अरुणा अंतरकर

मराठीतल्या ‘अमर भूपाळी’पासून ‘पिंजरा’पर्यंत आणि हिंदीत ‘झनक झनक पायल बाजे’पासून ‘दो आँखे बारह हाथ’पर्यंतचे अनेक संस्मरणीय चित्रपट करणाऱ्या अभिनेत्री संध्या. त्यांची त्या त्या चित्रपटातल्या भूमिकेकरिता तारीफ झाली तरी त्या लौकिकार्थानं ‘स्टार’ झाल्या नाहीत. तीच गोष्ट नृत्याची. त्यांच्यापाशी उत्कृष्ट नृत्यकौशल्य होतं, पण त्याचा गाजावाजा झाला नाही. ‘लटपट लटपट तुझं चालणं’, ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल’, तर हिंदीतील ‘नैन से नैन नाही मिलाओ’, ‘सैयां झूठों का बडा सरताज निकला’, ‘अरे जा रे हट नटखट’, ‘पंख होते तो उड़ आती रे’, ‘कजरा लगा के’ अशा अनेक गाण्यांमध्ये त्यांचं नृत्यचापल्य दिसलं. त्या विजया देशमुख ऊर्फ संध्या यांचं नुकतंच (४ ऑक्टोबर) निधन झालं. त्यानिमित्ताने…

आगळं वेगळं असणं म्हणजे काय? आणि आगळं वेगळं असायचं तरी किती? दोन्हींचं उत्तर एकच! विजया देशमुख ऊर्फ संध्या. ‘फिल्मस्टार’ असूनही कधी त्यांचे कुठल्या फिल्मी मासिकात फोटो झळकले नाहीत की मुलाखतींनी पानं भरली नाहीत. त्यांच्या काळी ‘मीडिया’चा उच्छाद नव्हता. त्यामुळे फिल्मस्टार म्हणजे आकाशातले तारे नव्हते. जमिनीवरचे होते.

ग्लॅमर, इमेज, प्रमोशन, अशी कलेशी संबंधित नसलेली आणि त्याचबरोबर महा नायक आणि सुपर स्टार अशी अतिशयोक्त अन् जाहिरातवाचक लेबलं उधळली जात नव्हती. पण इतक्या माफक फिल्मस्टारपणातसुद्धा संध्याबाई पूर्ण साध्या होत्या. अगदी संध्या हे सिनेस्टारला शोभेसं ‘शॉर्ट अँड स्वीट’ नाव असलं तरीदेखील विजयाबाई देशमुख हे मूळचं नावच तोंडी यावं. आणि त्या नावासरशी डोळ्यापुढे उभी राहावी ती त्यांची पांढरीशुभ्र साडी, डोक्यावरचा पदर आणि कपाळावरचं रुपयाच्या नाण्याएवढं ठसठशीत कुंकू. सारांश, संध्याबाई पडद्यापुरत्याच फिल्मस्टार होत्या. दिसायला सुंदर असूनही आपल्यातल्या वाटाव्या अशा होत्या.

आपल्या फिल्मस्टारपणाची श्रीमंती त्यांनी जणू पडद्यावरच्या लॉकरमध्ये बंदिस्त करून ठेवली होती. त्यांच्या नावावर बँकेत किती मालमत्ता होती हे सांगणं शक्य नाही तसंच त्यांच्या चित्रपटाने ‘बॉक्स ऑफिस’वर किती कमाई केली याची आकडेमोड करणंही शक्य नाही. पण पन्नास आणि साठच्या दशकांमधल्या कितीतरी अभिजात चित्रपटांच्या श्रेयनामावलीत त्यांचं नाव झळकलं होतं.

मराठीतल्या ‘अमर भूपाळी’पासून ‘पिंजरा’पर्यंत आणि हिंदीत ‘झनक झनक पायल बाजे’पासून ‘दो आँखे बारह हाथ’पर्यंतचे संस्मरणीय चित्रपट त्यांच्या खात्यात जमा होते. वसंत देसाई, सी. रामचंद्र आणि रामलाल यांच्या उत्तमोत्तम गाण्यांना त्यांचा पदन्यास लाभला आहे. त्यांच्यानंतर आलेल्या सुपरस्टार म्हणून मान्यता पावलेल्या नायक-नायिकांच्या नावावरदेखील असं वैभव नसेल. हे वैभव टिकण्याचं कारण हेच असावं की संध्याबाईंनी मोजकेच चित्रपट आणि तेही ‘राजकमल’ सारख्या दर्जेदार चित्रसंस्थेचेच केले. डझनावारी चित्रपटांमध्ये काम करण्यात त्यांच्यातल्या गुणवत्तेची धूप झाली नाही.

