सुषमा देशपांडे
‘सावित्री’ माझ्या मनात कशी आकार घेत गेली ते मागच्या (६ सप्टेंबर) लेखात पाहिलंच. पण नंतर प्रत्यक्ष नाटक काही काळ तसंच बंद अवस्थेत पडून राहिलं. ‘राज्य नाट्य स्पर्धे’साठी समीर कुलकर्णी लिखित ‘अतिथी’ नाटक बसवशील का? असं ‘अभियान संस्थे’नं विचारलं. मी होकार दिला. एकदम वेगळ्याच कामात बुडून गेले. त्या नाटकाचा प्रयोग झाला आणि ‘सावित्री’ पुन्हा पुढ्यात आली.
आता ती संहिता हातात घेऊ शकले ते दिग्दर्शक म्हणून. वेगळंच नाटक बसवल्याने ‘सावित्री’च्या लेखन प्रक्रियेतून मी बाहेर पडले. आता माझ्याच लेखनाकडे मी तटस्थपणे पाहू शकत होते. लेखकच दिग्दर्शक असेल तर त्या संहितेकडे पाहण्याची तशी क्षमता मिळवायलाच हवी, नाही तर लेखन प्रक्रियेच्या प्रेमात पडणं होतं. तत्पूर्वी राम बापट सरांच्या सांगण्यावरून य. दी. फडके यांना मी भेटले होते. ऐतिहासिकदृष्ट्या नाटक अचूक व्हायला हवं होतं. फडके सरांनी संहिता तपासणं खूपच महत्त्वपूर्ण होतं.
दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा होता नाटकाची भाषा. सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांची पार्श्वभूमी लक्षात घेता लेखनात नाटकाची भाषा ग्रामीण ढंगाची वापरली गेली होती. पण शिक्षणानंतर भाषेत बदल असावा का? असा मुद्दा चर्चेत आला. सरांनी निळूभाऊ फुले यांना भेटायला सांगितलं. निळूभाऊ म्हणाले, ‘‘तुला माहीत आहे, मी खूप वाचतो म्हणून माझी बोली भाषा बदलली का? बोलण्याचा ढंग मूळचाच राहतो.’’ जोतिराव आणि सावित्री शिक्षण झाल्यावर प्रमाणित भाषा बोलणार नाहीत हे त्यावेळी पक्कं झालं. त्यामुळे भाषा ग्रामीण ढंगाचीच ठेवली.
पात्रांनुसार बोलण्याची ढब, पोत आणि व्यक्ती-वयानुसार देहबोली वापरणं, याचा विचार केला. हो, एकूण माझं नाटकाशी नातं लक्षात घेता नाटक मीच करणार आहे हे निश्चित होतं. तेव्हा पुण्यात मी साने गुरुजी स्मारकाजवळ राहत होते. स्मारकाचं सभागृह तालमीसाठी अत्यंत जुजबी पैशांत उपलब्ध झालं. दिवसा मुलगा अंजोर झोपेल तेव्हा समोर राहणाऱ्या टिळेकरांच्या घरात बसून पाठांतर करणं, रात्री स्मारकात उभ्यानं तालमी करणं असा दिनक्रम सुरू झाला. तालमीला धाकटी बहीण संज्योत (देशपांडे) समोर बसे आणि केलेलं पाठांतर ठरवलेल्या नेपथ्याच्या आकृतिबंधात मी तिच्यासमोर बसवत होते. रोज २-३ पानं बसवणं, पहिलं बसवलेलं आणि आज बसवलेलं एकत्र करणं सुरू झालं.
अंजोर रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान झोपायचा. त्यानंतर आम्ही जेवून तालमीला जात असू. त्यामुळे तालमीला पुरेसा वेळ मिळायचा नाही. काय करावं? या प्रश्नाचं उत्तर शोधून काढलं आणि मी अंजोरची दुपारची झोप बंद केली. दुपारी त्याच्याशी खेळत त्याला जागं ठेवायचं, मग स्वाभाविकपणे तो रात्री लवकर झोपू लागला, तालमीला नीट वेळ मिळू लागला. नाटक आकार घेऊ लागलं होतं. ‘सावित्री जिवंतपणे मांडायची’ या कल्पनेनं मी झपाटले होते. संगीताची तयारी केली. जोतिरावांचं मृत्युपत्र ध्वनिमुद्रित करून वाजवायचं ठरवलं. तालमी तिघांपुरत्या मर्यादित होत्या. मी, संज्योत आणि विश्वास (पोतदार).
नाटकाचं नाव काय? हे ठरत नव्हतं. एकदा एका मित्राने विचारलं, ‘‘मीच सावित्री, हे कसं म्हणशील?’’ सहजपणे मी म्हणाले होते, ‘‘व्हय मी सावित्रीबाई!’’ आणि ते नाव मनात पक्कं झालं. पुढे लोकांनी उगाच त्याला ‘बोलतेय’ हे जोडलं. तेव्हा जोतिराव फुले यांचं गंज पेठेतलं घर आजच्यासारखं सगळ्यांना ठाऊक नव्हतं.
