जनलोकपाल आणि अन्य मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे रामलीला मैदानावरील आंदोलन शनिवारीही सुरू होते.  आंदोलनात सहभागी व्हायचे असले तर राजकारणात सक्रीय होणार नाही असे लेखी देण्याची अट अण्णांनी घातली आहे. केंद्र सरकारकडून मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील, असे हजारे यांनी आंदोलनाला बसण्याआधीच स्पष्ट केले होते. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी अण्णांची प्रकृती स्थिर होती मात्र एका आंदोलनकर्त्यांची प्रकृती ढासळल्याने त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले.

राळेगण ग्रामस्थांचे रास्ता रोको

पारनेर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या दिल्लीतील आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी राळेगणसिद्धीतील ग्रामस्थांनी शनिवारी पारनेर-शिरूर रस्त्यावर एक तास रास्ता रोको आंदोलन केले. नायब तहसीलदार दत्तात्रय भावले यांना निवेदन देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. रास्ता रोको आंदोलनानंतर संत यादवबाबात मंदिराच्या प्रांगणात साखळी उपोषण, घंटानाद आंदोलन करण्यात आले. तसेच सायंकाळी कॅन्डल मार्च काढण्यात आला.