विस्मरणात खरोखर जग जगते!

स्मरण हीच शक्ती आहे.. स्मरण म्हणजे काय?

एकदम वीज चमकावी तशी काही वाक्यं मनात चमकून जातात. जणू अवचित एखादं सत्यच क्षणार्धात पुढं उभं ठाकावं. ही वाक्यं अशी असतात जी तुमच्या दृष्टिकोनाला वेगळं वळण देतात. विनोबा भावे यांचं असंच एक वाक्य अवचित सामोरं आलं की, ‘‘विस्मरण हीसुद्धा शक्तीच आहे!’’

लहानपणापासून आपण मानत आलो की, स्मरण हीच शक्ती आहे.. स्मरण म्हणजे काय? तर लहानपणी आपण (आणि आपले पालकही) मानायचो की, परीक्षेचा पेपर लिहिताना सगळी उत्तरं जशीच्या तशी आठवणं, म्हणजे स्मरण. त्यासाठी घोकंपट्टी करीत राहणं, हाच एकमेव मार्ग असायचा. मग वक्तृत्व स्पर्धा आली की आईनं किंवा आणखी कुणी लिहून दिलेलं आणि आपण पाठ केलेलं भाषण जसंच्या तसं, न अडखळता म्हणता येणं, हेसुद्धा स्मरणशक्ती चांगली असल्याचं लक्षण मानलं जाई आणि जातं. ज्याला घोकंपट्टी चांगली जमते आणि जो पाठ केलेलं जसंच्या तसं लिहून काढतो किंवा घडाघडा बोलून दाखवतो तो हुशार ठरायचा.. किंवा ठरतोही. त्या स्मरणशक्तीच्या जिवावर किती औषधं आजवर बाजारात आली त्याला गणती नाही. महाविद्यालयीन शिक्षणाचाही एकूण भर उत्तम घोकंपट्टीवरच असायचा. जे या समजाच्या विपरीत वागायचे त्यांना गुण मिळणं कठीण व्हायचं.

मला आठवतं, माझ्या मित्राची मुलगी तिसरी-चौथीत असेल तेव्हा. तिला चित्रकलेच्या परीक्षेत विषय आला ‘निसर्गचित्र’. तिनं रात्री खिडकीतून दिसणारं काळं आभाळ आणि त्यात चमकणाऱ्या चांदण्या आणि ढगाआड लपत चाललेला चंद्र काढला. चित्र अतिशय सुंदर काढलं होतं, पण तिला कमी गुण मिळाले. कारण विचारलं तर सांगण्यात आलं की, डोंगर, झाडं, त्यासमोर एखादी झोपडी, त्या झोपडीकडे जाणारी पायवाट.. हे निसर्गचित्र आहे! त्यावर, असा निसर्ग ती कधीच पाहात नाही. इमारतींच्या गलबलाटात रात्री खिडकीतून तिला हाच निसर्ग दिसतो.. मग तिनं तेच का रेखाटू नये? आणि हेही निसर्गाचं रूप आहेच ना? हा प्रतिप्रश्न तिच्या आईनं विचारला तर उत्तर मिळालं, ‘‘इतर मुलांनी बघा कसा तो झोपडी-डोंगराचा निसर्ग काढलाय! यात निदान चंद्र झाडामागे लपताना तरी दाखवायचा..’’ तर असं आहे. आपण काही साचे तयार केलेत आणि वर्षांनुवर्ष मनात पक्के केलेत. त्या साचाबरहुकूम जे ‘निर्माण’ होतं.. कागदावर पेनानं, ब्रशनं उतरतं तेच उत्तम मानलं जातं. तो साचा लक्षात ठेवणाराच हुशार ठरतो. पूर्वी चाचणी परीक्षेच्या काळात असा शिरस्ता असायचा की, वर्गात शिक्षक फळ्यावर प्रश्न लिहायचे आणि मुलांनी उत्तरपत्रिका लिहायची. मराठीचा पेपर होता आणि त्यात एक प्रश्न असा होता की खालील उलटसुलट क्रमानं अक्षरं लिहिली असून त्याचा क्रम सुयोग्य करून शब्द लिहा. म्हणजे ‘हाजज’ लिहिलंय, तर उत्तर आहे ‘जहाज’.. ‘मचाच’ लिहिलंय तर उत्तर आहे ‘चमचा’.. असं. तर एका मुलीनं शब्द लिहिला ‘मानवी’. तिला त्या उत्तराचे शून्य गुण मिळाले. इतर मुलांनी लिहिलं होतं ‘विमान’ आणि त्यांना पूर्ण गुण मिळाले होते. घरी आजी म्हणाली, ‘‘बाई गं, विमान सोडून तू मानवी हा कुठला कठीण शब्द लिहिलास.’’ नात म्हणाली, ‘‘आजी बाईंनी ‘वी’ दीर्घ लिहिला होता. ऱ्हस्व नाही. मग ‘वीमान’ शब्द कसा होईल? ‘मानवी’ हाच बरोबर आहे ना?’’ चौथीतल्या आपल्या नातीला आजी म्हणाली, ‘‘तुला एवढं कळलं ना? मग तुला माझ्याकडून पैकीच्या पैकी मार्क!’’ पण किती पालक मुलाला गुण कमी मिळाले तरी चालतील त्यानं आपली बुद्धी वापरली हेच महत्त्वाचं आहे, असं म्हणतील? तेव्हा स्मरणशक्ती म्हणजे घोकंशक्ती, हीच सवय लागलेल्या मनाला ‘‘विस्मरण हीसुद्धा शक्तीच आहे,’’ या विनोबांच्या वाक्यानं धक्काच दिला खरा. पण मग त्यांचं सांगणं उकलू लागलं तसतसं जाणवू लागलं की, खरंच विस्मरण ही शक्तीच आहे. ती नसती तर माणसाला जगताच आलं नसतं!