मी जाऊन आले होते पण पुन्हा एकदा विश्वासला घेऊन तिथं गेले. तेव्हा नेपथ्यासाठी त्याचा विचार करायचा का, असा मुद्दा मनात होता. त्या वेळी बोलायला लागलेला अंजोर बरोबर होता. मी विश्वासला झपाटल्यासारखं ‘ही विहीर त्यांनी सगळ्यांना खुली केली. इथं विधवा, गरोदर मुलींची बाळंतपणं केली’ दाखवत होते. मध्येच अंजोर म्हणाला, ‘‘आई सावित्री मावशी कुठं आहे? भूक लागलीय. तिला पोहे करायला सांग ना.’’ सावित्रीच्या घरी जायचंय, सावित्रीचं असं, जोतिबांनी हे केलं, घरात माझं हेच बोलणं चालू असायचं. अंजोरच्या बोलण्यातून मला जाणवलं. सावित्री-जोतिबा आमच्या घरात जिवंत होते.
३ जानेवारी १८३१ हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस मानला जातो. मी मनाशी ठरवलं, ३ जानेवारी १९८९ ला पहिला प्रयोग करायचा. एक दिवस विद्याताई बाळ भेटल्या. म्हणाल्या, ‘‘नारी समता मंचाने प्रयोग आयोजित केला तर तुला चालेल का?’’ मी होकार दिला. मंचाने प्रयोग आयोजित करणं हे खूपच सुकर झालं होतं. पुण्याच्या ‘एसएनडीटी’ सभागृहामध्ये पहिला प्रयोग ठरला. शेवटचे १०-१५ दिवस विश्वासने ठाण्यात ‘न्यू इंग्लिश स्कूल’च्या सभागृहामध्ये सलग तालमी घेतल्या.
विजय परुळकरने सरोजाकडून सावित्रीच्या वेशातले फोटो काढून घेतले. विश्वासने माहितीवजा पत्रक छापून घेतलं. प्रयोगाची तयारी होत होती. सावित्रीचं आडवं कुंकू. पायात जोडवी, कानात कुड्या, मंगळसूत्र इत्यादीच वापरायचं ठरवलं. आईने स्वत:च्या कानातल्या कुड्या दिल्या. बारामतीच्या बाजारातून एकदम ठसठशीत जोडवी, दोऱ्यात ओवलेलं मंगळसूत्र आणलं. लहानपणी मला तयार करणाऱ्या माझ्या आईचा उत्साह तेव्हाही तोच होता. बारामतीतूनच नऊवार सुती साड्या घेतल्या होत्या. हो, त्या धुऊन वापरलेल्या करण्याची जबाबदारीही आईनेच घेतली आणि नऊ तुकड्यांची चोळीही तिनेच शिवून घेतली. नऊवार नेसताना कोणता पदर ओढायचा आणि कसा हेही तिनं शिकवलं.
वीणा पटवर्धन प्रयोगाची माहिती विचारायला घरी आली. दैनिक ‘सकाळ’मध्ये छापून आलेली प्रयोगाची माहिती वाचून गंमत वाटली होती. वेगळी उभारी मिळाली होती. ३ जानेवारी, लक्ष फक्त प्रयोगावर होतं. मंचाने प्रयोगाचं नियोजन चोख केलं होतं. दुपारी ४ चा प्रयोग होता. हा प्रयोग नेपथ्य, संगीत, लाइटसह करणार होतो.
प्रयोग सुरू झाला. दहाच मिनिटं झाली असतील, तितक्यात लाइट गेले. माइक सिस्टीम बंद पडली. तयार केलेलं संगीत, लाइट इफेक्ट वापरणं शक्य नव्हतं. पोटात खोल खड्डा पडला. मी विंगेत गेले. पाणी प्यायले. विश्वासने विचारलं, ‘‘काय करतेस?’’ ‘‘फुले काहीही कारणाने थांबणारे नव्हते. करते सुरू’’ म्हणत मी रंगमंचाकडे वळले. माझा मूड खराब होऊ नये म्हणून पहिल्या रांगेमध्ये बसलेला विजय परुळकर उठला, रंगमंचाच्या दिशेने पुढे आला. ‘‘चांगलंच चालू आहे.’’ त्याच्या स्टाइलने म्हणाला.
