कविता पाटणकर

सेवानिवृत्त होता होता कॉम्प्युटरच्या ‘एमएससीईटी’ परीक्षेत उत्तीर्ण झालं पाहिजे, नाही तर वेतनवाढ रोखण्यात येईल, असा फतवा आल्यानंतरची कार्यालयातील लोकांची त्रेधातिरपीट ‘आणि आम्ही शिकलो’ हे शीर्षक वाचताना माझ्या नजरेसमोर आली आणि हसूच फुटलं. ‘हे काय आता नवीन शिकायचं?’,‘मी बाई निवृत्तीच घेते’, ‘कामाचा व्याप वाढेलच, सुटका अजिबात नाही’.. अशा चर्चाना उधाण आलं होतं.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
ragging case in Pune, pune,
पुण्यातील रॅगिंग प्रकरणाला धक्कादायक वळण! अधिष्ठाताच संशयाच्या भोवऱ्यात
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी
High Court relief
वैद्यकीय विषयाच्या विद्यार्थ्याला उच्च न्यायालयाचा दिलासा, पुनपर्रीक्षेची गुणपत्रिका देण्याचे राज्य शिक्षण मंडळाला आदेश

 ऑफिसमध्ये कॉम्प्युटर शिकवणाऱ्या संस्था हाजीर झाल्या आणि फी भरून कार्यालयीन वेळेत क्लास सुरू केला. पास होणं खूप गरजेचं होतं, कारण एक तर भरलेली फी पूर्ण परत आणि दुसरं नियमित वार्षिक वेतनवाढ, असं आमिष फतव्यामध्ये होतं! शिकलेल्याचं घरात प्रॅक्टिकल करावं, तर कॉम्प्युटर, लॅपटॉप नव्हता. मग उजळणीला लंच टाइम उपयोगी आला. माझी इच्छाशक्ती जबरदस्त. शिकायला मिळतंय, तर उपयोग करून घेतलाच पाहिजे. मेहनतीचं फळ मिळालं. वेतनवाढ व फी-परतीची ग्वाही! ऑफिसमध्ये कॉम्प्युटरवर काम करताना केलेलं काम चुकून ‘डिलीट’ होत असे. कधी कॉम्प्युटरच बंद होई. ‘अरे बापरे’ म्हणत पुन्हा श्रीगणेशा करत असे.

सेवानिवृत्त होता होता हाती मोबाइल आला आणि निवृत्तीनंतर टचस्क्रीन मोबाइल आला. त्यानं कहरच केला! एक बटण दाबलं, की त्याच्या बाजूचं दुसरं बटणही चुकून दाबलं जाई; पण मोबाइलचं इतकं वेड लागलं, की सारखं स्क्रीनवर टच करून बोटं दमली; पण मी मोबाइल सोडला नाही! प्रत्येक जण मला शिकवण्याचा प्रयत्न करत होतंच. काही अडलं तर विवाहित मुलीला फोन करून विचारायचे आणि ती हातातलं काम टाकून माझी शिकवणी घ्यायची. मुलानं स्काइपची शिकवणी दिली. हे सर्व मी माझ्या नवऱ्याला शिकवायचे! माझा जुना मोबाइल आईला देऊन तिला, मुलांना सांभाळणाऱ्या मावशींना फोन घेणे-करणे याची माझी चौफेर शिकवणी आणि उजळणी चालू होती. व्हॉट्सअ‍ॅप आलं, तशी ‘How are you?’ वगैरे जाऊन ‘Ag kashi aahes?’ अशी मराठी-इंग्रजी मिश्र भाषा अवतरली. कधी मराठी इंग्रजीत लिहिताना स्पेलिंग मिस्टेक झाल्यानं विषयाचा संदर्भच लागायचा नाही. कधी अर्थाचा अनर्थ होऊन सगळा मेसेज संदर्भहीन आणि अर्थहीन व्हायचा आणि हसून पुरेवाट लागायची. आपल्याला काय लिहायचं होतं आणि आपण समोरच्याला काय पाठवलंय, हे पुन्हा वाचेपर्यंत समोरची व्यक्ती ‘अगं, पाठवण्याआधी नीट वाचून मगच पाठव मेसेज,’ अशा सूचना द्यायची. वास्तवात मध्येच चुकून बटण दाबलं जाऊन ते फॉरवर्ड झालेलं असायचं!

