आज संध्याकाळी राष्ट्रपती भवनात होत असलेल्या शपथविधी सोहळ्यात एकूण ४३ मंत्री शपथ घेत. यापैकी सात विद्यमान राज्य मंत्र्यांची पदोन्नती होईल. नवीन मंत्रीमंडळ गठीत करतांना मोदी सरकारने निवडणूक समीकरणांवर विशेष लक्ष केंद्रीत केल्याचे दिसते. मोदी सरकारने प्रसिद्ध केलेल्या यादीत उत्तर प्रदेशमधील एकूण सात नवीन चेहर्‍यांचा समावेश आहे. यामध्ये खासदार अनुप्रिया पटेल यांचा देखील समावेश आहे. अनुप्रिया पटेल मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात मंत्री होत्या. पण २०१९ मध्ये त्यांना मंत्री करण्यात आले नव्हते. आता निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना पुन्हा मंत्री करण्यात आले.

२०२२ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्ष आपल्या मित्रपक्षांना जवळ करत आहे. या पार्श्वभूमीवर एनडीएमध्ये सामील असलेला भाजपाचा सहयोगी ‘अपणा दल’चे राष्ट्रीय अध्यक्षा अनुप्रिया पटेल पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्री झाल्या आहेत. २०१४  मध्ये मोदी मंत्रिमंडळात त्या केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्रीही राहिल्या आहेत.

त्या केंद्रीय मंत्रिमंडळात येण्याचा प्रयत्न करीत होत्या

गेल्या महिन्यात गृहमंत्री अमित शहा यांची भेट झाली तेव्हापासूनच अनुप्रिया पटेल यांची मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागेल, अशी चर्चा रंगली होती. २०१९ मध्ये मोदी सरकार स्थापन झाल्यापासून, त्या मंत्रिमंडळात येण्याचा प्रयत्न करीत होत्या. कारण २०१९ मध्ये पुन्हा निवडणूक झाल्यानंतरही त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. दुसरीकडे, त्या उत्तर प्रदेशातील योगी मंत्रिमंडळातही आपल्या पक्षाचे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी दबाव आणत होत्या.

हेही वाचा- मंत्रिमंडळ विस्तारातून मोदींचे उत्तर प्रदेश निवडणुकांवर लक्ष? राज्याला मिळाली ७ केंद्रीय मंत्रिपदं!

उत्तर प्रदेशात निवडणुका होत असल्याने पटेल यांना पुन्हा संधी

लोकसभा मतदारसंघ मिर्झापूरमध्ये भाजपा नेते आणि मंत्री त्यांचे ऐकत नाहीत, अशीही चर्चा होती. पण एका चांगल्या सहकाऱ्याप्रमाणे त्यांनी मोदी आणि योगी यांच्याविरोधात कोणतेही विधान केले नाही. उलट उत्तर प्रदेशमधील पुढील निवडणुकांमध्येही त्यांनी युती कायम ठेवण्याचे त्यांनी आश्वासन दिले. आता उत्तर प्रदेशात निवडणुका होत असल्याने पटेल यांना पुन्हा संधी मिळाली आहे, कारण पूर्व उत्तर प्रदेशातील एका विशिष्ट क्षेत्रात आपना दलाची महत्वाची भूमिका आहे. अपना दल २०१४ पासून एनडीएचा मित्रपक्ष आहे.

वडीलांच्या निधनानंतर अनुप्रिया पटेल पक्षाचा मुख्य चेहरा

वडील सोनलाल पटेल यांच्या निधनानंतर अनुप्रिया पटेल पक्षाचा मुख्य चेहरा आहेत. १९९५ मध्ये सोनालाल पटेल यांनी पक्षाची स्थापना केली होती. २००९ मध्ये त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी कृष्णा पटेल यांना राष्ट्रीय अध्यक्ष आणि अनुप्रिया यांना राष्ट्रीय सरचिटणीस करण्यात आले. पण हळूहळू अनुप्रियावर तिच्या आईकडे दुर्लक्ष करून स्वत: ला पक्षाचा खरा वारस म्हणत असल्याचा आरोप लावला गेला. यावेळी पक्षाच्या अधिकाराबाबत आई-मुलीत वाद झाला. त्यानंतर आई कृष्णा पटेल हे आपल्या गटासह बाहेर पडल्या.

अनुप्रिया २०१२ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभेच्या सदस्य राहिल्या आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अपना दल दोन जागांवर लढला आणि दोन्ही जागेवर विजय मिळवला होता. तसेच दोन खासदार असूनही त्यांना मंत्रीपद देण्याबाबत राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली होती.