काय करू मी?

मुली मोठय़ा होत असताना दुसऱ्याचा विचार करायला शिका हे मनात रुजवायचं राहूनच गेलं का? कधी कुठल्या कामाला हात लावू दिला नाही, अडचणी कळू दिल्या नाहीत ते अभ्यासात अडथळा नको म्हणून

मुली मोठय़ा होत असताना दुसऱ्याचा विचार करायला शिका हे मनात रुजवायचं राहूनच गेलं का? कधी कुठल्या कामाला हात लावू दिला नाही, अडचणी कळू दिल्या नाहीत ते अभ्यासात अडथळा नको म्हणून. पण त्यामुळेच सगळं  विनासायास मिळतं, आपल्या मनासारखंच झालं पाहिजे हीच सवय लागली. स्वत:पुरतं पाहिलं की संपलं असं वागणं. काय चुकलं आपलं? मुलींनी स्वावलंबी बनावं एवढंच होतं मनात. पण ते करता करता रोवलं गेलेलं महत्त्वाकांक्षेचं रोपटं आडवंतिडवं फोफावलं?
‘अहो, मीनाचा फोन होता.’
वर्तमानपत्रातलं डोकं बाहेर न काढता अण्णांनी हुंकार दिला.
‘उन्हाळ्याच्या सुट्टीत बोलावते आहे.’ अण्णांनी वर्तमानपत्र थोडं बाजूला करीत वत्सलाबाईंकडे नजर टाकली.
‘नाही, म्हणजे मुलांना सुट्टी लागली आहे ना. त्यांच्याकडे लक्ष द्यायला कुणीतरी पाहिजे म्हणत होती.’
‘वत्सला, हे नवीन आहे का तुला? दरवर्षी जातोच की आपण तिकडे मुलावर लक्ष पाहिजे म्हणून. आणि तुम्ही दोघंही आहात इथे तर छोटीला पण काढते पाळणाघरातून म्हणाली असेल.’
‘काय करायचं पण? आता झेपत नाही ही उस्तवारी. म्हणजे सुरुवात प्रवासापासूनच होते. कल्पनेनंच नको वाटतं.’ दुखरे पाय चोळत त्या तिथेच टेकल्या.
‘नाही जमणार सांग. तिकडे असतात चांगली पाळणाघरं आणि काय ते त्यांचे समरकॅम्प पण असतात, त्यात घाल म्हणावं मोठय़ाला.’
‘सांगितलं. खूप महाग पडतं म्हणे ते. भारतात पाठवून देते मुलांना. एखादी दिवसभराची बाई लाव, पसे देईन म्हणते आहे.’
‘काय नालायक मुलं आहेत ही. पसे फेकले आमच्या तोंडावर की झालं? त्यांचं सगळं केलंच आपण. आता पार सातासमुद्रापलीकडे जाऊन बसली आहेत. उन्हाळ्यात तिथे जाऊन त्यांच्या मुलांना सांभाळायचं. इथे आम्हाला कोण सांभाळणार? झाली म्हणावं आमची देखील वयं आता. दे तो फोन इकडे. मीच सांगतो तिला.’ वत्सलाबाई उठल्या नाहीत. म्हणता म्हणता एक घाव दोन तुकडे करतील हे. ते सांधायला पुन्हा सगळी मानसिक शक्ती घालवायला लागेल आपल्याला. अण्णांनीही परत वर्तमानपत्रात डोकं खुपसलं. वत्सलाबाईंच्या मनाला थकव्याने एकदम वेढा घातला.
