अर्चना जगदीश

अ‍ॅनी १९६५ मध्ये दक्षिण आफ्रिकेतल्या फ्लर दी ले इथे पोहोचली तेव्हा ती फक्त २३ वर्षांची होती. तिथे तिने जवळच्याच गवताळ प्रदेशात सहा-आठ महिने जिराफांचा, त्यांच्या वागणुकीचा अभ्यास केला. हजारो टिपणं तयार केली आणि ती ९५ जिराफांना व्यवस्थित ओळखायला लागली होती. या टिपणांवरून तिला जिराफांवरचं पहिलं पुस्तक ‘द जिराफ’ लिहून ते प्रसिद्ध करायला १९७४ हे वर्ष उजाडलं. आजही तिचं हे पुस्तक जिराफ या विषयावरचं महत्त्वाचं पुस्तक मानलं जातं. २१ जून हा ‘जागतिक जिराफ दिवस’ म्हणून साजरा केला जातो, त्यानिमित्ताने..

पन्नाशीच्या दशकात आफ्रिका खंड म्हणजे  भीतिदायक प्रदेश होता. नरभक्षक टोळ्यांचा, हत्तीपासून सिंहापर्यंत सगळ्या प्राण्यांची शिकार करणाऱ्या, काळ्या जादूचा उपयोग करणाऱ्या आदिवासींचा प्रदेश, अशी त्याची ख्याती होती. गोऱ्या लोकांना या प्रदेशाबद्दल भीती होती पण सुप्त आकर्षणही होतं. तिथल्या अनेक प्रदेशांवर गोरे लोकच राज्य करत होते. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात एकीकडे डॉ. लुई लिकीसारखे मानववंशशास्त्रज्ञ मानवाचं मूळ आफ्रिकेत आहे या सिद्धांतासाठी संशोधन करत होते, पुरावे गोळा करत होते. तर जेराल्ड डरेलसारखा प्राणीप्रेमी युरोपमधल्या प्राणिसंग्रहालयांसाठी या अद्भुत प्रदेशातून प्राणी गोळा करण्याच्या मोहिमा आखत होता. पण तरीही आफ्रिकेत जाऊन प्राण्यांचा अभ्यास करणं आणि तेही एक स्त्रीने, हे दुर्मीळच होतं.

जेन गुडालने आफ्रिकेतल्या ‘गोमबे राष्ट्रीय उद्याना’त चिंपांझींचा अभ्यास करायला सुरूवात केली. आपली सगळी कारकीर्द चिंपांझींवर काम करण्यासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी पणाला लावली. तिला आफ्रिकेत प्रत्यक्ष प्राण्यांमध्ये जाऊन काम करणारी पहिली स्त्री संशोधक म्हणून नाव मिळालं. पण त्याच्या काही वर्षे आधी एक कॅनडाची स्त्री संशोधक दक्षिण आफ्रिकेच्या गवताळ प्रदेशात पोहोचली होती आणि तिनेही एका वेगळ्या प्राण्यावर उत्तम संशोधन केलं होतं ही गोष्ट कुणाला माहीतही नसेल. संशोधकांना खुणावणाराच हा प्रदेश होता. इथेच विचित्र प्राणी आणि जैवविविधता होती म्हणूनच अ‍ॅनी इनिस डॅग या कॅनडाच्या संशोधिकेची पावलं आपोआप आफ्रिकेकडे वळली होती. जिराफांवर काम करण्यासाठी, त्यांच्या वागणुकीचा अभ्यास करण्यासाठी..

जिराफ हा प्राणी आपल्याला फारसा माहीतही नसतो. ‘डिस्कवरी’ वाहिनीवरच्या लघुपटातून आणि आफ्रिकेबद्दलच्या वृत्तचित्रांमधून तो आपल्याला अधूनमधून दिसत राहतो. या लांब मानेच्या प्राण्याचं महत्त्व, उत्क्रांतीच्या सिद्धांतात त्यावरून रंगलेले वादविवाद याबद्दल आपण अनभिज्ञ असतो. लामार्क या फ्रेंच शास्त्रज्ञाच्या म्हणण्यानुसार जिराफाची मान उंच होत गेली, कारण उंच झाडांचा पाला खाता येणं त्याच्यासाठी महत्त्वाचं होतं. मात्र याला विरोध करणारा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत डार्वनिने एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मांडला. त्यानुसार ज्या जिराफांची मान उंच होती ते जास्त यशस्वी झाले आणि त्यांच्या पुढच्या पिढय़ा उंच मानेच्या झाल्या. जिराफ हे आज आफ्रिकेच्या संपन्न गवताळ प्रदेशात दिसत असले तरी दोन-अडीच कोटी वर्षांपूर्वी ते मुख्यत: युरेशियामध्ये प्रगत झाले आणि आफ्रिकेच्या गवताळ प्रदेशात स्थिरावले. जिराफाच्या मानेचा नक्की काय उपयोग असतो, जिराफाला पोहता येतं का, घोडय़ासारखं पळता येतं का, जिराफांचं प्रजनन कसं होतं, त्यांचं सामाजिक जीवन कसं असतं, अशा अनेक शंका आजही अनेकांना पडतात. ‘गूगल’वर आज कदाचित त्यांची उत्तरे मिळत असतील; पण ६४ वर्षांपूर्वी १९५६ मध्ये अशी कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. जिराफ म्हणजे गवताळ प्रदेशातला मोठा शाकाहारी प्राणी आणि त्याचे मांस आफ्रिकी आदिवासी खातात इतकीच त्याची ओळख होती. लांब मान असूनही निरुपयोगी प्राणी म्हणून तो कार्टून फिल्म्समध्ये दिसायचा.

