पाकिस्तानमधील अशांत बलुचिस्तान प्रांतात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी एका बाजारपेठेत केलेल्या गोळीबारात सोमवारी चार जण ठार झाले. यात पाकिस्तान हवाई दलाच्या तीन कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे.
ग्वादर जिल्ह्य़ातील पस्नी बाजारात पाकिस्तानी हवाई दलातील कर्मचारी खरेदीसाठी आले होते. त्याचवेळी मोटरसायकलवर आलेल्या दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी त्यांच्या दिशेने बेछूट गोळीबार केला. त्यात हे कर्मचारी जागीच ठार झाले. हल्ल्यात दुकानाचा मालकही मरण पावला असून अन्य एक जण जखमी झाल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
या हल्ल्यातील जखमीस रुग्णालयात हलविण्यात आले आहे. आपण बाजारात जाणार असल्याची माहिती हवाई दलातील या कर्मचाऱ्यांनी आम्हाला दिली नव्हती. त्यामुळे त्यांना आवश्यक ती सुरक्षा पुरविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. बलुचिस्तानच्या या अशांत टापूत तालिबान, लष्कर-ए-झांगवी तसेच बलूच राष्ट्रवादी बंडखोरांचे प्राबल्य आहे. मात्र या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.