स्मरण ही शक्ती किंवा मोठी क्षमता आहे यात शंकाच नाही. हे स्मरण दोन पातळ्यांवरचं असतं. ‘शॉर्ट टर्म मेमरी’ किंवा ‘अल्प मुदतीचं स्मरण’ आणि ‘लॉन्ग टर्म मेमरी’ म्हणजे ‘दीर्घ मुदतीचं स्मरण’. ‘अल्प मुदतीचं स्मरण’ म्हणजे काय? तर समजा आपल्या कार्यालयात एखाद्या सहकाऱ्यासाठी दूरध्वनी आला आणि तो जागेवर नाही. मग समोरचा माणूस सांगतो, ‘‘त्यांना सांगा साटम यांचा फोन होता.’’ आपण ते नाव लक्षात ठेवतो, कुठपर्यंत? त्या सहकाऱ्याला सांगेपर्यंत. मग विसरूही शकतो. दोन दिवसांनी त्यानं समजा विचारलं की, ‘‘अरे मला कुणाचा तो फोन आला होता?’’ तर आपल्याला आठवेलच याची खात्री नाही. कारण ‘अल्प मुदतीच्या स्मरणा’तली ती माहिती ‘दीर्घ मुदतीच्या स्मरणा’त जमा झाली नसते ना! दीर्घ मुदतीचं स्मरण म्हणजे एक अवाढव्य कोठार आहे. त्यात किती तरी प्रकारच्या आठवणी सुप्तावस्थेतही पडून असतात. किती रोजच्या रोज वापरात येत असतात. आता हेच पाहा ना.. हा लेख तुम्ही वाचताय किंवा वाचू शकताय कारण तुम्हाला मराठी भाषेचं, लिपीचं ज्ञान आहे म्हणून. हे ज्ञान टिकून आहे ते ही भाषा, तिचं व्याकरण तुमच्या स्मरणात आहे म्हणूनच! सहकाऱ्याला कुणाचा दूरध्वनी आला होता, त्याचं नाव फार थोडा वेळ आपण लक्षात ठेवतो.. पण आपल्या नातेवाईकांची, परिचितांची नावं आपल्याला माहीत असतात तीदेखील याच दीर्घ मुदतीच्या स्मरणशक्तीमुळेच! एखाद्या अत्तराचा वास येतो आणि अचानक लहानपणी आईनं लावलेल्या अत्तराची आठवण जागी होते. ती जागी होते कारण ती दीर्घ मुदतीच्या स्मरणकप्प्यात सुप्तावस्थेत इतकी वर्ष पडून होती म्हणूनच! एखादं जुनं गाणं कानावर पडतं आणि अनेक आठवणी जाग्या होतात. तो चित्रपट कुठला? तो कुठं पहिला होता.. वगैरे. तर आपल्या स्मरणावर विसंबून आपण जगत असतोच, पण स्मरणाच्या ताकदीएवढीच विस्मरणाची शक्ती नसती तर माणूस वेडाही झाला असता. कुठलंच दु:खं, कुठलाच आघात, कुठलाच वियोग, कुठलाच मृत्यू माणसाला विसरता आला नसता, तर? तसंही माणूस आठवणींची चिरगुटं पटकन टाकून देत नाही. त्या आठवणींच्या अगदी चिंध्या झाल्या तरी, ती ठिगळं शिवून शिवून तो त्या चिंध्या सांभाळत राहातो. जुन्या आघातांच्या, ओरखडय़ांच्या आठवणी जपत तो वेदना सांभाळू पाहातो. कधी त्या आठवणींनी नेहमीप्रमाणे डोळ्यांना पाणी आलं नाही, तरी त्याला चुकल्या-चुकल्यासारखं वाटतं. ‘असोसिएशन ऑफ इमॅजिनेशन’ म्हणजे कल्पनांचा अनुषंग म्हणून एक सूत्र मांडलं जातं. म्हणजे एका कल्पनेच्या अनुषंगानं माणूस अनेक कल्पनांचं जाळं विणत जातो. मग त्या कल्पनांशी तो खऱ्या-खोटय़ा दु:खाची सांगड घालून दु:खी राहण्यातलं सुख अनुभवत राहतो. लहानपणी चॉकलेटच्या चांद्या आपण प्राणापलीकडे जपायचो. मोठं झाल्यावर त्याच चांद्या कचरा वाटू लागल्या आणि त्या सहज फेकूनही देता आल्या. पण मनाच्या चोरकप्प्यातल्या आठवणींच्या चिंध्या मात्र अजून फेकाव्याशा वाटत नाहीत. प्रेरक आठवणींची भरजरी वस्त्रं जपा हवी तर, पण नकारात्मकतेकडे नेणाऱ्या आठवणी उगाळत कुढत राहण्यात काय अर्थ आहे? त्या आठवणीनं जे शिकवलं ते ध्यानात ठेवा आणि जे दु:खं दिलं होतं ते विस्मरणाच्या शक्तीनं मनातून दूर सारा.. हा अभ्यास साधला नाही, तर जगणं कठीण होईल.