   मीनाच्या वागण्याचं त्यांना राहून राहून आश्चर्य वाटत होतं. आता हे दरवर्षीचं झालं होतं. जून महिना जवळ आला की त्या अस्वस्थ व्हायच्या. मीनाचा फोन घेऊच नये, असं होऊन जायचं. पण किती ठरवलं तरी सगळं त्याच क्रमाने घडायचं. अडीच तीन महिन्यांनी भारतात परत यायला निघताना प्रत्येक वेळी त्या तिथून येताना बजावून यायच्या, ‘आता पुढच्या वेळेस तुझी तू सोय बघ गं बाई. नाही हो झेपत आम्हाला हा प्रवास, पुन्हा घरीही तशी दिवसभर ऊठबस होते ना, त्याने अगदी थकून जायला होतं.’ त्यांना सगळी वाक्यं जशीच्या तशी आठवली. पण दरवेळी उगाच मुलीचं मन कशाला दुखवा, नातवंडाचं मायेने कोण करणार, म्हणून परदेशवारी व्हायचीच. हल्ली हल्ली मनात एक सल दाटून यायला लागला होता. वाटायचं, मायेने करतो आहोत त्याचा फायदा तर घेत नाही ना ही? जिथे तिथे हिशोबाने वागणं, त्यापुढे आमच्या त्रासाची, दुखण्या-खुपण्याची पर्वा वाटत नाही की डोळ्यावर कातडंच ओढून बसली आहे? एक वर्ष अण्णांचीच तब्येत बरी नव्हती तेव्हा जमलं नाही जायला, तर मोठय़ाला दिलं पाठवून इकडे. काय धावपळ उडाली आणि इथेही मीना म्हणते तशा बायका थोडय़ाच मिळतात आजकाल. मिळाल्या तरी त्यांची तंत्र सांभाळावी लागतात. शेवटी नाशिकच्या लेकीला बोलवून घ्यायला लागलं. तिने केलं सगळं. पण गरज पडली की तिचाच कसा उपयोग होतो ते सांगायला विसरली नाही. दरवर्षी मीनाच्या मदतीला झेपत नसताना का धावता हा नेहमीचा प्रश्न विचारायलाही विसरली नाहीच.
मुली मोठय़ा होत असताना दुसऱ्याचा विचार करायला शिका, हे मनात रुजवायचं राहूनच गेलं का? कधी कुठल्या कामाला हात लावू दिला नाही, अडचणी कळू दिल्या नाहीत ते अभ्यासात अडथळा नको म्हणून. पण त्यामुळेच सगळं  विनासायास मिळतं, आपल्या मनासारखंच झालं पाहिजे हीच सवय लागली. स्वत:पुरतं पाहिलं की संपलं असं वागणं, विशेषत: मीनाचं. काय चुकलं आपलं? मुलींनी स्वावलंबी बनावं एवढंच होतं मनात. पण ते करता करता रोवलं गेलेलं महत्त्वाकांक्षेचं रोपटं आडवं तिडवं फोफावलं. मीनाच्या धिटाईचं, हुशारीचं कौतुक करता करता ती म्हणेल ती पूर्व असंच होत गेलं. त्याचा फायदा ती तिच्या नकळत घ्यायला शिकली असं तर झालं नाही ना? ती कर्तृत्ववान निघाली. इंजिनीअर होऊन स्वत:च्या हिमतीवर परदेशात शिक्षणासाठी गेली. पण हे एवढंच पुरे असतं? कर्तृत्ववान बनविता बनविता माणूस घडवायचं राहूनच गेलं का? कुणाची चूक? का घरोघरी हे असंच होतं? त्यांचं त्यांनाच ठरवता येईना.
‘चहा करतोय मी माझ्यासाठी. तुला हवा का?’ अण्णांनी विचारलं तशा त्या विचारांतून बाहेर आल्या.

‘काय झालं? येते आहे का तुझी आई?’ मयूरेशच्या प्रश्नावर मीना काहीच बोलली नाही.
‘त्यांचं नक्की होत नसेल तर माझ्या आईला जमतंय का पाहतो.’
‘आता तिला विचारलं आहे ना. तिचं कळू दे. मग तुझ्या आईला बोलवायचं बघू.’
‘पण हो, नाही काहीतरी म्हणाल्या असतील ना?’