सतत ‘सुखी माणसाचा सदरा’ असल्यासारखा आनंदी चेहरा ठेवणं गरजेचं झालं. स्वत:च्या मनातली दु:खद मळमळ व्हॉट्सअ‍ॅपच्या चावडीवर चुकूनही पोहोचणार नाही याची दक्षता घेणं सुरू झालं. जगात सगळीकडे आनंदी वातावरण, जोक्स, मजा-मस्ती दिसू लागली! एका व्हिडीओ फोनवर राजीखुशी कळत असल्यामुळे इतरांच्या घरी जाण्यायेण्याचं आपोआप बंद झालं. माझी आई म्हणायची, ‘‘अगं, व्हिडीओ फोन करून बोलण्यापेक्षा तू घरीच भेटायला येत जा. म्हणजे भरपूर बोलायला मिळतं.’’ एक लक्षात आलं, की दु:ख, राग, त्रास, चिडचिड, घुसमट बोलून दाखवता येत नाही आणि ‘शेअर’चं बटण असूनही ती शेअर करता येत नाही! यावर उपाय म्हणून सगळय़ांनी एकत्रित दोन-तीन महिन्यांनी भेटायचंच असं ठरलं. भेटून बोलायची, रागवायची मजा काही औरच. कामानिमित्त नेहमी बँकेत जाणं व्हायचं, त्यामुळे बँक मॅनेजरपासून शिपायापर्यंत सगळे ओळखीचे. ऑनलाइन व्यवहार शिकायला मी आमच्या बँक मॅनेजरकडे ठाण मांडून बसायचे! त्या दुपारनंतर अ‍ॅप डाऊनलोड करणं वगैरे सांगायच्या. ऑनलाइन पैसे पाठवताना शून्य वाढून पैशांची उधळण होऊ नये, म्हणून प्रथम एकेक रुपया ट्रान्स्फर करायचा. तो खात्यात जमा झाल्याचा मेसेज आला, की पुढची रक्कम पाठवायचे. मग याचा गृहपाठ. त्याचा फायदा इतका झाला, की फोन, वीज, गॅस बिलं भरणं, मेल करणं; रेल्वेची, नाटकाची तिकिटं बुक करणं, घरी काम करणाऱ्या मावशींचा पगार ट्रान्स्फर करणं, अशी बरीच कामं मी ऑनलाइन यशस्वीपणे करू लागले. याचा सगळय़ात जास्त आनंद बँक मॅनेजर आणि मुलांना झाला. त्यांच्या मागची माझी कटकटही गेली!

आता मी पुढच्या इयत्तेत गेले. ‘फेसबुक’ची शिकवणी मुलीनं सुरू केली. मग काय, माझी गाडी सुसाट! फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणं, आलेली रिक्वेस्ट स्वीकारणं, एखादी कथा पाठवणं सुरू झालं. मला शिकवताना मुलगा म्हणायचा, ‘‘आई, आम्ही लहान होतो, तेव्हा आम्हाला तू शिकवायचीस आणि ‘हे आलंच पाहिजे’ अशी तंबी द्यायचीस. आता तुलाही हे आलंच पाहिजे.’’ काही अडलं तर कोणत्याही वेळी फोन करून मी या प्रशिक्षकांना त्रास दिलाय!  कधी कधी नवऱ्याची जेवणाची आबाळही झालीय; पण सेवानिवृत्तीनंतर मी सतत मोबाइल लिखाणात बिझी राहीन आणि त्यांच्या मागे लागणारी माझी भुणभुण कमी होईल, याचा त्यांना आनंद! ‘‘तू तुझं काम कर. मी एक प्लेट भाजी मागवतो,’’ असे सध्या दिवस सुखाचे चालले आहेत. ते यूटय़ूबवर जुने पिक्चर पाहतात, एकटय़ानं भटकंती करतात, तर मी वाचन, लिखाण, भाषांतर, यूटय़ूब, गूगलमधून माहिती मिळवणं, ऑनलाइन मीटिंग्ज, संस्कार वर्ग घेणं, असं  छान मस्त सुरू आहे. तोंडाचा चंबू करून सेल्फी घेणं मात्र मला अजून तितकंसं जमलेलं नाही! आम्ही मैत्रिणी एकत्र भेटल्यावर सेल्फी काढताना इतकी मजा येते, की सर्व जणी वय विसरून जातो. तो फोटो पाहताना ‘ए, माझ्या चेहऱ्यावर तुझा हात आलाय’.. ‘मी दिसतच नाहीये’.. ‘मी झोपाळू दिसतेय’.. ‘आता तोंडाचा चंबू करून आपला चेहरा वयानुरूप चांगला दिसत नाही!’ अशा लाडिक तक्रारी सर्व जणी करत राहतात. मग आपण सेल्फीचं ट्रेनिंग घ्यायलाच हवं, यावर एकमत होऊन सगळय़ा जणी हास्यकल्लोळात सामील होतात!