खिडक्या दरवाजे उघडले गेले. तेवढ्यात मी संज्योतला सांगितलं, ‘‘टेप सुरू झाला नाही तर मृत्युपत्र तुला वाचायचं आहे.’’ नाटक पुन्हा सुरू झालं. स्वच्छ, नैसर्गिक उजेडात मी सावित्री आणि जोतिबा साकारू लागले. मृत्युपत्र संज्योतने वाचलं. जोतिराव फुले यांचा मृत्यू, सावित्रीचा मृत्यू, प्रयोग संपला. टाळ्यांचा गजर झाला. आईपाशी असलेला अंजोर धावत आला. कडेवरच बसला. ‘‘आई छान केलंस.’’ म्हणत अधिकच बिलगला. काय समजलं होतं माझ्या इवल्याशा पोराला!
हळूहळू माणसांचा गराडा पडू लागला. मीनाताई चंदावरकर जवळ आल्या. मिठी मारून, माझा हात दाबून गालावर ओठ टेकवून म्हणाल्या, ‘‘स्पेल बाउंड. Can not speak, too good’ आणि पटकन निघून गेल्या. माझे वडील जवळ आले. मला मिठी मारून बांध फुटावा तसे ओक्साबोक्शी रडले. लोक कौतुक करत होते. मृदुल (भाटकर) म्हणाली होती, ‘‘सुषमा, तुला तू सापडलीस.’’ प्रयोगाला अनेक मित्र-मैत्रिणी, ओळखीचे-अनोळखी आवर्जून उपस्थित होते. आई मात्र न भेटता घरी निघून गेली. पोरं घरी आल्यावर त्यांची खायची-प्यायची काळजी घ्यायला.
ती संध्याकाळ खूप रिकामी रिकामी गेली. सुन्न. सुचत नव्हतं काहीच. प्रयोग संपल्यावर थोड्या वेळाने लाइट आले. पहिल्याच प्रयोगात मला समजलं लाइट, संगीत या तंत्राशिवायही मी प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकते. मनोमन ‘इलेक्ट्रिसिटी बोर्डा’च्या ढिसाळ कामाचे आभारच मानले. ग्रामीण भागात अर्थात जिथवर पोचावंसं वाटतं तिथवर पोचायला या साधनांशिवाय जाणं गरजेचं होतं, त्याचा आत्मविश्वास वाटला.
दुसऱ्या दिवशी सकाळी विजयचा फोन आला. ‘लगेच घरी ये.’ विजय-सरोजाने खूप कौतुक केलं. शेवटी शांतपणे विजय म्हणे, तुझा प्रयोग पाहून खात्रीने सांगतो, लोक तुला मोठं करायचा प्रयत्न करतील. तुझे पाय जमिनीवरच राहायला हवेत. डोक्यात हवा जाता कामा नये.’’ जगण्याची समज देणारी माणसं जवळ असणं महत्त्वाचंच…
खेडोपाडी कधी झाडाखाली, देवळात, तर कधी ट्रॉलीवर उभं राहून प्रयोग केले. खेड्यात लोकांची प्रयोग बघण्याची मानसिकता तयार करण्यासाठी प्रेक्षकांसमोर बसून मेकअप करत गप्पा मारत तयारी करणं आणि मग प्रयोग करणं सुरू केलं. अविनाश धर्माधिकारी रत्नागिरी ‘जिल्हा परिषदे’चा प्रमुख असताना केलेले प्रयोग, मल्लिका साराभाईने ‘दर्पना अॅकॅडमी’त आयोजलेला पहिला हिंदी प्रयोग आणि आगुस्तो बोआल यांची कार्यशाळा विनामूल्य करण्यासाठी कॅलिफोर्नियात केलेला प्रयोग… किती आणि काय काय सांगू!
पुढे ३५ वर्षं मी या नाटकाचे प्रयोग केले. मराठीसह हिंदीत केले. ‘स्पॅरो’ संस्थेने या प्रवासाचं दस्तऐवजीकरण केलं. आठ भाषांमध्ये नाटकाचं भाषांतर झालं. सुरुवातीपासूनच मी कोणालाही प्रयोग करण्यास परवानगी देत होतेच. सावित्रीच्या आयुष्यावर मी माझा अधिकार कसा सांगू? आज मराठी आणि हिंदीत शुभांगी भुजबळ आणि शिल्पा सानेचा प्रयोग मी बसवला. इंग्रजीमध्ये शांता गोखलेंनी भाषांतर केलं, तर मंजिरी भुस्कुटेने इंग्रजीतील रंगावृत्ती तयार केली आणि नंदिता पाटकरचा प्रयोग मी बसवला. खरं तर अजूनही मुली प्रयोग करतात. तो सर्व तपशील पुन्हा कधी तरी.
एक आठवण- दिल्लीतल्या हिंदीतल्या प्रयोगानंतर एक म्हातारी स्त्री काठी टेकवत माझ्याजवळ आली. म्हणाली, ‘‘खून का रिश्ता लगा तेरे सावित्री के साथ.’’ मी म्हणते, सावित्रीचं नातं रक्तापलीकडचं, सावित्रीनं जगणं दिलं. जगण्याला खोली दिली.
सुषमा देशपांडे | sushama.despande@gmail.com