‘काही बोलली नाही. कंटाळते हल्ली ती दरवर्षीच्या प्रवासाला.’
‘तुझा पण अट्टहास का, तुझ्याच आईला बोलावण्याचा?’
‘नििश्चत राहता येतं मग. तुझी आई आली की त्यांच्यावर जास्त ताण पडू नये याची काळजी घेण्याचाच ताण येतो माझ्या मनावर.’
‘हे अतीच तुझं. बघ, तुझं तू ठरव. परत माझे आई, बाबाच करतात, असं ऐकवू नकोस म्हणजे झालं.’ तिने नुसतीच मान उडवली. मयूरेशने आठवडय़ाचे कपडे यंत्रात धुवायला टाकले तसं भाजी चिरता चिरता तिचं मनंही एका लयीत मागे-पुढे होत राहिलं.
खरं तर आईने मागच्या वेळेस बजावून सांगितलं होतं पुन्हा नाही यायला जमणार म्हणून. पण मग करायचं काय? आजी-आजोबा आले की किती खूश असतात मुलं. आता आणखी थोडी र्वष. मोठी झाली की राहतीलच एकटी. समर कॅम्प, पाळणाघर दोन्हीचा खर्च खूप. पुन्हा पशांनी प्रेम थोडंच मिळतं? आई आली की तिच्या हातचे चविष्ट पदार्थ पण मिळतात चाखायला. पण मागच्या वेळेला आईने एका मत्रिणीकडेच बोलून दाखवलं, झेपत नाही असं सांग म्हणे आमच्या वतीने मीनाला. तिने तेव्हा मत्रिणीलाच म्हटलं होतं,
‘नको सांगू मला. मनाला लागून राहतं.’ मत्रीण गप्प बसली. आईचा राग आला होता. खरंच त्यांना इतकं नको वाटतं इकडे यायला? मुलांचं जबाबदारीने, प्रेमाने त्यांच्याइतकं कोण करणार? आणि दोन महिन्यांचा तर प्रश्न. भारतात गेले की आरामच आराम. पोळ्या करायला, भाज्या चिरायला बाई आहे, दोघंच्या दोघं असतात. इथे निदान आमचा सहवास मिळतो, अगदीच काही घरात नाही राहावं लागत. अधूनमधून बाहेरगावी फिरवून आणतोच की दोघांना. बाहेर जातो जेवायला. भारतातले सगळे कार्यक्रम घरबसल्या टी.व्ही.वर पाहता येतात. काही कमी पडू देत नाही मी तिला. तरी इकडे आल्याआल्या परतीचे वेध सुरू यांचे. तिकिटाचा खर्च तर मी करूच देत नाही. म्हणजे आई, बाबांची तयारी असते, पण मी बोलावलं आहे तर मी थोडीच करू देईन. मीही नोकरी करते तर एवढं तर हक्काने करू शकतेच. मग तरीही आई, बाबा का नाहीत खूश? आईला मुळी कशात समाधानच नाही. आणि बाबा. ते म्हणजे एकदम रोखठोक.  चिडले की तोफ. स्पष्ट बोलून मोकळे. मागे एकदा म्हणाले होतेच, की भारतात त्यांचे मित्र त्यांना बेबीसीटर म्हणून चिडवतात. दुर्लक्ष करा म्हटलं. तर म्हणाले, पण ते खरंच आहे ना?
काय खरं, काय खोटं तेच समजेनासं झालं आहे. आणि आता इतक्या उशिरा कुठे नावं नोंदवणार समरकॅम्पमध्ये, जागा शिल्लक नसणारच. या वेळेस पुन्हा गळ घालणं आलंच आई-अण्णांना. चिरलेली भाजी फोडणीला टाकीत तिने कॅलेंडर पाहिलं. आई-अण्णांचं किती तारखेचं आरक्षण करणं सोयीचं पडेल याचा विचार करीत मीनाने त्यांचा नंबर फिरवायला सुरुवात केली.   

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: What should i do