आठवणींकडून प्रेरणा घ्यावी, धडा शिकावा, पुढचा मार्ग दिसावा, तो चालण्यातले धोके लक्षात यावेत आणि त्या आधारावर आत्मविश्वासानं पाऊल टाकता यावं. त्या आठवणींकडून निराशा घेऊ नये, त्या आठवणीनं जो धडा शिकवला तो पुसून टाकून पुन्हा भ्रम-मोहात फसू नये, पुढची वाट अडखळून जाऊ  नये आणि न्यूनगंडानं चालण्याची उमेद संपू नये. त्यासाठी काही आठवणी विसरता येणंच चांगलं.. त्यानं जगणं अधिक सकारात्मक, अधिक पक्व, अधिक सार्थ आणि अधिक आनंदाचं होईल.. जे विसरायला हवं ते माणसानं विसरलंच पाहिजे. काय आठवायचं, हे माणूस विसरतो आणि जे विसरायला हवं तेच आठवत बसतो! त्यामुळे जे विसरायला हवं, ते विसरता येणं ही क्षमता वापरलीच पाहिजे. विस्मरणात खरोखर जग जगते, हे खरंच आहे!

चैतन्य प्रेम

chaitanyprem@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विचार पारंब्या बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: What is the memory capacity of the human brain

ताज्या बातम्या