आणखी एक उल्लेखनीय घटना म्हणजे नायिका संध्या आणि दिग्दर्शक व्ही. शांताराम हे समीकरण किमान एक तप कायम राहिलं असेल. पण संध्या आणि शांताराम वणकुद्रे या जोडप्याचा पडद्यामागचा संसार या संख्येच्या तिपटीत असेल. चित्रपटसृष्टीत इतका काळ संसार टिकणं हा ऐतिहासिक विजयच म्हटला पाहिजे. यामागचं रहस्य काय असावं? चि. सौ. कां. विजया देशमुख हिनं हरतालिकेची पूजा करताना दिग्दर्शक पती मिळावा अशी मागणी केली असावी का? कारण तो काळ मध्यमवर्गीय स्त्रियांनी चित्रपटात काम करण्याचा नव्हता, तरीही विजयाला अभिनयाची ओढ होती आणि चित्रपटात काम करण्याची इच्छा होती.

चित्रपट रसिकांच्या नशिबात ‘अमर भूपाळी’ आणि ‘दो आँखे बारह हाथ’ यांच्यासारखे चित्रपट होते. म्हणून संध्यांना अभिनयाची इच्छा होती आणि शांतारामांची देखील पत्नी म्हणून अभिनेत्रीच असावी अशी अपेक्षा असावी. यावर नशिबाने तथास्तु म्हटलं. चित्रपटाच्या इतिहासात पत्नी अभिनेत्री आणि पती दिग्दर्शक या युतीचा इतिहास फारसा बरा नाही. त्या काळातल्या स्नेहप्रभा प्रधान आणि किशोर साहू या स्टार जोडप्यापासून नव्वदच्या दशकातल्या राखी आणि गुलजार या जोडप्यापर्यंत बहुतेक नाती विस्कटलेली दिसतात.

निर्माता किंवा दिग्दर्शक यांच्याशी विवाहबद्ध झालेल्या बऱ्याच नायिकांना संसारासाठी चित्रपटापासून संन्यास घ्यावा लागतो. संध्या आणि शांताराम या जोडप्याच्याबाबत या कटू इतिहासाची पुनरावृत्ती झाली नाही. याचं श्रेय शांताराम यांच्या संध्यावरच्या विश्वासाला आणि संध्याबाईंच्या गृहिणीधर्माला.

संध्याबाई चित्रपटातल्या सर्व झगमगाटापासून दूर राहिल्या. ‘राजकमल’च्या बाहेर काम करण्याची त्यांना इच्छाच झाली नसावी. आणि तशी गरज त्यांना भासू नये अशा नेकीनं आणि सातत्यानं व्ही. शांताराम यांनी आपल्या अभिनेत्री पत्नीला सुयोग्य भूमिका दिल्या. संध्याबाई जोवर नायिकेच्या भूमिकेत शोभत होत्या, तोवर म्हणजे किमान बारा वर्षं त्यांनी आपल्या चित्रपटात संध्याखेरीज दुसऱ्या नायिकेला स्थान दिलं नाही.

आता एक खरं की, ‘राजकमल’च्या चित्रपटांमधून संध्याबाईंना त्यांच्या समकालीन नायिकांप्रमाणे ग्लॅमर मिळालं नाही. बड्या स्टार्सची आपल्याकडे जवळपास विभूती पूजा होतेे. तशी संध्याबाईंच्या वाट्याला आली नाही किंवा त्यांच्या अभिनय गुणांचा उदोउदो झाला नाही. याचं एक कारण म्हणजे संध्याबाई दिसायला सुस्वरूप होत्या तरी त्यांच्या मुळच्याच व्यक्तिमत्त्वात फिल्मस्टारमध्ये अपेक्षित असलेला नखरा किंवा तोरा नव्हता. ‘पिंजरा’मध्ये त्यांनी आदर्शवादी शिक्षकाला भुलवणाऱ्या तमाशा नर्तकीची भूमिका केली होती.

