पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक महत्वाची घोषणा केली. आज प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा होणार असल्याची माहिती पंतप्रधान यांनी ट्विट करुन दिली. ‘मेरे प्यारे मित्रों, आज सबके बँक अकाऊण्ट में १५ लाख की राशी सरकार के तरफ से जमा की जाऐंगी’ हेच ते ऐतिहासिक शब्द आहेत ज्यांची प्रत्येक भारतीय मागील साडेचार वर्षांपासून वाट पाहत होता. अखेर याच शब्दामध्ये पंतप्रधानांनी ट्विट करुन भारतीयांना एप्रिलमध्येच दिवाळी साजरी करण्याची सुवर्णसंधी दिली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रमुख विरोधीपक्ष असणाऱ्या काँग्रेसने प्रत्येक सभेमध्ये १५ लाखांचा मुद्दा लावून धरल्याने मोदी अस्वस्थ होते. सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइक, स्पेस स्ट्राइक नंतर ‘इलेक्शन स्ट्राइक’ करत विरोधकांकडे उरलेला हा एकमेव मुद्दा कायमचा संपवण्यासाठी मोदींनी हा लाखमोलाचा मास्टर स्ट्रोक मारल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. आज रात्री बारा वाजण्याआधी सर्व भारतीयांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे. ज्यांची बँक खाती नसतील त्यांच्या घरी पोतभर नोटा या आठवड्याच्या शेवटपर्यंत पोहचल्या जाणार आहेत. तर नेट बँकिंग वापरणाऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाल्यानंतर ‘Your 15 Lakh has been credited to your account’ असा मेसेज बँक खात्याशी संलग्न असलेल्या क्रमांकावर येईल.

सुब्रमण्यम स्वामी यांच्या मते ज्यांना अर्थशास्त्र कळत नाही असे अर्थमंत्री अरुण जेटलींबरोबर फोनवर चर्चा केल्यानंतर मोदींनी हा निर्णय घेतल्याचे समजते. या चर्चेमध्ये प्रत्येक भारतीयाला आधी १५ लाख रुपये देऊन नंतर सरकारची तिजोरी जो काळा पैसा परत भारतात येईल त्याने भरु असा निर्णय या दोन्ही दिग्गज नेत्यांनी घेतल्याचे समजते. जेटलींचा फोन ठेवल्यानंतर शेवटचे कन्फर्मेशन घेण्यासाठी मोदींने आपल्या पर्सनल नंबरवरुन ‘छोटा भाय’ हा क्रमांक डायल करत अमित शाहांशीही चर्चा केल्याचे समजते. ही योजना लागू करुन सरकारीची तिजोरी रिकामी झाल्यास शाहपुत्रांच्या मदतीने सरकारचा नफा काही हजार पटींने वाढण्याचा प्लॅन बी तयार ठेवण्याचे आदेश मोदींनी छोटा भायला दिल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.

दरम्यान मोदींनी या घोषणेसंदर्भातील ट्विट केल्यानंतर विजय माल्या आणि निरव मोदी यांनी आमच्या एकूण कर्जामधून ते १५ लाख वजा करुन किती रक्कम शिल्लक राहते याची माहिती कुठे मिळू शकते अशी विचारणा मोदींकडे ट्विटरवरच केली आहे. मोदींनी या ट्विटला लाईक केले असून उत्तर मात्र दिले नाही.

टीप: मोदींने हे ट्विट लगेच डिलीट केल्याने आम्ही त्याचा स्क्रीनशॉर्ट घेऊ शकलो नाही.


अत्यंत महत्त्वाचे– वाचकांनी आज १ एप्रिल असून आज एप्रिल फूल करण्याची प्रथा आहे हे विसरू नये ही नम्र विनंती