पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप

फाळणीच्यावेळी कर्तारपूर साहिब हे शिखांचे पवित्र ठिकाण भारताच्या ताब्यात घेण्यामध्ये कुचराई केल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काँग्रेसवर टीका केली. शिखांचे दहावे गुरू गोविंद सिंग यांच्या साडेतीनशेव्या जयंतीनिमित्त मोदी यांनी नाणे जारी केले, त्या वेळी त्यांनी इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर शीखविरोधी दंगलीत काँग्रेसचा हात होता, अशी टीका केली.

कर्तारपूर साहिब मार्गिकेवर त्यांनी सांगितले,की कर्तारपूर साहिब येथील धर्मस्थळ आता पाकिस्तानच्या ताब्यात आहे. शीख भाविकांना ते द्विनेत्रीतून पाहावे लागते, व्हिसा असल्याशिवाय ते तेथे जाऊ शकत नाहीत. ऑगस्ट १९४७ मध्ये हे ठिकाण भारतात सामील करून घेणे शक्य होते, पण त्यात काँग्रेसने प्रयत्नच केले नाहीत. गुरू नानक यांचे कर्तारपूर येथे २२ सप्टेंबर १५३९ रोजी निधन झाले होते. पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी सरन्यायाधीश जे.एस.खेहर व अनेक शीख नेते उपस्थित होते.

मोदी यांनी या वेळी गुरू गोविंद सिंग यांच्या साडेतीनशेव्या जयंतीनिमित्त साडेतीनशे रूपयांचे चांदीचे नाणे जारी केले. गुरू नानक यांचा जन्म पाकिस्तानातील नानकानासाहिब येथे १५ एप्रिल १४६९ रोजी झाला होता. हे ठिकाण आता पाकिस्तानात आहे.

‘कायदाच त्यांचे अश्रू पुसेल’

मोदी यांनी सांगितले, की गुरू नानक म्हणजे गुरू गोविंद सिंग यांनी सर्वाना न्यायाच्या बाजूने लढण्याची शिकवण दिली. त्यामुळेच आम्ही शीख विरोधी दंगलीतील पीडितांना न्याय मिळवून दिला आहे. गेली काही दशके आया, बहिणी, मुली, मुलगे यांना केवळ अश्रू ढाळण्यावाचून काही करता येत नव्हते, आता कायदाच त्यांचे अश्रू पुसेल.