पण पडद्याबाहेर सतत प्रकाशझोतात राहण्यासाठीचं ग्लॅमर त्यांच्याजवळ नव्हतं. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे व्ही. शांताराम यांच्या चित्रपटांमध्ये कलाकारांची स्टार प्रतिमा कधीच महत्त्वाची नव्हती. त्यांच्या चित्रपटात कथा, आशय यांना प्राधान्य असायचं. संध्याबाईंचे ‘राजकमल’मधले बरेच चित्रपट स्त्रीप्रधान असले तरी एकाच पात्राभोवती फिरत नसत. किंवा नायक अथवा नायिकेची लोकप्रिय छबी उगाळण्याची त्यांची वृत्ती नव्हती. त्यामुळेच शांताराम यांच्या चित्रपटात चांगल्या भूमिका दिसल्या तरी अभिनय कथेच्या पट्टीत असायचा. त्यांच्या चित्रपटात अमूक एक भूमिका गाजली असं कधी दिसलं नाही. त्यांच्या चित्रपटांच्या कथांना आणि निर्मिती व दिग्दर्शनाला जसे पुरस्कार मिळायचे तेवढे कलाकारांना मिळाले नाहीत.

साहजिक संध्याबाईंची त्या त्या चित्रपटातल्या भूमिकेकरिता तारीफ झाली तरी त्या लौकिकार्थानं ‘स्टार’ झाल्या नाहीत. तीच गोष्ट नृत्याची. त्यांच्यापाशी उत्कृष्ट नृत्यकौशल्य होतं, पण वैजयंतीमालाप्रमाणे त्यांच्या नृत्याचा गाजावाजा झाला नाही. वास्तविक ‘नवरंग’मधल्या त्यांच्या होळीनृत्याची धमाल उडायला हवी होती. ‘अरे जा रे हट नटखट’ या होळीनृत्यात एकाच वेळी स्त्री वेश आणि पुरुष वेश पांघरून संध्याबाईंनी दोन्ही शैलीतलं नृत्य खुबीनं सादर केलं होतं. त्याला तांत्रिक कौशल्याची मदत असली तरीसुद्धा संध्याबाईंच्या हालचालींमधला जोम, ताल, आणि चापल्य नजरेत भरल्याखेरीज राहत नाही.

याच चित्रपटातल्या ‘तुम सैयाँ गुलाब के फुल, हुई क्या हमसे भूल’ या नृत्यात तर संध्याबाईंनी बहार आणली आहे. ते अगदी साधं मोठं गोड आणि मोहक नृत्य आहे. ती रुसलेल्या पतीची मनधरणी आहे. तिच्यात नृत्याच्या अंगविक्षेपापेक्षा भावसौंदर्याची गरज आहे. हे ओळखून संध्याबाईंनी त्यात चेहऱ्यावरच्या भावसौंदर्यातून त्याचा गोडवा वाढवला आहे.

‘अमर भूपाळी’ आणि ‘पिंजरा’ या दोन्ही चित्रपटांमध्ये नायिकेला सत्प्रवृत्त पुरुषांना भुलवायचं होतं. त्यासाठी बोलण्यात कधी ठसका, कधी लाडिकपणा आणून त्यांनी आपलं काम चोख बजावलं. तिथे त्यांची अभिनयाची समज दिसून आली. मात्र नखरेल नर्तकी उभी करतानादेखील संध्याबाईंचा तोल जराही ढळला नाही. अशा भूमिकांमध्येही त्या घरंदाज आब राखायच्या.

थिएटरमध्ये त्यांच्या नृत्य कौशल्याला उत्स्फूर्त दाद मिळायची, पण कधी सवंग शेरेबाजी झाली नाही. संध्याबाईंच्या भूमिकांमध्ये अभिनयापेक्षा नृत्याला अधिक वाव दिसला. त्यात कोणतीही दाखवेगिरी न करता त्यांनी अगदी सहजपणे विविध नृत्यप्रकारांमधलं नैपुण्य दाखवलं. ‘अमर भूपाळी’च्या ‘लटपट लटपट तुझं चालणं’ आणि ‘तुझी माझी प्रीत’ या नृत्यगीतांमध्ये त्यांनी तारुण्यसुलभ आक्रमकता दाखवली आहे.

