‘आयफोन एसई’ दाखल, अंदाजे ३० हजारांत उपलब्ध

आपल्या महत्त्वाच्या उत्पादनांच्या विक्रीत घट होत असताना अ‍ॅपल कंपनीने स्मार्टफोन्स बाजारातील स्पध्रेत ‘आयफोन एसई’ बाजारात आणला आहे. भारतासारख्या बाजारपेठेत अ‍ॅपलाला पसंती मिळत असली तरी विक्रीच्या आकडेवारीमध्ये मात्र अ‍ॅपल मागे दिसते. यामुळे अ‍ॅपलच्या आतापर्यंतच्या फोनपेक्षा स्वस्त असा हा फोन बाजारात आणला आहे. ‘आयफोन एसई’द्वारे भारत आणि चीनमधील स्मार्टफोन बाजार आपल्या कवेत घेण्याचा अ‍ॅपलचा प्रयत्न असला तरी त्यासाठी अ‍ॅपलला नफ्यात मोठी घट सहन करावी लागणार आहे. भारतात अंदाजे ३० हजार रुपयांमध्ये हा फोन उपलब्ध होणार आहे.

‘आयफोन एसई’मुळे अ‍ॅपलला भारतासह मध्य-पूर्व आणि आफ्रिकन देशांमध्ये मोठी चालना मिळू शकेल, असा अंदाज आहे. मोठय़ा स्क्रीनचे स्मार्टफोन नको असणाऱ्यांसाठी ‘आयफोन एसई’ हा उत्तम पर्याय ठरू शकतो. या कमी किमतीच्या आयफोनकडे ग्राहक आकर्षित होऊ शकतात.यावेळी अ‍ॅपलचे सीईओ टिम कूक यांनी अ‍ॅपल वॉचच्या स्वस्त मालिकेचेही लाँच केले. याची किंमत २९९अमेरिकन डॉलर इतकी ठेवण्यात आली आहे. याचबरोबर यावेळी आयपॅड प्रोही सादर करण्यात आला. नव्या आयपॅड प्रोमध्ये आयपॅडवर चालणारे तब्बल दहा लाखून अधिक अ‍ॅप्स अ‍ॅप स्टोअरमध्ये उपलब्ध असल्याची माहिती टिम कूक यांनी सांगितले. याची स्क्रीन ९.७ इंचांची देण्यात आली आहे. याचबरोबर १२.९ इंचांचे आयपॅडही बाजारात आणले आहे. या दोन्ही आयपॅडसोबत स्मार्ट की-बोर्ड आणि अ‍ॅपल पेन्सिल उपलब्ध करून देण्यात आली आहे. याची किंमत ३२ जीबीच्या उपकरणासाठी ५४९अमेरिकन डॉलर्स, १२८ जीबीचे उपकरण ७४०अमेरिकन डॉलर, २५६ जीबीच्या उपकरणाची किंमत ८९९ अमेरिकन डॉलर इतकी ठेवण्यात आली आहे. याची नोंदणी २४ मार्चपासून सुरू होणार आहे.

या नव्या आयफोनची स्क्रीन चार इंचांची असून त्यामध्ये ६४ बीट ए ९ प्रोसेसर देण्यात आला आहे. यात १६ जीबीची अंततर्गत साठवधूक क्षमता देण्यात आली आहे. तसेच यामध्ये मुख्य कॅमेरा बारा मेगापिक्सेलचा देण्यात आला आहे. यामध्ये एम ९ कॉम्प्रेसर, सिरि, यामध्ये जलद एलटीई, व्हॉइसओव्हर एलटीई, वायफाय कॉलिंग, ब्लूटय़ूथ ४.२, आयओएस ९.३ अशी अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्ये फोर के व्हिडीओ देण्यात आला आहे. यामध्ये अ‍ॅपल पेची सुविधाही देण्यात आली आहे. या आयफोन एसईच्या १६ जीबीच्या उपकरणाची किंमत ३९९अमेरिकन डॉलर्स तर ६४ जीबीच्या उपकरणाची किंमत ४९९ डॉलर इतकी ठेवण्यात आली आहे.