लेह, जम्मू, श्रीनगर आणि पठाणकोट विमानतळं हाय अलर्टवर असून सुरक्षेच्या कारणास्तव प्रवासी विमानांची वाहतूक थांबवण्यात आली आहे. यामुळे अनेक विमानं विमानतळांवर अडकून पडली असल्याची माहिती मिळत आहे. भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर आता पाकिस्तानच्या विमानाने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचे समोर आले आहे. जम्मू- काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी विमानाने घुसखोरी केल्याचे वृत्त आहे. यानंतरच विमानतळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. श्रीनगर विमानतळ तीन तासांसाठी बंद करण्यात आलं आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय वायुसेनेचं लढाऊ मिग-21 विमान कोसळलं आहे. सराव सुरु असताना विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती मिळत आहे. श्रीनगरहून या विमानाने उड्डाण केलं होतं. जम्मू काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील कलान गावात विमान दुर्घटनाग्रस्त झालं. तांत्रिक बिघाड झाल्याने विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती मिळत आहे.

दुर्घटना झालेल्या ठिकाणी दोन मृतदेह सापडले असून हे वैमानिकांचे असण्याची शक्यता आहे. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्याची दुसऱ्या दिवशी ही दुर्घटना झाली आहे.