एअरबसच्या ए-320 प्रकारातल्या निओ जातीच्या 11 विमानांना उड्डाण करण्यास नागरी उड्डाण खात्याच्या महासंचालनालयानं बंदी घातली आहे. या विमानांच्या इंजिनांमध्ये दोष असल्यामुळे हा आदेश देण्यात आला आहे. या अकरापैकी आठ विमानं इंडिगोची आहेत तर तीन विमानं गो एअरची आहेत. या कंपन्यांकडे ही दोष असलेली इंजिन असून या दोन्ही विमानकंपन्यांनी ती वापरू नयेत असे नियंत्रकानं सांगितलं आहे.
अहमदाबादवरून लखनौला जाण्यासाठी जेव्हा इंडिगोच्या विमानानं झेप घेतली तेव्हा इंजिन बंद पडल्याचा प्रकार घडला. त्यामुळे सदर विमानाला पुन्हा वळून अहमदाबादमध्येच इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं होतं. युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीनं फेब्रुवारी 9 रोजी या इंजिनांसंदर्भात एक सूचना केली होती. ही इंजिनं काहीवेळा बंद पडत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले होते. त्यानंतर लगेचच इंडिगोच्या एका विमानाला अत्यावश्यक उपाय म्हणून धावपट्टीवर उतरवावं लागलं होतं. त्यावेळी एक इंजिन सदोष असलेल्या अन्य 11 विमानांना मात्र उड्डाणाची मंजुरी देण्यात आली होती. मात्र, ए-320 निओमध्ये पीडब्ल्यू इंजिन असताना 24 फेब्रुवारी, 5 मार्च व 12 मार्च अशा तीन वेळा इंजिन बंद पडण्याचे प्रकार घडले. एकूण मिळून 14 वेळा सदर इंजिन असलेलं ए-320 विमान जमिनीवर उतरवावं लागण्याचा प्रकार घडला आहे. गेल्या महिन्यात तीन विमानांना उड्डाणास बंदी घालण्यात आली होती, आता आणखी 11 विमानांना बंदी घालण्यात आली आहे.
यामुळे रोजच्या सुमारे 100 विमान उड्डाणांना याचा फटका बसणार आहे. ज्या प्रवाशांनी या विमानांमधून प्रवासासाठी बुकिंग केलं असेल त्यांना एकतर तिकिटाचे पैसे परत द्यावे लागणार आहेत किंवा अन्य विमानांमध्ये त्यांना बसवावं लागणार आहे.
आम्हाला डीजीसीएकडून या संदर्भात सूचना आली असून त्यांच्या निर्देशांचं पालन करण्यात येईल असं इंडिगोच्या प्रवक्त्यानं सांगितलं. आम्ही प्रवाशांना अन्य विमानांमध्ये सामावण्याचा प्रयत्न करत असून त्यांना तसं कळवण्यात येईल असं इंडिगोनं म्हटलं आहे. प्रवासी व कर्मचाऱ्यांची सुरक्षा सगळ्यात जास्त महत्त्वाची असून तिच्याशी तडजोड केली जाणार नाही असं इंडिगोच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 12, 2018 7:36 pm