अफगाणिस्तानमधील जलालाबाद शहरात असलेल्या भारतीय वकिलातीवर बुधवारी आत्मघातकी हल्लेखोर आणि सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर गुरुवारी वकिलातीभोवतालच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. या वकिलातीभोवती अफगाणिस्तान दलांच्या अतिरिक्त तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत.

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले की, राष्ट्रीय सुरक्षा संचालनालय आणि अफगाण राष्ट्रीय पोलीस दलाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी वकिलातीला भेट दिली आणि पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

जलालाबादमधील आमच्या वकिलातीवर पाच दहशतवाद्यांच्या एका गटाने दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हल्ला केला, स्फोटकांनी भरलेल्या व्हॅनमधून हे दहशतवादी आले होते. मात्र वकिलातीमधील कोणालाही इजा झाली नाही.

अफगाण राष्ट्रीय पोलीस आणि राष्ट्रीय सुरक्षा संचालनालयाने वकिलातीभोवती सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे. स्फोटामुळे खंडित झालेला विजेचा पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

गेल्या नऊ वर्षांत जलालाबादमधील भारतीय वकिलातीवर करण्यात आलेला हा नववा हल्ला आहे. भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना याबाबत चिंता व्यक्त केली.