संदेसरा बंधूंच्या बँक घोटाळा व काळा पैसाप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची सक्तवसुली संचालनालयाने गुरुवारी त्यांच्या निवासस्थानी चौथ्यांदा चौकशी केली. हा घोटाळा पंजाब नॅशनल बँकेपेक्षा मोठा म्हणजे १४,५०० कोटी रुपयांचा असल्याचे सांगण्यात येते.

तीन सदस्यांच्या पथकाने राज्यसभा खासदार पटेल यांच्या २३, मदर तेरेसा क्रिसेंट या ल्युटेन्स भागातील निवासस्थानी जाऊन सकाळी अकरा वाजता चौकशी सुरू केली. पटेल (वय ७०) यांची २ जुलैला १० तास चौकशी झाली होती. त्यांनी वार्ताहरांना सांगितले की, आधीच्या तीन टप्प्यांत त्यांना १२८ प्रश्न विचारण्यात आले. आपल्या कुटुंबीयांचा छळ करण्याचा हा प्रकार असून राजकीय सूडभावनेतून ही कारवाई केली जात आहे.

आतापर्यंत पटेल यांची २७ तास चौकशी करण्यात आली असून २७ जून, ३० जून व २ जुलै असे तीनदा जाबजबाब नोंदविण्यात आले. करोनामुळे सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्यास पटेल यांनी नकार दिला होता त्यामुळे त्यांचे जबाब निवासस्थानीच घेतले जात आहेत. पीएमएलए कायद्याअंतर्गत त्यांचे जबाब नोंदवण्यात आले असून वडोदरा येथील स्टर्लिग बायोटेक फार्मास्युटिकल कंपनीचे प्रवर्तक संदेसरा बंधूंशी पटेल यांचे काय संबंध आहेत याचा उलगडा करण्यात येत आहे.

पटेल यांचा मुलगा फैजल व जावई अहमद सिद्दिकी यांचाही या प्रकरणाशी संबंध असून, संदेसरा समूहाचा कर्मचारी सुनील यादव याने दिलेल्या जबाबानंतर गेल्या वर्षी त्यांची चौकशी करण्यात आली होती.

प्रकरण काय?

हे प्रकरण १४,५०० कोटी रुपयांचे असून त्यात स्टर्लिग बायोटेक, त्याचे प्रवर्तक व संचालक नितीन जयंतीलाल संदेसरा, चेतनकुमार जयंतीलाल संदेसरा, दीप्ती संदेसरा यांचा संबंध आहे, ते सर्व फरार आहेत. संदेसरा बंधूंची चौकशी सीबीआय व प्राप्तिकर खाते करीत आहे. संदेसरा बंधू सध्या युरोपातील अल्बानियात असल्याचे समजते. त्यांना परत आणण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यांच्या कंपनीने आंध्र बँकप्रणीत बँक महासंघाकडून ५,३८३ कोटींचे कर्ज घेतले होते. ते नंतर बुडीत खाती जमा झाले. या प्रवर्तकांनी बनावट कंपन्यांच्या नावाने मोठय़ा प्रमाणावर पैसा घेतला.