अ‍ॅनी लहानपणी प्राणिसंग्रहालयात आईबरोबर गेली असताना तिनं पहिल्यांदा जिराफ बघितला होता आणि तेव्हापासून ती या प्राण्याच्या प्रेमातच पडली. आधी जीवशास्त्रात पदवी आणि नंतर जनुकशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावर आफ्रिकेत जाऊन जिराफांचा अभ्यास करायचा असं तिने ठरवलं होतं. अर्थातच मित्रमत्रिणी आणि घरच्यांनी त्यावेळी तिला विरोध केला. कारण आफ्रिकेबद्दल कुणालाच खात्री नव्हती. तिने यासाठी पैसे मिळवण्यासाठी प्रयत्न केले, पण सगळीकडे नकारघंटा मिळत होती. एक बाई म्हणून विरोध होत होता. मग तिने एका मत्रिणीच्या ओळखीतून दक्षिण आफ्रिकेतल्या एका गोऱ्या शेतकरी कुटुंबाला पत्र लिहिलं आणि त्यांनी तिला यायची परवानगी दिली. तिनं एक छोटीशी शिष्यवृत्तीही पदरात पाडून घेतली. तिथे पोहोचेपर्यंत मात्र ती नुसती आद्याक्षरांनी पत्र लिहीत होती कारण पुन्हा बाई म्हणून नकार मिळायची शक्यता होती. १९६५ मध्ये अ‍ॅनी दक्षिण आफ्रिकेतल्या फ्लर दी ले इथे पोहोचली तेव्हा ती फक्त २३ वर्षांची होती. तिथे तिने जवळच्याच गवताळ प्रदेशात सहा-आठ महिने जिराफांचा, त्यांच्या वागणुकीचा अभ्यास  केला. हजारो टिपणं तयार केली आणि ती ९५ जिराफांना व्यवस्थित ओळखायला लागली होती. अर्थातच पैसे आणि बाकीच्या अडचणी यामुळे ती वर्षभरात कॅनडाला परत आली.

आपल्या टिपणांवरून तिला जिराफांवरचं पहिलं पुस्तक ‘द जिराफ’ लिहून ते प्रसिद्ध करायला १९७४ हे वर्ष उजाडलं. आजही तिचं हे पुस्तक जिराफ या विषयावरचं अत्यंत महत्त्वाचं पुस्तक मानलं जातं. आफ्रिकेतून परत आल्यावर एक स्त्री असल्यामुळे  तिला विद्यापीठातली प्राध्यापकाची नोकरी मिळाली नाही. ‘स्त्रियांनी त्याऐवजी कुटुंबाकडे लक्ष द्यावं,’ असा सल्ला तिला वारंवार मिळत राहिला. ती खरं तर अशा नोकरीच्या शोधात होती कारण प्राध्यापकांना चार महिने हक्काची सुट्टी दरवर्षी मिळते आणि त्या काळात आफ्रिकेत परत जायचं, असं तिनं ठरवलं होतं. पण ते प्रत्यक्षात आलं नाही. पुढे ती स्वतंत्र संशोधक म्हणून मिळेल त्या पाठय़वृत्त्या घेऊन प्राण्यांच्या वागणुकीचा अभ्यास करत राहिली. स्वत:च्या कामाने, चिकाटीने संशोधक म्हणून तिने आपली ओळख निर्माण केली आणि प्रतिकूल परिस्थितीतही संशोधन सुरूच ठेवलं. तिने १९७२ मध्ये कॅनडाचं वन्यजीवन आणि माणूस यावर अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिलं. पुढे वॉटर्लू विद्यापीठात या विषयावर पीएच.डी. संशोधनासाठी खास विभाग सुरू केला. सहारा वाळवंटात जाऊन तिथल्या उंटांचा अभ्यास केला आणि त्यांच्याबद्दल खूप महत्त्वाची माहिती गोळा केली. प्राणी कसे चालतात आणि त्यांच्या वागणुकीवर, चालणं आणि हालचाल करण्याची क्षमता याचा काय परिणाम होतो यावरही तिनं खूप काम केलं. अ‍ॅनीनं वन्यजीव, वन्यजीवन आणि माणसांचा संबंध अशा संबंधित विषयांवर एकूण २० पुस्तके आणि अगणित शोधनिबंध लिहिले.

