परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा खटला दाखल करू, असा इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे. राहुल गांधी यांनी सुषमा स्वराज यांचा उल्लेख गुन्हेगार असा केला. देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांबद्दल असे विधान करणे दुर्देवी असून, यातून केवळ स्वराज यांचाच नव्हे, तर संपूर्ण देशाचा अपमान झाला आहे. त्यामुळे राहुल यांनी या प्रकरणी माफी मागावी नाहीतर त्यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा खटला दाखल करावा लागेल, असे नितीन गडकरी माध्यमांना सांगितले. तसेच सुषमा स्वराज यांनी काहीही चुकीचे केलेले नाही. त्यांनी कोणता भ्रष्टाचार केला नाही, अशी पाठराखण देखील गडकरी यांनी यावेळी केली. दरम्यान, सुषमा स्वराज यांनी एका पळपुट्याला मदत करुन गुन्हेगारी कृत्य केले आहे. स्वराज यांनी राजीनामा द्यायलाच हवा. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असे सांगत राहुल गांधी यांनी ‘आधी राजीनामा, मग चर्चा’ या भूमिकेवर पक्ष ठाम असल्याचे लोकसभेत सांगितले होते.