संसार दोघांचा आहे, दोघांनी मिळून फुलवायचा आहे, यावर आमची दोघांचीही ठाम श्रद्धा आहे. घर सांभाळण्यातलं आणि संसार फुलवण्यातलं कोणतंच काम, कोणतीच भूमिका ही ‘स्त्री’चीच किंवा ‘पुरुषा’ची एकटय़ाचीच नाही, असं आम्हाला वाटतं. एकमेकांच्या करियरमध्येही ठामपणे एकमेकांसोबत उभं राहावं असं आम्हाला वाटत आलं आहे. असं उभं राहाणं म्हणजे खरं तर आपले डोळे आणि कान उघडे ठेवणं एवढंच करावं लागतं. आपला जोडीदार ‘ऑफिसच्या टेन्शन’मध्ये आहे का, हे लक्षात यायला हवं आणि तसं लक्षात आलं तर त्याला/ तिला समोर बसवून ताण हलका अन् मन मोकळं करण्यासाठी भरभरून बोलू देता यायला हवं.

करियर, संसार वगैरे सगळं करताना भरभरून जगणंही विसरायचं नसतं! दर आठवडा सुट्टीला एकत्र नाटकं-सिनेमे बघणं, छोटय़ा-मोठय़ा सहली ठरवून भरपूर भटकंती करणं, मित्रमैत्रिणींना गोळा करून गप्पांच्या मैफली रंगवण्यापासून ते एकमेकांसोबत कवितांचे आणि अभिवाचनाचे कार्यक्रम करणं, असे अनंत उद्योग आम्ही एकत्रपणे करत आलो आहोत. सहजीवन म्हणजे फक्त करार, व्यवहार, करियर्स वगैरे नसून एकत्र येऊन सजवलेली आणि उत्तरोत्तर रंगत जाणारी मैफल असावी असं आम्हाला वाटतं. अशी मैफल एकमेकांच्या साथीनं रंगवण्याचा आम्ही प्रयत्न करत आलो आहोत!

prasad@aadii.net

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The world concert job career marriage life family love ysh
First published on: 09-07-2022 at 00:08 IST