अ‍ॅलिसन रेड या चित्रकर्तीनं नुकतीच अ‍ॅनी हिच्यावर ‘द वुमन हू लव्ह्ज जिराफीज्’ ही फिल्म तयार केली आहे. यामध्ये अ‍ॅनीने १९५६ मध्ये तिच्या शेतकरी यजमानाच्या मदतीने घेतलेल्या १६ मिमी फिल्ममधल्या काही भागाचा समावेश आहे. तसेच तिचं लिखाण, पत्रं या सगळ्याचा आधार घेतला आहे. रेडनं लिहिलं आहे, ‘‘मी अ‍ॅनीशी विमानतळावर बोलत होते तेव्हा ती काहीशी अलिप्त होती. पण या फिल्मसाठी आम्ही पुन्हा फ्लर दी ले इथं पोहोचलो. तिथे तिने जिराफ बघितलेआणि ती पुन्हा अगदी तिशीतली तरुणी झाली. मग सगळं शूटिंग सोपं झालं.’’ अ‍ॅनी आता ऐंशी पार केलेली वृद्धा आहे. लिहिणं हे तिच्यासाठी स्वाभाविक आहे. तिला कुणीतरी एकदा लहान मुलांसाठी जिराफांवर पुस्तक लिहायला सांगितलं. तिच्या पुस्तकाला लहान मुलांसाठीच्या उत्तम पुस्तकाचं बक्षीस मिळालं आणि तिने ते दहा हजार डॉलर्स सहज ‘सेव द जिराफ’ या संस्थेला देणगी म्हणून देऊन टाकले. अ‍ॅनीची आई अर्थशास्त्रज्ञ होती आणि तिने लिहिलेलं पाठय़पुस्तक कॅनडात सर्वत्र वापरलं जायचं. अ‍ॅनीने आपल्या आईबद्दल पुस्तक लिहिलं, पण लोकांना सतत जिराफच हवा होता तिच्याकडून. म्हणून ते पुस्तक तसंच राहिलं.

२०१६ मध्ये ब्रूकफील्ड झूमध्ये तिला तिच्या नावाने सुरू केलेलं पहिलं ‘डॉ. अ‍ॅनी इनिस डॅग अवार्ड फॉर एक्सलन्स इन जिराफी सायन्स’ देण्यात आलं. याच प्राणिसंग्रहालयात तिने १९३६ मध्ये पहिल्यांदा जिराफ बघितला होता. १९१६ पासून दरवर्षी हे पारितोषिक जिराफांवर संशोधन आणि संवर्धन करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला देण्यात येतं. आज इतर सर्व प्राण्यांप्रमाणेच जिराफदेखील दुर्मीळ होत चालले आहेत आणि त्यांचा अधिवास आकसत चालला आहे. जिराफांच्या चार उपजातींपैकी रेटिक्युलेटेड जिराफ सगळ्यात  दुर्मीळ आहेत. अ‍ॅनी आणि तिचं कुटुंब केनियामध्ये याच जिराफाच्या संरक्षणासाठी मदत करतं. स्थानिक लोकांना बरोबर घेऊन काम केलं तरच वन्यजीवन टिकेल यावर तिचा पूर्ण विश्वास आहे. वन्यजीव आणि पर्यावरण संरक्षण ही पृथ्वीवरच्या सर्व माणसांची एकत्रित जबाबदारी आहे असं ती मानते.

आफ्रिकेतली प्रत्यक्ष परिस्थिती मात्र वेगळी आहे. आफ्रिकेतल्या वन्यप्राणी पर्यटनात जिराफ जसा बघायला मिळतो तसा चाखायलाही मिळतो. केनिया-टांझानियामधल्या अनेक उपाहारगृहांमध्ये जिराफाच्या मांसापासून बनवलेले पदार्थ मिळतात. पर्यटकांना रमवायला जिराफांच्या शिकारींनाही परवानगी आहे. हे असंच सुरू राहिलं तर जिराफासारखा देखणा प्राणी कायमचा नामशेष व्हायला वेळ लागणार नाही. माणसाच्या चंगळवादी जगात प्रत्येक गोष्टीचा बाजार होतो आहे. म्हणूनच ‘काजवा महोत्सवा’चं जोरात मार्केटिंग होतं. ‘धनेशांची घरटी बघायला पैसे देऊ का,’ असं अनेक पर्यटक विचारतात आणि प्रत्येकाला काहीही झालं तरी वाघ बघायचाच आहे..

हे सगळं आज इथं लिहायचं कारण म्हणजे २१ जून हा ‘जागतिक जिराफ दिवस’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने लोकांचं जिराफांकडे लक्ष जावं, त्यांचा अधिवास वाचावा आणि वन्यजीवनाकडे बघायचा दृष्टिकोन बदलावा, हे आपल्या लक्षात यावं इतकंच! खरा पर्यावरण विचार आणि कृती या दिशेने थोडीशी वाटचाल व्हावी म्हणून..

godboleaj@gmail.com

chaturang@expressindia.com