आयसीस या दहशतवादी संघटनेने अपहरण केलेल्या ३९ भारतीयांचा मृत्यू झाल्याची घटना प्रत्येक भारतीयांसाठी अत्यंत दुख:द आहे. पण सरकारने ही माहिती देण्यास इतका उशीर का केला, असा जाब विचारत त्यांचा मृत्यू झाला आहे हे माहीत असतानाही कुटुंबीयांच्या आशा विनाकारण पल्लवित ठेवण्याचा त्यांच्या भावनेशी खेळण्याचा कुणालाच अधिकार नसल्याचे मत काँग्रेस नेते शशी थरूर यांनी व्यक्त केले आहे.

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत या घटनेची माहिती दिल्यानंतर शशी थरूर यांनी आपली नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ही अत्यंत दुर्दैवी आणि दुख:द घटना आहे. पण सरकारला मला विचारायचे आहे की, त्यांना ही माहिती देण्यास इतका उशीर का झाला. हे कसं घडलं, त्यांचा मृत्यू कसा झाला हेही सरकारने सांगावे. सरकारने त्यांच्या कुटुंबीयांच्या आशा उंचावल्या होत्या. त्यांच्या भावनांशी खेळण्याचा सरकारला  अधिकार नाही, अशा शब्दांत थरूर यांनी फटकारले.

इराकमध्ये अपहरण झालेल्या ३९ भारतीयांचा मृत्यू, सुषमा स्वराज यांची माहिती

वर्ष २०१४ मध्ये इराकमधील मोसूल भागातून जून महिन्यात आयसिस या दहशतवादी संघटनेने ४० भारतीयांचं अपहरण केलं होतं. या ४० जणांपैकी एकटा हरजीत मसीहची सुखरुप सुटका झाली होती. मात्र या ३९ भारतीयांबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नव्हती. त्यावेळी परराष्ट्रमंत्र्यांनी भारतीयांना इराकमधील कारागृहात बंद केलं असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र आता त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमधील ३१ जण पंजाब, चौघे हिमाचल आणि बाकीचे बिहारमधील आहेत.