आणि ती अतिशय आकर्षक उतरली आहे. या चित्रपटानंतर १५ ते २० वर्षांनी आलेल्या ‘जलबिन मछली…नृत्य बिन बिजली’ या चित्रपटातही ती दिसली. त्यातलं ‘कजरा लगा के’ सजवताना त्यांनी पस्तिशी ओलांडली असणार. ही नृत्यरचना जोम आणि चापल्य आणणारी होतीच शिवाय त्यात त्यांनी जमिनीवर पहुडलेल्या स्थितीत हालचालींची अवघड कामगिरी सफाईदारपणे पार पाडली आहे, फक्त जातिवंत नर्तकच हे करू जाणे! ‘झनक झनक पायल बाजे’मध्ये संध्याबाईंची पारंपरिक नृत्यांमधली नजाकत मुद्दाम बघण्यासारखी आहे.

या बिजलीसमान वेगाच्या आणि लवलवत्या अंगविक्षेपाच्या पलीकडे जाणारी नृत्याची नजाकत दाखवताना संध्याबाई कमी पडल्या नाहीत. ‘नैन से नैन नाही मिलाओ’ आणि ‘सैयाँ जाओ’ या गाण्यांमधले त्यांचे लडिवाळ विभ्रम त्या नृत्यांमधला अभिजात शृंगारभाव खुलवून जातात. ‘जो तुम तोडो पिया’ या मीराबाईंच्या भजनाचा अतिशय सुंदर उपयोग या चित्रपटात करून घेतला आहे. त्यात अर्थातच नृत्य नाही. पण संध्याबाईंमधल्या अभिनेत्रीला आमंत्रित करणारी आर्तता आहे.

‘दो आँखे बारह हाथ’मध्ये त्यांची भूमिका फिरस्ता खेळणीवालीची होती. तिनं तिच्या हिंदी चित्रपटाच्या इतिहासातील दोन अत्युत्तम गाणी साकारण्याची संधी दिली. पैकी पहिलं म्हणजे अर्थातच ‘ए मालिक तेरे बंदे हम’. ते त्या काळात प्रार्थनागीत म्हणून आपल्या- प्रमाणेच पाकिस्तानमध्येसुद्धा मान्यता पावलं असं सांगितलं जातं. दुसरं ‘मैं जागू रे तू सो जा’ ही लोरी ऐकताना कासावीस होणार नाही असं हृदय सापडणं कठीण आहे.

तुरुंगाची पार्श्वभूमी असलेल्या या गाण्यात तिथल्या खिडकीच्या गजांचा ध्वनी गाण्याच्या सुरुवातीला ज्या कौशल्याने वापरला आहे त्याला तोड नाही. एक अशिक्षित, पण सहृदय स्त्री अनाथ मुलांसाठी हे गाणं गाते. या भूमिकेत ती आई आहे आणि तुरुंगाच्या जेलरवर जीवाभावानं प्रेम करणारी समर्पितादेखील आहे. शेवटी त्याचा मृत्यू होतो. तेव्हा हातातल्या बांगड्या फोडून ती पहिल्यांदाच आपल्या प्रेमाचा तोवर अनुच्चारित असलेला उच्चार करते. हा क्षण साकारताना जाणवणारी संध्याबाईंची समरसता मनात रेंगाळत राहते. असे उत्कट क्षण पडद्यावर त्यांच्या वाट्याला फारसे आले नाहीत.

तरीही ‘नवरंग’मध्ये त्यांनी एकाच भूमिकेत दाखवलेलं पत्नीचं घरगुती रूप आणि नर्तकीतली प्रणयिनी म्हणजे त्यांच्यातल्या अभिनेत्रीची साक्ष होती. त्यांच्या भाचीनं- रंजनानं (देशमुख) दाखवलेली अष्टपैलूता त्यांना दाखवता आली नसेल कदाचित. पण रंजनानं ‘राजकमल’बाहेर विपुल काम केलं म्हणून ते शक्य झालं हे लक्षात घ्यायला हवं. घरसंसार करण्याच्या भावनेनं आपला व पतीचा रुपेरी संसार करणाऱ्या संध्याबाईंनी जणू शांताराम गेले तेव्हा आपली अभिनयकलाही त्यांना अर्पण केली. तो अभिनय संन्यास नव्हता. तेही एक प्रकारे गृहिणी धर्माचं पालन होतं.

४ ऑक्टोबर २०२५ या दिवशी या जगाचा निरोप घेणाऱ्या संध्याबाई या ‘फिल्मस्टार’ नव्हत्या; विजया देशमुख-वणकुद्रे होत्या.

अरुणा अंतरकर | chaturang@expressindia.com