अफगाणिस्तानमध्ये आम्ही आमचं ध्येय पूर्ण केल्याचा दावा अमेरिकेकडून केला जात असला तरी अमेरिकवर असणारा दहशतवादाचा धोका कायम असल्याचा दावा अमेरिकन गुप्तचर यंत्रणेमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केलाय. अल कायदा हा दहशतवादी ग्रुप आता अमेरिकेने अफगाणिस्तानवरील ताबा सोडल्यानंतर पुन्हा एकत्र येऊन पुढील एक ते दोन वर्षात अमेरिकेवर मोठा दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता या सुरक्षा अधिकाऱ्याने व्यक्त केलीय.

“सध्याची परिस्थिती पाहता पुढील एक किंवा दोन वर्षांमध्ये अल कायदा अमेरिकेला दहशत दाखवण्या इतकी ताकद गोळा करु शकतं,” असं मत लेफ्टनंट जनरल स्कॉट बॅरियर यांनी मांडल्याचं ब्लुमबर्गने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. बॅरियर हे संरक्षण गुप्तचर विभागाचे निर्देशक आहेत. मंगळवारी गुप्तचर विभागाशीसंदर्भात एका कॉन्फर्नसमध्ये बोलताना आता अमेरिका पुन्हा अफगाणिस्तानमध्ये माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं बॅरियर यांनी सांगितलं. अमेरिका सध्या प्रत्येक प्रकारची माहिती मिळवण्यासाठी काय करता येईल आणि आपल्याला अफगाणिस्तानमधील माहिती कशी मिळेल याबद्दल विचार विनिमय करत असल्याचे संकेत बॅरियर यांनी दिले. “आम्ही सध्या ध्येय निश्चित करुन प्रयत्न करत आहोत. आम्ही आमची ध्येय डोळ्यासमोर ठेऊनच काम करणार आहोत. मात्र त्याचवेळी मिळाणाऱ्या माहितीबद्दल आम्ही साधव राहणंही गरजेचं आहे,” असं अफगाणिस्तानसंदर्भात बोलताना बॅरियर यांनी स्पष्ट केलं.

नक्की वाचा >> अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन करणाऱ्या तालिबानला इराणचा मोठा दणका, शेजाऱ्यांबद्दल म्हणाले…

सैन्य माघारी आणि २० वर्षांचा संघर्ष

अमेरिकेने तडकाफडकी अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी घेतल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. मात्र अमेरिकेने २० वर्षानंतर मागील महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यात सैन्य माघारी घेतलं. ११ सप्टेंबर २००१ म्हणजेच २० वर्षांपूर्वी ओसामा बिन लादेनच्या नेतृत्वाखाली ‘अल-कायदा’ने अमेरिकेवर दहशतवादी हल्ला केला होता. त्यात वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन मोठ्या इमारती त्यांनी उद्धवस्त केलेल्या. त्यानंतरच अमेरिकेने आपल्या लष्करासहीत अफगाणिस्तानवरील तालिबानच्या तळांवर हल्ला करत पहिल्यांदा अफगाणिस्तानच्या भूमीवर पाऊल ठेवलं होतं. त्यावेळी अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं सरकार होतं. अमेरिकने त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये सत्तांतर घडवून आलं होतं. हा संघर्ष २० वर्षे चालला अखेर अमेरिकने ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपलं संपूर्ण सैन्य अफगाणिस्तानमधून मागे घेत असल्याची घोषणा केलीय. अल कायदाला कमकूवत करणं आणि ओसामा बीन लादेनचा खात्मा करणं हे अमेरिकेचं मुख्य उद्दीष्ट होतं. ज्यात आम्हाला यश आलं आहे, असं अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आपल्या भाषणात म्हटलं होतं. ओसामाला तालिबान्यांनी संरक्षण दिल्याचं सांगण्यात आलेलं.

नक्की वाचा >> ८००० कोटींच्या मदतीसाठी तालिबानने संपूर्ण जगाचे मानले आभार; मात्र अमेरिकेला मारला टोमणा

या देशांपासूनही अमेरिकेला धोका

सीआयएचे उप निर्देशक डेव्हीड कोहेन यांनीही एक ते दोन वर्षात अल कायदा अमेरिकेवर हल्ला करु शकतं अशी भीती व्यक्त केलीय. तसेच गुप्तचर यंत्रणा अफगाणिस्तानमधील अल कायदाच्या हलचालींवर लक्ष ठेऊन असल्याचंही कोहेन म्हणालेत. मात्र अमेरिकेतील राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख एव्हरील हानिस यांनी अफगाणिस्तानमधून सैन्य माघार घेतल्यानंतर धोकादायक देशांच्या यादीमध्ये अफगाणिस्तानला आम्ही कमी महत्व देत असल्याचं याच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. तसेच येमेन, सोमालीय, सिरीया, इराक यासारख्या देशांकडून अमेरिकेला मोठा धोका असल्याचंही ते म्हणालेत. याच वर्षी जूनमध्ये संरक्षण सचिव लोयाड ऑस्टीन यांनी सिनेटच्या बैठकीमध्ये दोन वर्षांमध्ये अमेरिकेवर हल्ला करण्याइतकी ताकद अल कायदाकडे पुन्हा आली असेल असं म्हटलं होतं.

नक्की वाचा >> अफगाणिस्तानमधील लूडबूड पाकिस्तानला महागात पडणार?; भारताचा उल्लेख करत अमेरिकेने दिला इशारा

चीननेही दिलाय इशारा
काही दिवसांपूर्वीच चीनमधील सरकारी प्रसारमाध्यमाने अमेरिकेला पुन्हा एकदा मोठ्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात इशारा दिलाय. ग्लोबल टाइम्सचे संपादक हू शिजिन यांनी अमेरिकेवर पुन्हा ९/११ सारखा हल्ला होऊ शकतो अशी भीती व्यक्त केलीय. शिजिन यांनी ९/११ च्या हल्ल्याला २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त बोलताना ही शंका बोलून दाखवलीय. ग्लोबल टाइम्सच्या संपादकांनी, “११ सप्टेंबरचा हल्ला १९ दहशतवाद्यांनी केला होता. तो आत्मघाती हल्ला होता. मात्र हा दहशतवादी वृत्तीचा आत्मघात करणारा हल्ला नव्हता. आता दहशतवादी पुन्हा दुसऱ्या हल्ल्यासाठी सर्व शक्ती एकजूट करुन तयार होतील. तसेच चीनला आपला सर्वात मोठा शत्रू समजणं ही आपली चूक होती हे ही अमेरिकेला काळानुरुप समजेल,” असं मत व्यक्त केलंय. चीन आणि अमेरिकेचे संबंध कमालीचे बिनसले आहेत. चीनमध्ये उइगर मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचारांचं कारण देत अमेरिका आणि इतर सहकारी देशांनी चीनवर अनेक निर्बंध लादले आहेत.