गुरूगीतेत भगवान शंकरानं पार्वतीमातेला केलेला बोध आपण आजवर ‘पूर्ण-अपूर्ण’, ‘स्वरूप चिंतन’, ‘मनोयोग’ आदी सदरांत वाचला आहेच. त्याची पुनरूक्ती टाळून अत्यंत संक्षेपानं सांगायचं, तर ‘ब्रह्म’ म्हणजे काय, हे सांगताना शिवजींनी सांगितलं की, ‘गुरूर्साक्षात परब्रह्म’! म्हणजे जे परब्रह्म म्हणतात ना? जे या चराचराला व्यापून त्यापलीकडेही आहे, ते साक्षात गुरूच आहे. सद्गुरूरूपानंच ते व्यापक परम तत्त्व साक्षात म्हणजे डोळ्यांना दिसेल अशा आकारात प्रकटलं आहे. अथर्वशीर्षही सांगतं की, ‘‘त्वमेव र्सव खल्विदं ब्रह्मासि। त्वं साक्षादात्मासिनित्यम्।।’’  हा सद्गुरूच परब्रह्म आहे, नित्य असं आत्मतत्त्व तोच आहे. मी अगदी खरं सांगतो.. ऋतं वच्मि। सत्यं वच्मि! मग पुढे म्हणतात की, अव त्वं माम्। अव वक्तारम्। अव श्रोतारम्। अव दातारम्। अव धातारम्। अवानूचानमव शिष्यम्। याचा शब्दश: अर्थ असा की, हे देवा, तू माझं रक्षण कर, तुझ्या गुणानुवादाचे वर्णन करणाऱ्या वक्त्याचे रक्षण कर आणि ते ऐकणाऱ्याचेही रक्षण कर, अधिकारी शिष्याला उपासनेचा मार्ग प्रदान करणाऱ्या गुरूचे रक्षण कर, तो मार्ग धारण करणाऱ्या आणि त्या गुरूच्या सेवेत रत असलेल्या शिष्याचेही रक्षण कर! आता जर ही प्रार्थना सद्गुरूलाच आहे, हे लक्षात घेतलं, तर त्याचा अर्थ काय होतो? हे सद्गुरो, परम तत्त्वाच्या अनुभूतीसाठी प्रयत्नरत अशा साधकाचं तू रक्षण कर. ज्या सत्संगाच्या योगे तुझा बोध मनात पक्का होतो त्या सत्संगाचं आणि तो सत्संग ऐकणाऱ्या साधकाचं रक्षण कर. या मार्गावरील वाटचालीत जे जे साधकाला आंतरिक जागृतीसाठी साह्य़ करतात त्यांचं रक्षण कर, त्या बोधाच्या आंतरिक धारणेचं रक्षण कर आणि जो सद्गुरू मार्गाचं, बोधाचं निष्ठेनं सेवन करीत आहे, तो बोध आचरणात आणत आहे, त्या शिष्याचंही रक्षण कर! इतकंच नाही, पुढे म्हणतात, ‘‘अव पश्चात्तात्। अव पुरस्त्तात्। अवोत्तरात्तात्। अव दक्षिणात्तात्। अव चोध्र्वात्तात्। अवाधरात्तात्। सवरेतो मां पाहि पाहि समन्तात्।’’ म्हणजे, सर्वत्र आणि सर्व दिशांना हे सद्गुरो, तू माझं रक्षण कर. आता सद्गुरूला या प्रार्थना कराव्या लागतात का हो? विघ्नहर्त्यांला तरी कराव्या लागतात का? नाही. पण तरीही त्या केल्या जातात, त्यामागे दोन कारणं असतात. पहिलं कारण म्हणजे आपल्या मनाचं समाधान! लहान मूल शुद्ध अजाण असतं तेव्हा आईकडे काही मागायचंही त्याला भान नसतं. तरीही त्याचा सांभाळ पूर्ण होत असतोच. त्याची सर्वतोपरी काळजी घेतली जात असतेच. तसं खऱ्या उपासकाला खरं तर काहीही मागायची गरज नसते. तरीही तो मागतो, रक्षणासाठी प्रार्थना करतो. तर ही एक बाजू आहे. दुसरी बाजू म्हणजे कृतज्ञता! म्हणजे प्रार्थना न करताही तो जे अविरत कृपाकार्य करीत आहे, त्याचं स्मरण आणि त्याबाबतची कृतज्ञता. या मार्गावरचं आपलं एकही पाऊल त्याच्या कृपेशिवाय पुढे पडत नाही. या मार्गावरील वाटचालीसाठी जे जे आवश्यक आहे, मग तो सत्संग असेल, आंतरिक प्रेरणा असेल, जाणिवेचा विस्तार असेल, हे सारं तो सद्गुरूच करीत असतो. साधकाच्या मनातल्या आध्यात्मिक बिजाचं पोषण आणि संवर्धन, त्याच्या धारणेचं रक्षण तोच करीत असतो. अशा साधकासाठी खरं तर सर्व दिशा मंगलमय असतात कारण सर्वच दिशांना तो मंगलकारी सद्गुरू उभा असतो. ‘जेथे जातो तेथे, तू माझा सांगाती, चालविसी हाती, धरूनिया,’ हा अनुभव तो साधकाला अविरत देत असतो.

चैतन्य प्रेम