22 April 2019

News Flash

१५६. केंद्रबिंदू

जगण्याचा केंद्रबिंदू जेव्हा ‘तू’ अर्थात सद्गुरू होतो तेव्हा जगणं त्याच्या व्यापक बोधानं प्रेरित होतं.

प्रपंच हा पाचांचा असतो. अर्थात जगात सुख भोगण्याच्या ओढीनं, पाच ज्ञानेंद्रियं आणि पाच कर्मेद्रियं यांना अकरावं इंद्रिय असलेलं मन जेव्हा राबवू लागतं तेव्हा प्रपंच सुरू होतो. या प्रपंचसुखातील व्यत्ययांनी आणि चढउतारांनी मन जेव्हा गांगरून जातं आणि स्वप्रयत्नांनी अनेक उपाय करून थकतं तेव्हा ते परमार्थाच्या वाटेकडे वळू लागतं. अर्थात या वळण्यात ठोस विश्वास नसतो. साशंकतेची सोबत असतेच. परमार्थ म्हणजे ‘देवाधर्माचं काही तरी करणं,’ एवढंच आकलन असतं. प्रपंच हा अनेकांसाठी आणि अनेकांचा असेल, तर परमार्थ हा मात्र एकासाठीच आणि एकाचाच आहे, ही जाणीव झालेली नसते. प्रपंच म्हणजे तर आपल्या इच्छांचा गुंताच असतो, पण परमार्थही आपण आपल्या इच्छांसाठीच करू लागतो! मग तो आपल्या इच्छेच्या कमी-अधिक तीव्रतेनुसार सुरू होतो. खरं पाहिलं तर प्रपंच हा अनेकांसाठीचा असला तरी तोसुद्धा प्रत्यक्षात एकाचा आणि एकाच्याच सुखासाठी आपण करीत असतो ना?

हा एक म्हणजे ‘मी’! प्रपंचातलं सुख अनेकांच्या आधारावर अवलंबून असलं तरी ‘मी’ त्यात पूर्ण सुखी व्हावं, याच हेतूनं आपण प्रपंच करतो ना? म्हणजेच जो-तो स्वत:च्याच इच्छेला, सुखाला, मताला, विचाराला अग्रक्रम देतो ना? मी म्हणतो तेच खरं, मी सांगतो तेच करावं, याच दुराग्रहासह आपण प्रपंचात इच्छापूर्तीच्या ओढीनं रुतत असतो ना? मग या ‘मी’च्या जागी ‘तो’ अर्थात परमात्मा स्थापित करण्यात गैर काय आहे? उलट त्यानं संकुचित झालेलं जगणं व्यापक होणार नाही का? जीवनदृष्टी, जाणिवेचा परीघ व्यापक होणार नाही का? ते होणं म्हणजे पारमार्थिक वाटचालीचा खरा प्रारंभ आहे. तेव्हा प्रपंचात राहून खरा परमार्थ जो साधू इच्छितो त्याच्यासाठी पू. बाबा बेलसरे यांनी सांगितलेल्या दहा बोधमण्यांतील अखेरचा मणी सांगतो की,

‘‘आपले जीवन अर्थात आपला प्रपंच आणि परमार्थ भगवंताच्या इच्छेने चालला आहे अशी भावना वाढीस लावावी.’’ या वचनात ‘अर्थात’ हा शब्द फार महत्त्वाचा आहे. या शब्दानं साधकाचं जीवन म्हणजे त्याचा प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही संयुक्त आहे, यावर मोहोर उमटवली आहे. म्हणजे जो साधना करू लागला आहे त्याची प्राथमिक धारणा काय असली पाहिजे, हे बाबा प्रथम स्पष्ट करीत आहेत. ही धारणा म्हणजे, प्रपंच वेगळा आणि परमार्थ वेगळा नाही! या दोन्हीनं जीवन युक्त असलं पाहिजे.. आणि मग पुढे स्वार्थानं भारलेला प्रपंच जेव्हा पूर्ण नि:स्वार्थ भावानं भरून जातो तेव्हा तो प्रपंचच परमार्थ होऊन जातो! पण याची सुरुवात कुठून आहे? तर माझं जीवन अर्थात माझा प्रपंच आणि माझा परमार्थ हा माझ्या नव्हे, तर भगवंताच्या अर्थात परमतत्त्वाशी एकरूप सद्गुरूंच्या इच्छेनुसारच झाला पाहिजे! म्हणजेच जगण्यामागील जीवनदृष्टीचा केंद्रबिंदू ‘मी’ नव्हे, तर ‘तो’ अर्थात सद्गुरू झाला पाहिजे. हा केंद्रबिंदू जेव्हा ‘मी’ असतो तेव्हा जगणं माझ्या संकुचित स्वार्थप्रेरित इच्छांनुसार व्यतीत होत असतं. त्यात इतरांचा विचार नसतो, इतरांच्या वास्तविक इच्छांची वा मतांची कदर नसते. देहबुद्धीला जे पोषक ते ते ग्राह्य ठरत असतं. जगण्याचा केंद्रबिंदू जेव्हा ‘तू’ अर्थात सद्गुरू होतो तेव्हा जगणं त्याच्या व्यापक बोधानं प्रेरित होतं. त्यात आत्मबुद्धीला जे जे पोषक तेच ग्राह्य आणि आत्मबुद्धीला जे जे मारक तेच त्याज्य होतं!

 चैतन्य प्रेम

First Published on August 9, 2018 1:03 am

Web Title: loksatta chintan dhara part 156