दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी दिल्लीचे मुख्य सचिव अंशू प्रकाश यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. याप्रकरणी आपच्या आमदारांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ‘एएनआय’ने दिली आहे. दिल्लीच्या मुख्य सचिवांना आम आदमी पार्टीच्या आमदारांनी धक्कादायक केल्याचे वृत्त बिनबुडाचे असल्याचे सांगत आपने ते फेटाळले आहे. अशात आता याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

धक्काबुक्की आणि मारहाणीचे हे प्रकरण चिघळलं असून दिल्लीमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. “मुख्य सचिव अंशू प्रकाश यांच्या मारहाणीचा आम्ही निषेध करतो. आम्ही आत्तापासून संपावर जात आहोत. जोपर्यंत त्यांना मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही कामावर दाखल होणार नाही,” दिल्ली अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सबऑरिडिनेट सर्विसेसचे अध्यक्ष डी.एन. सिंग म्हणाले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी दिल्लीचे मुख्य सचिव अंशू प्रकाश यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचे वृत्त टाइम्स नाऊनं दिलं होतं. त्याबाबत बोलताना अंशू प्रकाश भाजपाच्या तालावर नाचत असून असे हास्यास्पद आरोप ते करत आहेत असं आपनं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

डी.ए. सिंग हे लेफ्टनंट जनरल अनिल बैजल यांनाही भेटले असून प्रकाश यांच्यावर झालेल्या शारीरिक हल्ल्यासाठी जे जबाबदार आमदार असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला हवी अशी मागणी त्यांनी केली आहे. हा घटनात्मक पेच असून आत्तापर्यंत असं कदीही घडलं नव्हतं असंही सिंग म्हणाले. केजरीवाल यांचे विश्वासू असलेल्या अमानुल्ला खान यांच्यासह एका आमदारानं प्रकाश यांना धक्काबुक्की केल्याचं सांगितलं जात आहे.

आधीच्या वृत्तानुसार अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी एका बैठकीसाठी अंशू प्रकाश गेले होते. यावेळी आपच्या दोन आमदारांनी त्यांच्यावर हल्ला चढवल्याचा प्रकाश यांचा दावा आहे. प्रकाश भाजपाच्या तालावर नाचत असून भाजपानं विरोध करताना खूपच खालची पातळी गाठली असल्याचा आरोप आपनं केला आहे. दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर तसेच अन्य अधिकारी यांच्या माध्यमातून भाजपा सरकार आपशी घाणेरडे राजकारण करत असल्याचा आरोप आपनं केला आहे.

मुख्यमंत्री व आपच्या दोन आमदारांविरोधात मुख्य सचिवांवर शारीरिक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सरकारी अधिकाऱ्यांनी केल्याचे वृत्त एनडीटिव्हीनं दिले आहे. आपनं प्रकाश यांचा दावा फेटाळला आहे तसेच प्रकाश यांनीच असभ्य भाषा वापरल्याचा आरोप केला आहे. “आधारची अमलबजावणी अयोग्य झाल्यामुळे दिल्लीतल्या अडीच लाख कुटुंबांना गेल्या महिन्यात शिधा मिळालेला नाही. जनतेकडून स्थानिक आमदारांवर प्रचंड दबाव आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सर्व आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी आमदारांना उत्तर देण्यास आपण जबाबदार नसल्याचे सांगत मुख्य सचिवांनी काहीही बोलण्यास नकार दिला. तसेच त्यांनी काही आमदारांविरोधात वाईट भाषा वापरली आणि कुठलंही स्पष्टीकरण न देता अंशू प्रसाद निघून गेले,” आपनं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

तर दिल्लीच्या प्रशासकीय सेवा संघानं याप्रकरणी बैठक बोलावली असून आम आदमी पार्टीच्या आमदारांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय या बैठकीत होऊ शकतो. दरम्यान, काँग्रेसनेही आपवर या प्रकाराबाबत टीका केली असून आपचे नेते गैरव्यवहारात गुंतल्याचा आरोप केला तसेच अशा प्रकारच्या गुंडागर्दीची काय गरज होती असा सवाल विचारला आहे.