रिलायंसने प्राइम मेंबरशिप सुरू केल्यानंतर आपले ग्राहक टिकावे यासाठी एअरटेलने ३४५ रुपयांमध्ये २८ दिवसांसाठी २८ जीबी डेटा ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत एका दिवसाला एक जीबी डेटा मिळणार आहे. याबरोबरच लोकल आणि एसटीडी कॉल पूर्णपणे मोफत मिळणार आहे. रिलायन्स जिओ आणि एअरटेल या दोन्ही नेटवर्कने दिवसाला १ जीबी डेटा वापराची मर्यादा ठेवली आहे. रिलायन्स जिओच्या प्राइमच्या ३०३ रुपयांच्या पॅक वर २८ जीबी डेटा मिळणार आहे. दिवसामधून तुम्ही केव्हाही एक डेटा वापरू शकाल परंतु एअरटेलने मात्र त्यामध्ये एक नियम ठेवला आहे. एअरटेलने ५०० एमबी डेटा दिवसा वापरावा आणि ५०० एमबी डेटा हा रात्री १२ ते सकाळी ६ या दरम्यान वापरावा अशी अट ठेवली आहे.

जर तुम्हाला या निर्बंधाशिवाय हा डेटा वापरायचा असेल तर ५४९ रुपयांमध्ये २८ जीबी हा डेटा पॅक घेता येतो. जे एअरटेलचे ग्राहक ३१ मार्च आधी हा डेटा पॅक विकत घेतील त्यांच्यासाठी ही ऑफर वर्षभर लागू राहील. तर जिओ प्राइम मेंबरशिपसाठी १ वर्षाचे ९९ रुपये भरावे लागतील आणि त्यानंतर तुम्हाला ३०३ रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. ५४९ रुपयांचे रिचार्ज करणाऱ्यांना एका आठवड्यास १,२०० मिनिटे मोफत व्हॉइसकॉल मिळणार आहे. तर त्यानंतर ३० पैसे प्रती मिनिट चार्ज लागणार आहे. एका दिवसाला ३०० मिनिटे म्हणजेच ५ तास मोफत कॉल करता येणार आहे. त्यानंतर ३० पैसे प्रती मिनिट मोजावे लागणार आहेत. एअरटेल आणि रिलायन्सच्या धर्तीवर आयडिया सेल्युलरनेही योजना काढली आहे. या योजनेअंतर्गत ३४८ रुपयांमध्ये २८ दिवसांसाठी १४ जीबी डेटा मिळणार आहे. एअरटेल आणि जिओच्या तुलनेत ही ऑफर फारशी प्रभावी ठरणार नाही असे तज्ज्ञांचे मत आहे. जिओ आणि एअरटेल प्रमाणे आयडियाची योजना सर्वांसाठी खुली नसून काही ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.