देशभरात धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या ५०० रेल्वे गाड्यांना सुपरफास्ट रेल्वेचा दर्जा देऊन त्यांचा वेग वाढवण्यात येणार असल्याची घोषणा रेल्वे मंत्रालयाने शुक्रवारी केली. त्यामुळे या गाड्यांचा वेळेत दोन तासांपर्यंत कपात होणार असून प्रवासाचा एकूण वेळ वाचणार आहे. या गाड्यांसाठीचे नवे वेळापत्रक नोव्हेंबर महिन्यांत जाहीर केले जाणार आहे. हिंदुस्तान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी मंत्रालयाला याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार आता प्रवाशांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या या रेल्वे गाड्यांच्या निश्चित वेळेत ५ मिनिटांपासून २ तासांपर्यंत कपात करण्यात येणार आहे.

सध्या रेल्वेकडे असलेल्या गाड्यांचा जास्तीत जास्त वापर करण्याचा मंत्रालयाचा मानस असून दोन प्रकारे हे शक्य होऊ शकते. त्यासाठी पुन्हा परतीच्या प्रवासाला निघण्यासाठी कोणत्याही स्थानकांत गाडी थांबणार असेल तर तीला ‘लाय ओव्हर पिरियड’मध्ये थांबवण्याचा विचार आहे. नव्या वेळापत्रकानुसार ५० रेल्वे गाड्या अशा प्रकारे धावणार आहेत. इतर ५१ गाड्यांच्या वेळा तत्काळ एक ते तीन तासांपर्यंत कमी करण्यात येणार आहे. या वेळा कमी करण्याची योजना ५०० गाड्यांपर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

त्याचबरोबर रेल्वे मंत्रालयाने अंतर्गत ऑडिट सुरु केले असून याद्वारे ५० मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांना सुपरफास्टचा दर्जा देण्यात येणार आहे. याद्वारे रेल्वेच्या ताफ्यातील सध्याच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या सरासरी वेगामध्ये वाढ करण्यात येणार आहे. तसेच या गाड्यांचा स्थानकांत थांबण्याचा कालावधीही कमी करण्यात येणार आहे. तसेच ज्या स्थानकांत कमी प्लॅटफॉर्म आहेत, अशा स्थानकांत या गाड्या थांबवण्यात येणार नाहीत.

रेल्वेतील या नव्या सुधारणांसाठी रेल्वे ट्रॅक आणि पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ज्या गाड्या १३० किमी प्रति तास या वेगाने धावतात. त्यांच्यासाठी स्वयंचलित सिग्नल यंत्रणा आणि नव्या बुश कोचची व्यवस्था करण्यात येणार आहे.