02 December 2020

News Flash

चिंतनधारा : २४५. वियोगात संयोग-संधी

जे डोळ्यांना दिसतं, कानांना ऐकू येतं, त्वचेला स्पíशता येतं, मनाला अनुभवता येतं ते जग मिथ्या आहे, हे आपल्याला पटत नाहीच.

चैतन्य प्रेम

जे डोळ्यांना दिसतं, कानांना ऐकू येतं, त्वचेला स्पíशता येतं, मनाला अनुभवता येतं ते जग मिथ्या आहे, हे आपल्याला पटत नाहीच. त्या जगात आपण ‘मी’ आणि ‘माझे’पणानं घट्ट जखडून असतो. आता हा ‘मी’ भ्रामक असल्यामुळे तो जे जे काही ‘माझं’ मानत असतो तेदेखील भ्रामकच असतं. या ‘मी’ची धारणा, कल्पना, भावना सतत बदलती असते आणि त्यामुळे त्याचा ‘माझे’पणाही अस्थिरच असतो. तरीही या जगाची ओढ काही संपत नाही. हे जग अनेकदा थपडा मारतं, अपमानित करतं, दूर करतो तरी या जगामागे लाचारीनं आणि आशाळभूतपणानं फरपटणं काही थांबत नाही. या जगाचं खरं रूप अनेकदा आपल्याला उमगतं, हे जग त्याच्यापासून निरासक्त होण्याची संधीही अनेकदा देतं, पण आपण ती साधत नाही. उलट त्याच त्या नश्वर आधारांना जखडून ठेवण्याची धडपड करीत राहतो. श्रीगुलाबराव महाराज हे एकदा मथुरेच्या यात्रेला निघाले होते. वाटेत जबलपूर स्थानकावर मुक्काम होता. तिथं मुसाफिरखान्याकडे ते जात असताना त्यांच्या कानी मोठमोठय़ाने रडण्याचा आवाज कानी आला. सतरा-अठरा वर्षांचा एक दृष्टीहीन तरुण रडत होता. महाराजही स्वत अंध होते बरं. पण विद्वत्ता अलौकिक होती. पौर्वात्य, पाश्चात्त्य शास्त्रांचं अत्यंत सखोल, पण सहज ज्ञान त्यांना होतं. तत्त्वज्ञानापासून वैद्यक, भौतिक, संगीत, मानसशास्त्र.. कशाचं ज्ञान त्यांच्या मुखातून प्रकटत नसे, हाच संशोधनाचा विषय होईल. तर महाराजांच्या कानी या मुलाचं रडणं गेलं. ते मोठय़ा प्रेमानं त्याच्याजवळ गेले. त्याच्याजवळ बसले आणि त्याला विचारलं, ‘काय झालं रडायला?’ तो हमसून म्हणाला, ‘माझा भाऊ मला या स्टेशनात एकटय़ाला टाकून गेला!’ महाराज करुणार्त स्वरात त्याला म्हणाले, ‘तो गेला तर गेला. मी तुला सांभाळीन. तुझी सर्व व्यवस्था ठेवीन.’ तरी त्यानं रडत भावाकडे पोहोचवण्याचाच हट्ट धरला. महाराज त्याला प्रेमानं म्हणाले, ‘ज्यानं आपल्याला सोडून दिलंय त्याच्याकडे परत कशाला जायचं? मी तुला कधी सोडणार नाही.’  तरीही त्याला काही पटेना. अखेर महाराजांनी त्याला भावाकडे पोहचवण्याची व्यवस्था केली. जगाचा आधार तुटला तरी परमाधार क्षणोक्षणी सहजप्राप्य असतो, पण आपण त्या परम आधाराऐवजी आपल्याला मानसिक आणि भावनिकरीत्या पंगु करीत असलेल्या नश्वर आधारांसाठी तळमळतो. अशाश्वताच्या वियोगातली परम शाश्वताच्या संयोगाची संधी आपणच गमावत असतो. फार थोडे असे असतात जे या संधीला सुवर्णसंधी मानून तिचा लाभ घेतात. शंकराचार्यानी म्हटलं आहे ना? ‘सत्संगत्वे नि:संगत्वं’ म्हणजे जेव्हा परम संगाचा लाभ प्राप्त होतो तेव्हा जगातला आसक्तीचा संग सुटू लागतो. आसक्तीचा संग सुटला, जगातल्या भ्रम-मोहजन्य गुंत्यातून सुटका झाली की मग? ‘निसंगत्वे निश्चलचित्तं!’ चित्त निश्चल होईल. कारण जगातल्या आसक्ती आणि अपेक्षांनी बरबटलेल्या संगानं चित्त सदोदित अस्थिर होत असतं. मग हे चित्त एकदा निश्चल झालं की शंकराचार्य सांगतात त्याप्रमाणे ‘जीवन-मुक्ती’ साध्य होते. अर्थात अपेक्षाच ओसरल्यानं अपेक्षारहित जगणं हे एक प्रकारे मुक्त आणि स्वतंत्र जगणंच असतं. त्यासाठी नात्यागोत्यांचा प्रपंच सोडू नये, त्या नात्यांबाबतची कर्तव्यं टाळू नयेत, पण मनानं त्यातलं गुंतणं कमी कमी करीत थांबवावं. जग कुणासाठी ताटकळत नाहीच, आपणही ताटकळू नये. जगात राहून जगात न गुंतण्याच्या अभ्यासाची संधी सतत उपलब्ध असते. ती गमावू नये!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2018 1:21 am

Web Title: loksatta chintan dhara part 245
Next Stories
1 २४४. अनंत आणि अंश
2 २४३. वाईटातही चांगलंच!
3 २४२. सर्वत्र दर्शन!
Just Now!
X